आठवणींच्या पुळणीवर फेरफटका मारायला लागलं की, असंख्य वाळूचे कण पायावर उधळत असतात! मग हे बघू का, ते बघू अशी अवस्था होते! ती वाळू पायाला गुदगुल्या करत असते तर कधी ओलसर असेल तर ती चिकटून बसते, जशी मनाला एखादी आठवण सोडत नाही!
तसं आपलं हे आयुष्य म्हणजे एक स्वतःसाठी असलेला मर्यादित सागरच असतो जणू! ज्याप्रमाणे सागराचा अंत कळत नाही, तसंच आपल्याला या मनाची खोली कळत नाही! ओहोटीच्या वेळी जितके आत जावे, तितके समुद्रात ओढले जातो, तसंच या मनाचे! जितके खोल खोल विचार करत राहू, तितकं मन आत आत रुतत जाते! त्या आठवणींची पुळण(वाळू) आत इतकी पाळेमुळे धरून असते की, एक एक जुना क्षण क्षण ही त्या वाळूचा कण कण असते. त्यात पाय नकळत रुतत जातात.
आयुष्याची भरती तर आता संपत आली याची जाणीव आहे. मागे वळून पाहताना जाणवतं, एवढं आयुष्य कसं गेलं आपलं! बालपणाचा काळ सुखात, शिक्षणात गेला. पुढे ४०/५० वर्ष संसार सागरात बुडलो होतो.
काठावरची रेती सुद्धा भेटत नव्हती. सतत उसळणाऱ्या परिस्थितीच्या एकावर एक लाटा येत होत्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्या सारखे आपण लाटावर लाटा झेलत होतो. कधी कधी नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या मारायला व्हायचं, पण आपला जीव सांभाळत, तोल सांभाळत त्या लाटांवर स्वार व्हायचं! नवीन उमेद मिळायची मोठ्या लाटा पार पाडताना! बघता बघता काळ सरत चालला आणि शरीराची आणि मनाचीही ताकद कमी होत चालली. आता समुद्र डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यातील लाटांवर स्वार होण्यापेक्षा किनाऱ्यावर बसून लाटा बघणं हेच बरं वाटतं – म्हणजे तेवढेच करता येतं! समुद्रात न जाताही त्याची विशालता, खोली, रंगरूप, सगळं मनाशी साठवत राहावंसं वाटतं!
तो आहे तसाच आहे – स्थिर, त्याच्या रूपात मग्न! आभाळाची निळाई प्रतिबिंबित होऊन त्याची निळाई कायम दिसते. त्या निळाईत पार बुडून गेलाय तो.. आणि मी- त्याच्यात!
सागराला किनारा आहे, तीच त्याची सीमा आहे आणि आपली ही एक वेगळीच सीमा रेषा आहे! आठवणींची वाळू पायाखालून सरत चालली आहे… एक दिवस असा येईल की हे वाळूत चालणारे पाय मंद मंद होत जातील.. पाणी, वाळू निसटून जाऊ लागेल पाया खालून, आणि शोधता शोधता तो किनारा गवसेल जिथून परतायची शक्यता नाही! त्या अनंत, अथांग सागर किनारी नकळत थांबतील हे पाय आणि डोळ्यासमोर येईल आपल्या गतायुष्याची मन- सागरात उमटणारी झलक! त्यातच विरून जाईल सगळी ऊर्जा, उमेद आणि उभारी!
☆ ‘सेवेची गोष्ट’ – लेखक : अज्ञात – माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन☆
आमचे वडिलोपार्जित घर भोपाळमध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडिलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.
समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा टि. सी. काही बोलणार नाही.
डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता. ”
मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला, “माझ नाव आलोक आणि मी इस्रो (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए. सी. डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”
ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”
एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”
माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.
खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.
काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.
रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे. ”
पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”
मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.
काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.
नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”
त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”
ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो. कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”
त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.
त्यावर छापले होते – डाॅ. जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.
आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए. सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!
एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि. सी. च्या मदतीने खाली उतरले.
रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए. सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”
ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”
नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.
आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.
म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जगही आपोआपच बदलेल.
लेखक : अज्ञात
माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला.
थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.
दिवसा कधी दिसत नसायचा.
खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.
रात्रीचे साडेबारा वाजले असतील.
मी त्या मंदिराकडे आलो.
तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला.
मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात हसला.
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?
सर माझ्या घरात लाईट नाही.
माझी आई आजारी असते.
दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.
बाळ तू मला बघून का गोड हसलास ?
सर तुम्ही देव आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.
ते जाऊदे तू जेवलास का?
मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.
सर म्हणूनच मी हसलो.
मला माहित होतं.
तो (देव) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार.
मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो, तो काहींना काही मला देतोच.
कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो.
आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो.
मला माहित होतं…. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात.
तुम्ही देव आहात ना !
मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं.
रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.
माझे डोळे तरळले.
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला.
त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.
सर,
माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.
क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले.
देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.
असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही.
वाईट वाटलं मला.
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे ना ना प्रश्न आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले.
असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन दगावला.
मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले.
सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो.
पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
सर….
अरे तू इथे काय करतोस ?
सर आता मी इथेच राहतो.
आम्ही घर बदललं.
भाडं भरायला पैसे नव्हते.
त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली.
काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे.
त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.
तिथे जीवंत माणसं यायची आणि इथे मेलेली.
ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो.
सर मी हार नाही मानली.
आई सांगायची……..
ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.
बरं… तुझी आई कुठे आहे ?
सर ती कोरोनाच्या आजारात गेली.
तीन दिवस ताप खोकला होता.
नंतर दम अडकला.
मी कुठे गेलो नाही.
इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला.
१४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो.
सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची.
आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.
सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही.
ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.
कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.
ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.
असो
सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर तोंड गोड करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.
भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.
सर,
मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.
आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो…
न सांगता.
खरा देव तर कधीच नाही दिसला पण,
मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला…
मी देव पाहिला…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
(हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी शेअर करतोय… कारण मलाही कळले माणसातच देव आहे.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- “रोहन? ज्याला स्वतःलाच काही नीट समजून घेता आलेलं नाही तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. “
“मी वाट पहाते तुझ्या फोनची. “
” हो.. थॅंक्स.. “)– इथून पुढे —-
रेस्टॉरंटमधे फारशी वर्दळ नव्हती. सानिका पाठोपाठ तीही फॅमिली रूमच्या दिशेने निघाली. सानिका थोडी सावरलेली वाटली तिला पण नेहा स्वत: मात्र अस्वस्थ होती. कुठून सुरुवात करावी तिला समजेचना.
” थँक्स. ” नेहाकडे पहात सानिका मनापासून म्हणाली.
” कशाबद्दल ?”
“मघाशी माझं ऐकलंत त्याबद्दल. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तर आई-बाबा येईपर्यंत अट्टाहासानं थांबून तमाशाही करू शकलं असतं. तुम्ही समंजसपणा दाखवलात. त्याबद्दल थँक्स. “
“बाबांची तब्येत कशी आहे?”
“रूटीन चेकअप होतं. ही इज क्वाईट नॉर्मल. “
“ओके. आपण मुद्याकडे वळूया?”
सानिका मानेनेच ‘हो’ म्हणाली. तिच्या मनावरचं दडपण हळूहळू वाढत चाललं होतं. ती कावरीबावरी झाली. नेहाच्या नजरेने ते अचूक हेरलं. तिचा राग यायच्या ऐवजी नेहाला आता तिची कींव वाटू लागली.
“मघाशी ‘मी कसलेही रंग उधळलेले नाहीत’ असं तू म्हणाली होतीस. ‘रोहननेच नीट समजून घेतलेलं नाहीय तो तुम्हाला काय सांगणार?’ असंही तुझं स्टेटमेंट होतं. याचा अर्थ अजूनही तुझी कांहीच चूक नाहीये असं वाटतंय कां तुला?”
नेहाच्या प्रश्नातला थेटपणा आणि स्वरातला शांतपणा सानिकाला अनपेक्षित होता. तिचा घरून निघतानाचा बचावाचा पवित्रा तिच्याही नकळत आपसूक गळून पडला. मनातलं नेमकं बोलायची ही संधी तिला घट्ट धरून ठेवायची होती. ती मनातल्या मनात कसेबसे शब्द जुळवू लागली…
” चूक किंवा बरोबर हे व्यक्तिपरत्वे वेगळं असू शकतं. माझं कांही चुकलंय कां हे मात्र आता तुम्ही ठरवायचंय. रोहननं त्यादिवशी तुमच्याइतक्याच शांतपणे मला हे विचारलं असतं तर त्या दिवशी त्याला जे सांगितलं असतं तेच आज तुम्हाला सांगते. त्यादिवशी रोहन मला भेटायला आला तोच खूप संतापून. त्याची ती प्रतिक्रिया खूप नैसर्गिक असेलही आणि त्या अवस्थेत तो मला समजून घेऊ शकणंही अपेक्षित नव्हतंच. म्हणूनच रोहनच्या मनात खदखदणारा संताप सहन करून मी शांतच राहिले होते. पण मला कांहीही बोलायची संधी न देता त्याने माझ्यावर केलेले गंभीर आरोप मला सहन झाले नाहीत. स्वीकारताही आले नाहीत. आजकालच्या पोरी फार पोचलेल्या असतात असं त्याचं स्टेटमेंट होतं. ‘मी वरुन साधीसुधी वाटते पण हे माझे दाखवायचे दात आहेत’ यावर तो माझं बोलणं ऐकून घेण्यापूर्वीच ठाम होता. मी एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करणारी मुलगी आहे काकू. रोहनही याच क्षेत्रात काम करतोय. इथलं वर्क कल्चर आणि निसरड्या वाटा त्याला परिचित असूनही तो हे बोलत होता. चुकीची किंवा बरोबर पण मलाही माझी कांही एक बाजू आहे हे जाणून घ्यायची त्याला गरजच वाटली नाही. मला कांही बोलायची किमान संधी न देता थेट मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मोकळा झाला तो! अशा परिस्थितीत खरंतर स्वच्छ मनाने संवाद व्हायला हवा होता. आमचे मात्र फक्त वादच झाले. आय एम सॉरी फॉर दॅट. त्याचा राग मी समजू शकते, पण माझं ऐकून घेणंही त्याला अगत्याचं वाटतं कां हेही महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी त्याच्या निरोपाची एक-दोन दिवस वाट पहायची ठरवलं होतं म्हणून घरी नव्हतं सांगितलं. “
” तो मुलगा कोण होता?”
” माझ्याच कंपनीतला माझ्या कलिग आहे तो. “
” त्यांने असं कां करावं? तुमचं अफेअर होतं का?”
सानिका एक क्षण थांबली. नेमकं उत्तर द्यायची हीच वेळ आहे हे तिनं ओळखलं. आता हातचं कांहीही राखून ठेवायची गरजच तिला वाटेना.
” चाणाक्षपणानं, माझ्या सोयीचं उत्तर द्यायचं, तर ‘त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं पण माझ्या नकारामुळे तो दुखावला गेला’ असंही मी सांगू शकते. पण मी तसं करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाहीय. थोडीच.. पण वेगळी आहे! त्याचं मुळात माझ्यावर ‘प्रेम’ नव्हतंच. आणि माझं म्हणाल तर मी अधांतरी होते. मी माझ्या वागण्या- बोलण्यातून कधीच कम्युनिकेट केलं नव्हतं त्याला पण तो मला प्रथमदर्शनी आवडला होता. मी वहावत जाणाऱ्यातली किंवा तुम्हाला वाटलं, तसं रंग उधळणाऱ्यातली नव्हते. पण म्हणून माझ्या मनात एखाद्याबद्दल जवळीक निर्माण होणं मी टाळूही शकत नव्हते हेही तेवढंच खर आहे. त्याचं हसणं, बोलणं, दिसणं, वागणं, त्याचा डिसेण्ट प्रेझेन्स सगळंच कुणालाही आवडावं असंच होतं. पण ते खरंच ‘प्रेम’ होतं की त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतचं ‘आकर्षण’ या संभ्रमात मी तरंगत होते. मला ते एकदा नीट तपासून पहायचं होतं. पण मला तेवढीही उसंत न देता त्याने मैत्रीसाठी हात पुढे केला. त्या मैत्रीच्या भरंवशावरच मी त्याला पारखून घ्यायचं ठरवलं. एकत्र गप्पा, कधी कॉफी-शॉप हा आता एक विरंगुळाच झाला होता जसा कांही. एक दिवस त्याने मला पिक्चरला यायचा आग्रह केला. मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले. तो रुसला. नाराज झाला. त्याने आधीच काढून ठेवलेली सिनेमाची दोन तिकीटं खिशातून काढली आणि तो ती फाडू लागणार तेवढ्यात एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे झेपावले आणि त्याला अडवलं. मला त्याला दुखावावंसं वाटेना. ती खरंतर त्याच्या जिंकण्याची आणि माझ्या हरण्याची सुरुवात ठरू शकली असती, पण माझ्या सुदैवाने तसं कांहीं झालं नाही. निसरड्या वाटेवरून मी सावरलं माझं मलाच. त्याला दुखवायचं नाही म्हणून मी त्याच्याबरोबर सिनेमाला गेले खरी पण आजही त्याचा मला पश्चाताप होत नाहीय. मी गेले ते बरंच झालं असंच वाटतंय. कारण म्हणूनच थिएटरमधल्या त्या मिट्ट काळोखातही त्याचे विकृत रुप मला स्वच्छ दिसलं! अंधार होताच तो अलगद मला खेटून बसू लागला तेव्हा मी थोडं नीट सावरून बसले. पण हार न मानता त्याने हळूच खुर्चीमागून आपला हात माझ्या खांद्यावर टाकला आणि माझ्याशी लगट करू लागला. मी त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि न बोलता माझ्या खांद्यावरचा त्याचा हात मी बाजूला केला. तो चिडला. बेचैन झाला. त्याने क्षणभर वाट पाहिली न् तडक उठून बाहेर निघून गेला. त्याचा उतावीळपणा मला आवडला नव्हता म्हणूनच स्वीकारताही नाही आला. त्याची किळस वाटू लागली आणि किंवही. त्याने परत आत येऊच नये असंच वाटतं राहिलं. इंटरव्हल झाला न् मी उठून बाहेर आले. दबा धरून माझीच वाट पहात असलेला तो सरळ पुढे येऊन माझी वाट अडवून उभा राहिला. जळजळीत नजरेने माझ्याकडे पहाणारा, संतापाने थरथरणारा. नाईलाजाने मी थांबले.
” खेळवतेयस मला?” त्यानं चिडून विचारलं.
” काहीतरीच काय बोलतोयस?”
“खेळवत, तिष्ठत नको ना ठेवू आता, चल. “
“कुठं?” त्याच्याकडे रोखून पहात मी विचारलं.
“तू म्हणशील तिथं. प्लीज.. नाही म्हणू नको. रुमवर येतेस?”
मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले.
” कां पण?” तो संतापलाच एकदम. आता एक घाव दोन तुकडे करण्याखेरीज पर्यायच नव्हता.
” तू जा आता. तू काय बोलतोयस, वागतोयस त्याचा रात्रभर शांतपणे विचार कर आणि आज मला जे विचारलंयस ना आत्ता ते सगळेच प्रश्न उद्या आपण ऑफिसमधे भेटू तेव्हा सगळ्या स्टाफसमोर मला विचार. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिथे सर्वांसमक्षच तुला देईन. नीघ आता. “
त्याला झिडकारुन मी निघून गेले. आजवरच्या आयुष्यात मी कांही रंग उधळलेच असतील ना काकू, तर हे एवढेच… ”
आवाज भरून आला तसं ती बोलायची थांबली. सानिकाचा हात नेहाने अलगद हातात घेतला. सानिकाने तो कसनुसं हसत दूर केला.
“आता विषय निघालाय म्हणून सांगते, राग मानू नका. रोहन तुम्हा कुणाच्या दबावाखाली लग्नाला तयार झाला तर मलाच ते नकोय. खरं सांगू? त्याची रागाच्या भरात व्यक्त झालेली कां असेनात पण आजकालच्या मुलींविषयीची टोकाची मतं मला धोक्याची वाटतायत. माझी बाजू समजून घेण्याइतकंच त्याने स्वतःची मतं तपासून बघणंही गरजेचं आहे असं मला वाटतं. आमच्या संसाराची उभारणी परस्परांबद्दलचा आदर आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभी रहाणार असेल तरच ते आम्हा दोघांच्याही हिताचं आहे. मी रोहनच्या फोनची वाट पाहेन. ”
नेहाचा निरोप घेऊन सानिका गेली तरी नेहा दिङमूढ होऊन उभीच होती. काहीही झालं तरी रोहनला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करायचं हे तिने मनोमन ठरवूनच टाकलं. त्यासाठी अर्थातच ती निरंजन आणि प्रिया दोघांची मदत घेणार होतीच. पण तरीही… ? तरीही ती अस्वस्थ होतीच. सानिकाला समजून घेणं जेवढं सोपं गेलं तेवढंच रोहनला समजावणं तिला अवघड वाटत राहिलं.
कांही क्षणापूर्वी उध्वस्त करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जातानाचा सानिकाचा ‘अॅप्रोच’ तिला कौतुकास्पद वाटला होता. पण आता.. ? आता मनात रेंगाळणाऱ्या त्या कौतुकावर रोहनचा अॅप्रोच कसा असेल या भीतीचा एक तवंग अलगद तरंगू लागलेला होता….!!
(पूर्वसूत्र- ” मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर उखडलीच ती माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस? ‘ असं मलाच विचारतेय. याला लग्न मोडणं याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मला. आता काय करायचं ते मी ठरवलंय आणि ते तुलाही सांगितलंय. ” रोहन म्हणाला.
“काय करायचं ते ठरवलंस पण कसं करायचं ते ठरवायला हवं कीं नको? मी.. आज रात्री.. पुण्याला यायला निघतेsय.. ” नेहाने रोहनला बजावून सांगितलं.)
(“आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “
“काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs? .. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.) – इथून पुढे —
“ठीक आहे. ये.. ” वरमल्यासारखा रोहन शांतपणे बोलला खरा, पण ‘ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल? ‘ या शंकेने नेहा धास्तावलीच. कितीतरी प्रश्न तिच्या मनात गर्दी करू लागले. पूर्वीच्या काळी आपल्यावेळी काळजी फक्त मुलींच्या लग्नाचीच असायची. मुलाच्या लग्नाची काळजी फारशी नसायची. आता मात्र मुलाच्या लग्नाची काळजीच नव्हे फक्त तर एक वेगळंच दडपणही असतं याचा अनुभव आज आपण प्रत्यक्ष घेत आहोत या विचाराने तर तिचं टेन्शन आणखीनच वाढलं. मुली मुलांच्या बरोबरीने शिकू लागल्या, नोकरी व्यवसायासाठी आत्मविश्वासाने समाजात वावरू लागल्या, स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेऊ लागल्या ही प्रगती म्हणायची की अधोगती? आजपर्यंत कधीच मनात न उभारलेला हा प्रश्न या सानिकाच्या निमित्ताने तिच्या मनात निर्माण झाला. खरं तर त्या दोघांची प्राथमिक पसंती, भेटणं-बोलणं हे सगळं झाल्यानंतर मग दोन्ही घरच्यांनी परस्परांशी चर्चा करून पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण केले होते आणि अचानक कुणा एका मुलाचा फोन रोहनला येतो काय आणि पत्त्याच्या बंगल्यावर फुंकर मारल्यासारखं सगळं क्षणात कोसळतं काय.. सगळं एखादं दु:स्वप्न असावं असं तिला असोशीनं वाटलं खरं, पण त्याचवेळी पुढं वाढून ठेवलेलं वास्तव या दु:स्वप्नापेक्षाही भयंकर नसेल ना अशी भीतीही वाटत राहिली..!
पुण्यापर्यंतच्या प्रवासात रात्रभरातला एकही क्षण तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. उलट सुलट विचार तिच्या मनात सतत भिरभिरत राहिले होते. साखरपुडा होऊन पंधरा दिवसही झालेले नाहीयेत, पुढच्याच महिन्यातला मुहूर्तही ठरलाय, निरंजनच्या बहिणीकडे आणि प्रियाच्या सासरी अशी दोन्हीकडची केळवणंही झालीयत. निमंत्रणाचे फोन तर सर्वांनाच गेलेत. निम्म्याशिम्या पत्रिकाही पोस्टांत पडल्यात. त्यामुळे लग्न मोडण्याइतकंच हे पुढचं सगळं निस्तरणंही खूप अवघड होऊन बसेल या कल्पनेने ती धास्तावलीच!
रोहन म्हणाला ते सगळं खरंच नेमकं तसंच असेल? सानिका अशी वहावत जाणारी मुलगी असेल? वाटत तरी नाहीय तसं. आपण तिलाच एकदा समक्ष भेटावं कां? बोलावं कां तिच्याशी? थेट तिलाच विचारावं? मनाला या विचारांचा स्पर्श झाला आणि त्या ओझरत्या स्पर्शानेही तिला तरतरी आल्यासारखं वाटलं. यामुळे एक झालं, नेहा रोहनकडे पोचली तेव्हा कालच्यासारखं दडपणाचं ओझं तिला जाणवत नव्हतं. बोलण्याच्या ओघात ती ‘एकदा सानिकाला भेटावं म्हणते’ असं रोहनला म्हणाली आणि तो खवळलाच एकदम.
“तू अजिबात तिचे पाय धरायला जायचं नाहीस बघ. सांगून ठेवतो. ” त्यानं फर्मावलं. ती त्या क्षणी गप्प बसली, पण आता असं हातावर हात ठेवून स्वस्थ बसायचं नाही हेही तिनं मनोमन ठरवून टाकलं. सानिकाला नाही पण तिच्या आई-वडिलांना तरी भेटायला हवंच ना? न भेटून कसं चालेल?
*****
नेहाने दाराची बेल वाजवली. दार सानिकानेच उघडलं. नेहाला अचानक दारात पाहून ती चपापली.
” येऊ..? “
“अं? .. हो.. ” सानिकाच्या मनातली अस्वस्थता लपत नव्हती. घरी बाकी कुणाचीच चाहूल लागली नाही तशी नेहा विचारांत पडली.
” तुम्ही.. बसा ना.. ” मान खाली घालून सानिका म्हणाली. नेहा मनाविरुद्ध बसल्यासारखी अवघडून सोफ्यावर टेकली.
” मी.. मी पाणी आणते… आलेच. “
” नाहीs नको. ” नेहा तुटकपणे म्हणाली. “काय गं? तू घरी सांगितलंयस ना सगळं? म्हणजे नेमकं काय घडलंय ते ठाऊक आहे ना त्यांना? “
” न… नाही.. ” सानिका कसंबसं एवढंच बोलली. आपण असं अचानक आलेलं पाहून ती भेदरलीय हे नेहाच्या लक्षात आलं होतं.
” ठीक आहे. मीच बोलते त्यांच्याशी. तुझ्या आईला बोलाव.? मी आलेय असं सांग त्यांना. “
सानिकांने चमकून वर पाहिलं. तिची अस्वस्थ नजर थोडी गढूळ झाली.
“नाही.. तुम्ही.. तुम्ही आता इथं सांगू नका कुणाला कांही. मी.. मी सांगेन ना.. सांगायचं आहेच मला.. हो.. “
नेहाला सणकच आली एकदम. लग्न म्हणजे खेळ वाटतो कां हिला?
“तू बोलाव तरी आईंनाs” नेहाने फर्मावलं. आता मात्र तिचे डोळे भरून आले. केविलवाण्या भरल्या डोळ्यांनी तिने नेहाकडे पाहिले.
“आत्ता आई नाहीये घरी. ती बाबांना चेकअपला घेऊन गेलीय. “
”हो कां? ” नेहा उपरोधाने म्हणाली. ” बरंs मी थांबते ते दोघे येईपर्यंत. ”
“असं नका करू, प्लीsज.. प्लीज ऐका माझं. बाबा हार्ट पेशंट आहेत. त्यांना खरंच त्रास होईल या सगळ्याचा. म्हणून म्हणते, ऐका माझं. “
“हा विचार तू रंग उधळण्यापूर्वीच करायला हवा होतास. ” आता असं एक घाव दोन तुकडे करण्याशिवाय नेहाकडे तरी दुसरा पर्याय होताच कुठे? सानिका थोडी गंभीर झाली. मनाशी कांही एक ठरवून तिने भरुन येणारे आपले डोळे पुसून कोरडे केले…
” मी कसलेही रंग उधळलेले नाहीयेत. पण तरीही हात जोडून विनंती करते मी तुम्हाला.. हवं तर पाया पडते तुमच्या पण हा विषय निदान आत्ता तरी वाढवू नका. आई बाबा केव्हाही येतील. “
” हे बघ, हे घोंगडं आता मला असंच भिजत ठेवायचं नाहीये. “
“मलाही. ” ती ठामपणे म्हणाली. ” मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. “
” माझ्याशीच नव्हे आई-बाबांशीही बोल तुझ्या. मला रोहनकडून सगळं समजलंय. “
” रोहन? ज्याला स्वतःलाच नीट कांही समजून घेता आलेलं नाहीय, तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. आपण बोलू. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. विश्वास ठेवा माझ्यावर. “
” कधी भेटायचं? आणि कुठे? “
” आई बाबा आले कीं लगेच मी बाहेर पडेन. तुम्ही असाल तिथून जवळच्याच एखाद्या रेस्टॉरंटमधे बसू. “
नेहाच्या संसारात गेल्या वर्षभरात एका मागोमाग एक इतक्या चांगल्या घटना घडल्या कीं पहाणाऱ्यांना तिचा हेवाच वाटावा. पण या सर्व घटनांची परिणती म्हणून नेहाच्या वाट्याला आलेलं एकटेपण तिलाच नकोसं वाटू लागलं. कारण या सर्व घटनांमुळे नेहा आणि निरंजनचं एक सुखी, आनंदी असं चौकोनी कुटुंब अचानक चार दिशांना विखरून गेलं होतं! रोहन आणि प्रिया ही काल-परवापर्यंत एवढीशी वाटणारी त्यांची पिल्लं अचानक पंख पसरून दूर उडून जावीत तसं झालं. कॅंम्पसमधून सिलेक्शन होऊन रोहन काॅक्निझंटला जॉईन होण्यासाठी पुण्याला गेला. प्रियाचं लग्न होऊन ती तिच्या मुंबईतल्या वेगवान रूटीनमधे व्यस्त होऊन गेली. रोहन आणि प्रिया दोघंही इतकी गोड आणि लाघवी होती कीं त्याची अनुपस्थिती कितीही अपरिहार्य असली तरी ती स्वीकारणं नेहाला सुरुवातीला खूप जडच गेलं. तरी बरं तेव्हा नेहाला निरंजनची हक्काची सोबत होती. पण ती सोबतही तात्पुरतीच ठरली. त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याचं पोस्टिंग झालं ते थेट नागपूरला! नेहा तिच्या नोकरीमुळे कोल्हापूरला एकटी पडली. दिवसभर ऑफिसमधे फारसं जाणवायचं नाही पण संध्याकाळी ती दार उघडून घरी आली कीं मात्र घर तिला खायला उठायचं. अर्थात हे सगळं तिची कसोटी पहायला घडलेलं असावं असं क्षणिकच ठरलं आणि नेहाला अनपेक्षित असा विरंगुळा मिळाला. कारण प्रियाच्या लग्नानंतर रोहनसाठी वधूसंशोधन सुरू झालंच होतं आणि अगदी अचानक त्याच्यासाठी पुण्याचं सानिकाचं स्थळ सांगून आलं होतं. एकमेकांची पसंती झाली आणि रोहनच्या लगीनघाईत तिचं एकटेपण तिच्याही नकळत विरून गेलं… !
आता कधी नव्हे ते रोहन दर विकेण्डला कोल्हापूरला येऊ लागला. लग्नाच्या तयारीत जमेल तशी मदत करू लागला. घरी त्याच्या मित्रांची ये-जा सुरू झाली. दर विकेंडचे दोन दिवस या मित्रांच्या राबत्यामुळे घर जिवंत वाटू लागलं. पूर्वीसारखं हसू, खेळू लागलं.
आनंदाचे, सुखाचे, कृतार्थतेचे क्षण असे नाचत- बागडत हसत-खेळतच येतात, पण दुःख मात्र भित्रं असतं. ते लपून दबा धरून बसतं आणि अचानक हल्ला करतं. त्यादिवशी नेहाला तिच्या ऑफिसमधे आलेला रोहनचा फोन या चोर पावलाने येणाऱ्या भित्र्या दुःखासारखाच होता! आज अचानक तो फोन आला आणि सगळ्या आनंदावर विरजणच पडलं जसं कांही. मन तळापासून ढवळून निघालं!
“आई, थोडं महत्वाचं बोलायचंय.. कामांत आहेस?”
“बोल ना… “
“तू दडपण न घेता शांतपणे ऐकून घ्यायचं बघ.. तरच बोलतो. “
रोहनचा आजचा हा हळवा स्वर नेहाला वेगळा वाटला.
“बोल अरे.. बोल. ऐकतेय मी… “
ती वरकरणी सहज बोलल्यासारखं बोलली खरी, पण आतून अस्वस्थच होती. ‘असं अचानक काय बोलायचं असेल याला.. ?.. ‘ ती स्वतःशीच विचार करत राहिली
“आई, माझं लग्न मोडायचंय… ” ऐकून ती हादरलीच.
” भलतंच काय बोलतोयस रोहन ? काय झालंय काय एवढं?.. “
“आईs.. प्लीsज. तू अशी पॅनिक होऊ नकोस.. “
” मी.. मी पॅनिक होत नाहीये.. हो.. मी.. मी शांतपणे ऐकते.. हां… बोल तू. सांग मला सगळं. काय घडलंय… ? “
“आई,.. “
“एक.. एक मिनिट रोहन.. मी बाहेर ऑफिस कॅन्टीनमधे जाते.. म्हणजे नीट बोलता येईल मला… हां.. बोल आता.. “
कपाळावरचा घाम रुमालाने टिपतानाही तिचा हात थरथरत होता..
“आई, या आजकालच्या मुलींचं ना, काही खरं नसतं. साध्याभोळ्या वाटतात पण पार पोचलेल्या असतात.. ”
भलतंच काय बोलतोय हा?सानिकाचा हसरा प्रसन्न चेहरा तिच्या नजरेसमोरून क्षणभर तरळून गेला..
“मी बोललो नसेन असं वाटलं कां तुला? पार पोचलेली आहे ती भटकभवानी.. ” रोहन एवढा चिडला होता की पुढे काय बोलावं ते नेहाला समजेचना.
“मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर ती उखडलीच माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस?’ असं मलाच विचारतेय. ‘तू काय स्वतःला धुतला तांदूळ समजतोयस कां?’ असं विचारलंन्. याला ‘लग्न मोडणं’ याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मलाs.. “
“रोहन,.. मी काय म्हणते… ” नेहा चाचपडत राहिली.
“आई, आता काय तो सोक्षमोक्ष आत्ताच लावून टाकायचा एकदाचा आणि मोकळं व्हायचं. मी आता लगेच बाबांनाही फोन करणाराय. त्यांनाही सगळं सांगून टाकणाराय.. “
“ए.. ए.. रोहन.. ऐक.. ऐक. तू आता निरंजनला अजिबात फोन करायचा नाहीयेस लक्षात ठेव. तो तिकडे नागपूरहून काय करू शकणाराय? विनाकारण त्रास मात्र करून घेईल. हे बघ, मी.. मी आजच रात्री पुण्याला यायला निघतेय. पहाटपर्यंत पोचेन. आधी शांतपणे बोलू आपण, मग त्यानंतर मीच निरंजनला फोन करीन.. ”
“आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “
“काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs?.. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.
गार वारं अंगावरनं गेलं तसं तिने पांघरूण अधिकच लपेटून घेतलं. वरतून वारं तर खाली दगडी फरशी गार गार. देवळाच्या ओट्यावर निजण्याचा आज सातवा दिवस. डोक्याखाली उशी म्हणून घेतलेलं गाठोडं तिनं तेवढ्यातही चाचपून घेतलं. तिच्याकडे होतं तरी काय? एक राखाडी रंगाची साडी अंगावर तर दुसरी फिकट बदामी रंगाची गाठोड्यात, तीही विरलेली. एक पेला पितळी व अल्युमिनियमची ताटली व हातात नेहेमी असलेली छोटीशी जपमाळ. ऐवज म्हणावा तर असा. गार वाऱ्यानं एक काम केलं. तिचा डोळा लागला पुन्हा तो पहाटे भजन म्हणत जाणारा जथा जवळून गेला तोपर्यंत.
पहाट झाल्याचे जाणवल्यावर ती लगबगीने उठली. तशी कुंभनगरीत रात्रंदिवस लगबग ही कुठे ना कुठे चालूच. माणसांचा अव्याहत राबता. सर्वांची पाऊले संगमाकडे जात असलेली सतत. तिनेही गाठोडं बगलेत धरत संगमाची वाट धरली. पहाटे बाहेर जरी गारवा असलातरी नदीत पाणी तसं कोमटच असतं हे लहानपणापासून ठाऊक असलेलं. गावी असलेली नदी तशी छोटीच होती पण ती नदी असो वा हा संगम पाण्याचा गुणधर्म सारखाच. त्यामुळे पहाटेचं स्नान गेल्या सात दिवसात तिने चुकवलं नव्हतं. एरवी दिवसभरात ही तिने कितीवेळा डुबकी मारली हे तिनं मोजणंच सोडून दिलेलं. साताजन्माचं पाप एका मेळ्यातच नाहिसं करायचं का? या विचाराने तिचं तिलाच हसू आलं.
आंघोळ आटपून तिनं कपाळावर पांढरं गोपीचंदन रेखाटून घेतलं. भाळीचं कुंकू सात वर्षांपूर्वीच पुसलं गेलं होतं. मग गावातल्या रीतिरिवाजानुसार गोपीचंदन जवळ केलं. खेडोपाडी असलेल्या कर्मठ प्रथा पाळल्याविना गत्यंतर नव्हतं. गावाहून आल्याला आठवडा उलटला पण सवयीनुसार कपाळावर गोपीचंदन उमटलंच.
पूर्वेला तांबडा सूर्य वर येत असताना तिनं आपसूक हात जोडून नमस्कार केला. हाताचा टेका घेत ती हलकेच उठली. आंघोळीमुळे टवटवी आलेली पण आताशाने तिच्या हालचाली मंदावत चाललेल्या. चालताना गुडघे एकमेकांवर आपटत असलेले. पाठीला जरी वाक आला नव्हता तरी संधी मिळाली की टेकून बसत असे. थोडं चालणं झालं की थांबणं आलंच. तशी कुंभनगरी डावी उजवी, पुढे मागे अवाढव्य पसरलेली. तंबू रहाट्यांची माळच माळ. त्यात अखंड धुनी लावून बसलेले साधू बैरागी. पहाटेपासूनच रहाट्यांवर लावलेले कर्णे वाजू लागायचे. कुठे अखंड नामसंकीर्तन, तर कुठे भागवत कथा, कुठे शिवमहापुराण तर कुठे उपनिषदांवर चर्चा. हे सर्व पाहण्या ऐकण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नसे. तिला केवळ नामसंकीर्तनात गोडी वाटायची. बाकीचे उपदेश डोक्यावरून जायचे.
आपल्या संथ चालीने ती कुंभनगरी न्याहाळत होती. दालबाटी, मालपुवा, मिठायांचे जेवण अखाड्यांमधून मिळून रहायचं. शिवाय यात्रेसाठी आलेले भाविक दानपुण्य कमावण्यासाठी काही ना काही पदरात टाकत असे. ती ते आनंदाने घेई. फळफळावळ, क्वचित सुकामेवा ही मिळायचा. मात्र तिने कधीही हात पसरला नव्हता वा कुणाकडे काही मागितलं नव्हतं. पैशाला तर हातच लावायचा नाही हे तिने ठरवूनच घेतलं होतं. देणारे देत होते तर ही ठामपणे नकार द्यायची. काहीजण आदराने माई म्हणून पायाही पडायचे व पैशे घेण्याचा आग्रह ही करायचे. पैसे गोळा केले असते तर सात दिवसात मालामाल झाली असती, पण नकोच ती माया! तिचं मन सांगत असे!!
‘चलो तुम्हें थानेदारने थानेपे बुलाया है!’ खाकी वर्दीतील हवालदारने हाळी दिली तशी ती चपापली. अगदी चारच दिवसांपूर्वीच तर चौकीत जाणं झालं होतं. थानेदारने तेव्हा तू कोण, कुठली, नाव, गाव सगळं विचारलं होतं. सुरूवातीस आस्थेवाईकपणाने नंतर जरबेने, पण ती बधली नव्हती. तोंडून चकार शब्द ही काढला नव्हती. तरणाबांड थानेदार तसा सालस वाटत होता, पण त्याचे डोळ्यातून आरपार पाहणं अस्वस्थ करणारंच, पण तिनेही दाद दिली नव्हती. आज पुन्हा चौकीत पाऊल टाकलं तशी ती दचकलीच. समोर लच्छीराम, पोटचा गोळा. तिला ब्रह्मांडच आठवलं. गेला महिनाभर तो व त्याची बायको, “चल आई तुला कुंभमेळ्यात स्नानाला नेतो!” म्हणून आग्रह करत कुंभनगरीत आणलं होतं! तेव्हा किती बरं वाटलं होतं. गेली सात वर्षे हे गेल्यापासून जणू वनवासच नशिबी आला होता.. स्वतःच्या राहत्या घरात परक्यांसारखं जिणं. जीव तर तसा आयुष्यभर सर्वांनाच लावला होता. अगदी नातवंडांवर ही जीवापलिकडची माया केली होती. तीही आता मोठी झालेली. सगळ्यांना सांभाळत संसाराचा गाडा हाकला होता. तीच माणसं असं मेळ्यात आणून सोडून निघून जातील असं स्वप्नीही वाटलं नव्हतं. पहिलं स्नान घडलं तसं मुलगा सून गायब. दोन दिवस वाटलं येतील शोधत, घेऊन जातील, पण लक्षात यायला तसा वेळ लागलाच नाही. गावातही जाऊन सांगितलं असेल सर्वांना ‘मैया कुंभमें खो गयी!!’ दिवसभर रडणं झालं होतं. अश्रू नकळत सुकले गेले, डोळे कोरडेठाक. जणू कुंभ रिता होऊन राहिलेला. घरच्यां बरोबरचं नातं संपलेलं. तसं ते कधीचंच संपलं होतं. वेड्या आशेनं चिकटून होतो. आतातर ती आशा संगमात विरघळून गेलेली. आता स्वतःचं असं काहीच उरलेलं नव्हतं. सोडावं लागतं काहीतरी मेळ्यात आल्यावर! रोज समोर नागा साधू, तसेच बैरागी, नावाच्या शेवटी, आनंद, पुरी, गिरी लावून घेणारे संन्यासी हे सर्वसंगपरित्याग करून मोक्षाच्या मार्गाला लागलेले हे ती पहात आलेली.
समोर ठाणेदार, लच्छीरामची खरडपट्टी काढत असलेला. तिला आठवलं, चारच दिवसापूर्वी कुठल्यातरी यंत्रावर अंगठा दाबून घेतला होता थानेदारने व आधारकार्डावर लच्छीरामचा फोन नंबर. थानेदारने तिला खुर्चीत बसवत तिची कुंडलीच उघड केली. “नाम: गेहनाबाई, गांव: ठकराहा, जिला: चंपारण बिहार. देखो माई, कुंभमें आके मांबाप को छोडकर जाना, ये हमारे लिए नया नहीं है। हम आपके उपर सीसीटीव्ही कॅमरेसे नजर रखे हुए थे। अब आपका बेटा आपके सामने है। जाईये उसके साथ। उसे समझाया है।”
तिनं शांतपणे ऐकून घेतलं. हातातील जपमाळ कपाळी लावली. मग निग्रहाने म्हटलं, “हा जरी माझा मुलगा असला तरी मी त्याच्याबरोबर जाणार नाही. त्याने आपली बायको व अपत्यांबरोबर सुखेनैव संसार करावा. कुंभमेळ्यात आल्यावर तर माझे भागच खुल गये. हे विश्वची माझे घर. नकोच मला ती तकलादू माया!!”
ठाणेदार व खजील झालेला लच्छीराम अवाक् होऊन गेहनाबाईकडे पाहत होते. दूर कुठल्यातरी राहुटीतून शंखनाद होत होता.
☆ आपल्या पायावर उभी…— भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
(कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.) – इथून पुढे-
तिच्या कोणत्याही मैत्रिणींना माहीत नव्हतं कल्याणीचा डावा पाय पूर्ण कृत्रिम आहे. सतत साडी नेसून येत असलेल्या कल्याणीला मुली म्हणत. “ कल्याणी, कधीतरी ड्रेस घाल की आमच्या सारखा. किती छान फिगर आहे तुझी ग. ”.. कल्याणी हसून सोडून देई. कशी घालणार होती ती ड्रेस?
कल्याणी आता दुसऱ्या वर्षात गेली. शाळेच्या वेळा आता बदलल्या.
अचानक शाळा सकाळी साडेसात ते अडीच अशी झाली. कल्याणी धावपळ करत रोज कशीतरी वेळेवर पोचायचा प्रयत्न करी पण तरीही दोन जिने चढून वर यायला तिला रोज उशीर व्हायला लागला. कल्याणी सततच अर्धा तास उशिरा येते हे बघून तिला प्रिन्सिपल बाईंच्या ऑफिस मधून बोलावणे आले. खाली मान घालून कल्याणी उभी राहिली. ”काय ग कल्याणी, रोज कसा उशीर होतो तुला? शिक्षक होणार ना तुम्ही मुली? तुम्हालाच जर शिस्त नसेल तर बाकीची मुलं काय शिकणार तुमच्याकडून? इतकी हुशार मुलगी आहेस तू, रोज असा उशीर मला चालणार नाही. मग बाकीच्या मुलीही असाच उशीर करायला लागतील. ”
…. बाई ताड ताड बोलत होत्या. कल्याणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ”आता आणखी रडून दाखवू नकोस. बस झालं. शिस्त म्हणजे शिस्त. ” कल्याणी उभीच होती.
तेवढ्यात आपला तास संपवून सानेबाई ऑफिस मध्ये डोकावल्या. कल्याणी आणि हेडबाईंचं संभाषण त्यांच्या कानावर पडलं.
“ बाई, काय झालं? का रागावताय एवढ्या?”
“ अहो बघा ना. रोज रोज ही मुलगी उशिरा येतेय. असं कसं चालेल? वर काही बोलत पण नाहीये. उभी आहे नुसती मगापासून. ” बाई आणखीच चिडल्या. ,
साने बाई कल्याणीजवळ गेल्या… “ बाळा, इकडे ये बेटा. जरा साडी वर करून दाखव आपल्या बाईना. ”
साने बाईनी तिचे डोळे पुसले. शांतपणे हळूच तिची साडी गुडघ्या पर्यंत वर केली. प्रिंसिपल बाईना दिसला तो बेल्टने बांधलेला कल्याणीचा कृत्रिम पाय. त्या हादरून गेल्या आणि कल्याणीला मिठीत घेऊन स्वतःच रडायला लागल्या.
“अग कल्याणी, मला आधीच नाही का ग सांगायचं? किती बोलणी खाल्लीस माझी बाई? मला माफ कर ग बाळा. माझी फार मोठी चूक झाली. मला आणि कोणालाच हे माहीत नाही. आणि मी वचन देते तुला, हे माहीत होणारही नाही. मला शरम वाटतेय माझीच. कशी सहन करत आलीस इतके वर्ष? आणि हे अवघड जिने दिवसातून चार वेळा कसे ग चढतेस उतरतेस बाळ? असं नको करू. माझं खूप चुकलं. साने बाई, तुम्ही तरी कल्पना द्यायची ना मला. काय ग जिद्दीची तू कल्याणी. ”
बाई गहिवरल्या. “ कल्याणी, जा आता हो तू. माफ कर मला. ”
सानेबाई म्हणाल्या, ”हिची आई जिथे काम करते ती माझी मैत्रीण आहे. फार सोसलं हो या कुटुंबानं. या पोरीच्या सहनशक्तीला तर तोड नाही हो बाई. ” साने बाईंच्या डोळ्यात अश्रू आले.
डीएड चे रिझल्ट लागले. फार उत्तम गुणांनी कल्याणी पहिल्या दोन नंबरात येऊन उच्च श्रेणीत पास झाली.
सगळ्यात जास्त आनंद प्रिंसिपल बाईना झाला. त्यांनी तिला घरी बोलावलं. कल्याणी बाईंच्या घरी आपल्या आईला घेऊन गेली. बाईनी दोघींचं छान स्वागत केलं., तिच्या आईचंही फार कौतुक वाटलं त्यांना.
“ कल्याणी, मी खूप रागावले ते मनात ठेवू नकोस हं”. बाई मनापासून म्हणाल्या.
”नाही हो बाई, तुमच्याच घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवर आम्ही भावी शिक्षिका चालणार आहोत. मी कशी रागावू माझ्या लाडक्या बाईंवर?”
बाईंनी कल्याणीला सोन्याची चेन दिली. “ ही सतत घाल म्हणजे माझी आठवण राहील तुला. ”
आणि तिच्या मनगटावर उत्तम घड्याळ बांधले. “ हेही वेळ दाखवील तुला बघ. ” दोघींचे डोळे भरून आले. नमस्कार करून त्या मायलेकी घरी गेल्या.
कल्याणीला पुण्यातल्या अत्यंत नावाजलेल्या शाळेत लगेचच नोकरी मिळाली.
दरम्यान खूप खूप वर्षे गेली. बाई रिटायर झाल्या. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाली होती.
बाई एकट्या पडल्या. प्रकृती त्यांना साथ देईना. वृद्धपणाचे आजार त्यांना आणखी विकल करू लागले.
नाईलाजाने मुलांनी बाईना एका अत्यंत उत्तम वृद्धाश्रमात दाखल केले. अतिशय समजूतदारपणाने हेही वास्तव बाईनी स्वीकारले. बाईनी आता वयाची पंच्याऐशी गाठली. अजूनही त्यांची तब्बेत बरी होती आणि बुद्धी खणखणीत.
त्या दिवशी बाईना शिपाई बोलवायला आला. ” बाई, तुम्हाला भेटायला कोणीतरी पाहुणे आलेत पाठवू का त्यांना?” बाई म्हणाल्या “ पाठव ना. ”
कोण आलं असेल? मुलगे तर नुकतेच भेटून गेलेत दोन महिन्यापूर्वी.
दारावर टकटक झाली. ” या ना. आत या “
दारात एक बाई त्यांच्याबरोबर दोन पुरुष होते.
“बाई, ओळखलं का मला?” बाईनी किलकिले डोळे करून बघितलं.
”कल्याणी ना तू? 81 ची बॅच?”
कल्याणी बाईंच्याजवळ बसली. “हो बाई. मीच ती. किती वर्षे गेली मध्ये हो. एक दिवस असा गेला नाही की तुमची आठवण मला आली नाही. हा माझा मुलगा…अमित. डॉक्टर होतोय आता. आणि हे माझे मिस्टर सुरेंद्र. बाई, मीही आता पुण्यातल्या शाळेची प्रिंसिपल झाले. मी पास झाले तेव्हाचे हे घड्याळ. तुम्हीच दिलेलं. मी हेच वापरते अजूनही… माझ्यासारख्या एक पाय नसलेल्या मुलीला स्वीकारणारा आणि माझा कायम आदर करणारा हा माझा नवरा. बाई, स्वप्नात नव्हतं वाटलं की माझं लग्न होईल, मला मूल होईल.
या देव माणसाने प्रेम केलं माझ्यावर. आणि या माझ्या पायासकट मला स्वीकारलं. ”
ते दोघे बाईंच्या जवळ बसले. बाईनी प्रेमाने दोघांचे हात हातात घेतले.
“फार गुणी बायको मिळाली तुम्हाला आणि अमित, अशी आई मिळायला भाग्य लागतं बरं. संभाळ हो नीट तिला. ”
बाई दमून गेल्या. कल्याणीने बाईना पाणी दिलं. हातात त्यांची आवडती अंजीर बर्फी ठेवली. बाई हसल्या.
“अजूनही माझी आवड लक्षात आहे हो तुझ्या? अग आता नको वाटतं सगळं ग. एक तुकडा दे आणि बाकी घरी ने ग बाळा. ” कल्याणीच्या डोळ्यात पाणी आलं….. आपले उंची सँडल्स टकटक वाजवत शाळेत येणाऱ्या, कानात हिऱ्याच्या कुड्या घालणाऱ्या, उंची साड्या नेसणाऱ्या आणि कायम शाळेसाठी झटणाऱ्या करारी बाई तिला आठवल्या.
एवढीशी शरीराची जुडी करून बेड वर कोपऱ्यात बसलेल्या बाई बघून तिला रडू आवरेना.
“ बाई, माझं खूप चुकलं. मी आधी यायला हवं होतं हो. पण माझे व्याप, शाळा संसार यातून सवड मिळेना. मला साने बाईंकडून समजलं, तुम्ही इथे असता… बाई, येता का माझ्या घरी रहायला? कायमच्या? मी नीट संभाळीन तुम्हाला. खात्री आहे ना माझी?”
बाईनी तिला जवळ घेतलं. “नको ग बाळा. इथे चांगलं आहे सगळं ग. छान घेतात काळजी इथले लोक. नको आता माझी हलवाहलव ग. थोडे दिवस उरले. येत जा अशीच भेटायला. ”
.. कल्याणी आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते जड पावलांनी तिथून गेले.
त्यानंतर काहीच दिवसात बाई गेल्याची बातमी कल्याणीने वाचली.
☆ आपल्या पायावर उभी…— भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
कल्याणी घाईघाईने क्लासला निघाली होती. तिचे हे खूप महत्त्वाचं वर्ष. गरीब परिस्थिति असताना देखील जिद्दीने छान मार्क्स मिळवून डॉक्टर व्हायची जिद्द होती तिची. कल्याणी दिसायला तर सुरेख होतीच पण गरीब परिस्थितीत असतानाही आईला सगळी मदत करून मगच ती शाळेत जात असे.
आज तिची मैत्रीण कल्पना आणि ती दोघीही निघाल्या होत्या शाळेत. अकरावी बारावी नुकतेच त्यांच्या शाळेत सुरू झाले होते. आणि यांना छान मार्क्स असल्याने शाळेने फ्रीशिप दिली म्हणून त्यांनी शाळेतच प्रवेश घेतला.
कल्पना आणि कल्याणीची घरची परिस्थिती तर वाईटच होती. कल्पनाच्या वडिलांची वडापावची गाडी होती. कसेतरी भागत असायचं त्यांचं. कल्याणीचे वडील एका ऑफिसमध्ये शिपाई होते तर आई घरकाम करायला जायची. मुलगी शिकायचं म्हणते, हुशार आहे म्हणून तिची शाळा चालू राहिली.
कल्याणीला शिकण्याची फार हौस होती. आपण शिकावं आई जिथे काम करते, त्या बाईंसारखी नोकरी करावी असं वाटायचं तिला.
त्या दिवशी कल्पना आणि कल्याणी घाईघाईने चालल्या होत्या.. , अचानक समोरून टेम्पो आला. त्याचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचा कंट्रोलच गेला. या दोघी मुली रस्ता क्रॉस करत असताना अचानकच दोघीना टेम्पोची जोरात धडक बसली. कल्पना फेकली गेली आणि कल्याणी टेम्पोखाली आली. आरडा ओरडा झाला. मुली चिरडल्या, मुली चिरडल्या. कल्याणी बेशुद्ध होती. तिचे पाय टेम्पोखाली अडकलेले होते. लोकांनी तिला बाहेर काढले. रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी तिला ससून हॉस्पिटलला नेले. कल्पना फेकली गेली म्हणून ती बचावली. हाताचे हाड फ्रॅक्चर झाले पण ती घरचा पत्ता सांगू शकली. तिने लोकांना कल्याणीचं घर दाखवलं.
घडलेली हकीगत समजताच तिच्या आईवडिलांनी ससूनला धाव घेतली. कल्याणीच्या एका पायावरून टेम्पोचे चाक गेले होते. , डॉक्टर म्हणाले, दोन दिवस बघूया. पण सुधारणा नसली तर मात्र मांडी पासून पाय कापावा लागेल. नाहीतर गॅंगरीन होईल. बिचारे आईवडील घाबरून गेले. दोन दिवसानंतर कल्याणाचा पाय काळानिळा पडला, तिला अत्यंत वेदना होऊ लागल्या. त्या पायाचा रक्तप्रवाह थांबला होता आणि गॅंगरीनची सुरवात झाली होती. नाईलाजाने आईवडिलांच्या सह्या घेऊन कल्याणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
कल्याणी चा डावा पाय गुढघ्याच्यावर मांडीपर्यंत कापावा लागला. आईवडिलांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. एक तर गरीबी, आणि आता ही अशी मुलगी.. तिचे भविष्य त्यांना भेडसावू लागले.
कल्याणी शुद्धीवर आली. बँडेज असल्याने तिला हे काहीच समजलं नाही. गुंगीत होती कल्याणी तीन दिवस.
आई तिच्याजवळ बसून होती.
” बाळा, आता बरं वाटतंय ना ? “ मायेने डोक्यावरून हात फिरवून आई म्हणाली.
चौथ्या दिवशी तिला अंथरुणातून उठवल्यावर कल्याणीला समजलं, मांडीखाली काहीच नाहीये. तिने किंकाळी फोडली. ”आई ग, आई, हे काय? माझा पाय? मला समजत कसं नाहीये काहीच?” आईने डॉक्टरांना बोलावून आणलं. अतिशय कनवाळू सहृदय तरुण डॉक्टर होते ते.
शांतपणे ते तिच्याजवळ बसले आणि म्हणाले, ”बाळा, तू वाचलीस ही देवाची कृपा. तुझा पाय आम्हाला कापावा लागला. पार सडला होता तो. तुला मग गॅंगरीन झाला असता. अजिबात रडू नकोस. सगळं आयुष्य उभं आहे तुझ्यासमोर. काय रडायचं ते आत्ता रडून घे. पण नंतर हे अश्रू पुसूनच तुला उभं रहायचं आहे खंबीरपणे. ” तिला थोपटून धीर देऊन डॉक्टर निघून गेले.
कल्याणी हमसून हमसून रडायला लागली. ” मला नाही जगायचं. मी जीव देणार आता. ”.. म्हणत ती उठून उभी रहायला लागली आणि धाडकन पडलीच कॉटवर. आपला आधाराचा पाय आपण गमावला आहे हे चरचरीत सत्य लक्षात आलं तिच्या. पंधरा दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. पायाची जखम अजून ओली होती.
कल्याणीला क्रचेस घेऊन चालायची सवय करावी लागली. सगळा भार एकाच धड पायावर येऊन तो अतोनात दुखायचा. काखेत क्रचेस घेऊन खांद्याला रग लागायची.
कोवळं वय कल्याणीचं. आई वडिलांना अत्यंत दुःख होई की हे काय नशिबी आलं आपल्याच मुलीच्या.
कल्याणीची आई जिथे काम करायची त्या बाई पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल हॉस्पिटल मध्ये नर्स होत्या. कल्याणीला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या. हॉस्पिटलचा, अशा युद्धात झालेल्या अपघातात, अवयव गमावलेल्या सैनिकांसाठी वेगळा सुसज्ज विभाग आहे. सगळा स्टाफ या सुंदर तरुण मुलीला बघून हळहळला.
तिथल्या सिनिअर डॉक्टर म्हणाल्या, “काळजी नको करू. आपण तुला नवीन पाय देऊ. तुला इथे रहावे लागेल निदान सहा महिने. किंवा एक वर्षदेखील. ”
कल्याणी म्हणाली ” मी राहीन मॅडम. मला पुढे शिकायचे आहे आणि या एकाच पायावर उभे रहायचे आहे. ”
ते दिवस खरोखरच परीक्षेचे होते तिच्या. त्या वेड्या वाकड्या तुटलेल्या पायावर पुन्हा तीनवेळा शस्त्रक्रिया केल्या. मग तिला आधी हलक्या ठोकळ्यावर चालायला शिकवलं. मग चार महिन्याने मापे घेऊन तिला अतिशय हलका पायलॉनचा मांडी पासून खाली कृत्रिम पाय दिला गेला. लहान मूल चाचपडत चालतं तशी कल्याणी पहिले काही दिवस अंदाज येई पर्यंत पडत, अडखळत चालली. पण नंतर सवय झाल्यावर तिला आणखी चांगला हलका मांडीपासून पावलापर्यंत नवीन पाय दिला.
… ज्या दिवशी कल्याणी त्याची सवय करून घेऊन सफाईने चालू लागली तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा होता तिच्यासाठी. तिला अत्यंत कष्ट झाले हे करण्यात. तिचा काहीही दोष नसताना. ,
रोज मरणयातना सोसून फिजिओथेरपी घेणे, त्या उरलेल्या थोट्या जखमेतून रक्त येई. पुन्हा पुन्हा नवीन जखमा होत. कल्याणीने एका जिद्दीने ते सहन केले. या जवळजवळ सात आठ महिन्यात ती घरीही गेली नाही. उरलेल्या मांडीच्या भागावर बेल्टने पायलॉन बांधून कृत्रिम पावलात बूट घालायला ती शिकली. त्या पायाची रोजची साफसफाई तिला तिथल्या डॉक्टर्सनी आपुलकीने शिकवली. आता मात्र तिला हा कृत्रिम पाय आहे हे कोणाच्या लक्षात सुद्धा न येण्याइतकी कल्याणी सफाईने पाय वापरायला शिकली.
हॉस्पिटलच्या सर्जन आणि कृत्रिम विभागाच्या डॉक्टर्सना म्हणाली, ” तुमचे उपकार कसे फेडू मी?
माझ्या गरीब आईवडिलांना कोणताही खर्च झेपला नसता हो. तुम्ही माझी स्पेशल केस म्हणून सगळी फी माफ केलीत. सर, मी इथेच रहाते. मला इथेच नोकरी द्या. मला त्या कृत्रिम जगात जायचेच नाही. , इथे मला खरे जगायला शिकवलं तुम्ही सगळ्यांनी. इथे उपचार घेणाऱ्या माझ्या सैनिक भाऊ मामा काका यांनी. ”
डॉक्टर म्हणाले, ” तू आता छान बरी झालीस. आता घरी जा. नवीन पायाची काळजी घ्यायला तुला आम्ही शिकवलं आहे. दर सहा महिन्यांनी तुला इथे तपासणीसाठी यावं लागेल. आता नवीन आयुष्य सुरू कर बाळा. मनासारखं शिक्षण घे. ”
कल्याणी घरी परतली. जग एक वर्षात खूप पुढे गेलं होतं. तिच्यासाठी थांबायला कोणाला वेळ होता?
कल्पना येऊन तिला भेटून गेली. आपली मैत्रीण पुन्हा आपल्या पायावर उभी राहिलेली बघून कल्पनाला अतिशय आनंद झाला. कल्याणीने आपली स्वप्नं बाजूला ठेवली. तिने बारावीची परीक्षा दिली आणि डीएड व्हायचं ठरवलं. तिला ते झेपणारं आणि लगेच नोकरी देणारं क्षेत्र होतं…
कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.
माझ्या नातवाने मला आज निरूत्तर केले. दररोज रात्री तो कितीही उशीरा घरी आला तरी माझ्या जवळ १०-१५ मिनिटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही. माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवलं आहे. आता तर त्याचं लग्न देखील झालं आहे. घरी आल्यावर लवकर जेवून त्याने त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे. पण तसं होत नाही. आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली. पण त्याचं उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. मी निरूत्तर झालो. त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं. माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो. पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील.
माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला, ” आबा, रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजचं आणि शेवटचंच. ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज. तुम्ही आईबाबांचं नका ऐकू. तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत.
माझी आठवण जिथं पर्यंत मागे जाते तेंव्हापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे. मला तेव्हा एकटं झोपायला खूप भिती वाटायची. पण मी डोळे मिटेस्तोवर तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास. तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं. त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तू मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचास. घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तू रंगून जायचास. मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास. मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून.
पुढे काॅलेज ऍडमिशन साठी फाॅर्म च्या लाईनीत उभा राहिलास. काॅलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास. माझी फायनल एक्झॅम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस. डोळ्यांवरची पेंग जाण्यासाठी मला काॅफी बनवून द्यायचास. दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं. मी तुझ्यापासून लांब रहाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस. मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास. तिथे तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार.
आबा लहानपणी जेव्हा भिती वाटायची तेव्हा तू सोबत केलीस, माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास. जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा राहिलास. परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील. तू खरंच सावली सारखी सोबत केलीस माझी. मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशिर्वाद होता रे. म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला. रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच. उशीर झाला तरी हरकत नाही. तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं. माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्या बद्दल सगळं सांगितलं तिला. मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हाॅटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी. आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो.
आबा आजवर तु माझ्यासाठी जे जे केलंस त्याबदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो. तुझी विचारपूस करतो. तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणांत दूर होतं. म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच रहाणार. तू आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नकोस प्लीज.
आबा तु माझा श्वास आहेस. तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच मी करु शकत नाही. तुझ्या आजारपणात तू खूप थकला आहेस. उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवयचा विचार करतो आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्विकार करावास आणि मला एका ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करावीस “.
खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्विकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
” राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे ” त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरुन मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगद ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला.
लेखक : अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक)
लेखिका : सुश्री प्राची गडकरी
मो. ९९८७५६८७५०
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈