सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ घिबलीच्या निमित्ताने… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सोशल मीडियावर निरनिराळ्या तांत्रिक कला-प्रकाराचे ट्रेंड्स येत आहेत. आपला फोटो वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये बनवणे हा त्यातलाच ट्रेंड. त्यात घिबली आर्ट हा सध्या लोकप्रिय आहे. त्यामुळे कलेच्या विश्वात कलाकारांचे हक्क, त्यांची होणारी हानी, कलेचे सामान्यीकरण, जगण्यातल्या अनेक जागांचं, भावनांचं सपाटीकरण, तांत्रिकतेमुळे नैसर्गिक कलेचं सामान्यीकरण असे अनेक मुद्दे निर्माण झालेत. त्यावर विस्तृत विचारमंथन होऊन समाजात सजगतादेखील निर्माण व्हायला हवी. पण ही जबाबदारी केवळ कलाकार, तंत्रज्ञ किंवा सर्वसामान्य व्यक्ती यापैकी एकाचीच नसून ती सर्वांचीच आहे.

आपणच आपली कलेकडे बघण्याची दृष्टी, तिचं जगण्यातलं स्थान, ‘स्व’ओळख आणि ‘स्व’प्रतिमेबद्दलचं प्रेम, विवेकशीलता, सामाजिक जाणीव, जगण्यातला अभाव-प्रभाव, आभासी जगताचं आयुष्यातलं स्थान याचा विचार करावा. असे ट्रेंड्स फॉलो करणं का गरजेचंय हे तपासायला हवं. एक व्यक्ती म्हणून वेगळ्यावेगळ्या रूपांमध्ये आपण कसे दिसू ही स्वाभाविक इच्छा तंत्रज्ञानातला ‘त’ आणि कलाकृती मधला ‘क’ माहित नसणाऱ्यांनादेखील सहज पूर्ण करता येते. आणि आपण गम्मत, अपुऱ्या इच्छा, स्वप्नं याची थोडीफार पूर्ती होईल म्हणून सहभाग घेतो. क्षणभंगुर आनंदासाठी आभासी जगात रमून आपली माहिती अज्ञात तंत्रज्ञानाला देताना सावध राहायला हवं. कुठलंही तंत्रज्ञान हे सहजासहजी काहीही फुकट देत नाही. त्यामागे त्याचा छुपा हेतू असतोच. या ट्रेंडमुळे फोटो वापरण्याची एक मुभाच आपल्याही नकळत त्याला दिली आहे. माहितीचा हा प्रचंड साठा गोळा करून याचा वापर केला जाणार निश्चितच मात्र तो कसा हे सांगणं अवघड आहे.

कलाकारांच्या दृष्टीने यात दोन बाजू अशा की कलाकाराला, कलाकृतीला मिळालेली ही एक उत्तम दादही आहे. कदाचित यातून कलाप्रकारांचा तात्काळ प्रसार होऊन सकारात्मकता निर्माण होईल. पण त्यापेक्षाही जास्त धोका म्हणजे ‘नैसर्गिक कलेचं’ तांत्रिक कलेद्वारे अवमूल्यन आणि शोषण होईल, झपाट्याने सामान्यीकरण होईल. कलेचं सार्वत्रिकरण होणं वेगळं आणि सामान्यीकरण होणं वेगळं. नैसर्गिक कलेसाठीच्या आवश्यक सरावाला, सातत्याला आणि मुख्यतः वैचारिक कृतीला जे दुय्यमत्व प्राप्त होईल, ते कालांतराने नैसर्गिक मानवीय क्षमतेलाच अतिशय नुकसानकारक ठरेल. कारण कलेचा पायाच मुळी सर्जनशीलता आहे. आणि तो व्यक्तीचं जगणं, अनुभव, संस्कार (कला व जीवन) या सगळ्याच्या पोषणातून निर्माण होतो. प्रथा-परंपरांचं हस्तांतरण, नीती-मूल्यं, भावभावना प्रकटीकरण, नैसर्गिक अनुबंध इत्यादी जगणं संपन्न करणाऱ्या, व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या गोष्टींची पूर्तता जर एका क्लिकवर आणून ठेवली तर आपलं जगणं आपणच संकुचित करत आहोत. अर्थपूर्ण गोष्टी आपणहूनच निरर्थक ठरवत आहोत.

आत्ताचा ‘घिबली’ चा ट्रेंड हे प्रतिरूप आहे. मूळ घिबली आर्टमध्ये फक्त विशिष्ट चित्रशैली अभिप्रेत नसून उत्तम कथन करणारी ‘कंटेंट व्हॅल्यु’ महत्त्वाची आहे. त्यातली हाताने काढलेली चित्रं, उबदार रंगसंगती, सौम्य प्रकाश, पार्श्वभूमीचे बारीकसारीक तपशील, वातावरणातली प्रसन्नता, शिवाय अॅनिमेशन्समधल्या हालचाली, संयत वेग यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा जपानी कलाप्रकार लोकप्रिय झाला. केवळ चित्रप्रकार म्हणून नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे कृत्रिमतेचा वापर करूच नये का? तर अतिशय मर्यादित आणि अपरिहार्य ठिकाणीच करावा. आपला आनंद, इच्छा व्यक्त्ततेसाठी नैसर्गिक कलेचा आस्वाद, प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यायला हवी. पदार्थाच्या फोटोतून जशी भूक भागत नाही तसंच आस्वादक आणि कलाकार म्हणून कृत्रिम साधनांवर कला बहरत नाही जिवंत राहणार नाही. याची जाणीव अधोरेखित करण्याचीच ही वेळ आहे.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments