श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

डॉ. प्रदीप महाजन

☆ “कीर्तिवान! पुण्यवान…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

(डॉक्टर त्यांच्या तंद्रीत रुग्ण तपासण्यामध्ये गर्क झाले होते. मग आमचं बोलणं सुरू झालं. लोक भेटायला येत होते. आम्ही जेवण केलं. तिथल्या परिसरात फेरफटका मारला, तरी आमचं विषयाला धरून बोलणं सुरूच होतं.) – इथून पुढे —– 

एका छोट्याशा शहरातला मुलगा, ज्याचे वडील साधे किराणा दुकान चालवायचे, ‘तो’ मुलगा आज जगातल्या ऐंशी देशांमध्ये जाऊन आरोग्यसेवेचे काम करतो. व्यवसाय आणि आरोग्य याचा तीळमात्र संबंध न ठेवता, केवळ सामाजिक भाव ठेवून, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बरं करायचं ही माझी जबाबदारी आहे असं समजत, लाखो रुग्णांचा खर्च उचलत जगाला सामाजिक सेवेने भुरळ घालणाऱ्या डॉ. महाजन यांची कहाणी थक्क करणारी होती.

डॉ. प्रदीप महाजन (८८९८०७०९०४) नांदेड येथील जुना मोंढा भागातील व्यंकटराव महाजन या व्यापाऱ्याचा मुलगा. घरी छोटे दुकान, सहा भाऊ. वडिलांना वाटायचं की, सहापैकी एकातरी मुलानं डॉक्टर व्हावं, सेवाभावी कामाचा घरात असणारा वारसा पुढे चालवावा.

तेव्हाच्या हलाखीच्या परिस्थितीत डॉ. महाजन यांनी अंबाजोगाई येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. छ. संभाजीनगरमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेत सुपर स्पेशलायझेशन केले. मुंबईच्या कोपरखैरणे भागात १९८८ ला त्यांनी स्वतःचा एक छोटासा दवाखाना सुरू केला. या काळातही त्यांनी शिक्षण बंद केलं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या बारा उच्च पदव्या मिळाल्यानंतर डॉक्टर तेरावी पदवी घेण्यासाठी आजही शिकत आहेत.

‘मूत्रतज्ञ’ आणि ‘मूळपेशी’ यातील तज्ज्ञ अशी डॉक्टरांची ओळख आहे. या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या खासियत आहेत. त्यातील पहिली खासियत आहे, येणारा रुग्ण हा माझ्यासाठी एक जबाबदारी घेऊन येतोय. तो माझ्यापर्यंत आला म्हणजे तो जबाबदारीतून मुक्त होतो. आता मी त्याला बरा करणार आहे. त्याच्याकडे पैसा आहे का नाही, याचं मला काही देणंघेणं नाही. हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर अविरतपणे करत आहेत.

त्या पाड्यावरून आम्ही निघालो. एकाच गाडीमध्ये सुरू झालेल्या प्रवासात आमच्या गप्पा सुरूच होत्या. मी डॉक्टराना म्हणालो, ‘डॉक्टर साहेब, टोपी काढा आता. आपण एसी गाडीत आहोत’.

डॉक्टर साहेबांनी टोपी काढली आणि लगेच टोपी घातली. म्हणाले, ‘ही टोपी माझ्या वडिलांची देन आहे. माझे वडील गेले, तेव्हा मी केस कापले, तेव्हा टोपी घातली. तेव्हा सारेच म्हणत होते, टोपी खूप छान दिसते. मग अनेक पद्धतीच्या टोपी घेतल्या आणि ती नियमित घालत आहे.

डोळ्यांवरचा चष्मा काढत डोळ्यांत आलेले पाणी पुसत डॉक्टर म्हणाले, ‘बाप जातानाही काहीतरी देऊन गेला. लहानपणी दुकानात बसलेला बाप चणे फुटाण्यासाठी १० पैसे द्यायचा. उड्या मारत चणे फुटाणे खायचो. घरी आल्यावर बाप म्हणायचा, ‘तुला जसा आनंद मिळतो ना, तसा लोकांच्या दुःखात सहभागी हो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहा. पोरा, डॉक्टर हो’. मला घेऊन बापाच्या डोळ्यात सेवाभावी स्वप्न होते. आज जगभरात आरोग्याचे काम करताना माझा बाप मला त्या प्रत्येक दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू आल्यावर दिसतो’.

डॉक्टर जे जे बोलत होते, ते सारे काही अद्भुत होते. ते सारे मी शांतपणे ऐकत होतो.

डॉ. प्रदीप महाजन जगातल्या त्या सर्व सर्वश्रेष्ठ डॉक्टरांमधील एक होते. त्यांच्या स्पेशल असलेल्या विषयापेक्षा सर्वसमावेशक विषयात रुची घेऊन ते प्रचंड काम करतात. जगातल्या ८० देशांत आरोग्याच्या निमित्ताने नेहमी जाणे येणे असलेल्या देशात डॉ. प्रदीप महाजन यांनी आरोग्यक्षेत्रात, संशोधनात, शिकवणीत दिलेले योगदान कदाचितच कुणी दिले असेल.

डॉ. प्रदीप महाजन यांनी भारतासह केनिया, मॉरिशस, नेपाळ, घाणा या देशांत सेवाभावी दवाखाने उभे केले आहेत. मी डॉ. प्रदीप महाजन यांना म्हणालो, ‘सर, जगातील आरोग्यसेवा आणि भारतातील आरोग्यसेवा याकडे तुम्ही कसे पाहता? ‘

त्यावर डॉ. महाजन म्हणाले, ‘भारत सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. आरोग्यसेवेत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अलीकडे तर रिसर्च, विमा सुविधा, एकूण आरोग्य यंत्रणा यात भारताने दिलेले योगदान खूप मोठे आहे. फक्त धंदा म्हणून आरोग्यसेवेकडे पाहणाऱ्या लोकांवर वचक ठेवायला अनेक वेळा सरकारी यंत्रणा कुचकामी ठरते’.

डॉक्टरांशी बोलताना मी नाशिकची रत्नमाला आणि गीताबाई यांचा विषय काढला. त्यावर डॉक्टर म्हणाले, ‘देवाने आपल्याला भरपूर दिले आहे. त्यातले थोडे थोडे इतरांना द्यायचे. आपला जन्म इतरांना देण्यासाठीच झाला आहे, हे माझ्या वडिलांचे सूत्र घेऊन मी आयुष्यभर त्याचे पालन केले. आपल्या पेशंटच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे. माझ्याकडे सेवाभाव आहेच. यात अजून वाढ होतच राहते.

सेवाभाव रुजावा, माझ्या सोबतच्या टीमने, दुसऱ्या पिढीने माझा वारसा कायम चालू ठेवावा, यासाठी मी फॅमिली वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. मोफत रुग्णसेवा, विम्यातून आरोग्यसेवा, शासकीय मदतीतून आरोग्य सेवा, वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमधून आरोग्यसेवा देत रोज किमान शंभर रुग्ण मी पाहत असेन. ‘

आम्ही बोलत बोलत डॉ. महाजन यांच्या कोपरखैरणे येथील घरी पोहचलो. डॉ. महाजन म्हणाले, ‘मला परदेशातील दोन ऑपरेशन करायचे आहेत. तुम्ही थोडे बसा’, यावर मी डॉक्टरांना म्हणालो, ‘मी सोबत असलो, तर चालेल काय? ‘ डॉक्टर म्हणाले, ‘येस कम, कम’.

मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. एक आफ्रिका आणि दुसरे दुबई या दोन ठिकाणच्या दोन पेशंटचे ऑपरेशन डॉक्टरांनी केले. मी फार चकित झालो. दीड तासात दोन ऑपरेशन झाले होते. कात्री घ्या, कापा, शिवा. हे औषध द्या, ते औषध द्या. संपूर्ण ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टरांचे डोळे आणि हात भरभर काम करीत होते.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यावर गावकुसातून आलेले अनेक रुग्ण डॉक्टरांनी तपासले. एक तंत्रज्ञ दवाखान्यात आलेल्या नवीन मशीन सुरू करून युद्धपातळीवर काम करीत होता. एक महिला सर्वांना ‘जेवण केले का? काही अडचण आहे का? औषधी घेतली का? ‘ अशी विचारणा करीत होती. ‘तो व्यक्ती’ आणि ‘ती महिला’ यांची ओळख करून देताना डॉ. महाजन म्हणाले, ‘हा माझा मुलगा सिद्धान्त आणि ही माझी पत्नी विपुला, सर्व सांभाळतात. सिद्धान्त आर्मीमध्ये ऑफिसर होता. आता खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च करतो. माझे दवाखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन तोच सांभाळतो’. माझ्या लक्षात आले, डॉक्टरांनी त्यांचा सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी माणसे तयार केली आहेत.

डॉ. महाजन एका स्कुटरवर हात ठेवत म्हणाले, ‘संदीप, माझा मोठा भाऊ विजयकुमार महाजन यांनी मला डॉक्टर झाल्यावर ही स्कुटर दिली होती. बापाच्या नंतर ‘भाऊ’ बाप म्हणून सावली देत असतो. तसेच समाजाच्या बाबतीत असते. कोणी काहीही देणार नाही, कोणी जाणीव ठेवणार नाही, कोणी मदत करणार नाही, हे माहिती असतानादेखील आपण समाजासाठी काम करीत राहणे, त्यात सातत्य ठेवणे हे फार आवश्यक आहे. ’

मी संस्थेच्या ऑफिसमध्ये पाहत होतो. पुढचे दहा बारा दिवस जगभर आरोग्य कँम्पचे नियोजन केले आहे. कुठे औषधी पाठवायचे आहेत, कुठे रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे द्यायचे, कुठे सांत्वनासाठी भेटीला जायचे आहे. बापरे! एक माणूस किती कामे करतो! मी नुसता विचार करीत होतो.

जगभर डॉक्टरांचा अनेक वेळा सन्मान झालाय, पण आपल्या देशात मात्र डॉक्टरांचा सन्मान झाला नाही, हेच मी पाहत होतो. एवढे मोठे साम्राज्य सांभाळायचे कसे? हा प्रश्न डॉक्टरसाहेब यांच्या समोर नक्की आहे. उद्याचा खर्च भागवायचा गंभीर विषयही आहे. अनेक विषय गंभीर आहेत, तरीही डॉक्टर साहेबांचा सेवेचा उत्साह काही कमी झाला नाही.

मी डॉक्टरांचा निरोप घेऊन निघणार, इतक्यात सिद्धान्त आणि विपुलजी यांनी माझा पाहुणचार केला. मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या ‘रसाळी’च्या जेवणाने मी एकदम तृप्त झालो आणि ‘मलबार हिल’कडे निघालो.

मी विचार करीत होतो, काही काही माणसे किती मोठमोठी कामं करतात! आज जगाच्या कानाकोपऱ्यात डॉ. प्रदीप महाजन आरोग्य सेवेचा वसा घेऊन प्रचंड पुण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामातून त्यांची ‘कीर्ती’ सातासमुद्रापार गेली आहे. त्यांचे काम आणखी उत्साहात चालण्यासाठी त्यांना आर्थिक आणि मानसिक मदतीची गरज नक्कीच आहे. आपल्या अवतीभोवती असे ‘कीर्तिवान’, ‘पुण्यवान’ अनेक ‘हिरे’ आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. बरोबर ना?

– समाप्त –

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments