श्री संदीप काळे
इंद्रधनुष्य
☆ “कीर्तिवान! पुण्यवान…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆
परवा नाशिकला गेल्यावर मुक्त विद्यापीठाच्या परिसरात जेवायला गेलो होतो. साध्या झोपडीत एका चुलीवर एक बाई ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमधील स्वयंपाकाला लाजवेल, असा स्वयंपाक करीत होती. त्या महिलेच्या दोन जुळ्या मुली मला आणि माझा मित्र गणेशला जेवायला वाढत होत्या.
जेवण झाल्यावर माझा ‘सारथी’ विजय, त्या बाईच्या घरभर फिरून ती स्वयंपाकासाठी काय काय साधनसामुग्री वापरते, हे पाहण्यामध्ये मग्न झाला होता. घरात एकूण आठ भांडे होते. त्यातल्या चार भांड्यांत सारी औषधे, गोळ्या होत्या आणि चार भांड्यात जेवण बनवायचे साहित्य.
माझा सारथी एकदम बडबड्या, हसी-मजाक करणारा. आम्ही दोघं बाहेर जेवत होतो.
माझा सारथी बाहेर आला आणि म्हणाला, “संदीप सर, ह्या मावशी जेवणात मसाल्याऐवजी औषधाच्या गोळ्या टाकतात, असं मला वाटतं. ” त्यावर मी त्यांच्याकडे गंभीरपणे पाहिलं. तेव्हा तो तितकाच गंभीर होऊन मला म्हणाला, “अहो सर, किचनमध्ये असलेल्या बऱ्याच डब्यांमध्ये गोळ्या आणि औषधे आहेत. मला दिसते, म्हणून मी तसं म्हणालो. “
मी थोडीशी ‘स्माईल’ विजयला दिली आणि पुन्हा शांतपणे जेवण करत होतो. विजय बोलता बोलता गंमतीत बोलून गेला.
या महिलेच्या घरात एवढ्या गोळ्या, औषधे का? असा प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता. जेवणानंतर मी त्या महिलेला त्या गोळ्या आणि औषधांबद्दल विचारल्यावर ती काहीच बोलत नव्हती. एकदम शांत असलेल्या महिलेने गोळ्या औषधाचे नाव काढल्यावर दोन्ही मुलींकडे गंभीरपणे कटाक्ष टाकला. माझ्या लक्षात आलं की, काहीतरी गंभीर विषय असणार. खूप खोदून, खोदून विचारल्यावर ती महिला ‘आजारी आहोत, काहीतरी झालंय’, असं सांगत होती.
स्वयंपाक करणाऱ्या त्या महिलेच्या पतीचा फोटो घरामध्ये दर्शनी भागात लावला होता. त्या फोटोला घातलेल्या हारामुळे त्यांचं अलीकडच्या काळामध्येच निधन झाल्याचं लक्षात येत होतं.
आता गणेश आणि विजय दोघेही बाहेर गेले होते. आता एकान्त आहे हे लक्षात घेऊन हळूच सांगितलं, ‘कारभारी आणि मला दोघांनाही मोठा आजार झाला होता. त्यात कारभारी जात राहिले. तो आजार माझ्या दोन्ही मुलींनाही झाला. कुणाचा तरी आधार मिळाला आणि या आजारातून आम्ही तूर्तास तरी सगळे विसरून कामाला लागलो’. त्या महिलेने मागच्या अनेक वर्षांपासूनच आजारामुळे त्रासून गेलेले जीवन माझ्यासमोर ठेवले.
‘त्या’ महिलेसोबत काम करणारी दुसरी एक महिला, तिनेही जे काही घडलं ते मध्ये मध्ये सांगायला सुरुवात केली. काय-काय खाचखळग्यांनी भरलेलं एखाद्याचं आयुष्य असतं! ज्या आयुष्याला वाट काढता काढता नाकी नऊ येऊ लागतात. त्यातच असं कोणीतरी भेटतं, जो आधार देतो. आणि मग आयुष्य जगण्याचा पुन्हा लळा लागतो, असंच काहीसं या कुटुंबाच्या बाबतीत झालं होतं.
मी ज्या महिलेशी बोलत होतो, त्या महिलेचे नाव रत्नमाला सूर्यवंशी. रत्नमाला सूर्यवंशी हिचे पती, त्र्यंबक सूर्यवंशी यांचे एच आय व्ही संसर्गाने निधन झाले. रत्नमालासह तिच्या दोन्ही मुली एच. आय. व्ही. बाधित आहेत. रत्नमालाकडे काम करणारी गीताबाई नावाची महिला ‘कॅन्सरग्रस्त’ आहे. तिने मुंबईमध्ये एका डॉक्टरच्या मदतीने कॅन्सरचे मोफत उपचार घेतले. ज्या मुंबईच्या डॉक्टरने त्या महिलेला खूप मदत केली, त्याच डॉक्टरांचा संदर्भ घेऊन रत्नमाला उपचारासाठी मुंबईला गेली. योग्य वेळी योग्य ते उपचार न झाल्यामुळे रत्नमालाचे पती त्रिंबक यांचे निधन झालं होतं.
रत्नमाला आणि तिच्या दोन्ही मुलींना त्याच मदत करणाऱ्या डॉक्टरांनी समुपदेशनच्या माध्यमातून बाहेर काढलंच काढलं. त्यांच्यावर होणारा पूर्ण औषधाचा खर्च, त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, सर्व काही डॉक्टरांनी स्वतः करून दिले. रत्नमाला, गीताबाई आणि जाई-जुई ह्या चौघीजणीही त्या मुंबईच्या डॉक्टरांचे अफाट कौतुक करत होत्या.
गीताबाई म्हणाली, ‘आमच्या परिसरातील अनेकांना त्या डॉक्टरांनी देवदूत बनून मदत केली आहे. माझ्या गावातील एका माणसाच्या सांगण्यावरून मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि माझा जीव वाचला’. असं गीताबाई सांगत होत्या.
‘ते’ डॉक्टर कोण? ‘ते’ कुठे राहतात? त्यांचा पत्ता काय आहे? त्यांचा संपर्क नंबर काय आहे? त्यांची संस्था कुठली? अशी माहिती मी रत्नमाला यांच्याकडून घेतली आणि परत मुंबईकडे जायला निघालो.
मी बाहेर पडणार, इतक्यात रत्नमालाची मुलगी जुई मला म्हणाली, ‘आमच्याकडे परत जेवायला येणार ना भाऊ? ‘
मी लगेच म्हणालो, ‘हो येणार ना. का नाही येणार? ‘
त्यावर जुई म्हणाली, ‘जेव्हा आम्हाला मोठा आजार आहे हे लोकांना कळतं, तेव्हा ‘ती’ माणसं आमच्याकडे जेवायला येणं बंद होतं. आणि ‘ती’ माणसे जेवायला येणं बंद झालं की, उदरनिर्वाहाचे सगळे मार्ग बंद होतात.’
तिचं ते बोलणं ऐकून माझं मन एकदम सुन्न झालं. तिला काय बोलावं, हे मला कळत नव्हतं. मी तिला हळूच म्हणालो, ‘तुम्हाला जो आजार झाला आहे, तो आजार तुमच्या सहवासात कुणीही आलं तरी त्याला होत नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. जी माणसं अडाणी आहेत, त्यांना काहीच कळत नाही. ते अशा प्रकारचा दुरावा करीत असतील. मी खिशामध्ये हात घातला खिशात थोडेबहुत पैसे होते, ते त्या मुलीच्या हाती ठेवले आणि मी माझा परतीच्या मार्गाला लागलो.
मुंबईच्या ‘त्या’ डॉक्टरांनी ‘त्या’ महिलेचे तिच्या कुटुंबीयांचे प्राण का वाचवले असतील? त्या सर्वांसाठी स्वतः खर्च का केला असेल? त्या डॉक्टरांनी अनेकांना का मदत केली असेल? असे अनेक प्रश्न मला पडले होते. मी अधिकचा विलंब न लावता त्या डॉक्टरांना फोन केला. त्यांच्याशी माझं प्राथमिक स्वरूपात बोलणं झालं. मुंबईमध्ये गेल्यावर भेटण्यासाठी त्यांची वेळही घेतली.
ज्या दिवशी भेटीची वेळ ठरली होती, त्याच दिवशी सकाळी डॉक्टर फोन करून मला म्हणाले, ‘मी रात्री मुरबाड जवळच्या एका आदिवासी पाड्यावर तपासणीसाठी गेलो होतो. तिथे आसपासचे अनेक रुग्ण आले होते. त्यामुळे रात्री खूप उशीर झाला. सकाळी त्याच भागात दुसरीकडे एका ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबीर लावले होते. म्हणून तिकडेच थांबलो. मी दिलेल्या पत्त्यावर, तुम्ही आदिवासी पाड्यावर येऊ शकाल का? ‘
क्षणाचाही विलंब न लावता मी ‘हो’ म्हणालो. आदिवासी पाड्यावर सकाळी सकाळी जाऊन पोहोचलो. तिथे महिलांची प्रचंड गर्दी होती. छान ड्रेसमध्ये चष्मा, टोपी घालून डॉक्टर सगळ्यांना तपासत होते. ‘बस बेटा, जा बेटा, ये बेटा, बेटा, बेटा, बेटा’ हाच शब्द डॉक्टरांच्या तोंडी होता. डोळ्यांची तपासणी, रक्ताची तपासणी, तिथेच रिपोर्ट, तिथेच औषधे, सगळ्या प्रकारच्या रोगांवर उपचार आणि औषध एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था डॉक्टरांनी केली होती.
मी नमस्कार करून डॉक्टरांना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘आता एवढे पेशंट झाले की, आपण गप्पा मारत बसू. ‘
मी आसपास असणाऱ्या अनेक लोकांना ‘हे डॉक्टर कोण आहेत? ते कधीपासून येत आहेत? ‘ हे विचारत होतो. तसे डॉक्टरांचे काम शहरातल्या लोकांसाठी असते, पण या डॉक्टरांना मात्र आदिवासी पाड्यांवर किंवा ग्रामीण भागामध्ये भेटण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी यावं वाटते. ही डॉक्टरांची खासियत होती.
डॉक्टर त्यांच्या तंद्रीत रुग्ण तपासण्यामध्ये गर्क झाले होते. मग आमचं बोलणं सुरू झालं. लोक भेटायला येत होते. आम्ही जेवण केलं. तिथल्या परिसरात फेरफटका मारला, तरी आमचं विषयाला धरून बोलणं सुरूच होतं.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈