श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “दुधाई! दुग्धदात्री!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भयाण अंधार आणि अगदीच जंगली श्वापदांचा नसला तर भटक्या कुत्र्यांचा तर निश्चित वावर असलेला परिसर… कुणाचाही पायरव नाही…. थरथरणा-या पानांना रातकिड्यांची साथ! कुठं लपू मी? कशी लपू मी? ती घायाळ हरिणी भांबावून गेलेली होतीच… पण गेल्या काही तासांपूर्वी ती सर्व भयापासून मुक्तही झाली होती…. भय जीव असलेल्या देहाला वाटते… मृतदेह कुणाला घाबरेल? मृतदेह बघून जग भयभीत होतं! पण… तिचं पाडस मात्र तिला सोडायला राजी नव्हतं! पाडसाला भूक आणि तहान या दोन्ही गरजा भागवू शकणारा तिच्या तनूतील एक अवयव नैसर्गिक प्रेरणेने आणि गेल्या नऊ महिन्यांच्या सरावाने ठाऊक झालेला होता! पाडसाने तिच्या देहावरचं आधीच काहीसं फाटलेलं प्रावरण भुकेचा जोर लावून जरुरीपुरतं फाडण्यात यश मिळवलं होतं…. आणि त्या पाडसाची जगण्याची धडपड सुरू होती… रात्रीने डोळे मिटून जणू काहीच घडत नाहीये असं भासवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता…. उगवलेल्या सूर्यानं रात्रीची त्या अवघडलेपणातून सुटका केली!
जग जागं झालं…. आणि तिथं माणसांचा वावर सुरु झाला…. एकाने पाहून दुस-याला सांगितलं…. अंतर राखत गर्दी उभी राहिली… दबक्या आवाजात चर्चा आणि हळहळ हा नेहमीचा सोपस्कार गर्दीला सरावाने छान जमून गेला आहे… त्या हरिणीचं पाडस खरं तर रात्रभर खूप दमून गेलं होतं… पण भूक भागेस्तोवर डोळा लागणार तरी कसा? आज आईच्या उरातला स्निग्ध स्राव असा आटत आटत का बरं गेला असावा? रागावली की काय गाय… वासरू मनात स्वत:लाच प्रश्न विचारत असावं… कारण त्याचं रडणं तिला पान्हा फोडत नव्हतं… पूर्वी असं त्याच्या अनुभवास नव्हतं आलेलं कधी. त्यात वासराच्या पायाला काहीतरी बोचलं होतं…. रक्तही वाहत असावं बहुदा… पण वेदनेशिवाय त्याला काहीही व्यक्त करता येत नव्हतं… बाळाचं रडू प्रत्येक वेळी वेगळं असतं…. पण हे जाणणारं तिथं कुणी नव्हतं!
गर्दीतील कुणीतरी कर्तव्य भावनेने पोलिस यंत्रणेस खबर दिली…. एक स्त्री निपचित पडलेली आहे… तिच्या कुशीमधलं बाळ… हालचाल करीत नाही… म्हणजे ते सुद्धा….? पोलिसांनी मग लगबगीने एका आईला फोन केला….. लगोलग येते म्हणाली! बेवारस प्रेतं, पैशांअभावी अडून राहिलेले गरीबांचे मृतदेह… यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तिने स्वत:हून खांद्यावर घेतलेली होती. एरव्ही तिरडीला पुरूषच खांदे देतात…. हिने मात्र एकटीने एका अर्थाने सबंध तिरडीच खांद्यावर वाहण्याचा चंग बांधलेला आहे.. आजवर शेकडो तिरड्यांना तिने खांदा दिलाय! अर्थात तिच्या मदतीला काही सुहृद माणसांचे हात असतातच!
ती अवघ्या दहा मिनिटांत तिथे हजर झाली…. देहाचं निरीक्षण केलं… बहुदा त्या मातेने स्वत:ला संपवलं असावं… कायदेशीर प्रक्रियेत काय ते समजेलच….. पण जवळ जाऊन पाहताच तिचे हात पाय लटपटले…. मृतदेहाच्या स्थितीने नव्हे… तशी तिला सवय होती… आकार गमावलेले मानवी देह पाहण्याची… पण त्या मृतदेहाच्या छातीशी एक आठ-नऊ महिन्यांचं लेकरू घट्ट बिलगून होतं… आणि श्वास घेत होतं…. स्त्री जातीचं लेकरू!
…. ‘हाय अबला तेरी यह कहानी, आंचल में दूध और आंखो में पानी! ‘ कुण्या हिंदी कवीने लिहून ठेवलेल्या या ओळी…. तिच्या आंचल मध्ये दूधही नव्हतं… आणि डोळ्यांतले अश्रू आता सुकून गेले होते… अश्रूंना सुद्धा वाहण्यासाठी काळजात जीवाचा झरा लागतो!
…. ती अबला होतीच… म्हणजे तिला अबला होण्यासाठी परिस्थिती, मन:स्थितीने बाध्य केलं असावं… अन्यथा कोण कशाला स्वत:चा जीव स्वत:च देईल? जीव देण्याच्या प्रयत्नात अगदी निकराच्या, अखेरच्या क्षणाला (इथं क्षण हे कालमापनाचं एककही तसे खूप मोठे असते त्याक्षणी! ) जगण्याची धडपड प्रत्येक जीव करीत असतोच! तिने सुद्धा निश्चित केला असावा…. पण तिच्या कृतीने तिला मागे टाकलं होतं.. आता काहीही होणार नव्हतं… जगाच्या धुळीत उमटलेली दोन पावलं आता कायमची पुसली गेली होती… मरणाच्या वावटळीमुळे!
तिने पटकन पुढे होत त्या देहाच्या कुशीतून ती बालिका आपल्या हाती घेतली… छातीपासून दूर केलं जात असल्याची जाणीव होताच त्या बालिकेने नकाराचा सूर लावला…. तिने तिथल्या तिथं.. भर गर्दीत… कसलाही आडोसा घेण्यात वेळ न दवडता… न जाणो बाळ किती वेळापासून उपवाशी असेल…. कोणताही क्षण त्याच्यासाठी अखेरचा ठरू शकतो… या विचाराने आपल्या छातीवरचा कपडा दूर केला…. आणि बाळ एका जिवंत देहातून वाहणारा मायेचा प्रवाह त्याच्या देहात उतरवू लागलं… जगातलं सर्वांत सुंदर दृश्य तिथं प्रत्यक्षात साकारलं जात होतं…. ते दृश्य कुणाला कसं दिसत असेल, कुणाच्या नजरेत काय झिरपत असेल.. याचा त्या आईने जराही विचार केला नाही…. बाळासाठी देवानं बाईच्या देहाला हे अलौकिक लेणं दिलं आहे…. त्यावेळी ती आणि ते बाळ… या दोघांच्यात दुसरं काहीही नव्हतं… केवळ एक यज्ञकर्म सुरु होतं! आणि दुसऱ्या कुणाच्या मनात काय असेल याचं तिला सोयरसुतक नव्हतं! तिने अशा अनेक बाळांना आजवर स्वतःचं दूध पाजलं आहे… अनेक मातांना दुग्धदानाचा वसा दिला आहे!
त्यानंतर पुढचे कित्येक तास ती पोर तिच्या या नव्या आईपासून क्षणभर दूर व्हायला राजी नव्हती!
थोड्यावेळाने त्या पोरीचा चार वर्षांचा थोरला भाऊही पोलिसांना त्या जागेपासून काही दूर अंतरावर आढळून आला… त्या बाईने दोन पोरांना कायमचे पोरके केले होते! का? तिच्याच जीवाला ठाऊक!
… हीच ती अमरावतीची दुधाऊ.. गुंजन ताई गोळे (८३ ७९ ८५ ८७ ६५).
(गुंजन ताई गोळे यांच्या फेसबुक पोस्टवर आधारित मुक्तलेखन. आपल्यापैकी काही जणांना हे नाव आणि त्यांचे कार्य निश्चित माहित असेलच. ज्यांना नाही आणि जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी इंटरनेटवर गुंजन गोळे या नावाने जरूर शोध घ्यावा! यातून काही जाणीव जागृत व्हावी म्हणून मी वरील लेखन केले आहे. त्यांनी प्रकाशित केलेले छायाचित्र वापरलेलं आहे.. गैरसमज नसावा!!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈