श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“जिथे जाहला तुझा जीवनान्त! ☆ श्री संभाजी बबन गायके 

…. शत्रूच्या मातीत चिरनिद्रा घेत असलेला वायूवीर!

पाकिस्तानातल्या पिंडी भटीया तहसीलमधल्या कोट नाका नावाच्या कोणत्या एका गावातल्या कोण्या एका शेतात आपला एक वीर वायुवीर चिरनिद्रा घेत पहुडला आहे… त्याचा देह मातीच्या स्वाधीन झाला ती जागाही आता विस्मृतीत गेली आहे.. पण त्याच्या स्मृती गेल्या काही वर्षांत पुन्हा स्मरणाच्या पटलावर आल्या! हा वीर मातीच्या कुशीत विसावला त्या घटनेला आज सुमारे साडे एकोणसाठ वर्षे होत आहेत. पण भारताला त्याचे बलिदान समजायला दुर्दैवाने खूप कालावधी लागला… ७ सप्टेंबर, १९६५ रोजी वायूवीर अज्जामदा बोपय्या देवय्या (Squadron Leader A B ‘Tubby’ Devayya) हे जग सोडून गेले.. हे आपल्याला कळायला १९८५ वर्ष उजाडले.. म्हणजे सुमारे वीस वर्षे! तोवर युद्धात बेपत्ता झालेले पायलट एवढीच त्यांची ओळख होती!

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. इथपर्यंत विमानांचा युद्धातला सहभाग तसा कमी होता, असे म्हणता येईल. पण पुढे पाकिस्तानला अमेरिकची अत्याधुनिक लढाऊ विमाने लाभली आणि त्यांची उड्डाणे वाढली… इतकी की त्यांनी ६ सप्टेंबर, १९६५ रोजी भारतीय वायूसेना तळांवर बेफाम हल्ला चढवला. आधी हल्ला न करण्याचे भारताचे धोरण त्यांनी त्यांच्या लाभासाठी अशाप्रकारे वापरून घेतले. याचा करारा जबाब देणे भारतीय वायूसेनेसाठी अनिवार्य होते. भारताकडे फ्रांसमध्ये बनलेली Dassault Mystere नावाची अमेरिकेच्या विमानांच्या अर्थात supersonic F-104 Star-Fightersच्या तुलनेत कमी ताकदीची लढाऊ विमाने होती. आपल्या विमानांच्या कमाल वेगात आणि त्यांच्या विमानांच्या कमाल वेगात १००० कि. मी. प्रतितास इतके मोठे अंतर होते. पण शस्त्रापेक्षा ते शस्त्र धारण करणारे मनगट बलशाली असावे लागते… आणि भारतीय सैन्य यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहे! ठरले… दुस-याच दिवशी पाकिस्तानी विमानतळावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली गेली. Group Captain Om Prakash Taneja (Veer Chakra) यांच्या नेतृत्वात आपली 12 विमाने पहाटेच्या काळोखात पाकिस्तानात अगदी त्या देशाच्या मध्यभागी (आणि त्यामुळे भारतीय सीमेपासून खूपच दूर) असलेल्या सरगोधा विमानतळाकडे झेपावली. इथपर्यंत पोहोचायचे, हल्ला करायचा आणि सुरक्षित परत यायचे यात खूप इंधन खर्च होणार होते. Dassault Mystere विमानांची इंधनसाठवण क्षमता तशी जेमतेमच होती. थोडा वेळ जरी अधिक पाकिस्तानी सीमेत राहिले तर भारतात परतणे अशक्य होणार होते… कारण पाकिस्तानी वायुसेना तोपर्यंत जागी होणार होती… पण धोका पत्करणे आवश्यक होते… कारण त्याशिवाय युद्धात काही हाती लागत नाही!

ठरल्यानुसार बारा विमाने सज्ज झाली.. पहाटेच्या अंधारात ५. २८ मिनिटांनी विमाने झेपावणार होती…. सुमारे पावणेपाचशे किलोमीटर्सचे अंतर कापायचे होते. ठरवलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एकच संधी मिळणार होती. योजनेचा एक भाग म्हणून या 12 विमानांच्या जोडीला दोन आणखी विमाने राखीव म्हणून ठेवण्यात आली होती…. आणि नेमक्या या दोन पैकी एकाचे वैमानिक होते…. युद्धाची प्रचंड जिगीषा असलेले आपले देवय्या साहेब! त्यांना हे राखीवपण चांगलेच डाचत असावे. हे मूळचे वैमानिक विद्या शिकवणारे शिक्षक. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत एक कुशल वैमानिक हाताशी असावा म्हणून त्यांना ऐनवेळी बोलावून घेतले गेले होते.

अंधार होताच. त्यात धुके पसरले. आधीच्या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्याने धावपट्टी तशी चांगल्या स्थितीत नव्हती. आपली विमाने दिवसाउजेडी उडण्याच्या क्षमतेची होती… रात्री अंधारात त्यांना उड्डाण करणे म्हणजे अंधा-या विहिरीत उडी घेण्यासारखे होते. चार चारच्या गटांनी उड्डाणे करण्याची योजना होती. मोहिमेच्या गुप्ततेसाठी काही वेळ एकमेकांशी रेडीओ संपर्क न ठेवण्याचे ठरले होते… पहिला गट व्यवस्थित हवाई मार्गस्थ झाला. दुसरा गटही बहुधा त्याच मार्गावर असावा. पण काहीतरी गडबड झाली म्हणा किंवा अन्य काही.. पण देवय्या साहेबांनी आपले विमान चक्क या दुस-या तुकडीच्या पुढे काढले… आणि जवळजवळ दुस-या विमानाला धडकले असते अशा अंतरावरून ते आभाळात झेपावले…. शत्रूला नेस्तनाबूत करायला! तोपर्यंत पहिली तुकडी लक्ष्यावर पोहोचली होती. त्यांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानची धांदल उडाली. इतक्या लांब भारतीय विमाने पोहोचणार नाही, या त्यांच्या समजुतीला हा मोठा धक्का होता. दुस-या तुकडीला तनेजा साहेबांनी लक्ष्य सांगितले… पण अंधारच इतका होता की त्यांना ते लक्ष्य दिसलेच नाही…. पाकिस्तानची बरीच अमेरिकन विमाने यामुळे बचावली. पण आपल्या या दुस-या तुकडीने मग लक्ष्य बदलले आणि तुफान हल्ला चढवला… आणि त्यांचे भरपूर नुकसान करीत आपली विमाने भारतीय हद्दीकडे माघारी वळाली… पण या तुकडीच्या मागे असलेले देवय्या साहेब आता येताना सर्वांत मागे राहिले… तोवर पाकिस्तानचे एक supersonic F-104 Star-Fighter आपल्या विमानांच्या पाठलागावर निघाले होते. देवय्या साहेबांकडे जेमतेम परत येण्याएवढे इंधन शिल्लक होते. त्यांना माघारी येणे शक्य असतानाही ते या पाकिस्तानी विमानाला सामोरे गेले… अन्यथा पाकिस्तानी विमानाने आपल्या माघारी फिरणा-या विमानांचा जीवघेणा पाठलाग केला असता आणि आपले भरपूर नुकसान झाले असते… कारण पाकिस्तानी विमान आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज होते…. त्याचा वैमानिक होता.. फ्लाईट लेफ्टनंट अहमद हुसैन… त्यांचा उत्तम पायलट…. त्याने पाहिले की एक साधारण विमान आपल्या रोखाने येते आहे… त्याने देवय्या यांच्या विमानावर त्याचे अग्निअस्त्र डागले…. उष्णतेचा मागोवा घेत विमानाचा पाठलाग करीत त्याला उध्वस्त करणारे ते अस्त्र… ते कधीच अपयशी ठरले नव्हते तो पर्यंत… त्यामुळे हुसेन निश्चिंत होता… त्याला वाटले की हे विमान पाडले की भारतीय हद्दीकडे जाणा-या विमानांचा फडशा पाडू! पण देवय्या साहेबांचे इरादे हिमालयाएवढे उंच. त्यांनी अशी काही शक्कल लढवली की ते अग्निअस्त्र ब भरकटले…. भारतीय वैमानिकाच्या कौशल्यापुढे अमेरिकन तंत्रज्ञान उघडे पडले होते….. पुढे वेगाने येत हुसेन ने देवय्या साहेबांच्या विमानावर जोरदार गोळीबार केला… विमान जोरात हादरले… पण तरीही देवय्या साहेबांनी विमानावर ताबा मिळवला… त्यांचे उड्डाण कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे होते… जो अभ्यासक्रम हुसेन शिकला असेल त्या अभ्यासक्रमाचे देवय्या साहेब म्हणजे जणू हेडमास्तरच होते! ते अजिबात डगमगले नाहीत… पाकिस्तानच्या आकाशात आता एक प्रचंड उत्कंठावर्धक हवाई युद्ध आरंभले गेले होते… खरं तर पाकिस्तानी विमान क्षणार्धात जिंकायला हवे होते… पण देवय्या साहेब त्याला भारी पडले. हुसेनने सात हजार फुटांची उंची गाठली… देवय्या साहेबांनी तोही धोका पत्करला आणि ते सुद्धा तेवढ्याच उंचीवर जाण्याच्या प्रयत्नात राहिले… हुसेन वेगाने त्यांच्या रोखाने आला… साहेबांनी अलगद हुलकावणी दिली… एखादे रानडुक्कर कसे थांबता न आल्याने पुढे धावत राहते… तशी हुसेनची गत झाली…. त्यांनी हुसेन याला आभाळभर फिरव फिरव फिरवले… एका बेसावध क्षणी हुसेनला गाठून त्याच्या विमानावर होत्या तेवढ्या शस्त्रांनी हल्ला चढवला… आता देवय्या माघारी जाण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते… आणि त्यांना माघारी जायचेही नव्हते! पण एका क्षणी या दोन्हे विमानांची आभाळातच धडक झाली…. दोघेही वेगाने जमिनीकडे कोसळू लागले…. हुसेनच्या विमानात उत्तम दर्जाची बाहेर पडण्याची यंत्रणा होती… तो यशस्वीरीत्या विमानातून eject झाला… आणि जमिनीवर सुखारूप उतरला…. देवय्या साहेब मात्र याबाबत कमनशीबी ठरले… त्यांनीही विमानातून बाहेर उडी ठोकली होती… पण.. त्यांचा देह विमानापासून काही अंतरावर सापडला…. पण ते फारसे जखमी झालेले नव्हते! पण त्यांचे प्राण भारतमातेच्या संरक्षणार्थ खर्ची पडले होते.. आणि त्याचा त्यांना अभिमान होता. आपली पत्नी आणि दोन मुली यांना ते कायमचे पोरके करून त्यांच्या आत्म्याने परलोकी उड्डाण केले होते.

वायुसेनेच्या भाषेत दोन लढाऊ विमानांच्या अशा प्रकारच्या संघर्षाला Dog Fight अशी संज्ञा आहे… पाकिस्तानी पायलटचे माहीत नाही… मात्र लढणारा आपला वैमानिक वाघ होता… वाघासारखा लढला आणि धारातीर्थी पडला!

सरगोधा मोहिमेवर गेलेली सर्व विमाने सुखरूप भारतीय हद्दीत परतली… पण देवय्या साहेबांविषयी तनेजा साहेबांना ते त्यांच्या विमानातून खाली उतरल्यावरच समजले! देवय्या साहेबांची काहीच खबर मिळाली नाही… कालांतराने त्यांना युद्धात बेपत्ता झालेले सैनिक असा दर्जा दिला गेला. साहेबांच्या पत्नी श्रीमती सुंदरी देवय्या आणि कन्या स्मिता आणि प्रीता यांचा पुढे प्रचंड मोठा झालेला प्रतीक्षा कालावधी सुरु झाला… त्यांना सुमारे तेरा वर्षांनी देवय्या साहेबांची खबर समजणार होती…. ते हयात नाहीत ही ती खबर!

भारत पाक युद्ध थांबले. पाकिस्तानचा पराभव झाला होता… पण ते उताणे पडले तर नाक वरच आहे असे म्हणत राहतात नेहमी. त्यांनी त्यांच्या वायुदलाच्या तथाकथित पराक्रमाबाबत लेखन करण्यासाठी एक इंग्रजी माणूस नेमला…. John Fricker त्याचे नाव. त्याने Battle for Pakistan: The Air War of 1965 ही एक प्रकारची बखरच लिहिली… त्यात अर्थात पाकिस्तानची स्तुती पानोपानी होती. पण कसे कोणास ठाऊक त्याने देवय्य्या साहेब आणि हुसेनच्या लढाईचा उल्लेख केला… देवय्या साहेबांचे नाव तोपर्यंत त्यालाही ठाऊक नव्हते… जिथे देवय्या साहेब धारातीर्थी पडले होते.. त्याच शेतात त्यांना तिथल्या लोकांनी दफन केले होते. ही बाब पाकिस्तान सैन्याने खरे तर भारताला कळवायला हवी होती! असो.

तर हे पाकिस्तान धार्जिणे पुस्तक कालांतराने म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी भारतात पोहोचले… आणि त्यातील मजकूर तनेजा साहेबांच्या नजरेस पडला…. आणि सुरु झाला एक शोध…. एका हुतात्मा वायूवीराचा शोध. त्याला न्याय देण्यासाठीचा संघर्ष… कारण सरगोधा मोहिमेत भाग घेतलेल्या सर्व वैमानिकांना पदके मिळाली होती… पण आपला कथानायक पाकिस्तानातल्या मातीत हरवून गेला होता… आपण जणू त्यांना विसरलो होतो! पण दैवयोगाने तपासाची चक्रे फिरत राहिली… तेवीस वर्षे… आणि १९८८ मध्ये Squadron Leader Ajjamada Boppayya Devayya No. 1 Squadron IAF यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय वायूसेनेतल्या लढाऊ वैमानिकास प्रदान केले गेलेले हे आजपर्यंतचे एकमेव महावीर चक्र ठरले आहे. देवय्या साहेबांच्या पत्नी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले… साहेब कधी न कधी तरी परत येईल या आशेवर त्यांनी दिवस काढले… त्यांच्या पराक्रमाची योग्य कदर केली गेल्यानंतरच त्यांच्या कष्टी काळजाला थोडा दिलासा लाभला. त्या आता नव्वद वर्षांच्या आहेत. देवय्या साहेबांना दफन केलेली जागा स्वत: हुसेन यांनीच शोधून काढली असे बोलले जाते. परंतु आता ती नेमकी जागा विस्मरणात गेली आहे… खरे तर देवय्या साहेबांचे अवशेष भारतात परत आणण्याचे प्रयत्न व्हायला हवे होती… पण अनाम वीरांच्या नशिबी …

‘स्तंभ तिथे न कुणी बांधला… पेटली न वात! ‘ अशी स्थिती असते.

धगधगता समराच्या ज्वाला.. या देशाकाशी…

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी…

– – हे शब्द किती खरे ठरतात ना?

देवय्या साहेब देशासाठी हुतात्मा झाले हे आता सिद्ध झाले आहे. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती तशी सर्वसामान्य जनतेपासून लांबच राहिली, असे दिसते. जानेवारी, २०२५ मध्ये अक्षय कुमार यांची भूमिका असलेला स्काय फोर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या मध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला… पण नावे, कथा, तपशील यात कमालीचा बदल करण्यात आला आहे…. हे मात्र अत्यंत दुर्दैवाचे आहे! एका ख-या वीराची कथा आपण त्याच्या ख-या नावासह सांगू शकत नाही… याला काय म्हणावे.. कारणे काहीही असोत. पण ही कथा पडद्यावर आणल्याबद्दल संबंधित निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचे आभारही मानावेत तेवढे कमी आहेत.. कारण हल्ली वाचन नाही केले जात. सैन्यविषयक पुस्तके बरीचशी इंग्रजीमध्ये असतात… आणि जनता हल्ली चित्रपटात इतिहास शोधते आहे.. त्यामुळे चित्रपट त्यांच्या दोषांसह स्वीकारावे लागतात, हेही खरे आहे. खरे आभार मानले पाहिजेत ते ग्रुप कॅप्टन ओम प्रकाश तनेजा या वीर चक्र विजेत्या जिगरबाज वायुसेना अधिकारी वीराचे. देवय्या साहेबांचे शौर्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट खूप कौतुकास्पद आहेत.

मी आज संध्याकाळी स्काय फोर्स हा चित्रपट पाहिला. दर रविवारी एक सैन्य कथा प्रकाशित करण्यचा प्रयत्न करीत असतो. निवृत्त वायूसैनिक श्री. मेघश्याम सोनावणे साहेब माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. यानिमित्ताने आपल्याच वीरांच्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या कथा पुन्हा सांगितल्या जातील.. जय हिंद.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments