श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ कुरूपता.. तिची? की जगाची??? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
Mary Ann Bevan
नवरा होता तोवर तिला कशाची फिकीर नव्हती. इतकी वर्षे सांभाळलेली परिचारिकेची नोकरी तिला गमवावी लागली होती पण नव-याचा व्यवसाय चार मुलांचे पोट भरण्याइतपत ठीकठाक होता. पण एकदिवशी दैवाने तिचा आणि तिच्या लेकरांचा आधार हिरावून घेतला आणि ती रस्त्यावर आली!
या जगात दिसणं हे जगात असण्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे तिला कळून चुकलं होतं… किंवा निसर्गाचं काही तरी चुकलं हे तिला कळालं होतं असं म्हणा हवं तर!
कुणाही चारचौघींसारखा तिचा संसार सुरु होता. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तिला त्यावेळी लगेचच रोजगार मिळवून देणारी, तिच्या सारख्या नाजूक मुलीला सहज पेलू शकणारी आणि मुख्य म्हणजे तिच्यातल्या मार्दवाला साजेल अशी नोकरी मिळाली… नर्सची नोकरी. दिसायला ती गोड होतीच शिवाय तिचा स्वभाव अतिशय लाघवी. त्यामुळेच एक शेतकरी भला मनुष्य तिच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांनी मिळून संसार थाटला. तिला आईपणाबद्दल खूप आकर्षण होतं. तिला मुलं हवीहवीशी वाटायची. चार मुलं झाली तिला. आणि नोकरी सांभाळून ती या चारही मुलांकडे अतिशय निगुतीने लक्ष द्यायची. प्रत्येक मुलावर तिचं जीवापाड प्रेम होतं. आणि मुलांसाठी आई नावाचा जीव काहीही म्हणजे काहीही करू शकतो! आणि अगदी तसंच करण्याची वेळ तिच्यावर ओढवली…!
तिचे हात, पाय सुजू लागले, तिच्या अन्य अववयांच्या मानाने मोठे दिसू लागले… आणि चेहरा अनैसर्गिकरीत्या वाढू लागलं… एका सुंदर फूलपाखराचं जणू पुन्हा सुरवंटामध्ये रुपांतर होऊ लागलं होतं. तिच्या दोन्ही डोळ्यांखाली सूज वाढू लागली.. तिथली त्वचा खाली लोंबू लागली…. हनुवटी मोठी होऊ लागली… स्त्रीचं शरीर पुरुषी दिसू लागलं होतं… भयावह स्थिती होती ही. वैद्यकीय परिभाषेत या विकाराला acromegaly असं नाव होतं आणि त्याकाळी या विकारावर उपचार नव्हते फारसे.
मेरी आता असाहाय्य होती. नर्सची नोकरी तिला सोडावी लागली. आणि अन्य कोणत्या नोकरीवर तिला कुणी ठेवून घेईना… जवळची पुंजी तर संपली होती. मुलांची आयुष्ये आता तर कुठे सुरु झाली होती… कसं होणार?
इतरांच्या दु:खावर, व्यंगावर जगणारा समाजाचा एक वर्ग सर्वत्र असतोच. तिच्याही आसपास असे लोक होतेच. कुणीतरी ‘सर्वाधिक कुरूप महिला’ निवडण्यासाठी एक स्पर्धाच आयोजित केली… तिच्यासारख्या सुमारे अडीचशे महिलांनी यात त्यांचे नशीब आजमावले होते…. आणि मेरीने ती स्पर्धा जिंकली! हा विजय नव्हता.. परिस्थितीपुढे तिने स्वीकारलेली शरणागती होती… आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी एका मातेला पत्करावा लागलेला हा अत्यंत घृणास्पद पर्याय होता!
यामुळे मेरी काहींच्या नजरेत भरली… त्यांची सर्कस होती… जंगली प्राण्यांची आणि माणसांची सुद्धा. त्यांनी निसर्गाने केलेल्या चुकांचा बाजार मांडला होता.
पाच फूट सात इंच उंचीचं शरीर, १५४ पौंडस वजन आणि ११ साईजचा पाय आणि २५ साईज हात! एक महाकाय कुरूपता… लोकांना बघायला मांडलेली… लोकही ही विचित्र मूर्ती बघायला गर्दी करायचे… सर्कसवाले मग मेरीला आणखीनच विचित्र पोशाख घालायला लावायचे. लोक तिची मनोसोक्त थट्टा करीत… पिंज-यातल्या हिंस्र श्वापदांना लोक सोडत नाहीत… ही तर असहाय्य… अबला… आणि एक आई! कित्येक वर्षे ती शारीरिक आणि मानसिक वेदना सहन करीत राहिली… या विकारामुळे तिच्या दृष्टीवर सुद्धा दुष्परिणाम झाला होता…. त्यामुळे तिला तिच्याकडे बघून हसणारे लोक काहीसे धूसर दिसत होते.. इतकेच!
या विकारावर तिने काही उपचारही घेण्याचा प्रयत्न केला… पण पदरी निराशाच पडली! तिचा कुरूपतेकडून अधिक कुरूपतेकडे जीवघेणा प्रवास सुरूच राहिला.. तो तिच्या वयाच्या एकोणसाठाव्या वर्षापर्यंत म्हणजे १८८० पर्यंत. मृत्यूने तिची सुटका केली!
एका जगप्रसिद्ध संस्थेने २००६ मध्ये एक Birth Day कार्डही बनवून विक्रीस ठेवले होते यात जगातील सर्वाधिक कुरूप महिला म्हणून मेरीचा संदर्भ दिला होता! Netherland मधील एक वैद्यकीय व्यावसायिक लंडनमध्ये सुट्टीसाठी आलेला असताना त्याच्या नजरेस ही भेट (?) कार्ड्स पडली. त्याने या विरोधात तक्रार केली असता, या संस्थेने या कार्ड्सची पुढील छपाई स्थगित केली… मात्र आधीच बाजारात पाठवली गेलेली कार्ड्स परत घेतली नाहीत… व्यवसाय महत्त्वाचा… मग तो एखाद्याच्या मर्मावर घाव घालणार का असेना… मेरीपेक्षा हे जग जास्त कुरूप निघाले!
मेरी निसर्गाने तिच्या शरीराशी केलेल्या विश्वासघाताची बळी ठरली… पण यामुळे मिळालेल्या पैशांतून तिने तिच्या चारही मुलांना दूरच्या ठिकाणी वसतिगृहात ठेवून शिकवले आणि त्यांच्या पायांवर उभे केले… आई मुलांसाठी काहीही करू शकते.. हे Mary Ann Bevan ने सिद्ध केले!
नुकत्याच झालेल्या मातृदिवसानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मेरीची ही कथा सांगितली. लेकरांसाठी खस्ता खाऊन कष्टाचे डोंगर उपसणा-या सर्व मातांना या निमित्ताने साष्टांग दंडवत… जगातली कोणतीही आई सुंदरच असते…
(लेखासाठी मेरी यांचे त्यांच्या आजारापूर्वीच्या आयुष्यातील एक छायाचित्र वापरले आहे… नंतरचे छायाचित्र हेतुपुरस्सर टाळले आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈