मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

अचलाने अभिजितला दाखवली ती आत्महत्येची बातमी.

क्षणभर त्याचा चेहरा गंभीर झाला. पण लगेचच दोन्ही हात वर करून तो ‘हेss’ म्हणून ओरडला. अगदी सुजयसारखंच.

“अभि?”

“अग अचला, ही बातमी खरीच  दिसतेय.आता तर आपला चित्रपट….. ”

“अभि……”तिच्या आवाजातला तिरस्कार त्याला आरपार भेदून गेला.

मग दर एक-दोन दिवसांआड अशा बातम्या  येऊ लागल्या.

अचलाला तर तिसऱ्या पानावरचा  वरचा उजवा कोपरा बघायचा धसकाच बसला. अभिजित तिची नजर चुकवू लागला.

त्या दिवशी रात्री मात्र अचलाने ठामपणे सांगितलं, “अभिजित,मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.”

“मी दमलोय.”

“मला एस्क्युजेस नकोयत. मी काय सांगणार आहे, ते तुला ऐकावंच लागेल.”

“ठीक आहे. लवकर आटप.”

“आतापर्यंत अकरा दुणे बावीस मुलांनी आत्महत्या केल्यायत. कसल्यातरी खुळचट कल्पनांवर विश्वास ठेवून.”

“सत्य आणि सिनेमा यातला फरक न कळण्याएवढी लहान ती नक्कीच नव्हती.”

“सत्य आणि सिनेमा यातला फरक समजण्याएवढी मोठी होती ती मुलं. पण खरी बातमी आणि खोटी बातमी यातला फरक ओळखू शकली नाहीत. निदान पहिल्या जोडीला तरी ती बातमी खरी वाटली. नंतरच्यांनी त्यांच्यावर विश्वास  ठेवला. कॉम्पिटिशनचं युग आहे ना हे !आमचं प्रेमही त्यांच्याइतकंच उत्कट आहे, हे दाखवायचा मोह झाला असणार त्यांना.”

“असेलही.”अभिजितने खांदे उडवले.

“पण कोणत्याही परिस्थितीत तू तुझी जबाबदारी टाळू शकत नाहीस.”

“म्हणजे? “अभिजित तुच्छतेने काही बोलला, की अचला सरळ तिथून निघून जात असे. आज मात्र त्याच्या ‘म्हणजे’मधली तुच्छता लक्षातच न आल्यासारखी  ती बोलत राहिली.

“तू प्रेस कॉन्फरन्स घे आणि सांगून टाक. सांगून टाक की ती पहिली बातमी खोटी होती. सांगून टाक, की चित्रपटाचा शेवट हाही एक स्टंटच आहे. चित्रपट ओरिजनल वाटावा म्हणून केलेला. वास्तवाच्या जगात त्याला काहीही अर्थ नाही, स्थान नाही. तेव्हा कोणीही तो चित्रपट गांभीर्याने घेऊ नये. पाहिजे तर तो चित्रपट ‘ऍडल्ट’ करून टाका.”

“झालं तुझं बोलून?”

“हे सगळं उद्याच्या उद्या झालं पाहिजे.”

“हे बघ, अचला. या गोष्टी माझ्या हातात नाहीत.नवीनभाईच काय ते ठरवू शकतील.”

“मग बोल त्यांच्याशी. समजाव त्यांना. म्हणावं, पैशापेक्षा माणसाचं आयुष्य कितीतरी पटीने मौल्यवान आहे. की  मी बोलू त्यांच्याशी?”

“तू नको. मीच बघतो.”

पण तो नवीनभाईंशी काहीच बोलला नाही. नवीन चित्रपटांची सिटींग्ज चालू होती. अशी काहीतरी मुर्खासारखी स्टेप घेऊन  तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नव्हता.

ही कालची गोष्ट. आज मात्र अचलाने निश्चयच केला. आज कोणत्याही परिस्थितीत ती अभिजितला कन्फेशन द्यायला लावणार होती. प्रेम म्हणजे काय, याची जाणीवही नसणाऱ्या त्या निरागस, कोवळ्या प्रेमिकांना अपील करायला लावणार होती.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ७. वचनपूर्ती

धारानगरीत एक ब्राह्मण रहात होता. फुले-फळे आणण्यासाठी तो वनात जात असे. हा त्याचा नित्याचाच उपक्रम होता. पण एक दिवस मात्र विपरीत घडले. त्याला वनात साक्षात व्याघ्रराजाचे दर्शन झाले! वाघाच्या रूपाने साक्षात मृत्यूच समोर उभा आहे असे ब्राह्मणाला वाटले. भयभीत होऊन तो पळायला लागला. वाघानेही पाठलाग करून त्याला शेवटी पकडलेच!

तेव्हा मनात काही विचार करून ब्राह्मणाने वाघाला विनंती केली की, “आपण माझ्यावर दया करून मला ठार न मारता तीन दिवसांसाठी सोडले, तर मी घरी जाऊन, माझी महत्त्वाची कामे आटपून, माझ्या नातलगांना भेटून परत येईन”. त्यावर वाघ म्हणाला, “जर तू परत आला नाहीस तर मी काय करावे?” “मी नक्की परत येईन” असे जेव्हा ब्राह्मणाने वचन दिले, तेव्हा वाघाने ब्राह्मणाला सांगितले की, “हे ब्राह्मणा! तू घरी जाऊन तीन दिवसांनी परत ये. मी तुझी इथेच वाट बघतो.”

शोकाकुल अवस्थेत ब्राह्मण घरी परतला. घरी जाऊन तीन दिवसांनी सगळी कामे आटपून, वाघाला वचन दिल्याप्रमाणे तो वाघाच्या समोर येऊन उभा राहिला. ब्राह्मणाला पाहताच, वाघाला त्याच्या सत्यप्रियतेचे खूप कौतुक वाटले. अहो आश्चर्यम्! वाघाने ब्राह्मणाची स्तुती करून त्याला ठार न मारता घरी जाण्यास सांगितले. ब्राह्मणाला वचनपूर्तीचे फळ मिळाले.

तात्पर्य –  खरोखरच सत्यवादी जगात पूज्य ठरतात

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

पण कुठे काय  बिनसलं कोणास ठाऊक !तिकिटं  खपेनातच. एका आठवड्यातच चित्रपट थिएटरवरून काढावा लागणार, अशी चिन्हे दिसायला लागली.

अभिजित तर नवीनभाईंपेक्षाही जास्त अपसेट झाला. इंडस्ट्रीतल्या त्याच्या करियरचं काही खरं नव्हतं.

दिवसभर तो डोकं धरून बसला होता. अचला जेवायला बोलवायला आली, तर”भूक नाही म्हटलं ना?”म्हणून वस्सकन ओरडला तिच्या अंगावर.

तेवढ्यात बाहेर सुजयने टीव्ही ऑन करून चॅनल सर्फिंग सुरु केलं. एकमेकांत मिसळलेले ते कर्कश आवाज कानावर आले मात्र, अभिजित चवताळलाच.

“बंद कर बघू आधी तो टीव्ही. आधीच डोक्यात घण घातल्यासारखं……. ”

सांगितलेलं ऐकेल तो सुजय कसला !त्याने फक्त व्हॉल्युम थोडा कमी केला.

“आय  डोन्ट नो व्हॉट यू से….. ”

हे सूर कानावर आले आणि कुठचंतरी दार किलकिलं झालं.

अभिजितने लगेचच नवीनभाईंची अपॉइंटमेंट घेतली.

पाच मिनिटांच्या आत  तयार होऊन तो बाहेर पडलेला बघून अचलाला धक्काच बसला.

अभिजितची कल्पना ऐकून नवीनभाई उडालेच, “तुमची आयडिया म्हणजे सोना हाय सोना. अरे, आपल्या पिक्चरवर पोरांच्या उड्या पडणार. कॉलेजं ओस पडणार आणि थिएटरवर ब्लॅक चालणार. मी तुमच्या या आयडियावर वर्क करेल. तुम्हाला तुमचं पर्सेंटेज मिळेल. ”

दुसऱ्याच दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात बातमी झळकली –‘  ‘मौत से…. ‘ या चित्रपटाने प्रेरित होऊन एका प्रेमी युगुलाची आत्महत्या. ‘

बातमी एवढी तपशीलवार लिहिली होती, की ती फक्त आपल्या कल्पनेतूनच जन्माला आली आहे, यावर खुद्द अभिजितचाही विश्वास बसला

नाही. अर्थात खाली तळटीप होती -‘मृतांच्या निकटवर्तीयांच्या विनंतीवरून व त्यांच्या भावनांचा आदर करून मृतांची नावं तसंच त्या गावाचंही नाव बदललं आहे.’

त्या बातमीने खरंच जादूची कांडी फिरवली. चित्रपटाचा धंदा एवढा प्रचंड झाला की……

अभिजितला घसघशीत रकमेचा चेक मिळाला.

नवीनभाईंनी ग्रँड पार्टी दिली.

पार्टीहून घरी परतताना अचलाने धीर करून अभिजितला विचारलं,”अभि, एक विचारू?”

“काय? ”

“ती बातमी खरी होती का रे?”

अभिजित मोठ्याने हसला.

“तुझ्याच सुपीक डोक्यातून निघालेली?”

एरवी अभिजित चिडला असता ; पण आज तो जाम खुशीत होता.

“कशावरून?”

“नवीनभाई ज्या प्रेमाने तुझ्याशी बोलत होते ना, त्यावरून अंदाज केला मी.”

पुन्हा अभिजित हसला.

अचलाला आपल्या नवऱ्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं.

दुसऱ्या दिवशी अचलाने वर्तमानपत्र उघडलं. तिसऱ्या पानावर वरच्या उजव्या कोपऱ्यात बातमी होती – तशीच.यावेळी फोटोही होता. एकमेकांचे हात घट्ट धरलेल्या दोन निरागस मुलांच्या प्रेताचा. खाली नावं बदलल्याची टीपही नव्हती.अचलाच्या अंगावर काटा आला.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“दहा -पंधरा मिनिटात आटपेल माझं. मग बरोबरच जाऊया.” अचला अभिजितला म्हणाली.

“नको. मी निघतो. वेळेवर पोचलं पाहिजे.”

अभिजित निघाला. त्याच्या वक्तशीरपणाचं नवीनभाईंना कौतुक होतं. आणि नवीनभाईंना खूष करायची एकही संधी अभिजित सोडत नव्हता.

व्यावसायिक चित्रपटसृष्टीत नवीनभाईंमुळेच ब्रेक मिळाला होता त्याला. स्क्रिप्टरायटरच्या टिममधला एक होता तो. सर्वांचे तुकडे जोडून एक प्रेमकथा  तयार झाली होती. पण ती नेहमीसारखीच वाटत होती. काहीतरी वेगळेपणा हवा होता.

“ट्रॅजिक एन्ड करूया,”एकाने सुचवलं, “हिरो हिरोईन मरतात.”

“कशी?”

“कोणीतरी त्यांना मारतं. किंवा आत्महत्या, नाहीतर  ऍक्सीडेन्टमध्ये… ”

“ऍक्सीडेन्ट हा शेवट नवीनच आहे.”

“पण त्याला तसा अर्थ वाटत नाही. उगीचच मारल्यासारखं वाटतं त्यांना.”

“मग घरचा विरोध असल्यामुळे आत्महत्या… ”

“हीपण आयडिया घिसीपिटी आहे. ”

इतका वेळ गप्प  राहून विचार करत बसलेल्या अभिजितला एकदम सुचलं -“मला एक आयडिया सुचतेय.”

“बोला.”

“ते आत्महत्या करतात ;पण घरच्या विरोधामुळे नव्हे.

आपण असं करूया. हिरो, हिरोईन थोडे लहान दाखवूया. म्हणजे इनोसन्ट, भावुक वगैरे. त्यांचं एकमेकांवर खूप खूप प्रेम असतं. घरच्यांचा सुरुवातीला विरोध असतो;पण नंतर ते लग्नाला संमती देतात.”

बोलताबोलता अभिजित  थांबला. त्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता न्याहाळली. नवीनभाई गोंधळात पडल्यासारखे वाटत होते; पण अभिजितच्या बोलण्याकडे  त्यांचं पूर्ण लक्ष होतं.

“तर लग्नाचं नक्की होतं. पण हिरो -हिरोईनलाच वाटतं, की लग्न झालं, संसाराची रुक्ष जगरहाटी सुरु झाली, की त्यांचं एकमेकांवरचं  हे गाढ प्रेम कमी होईल. ओहटी लागेल त्याला. कोणी सांगावं, पुढेमागे त्यांच्या आयुष्यात तिसरी किंवा तिसरा ‘वो’ डोकावण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत आत्ताचं हे प्रेम जन्मभर एवढंच उत्कट राहील, याची गॅरंटी नाही. एकदा का व्यवहाराचा सूर्य तळपायला लागला, की प्रेमाचं धुकं विरायला कितीसा वेळ लागणार?”

“तुम्ही बोलताय त्यात पॉईंट आहे.”

“ह्याs!मला तर ही आयडिया आऊटडेटेड वाटते. हल्ली प्रेमाला एवढं सिरीयसली  घेतं कोण? तू नहीं और सही, और नहीं….. ”

“तसं असतं, तर एवढ्या प्रेमकथा चालल्याच नसत्या. अजूनही आपला नव्वद टक्के सिनेमा  प्रेमाभोवतीच फिरतोय.”

मुख्य म्हणजे नवीनभाईंना अभिजितची आयडिया ‘एकदम ओरिजिनल’ वाटली. त्यांनी ती उचलून धरल्यावर विरोधाच्या जिभा गप्प झाल्या.

‘मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम’ चित्रपटाचं नाव ठरलं. लगेचच कामही सुरु झालं.

हिरो, हिरोईन दोघंही लहानच होती. दोघांचाही डेब्यू होता. पण त्यांनी कामं मात्र ताकदीने केली.

चित्रपट भराभर पूर्ण झाला. प्रोमो, साउंड ट्रॅक, पार्ट्या, प्रीमियरची तयारी…..

जाहिरातीचा केंद्रबिंदू ‘शेवट एकदम ओरिजिनल’ हाच होता.

चित्रपट सुपरहिट ठरणार, असा रंग दिसत होता.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

चहाचा गरमगरम घोट घशातून उतरला , तेव्हा कुठे अभिजितला वर्तमानपत्र उघडायचं धैर्य आलं.

’22फेब्रुवारी 2001′.त्याने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वर्तमानपत्रावरची तारीख वाचली. अर्थात  मनातल्या मनात. नेहमी तो मोठ्याने वाचायचा. सुरुवातीला अचला चिडवायची त्याला, नंतर चिडायची, मग निर्विकार असायची. आताआताशा तर…..

तिसऱ्या पानावरच्या वरच्या उजव्या कोपऱ्याकडे नजर गेली मात्र…..

त्याने कितीही कसोशीचा प्रयत्न केला, तरी त्याच्या चेहऱ्यावरचा बदल अचलापासून लपू  शकला नाही.

“बारावं? ”

“अं?…. हो…”अभिजितचा निसटता होकार.

भुवयांच्या मधला भाग दोन बोटांच्या चिमटीत धरून बसून राहिला तो. डोळे  मिटले असले, तरी अचलाची धगधगती नजर आपल्यावरच रोखल्याचं जाणवत होतं त्याला.

जराशाने तो सावरला. चहाचा आणखी एक घोट घेतल्यावर,  अंगात थोडं बळ आल्यासारखं वाटलं त्याला.

“पण…. पण माझा काय दोष आहे यात? त्या मुलांना स्वतःची अक्कल नव्हती? ”

अचलाला कळेना, हा आपल्याला पटवायचा प्रयत्न करतोय, की स्वतःचीच समजूत घालतोय.

“ते काहीही असो, अभिजित. बारा दुणे चोवीस जणांचे प्राण गेलेयत. यापुढेही असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती जणांच्या मृत्यूचं  पाप घेणार आहेस तू  तुझ्या डोक्यावर? ”

“बघतो दुसरा काही मार्ग निघतो का.”

“दुसरं सोल्युशन सुचेपर्यंत आणखी बळी पडलेले असतील. त्यापेक्षा  मी सांगितल्यासारखं कर. आजच्या आज कन्फेशन देऊन टाक.”

“हं. ”

“सॅन्डविच घे.”

“नको. इच्छा  नाही……. सुजय उठला नाही अजून? ”

“त्याच्या रूममध्ये नाहीय तो. रात्री आलाच नाहीसं वाटतं. बोर्डवर लिहून गेला होता -‘मित्राकडे जातोय. उशीर झाला तर तिथेच झोपेन. डायरेक्ट उद्या संध्याकाळीच येईन.’ ”

अभिजितची नजर मेसेज बोर्डकडे वळली. सुजयचा पैशाचा मेसेज तसाच होता.

“हे काय? तू त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले नाहीस अजून? ”

“नाही.”

“का? वेळ नाही मिळाला? आज कसंही करून वेळ काढ. त्याचं  क्रेडिट कार्डपण काढून घेतलंस तू.”

“आधीचे पैसे एवढ्यातच कसे संपले, ते कळल्याशिवाय मी त्याला आणखी पैसे देणार नाही. पैसे मागितले की लगेच मिळतात ना. त्यामुळे किंमतच वाटत नाही त्याला पैशाची. आपण लहान असताना….. ”

“अग, जाऊदे ग अचला. त्याच्या नशिबाने त्याला मिळतंय, तर घेऊ दे ना उपभोग त्याला. आपल्या वेळची परिस्थिती  वेगळी होती. तसा आपल्यालाही थोडासा का होईना, पॉकेटमनी मिळत होताच की. आणि आपण उडवतही होतो तो. दोनतीन दिवस कँटीनला चाट मारून छोटीशी गिफ्टही द्यायचो तुला. आठवतं?”

कोर्टींगच्या आठवणींनी दोघांचाही मूड थोडासा निवळला.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – वडिलोपार्जित धन (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – वडिलोपार्जित धन (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मरणशय्येवर वडील निजलेले होते. समोर  त्यांचा लाडका पुत्र. वडिलांना काही तरी सांगायचं होतं. मुलगा त्यांची मनोव्यथा जाणून घ्यायला आतूर झाला होता. वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘बाळा,  ह्या घराशिवाय माझ्या पाशी काही नाही. जे होतं ते तुला वाढवण्यात आणि तुझ्या शिक्षणात मी खर्च केलं. मला अभिमान वाटतोय की माझा मुलगा परदेशातल्या एका

कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो आहे. माझं जे काही आहे ते ह्या कपाटात ठेवलं आहे.

मुलाला आश्चर्य वाटलं. लोक मूल्यवान गोष्टी बँकेच्या लाँकरमध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवतात. मुलाच्या शंकेखोर चेहऱ्याकडे बघून त्या लेखक वडिलांनी सत्य सांगितलं.’बाळा,ह्या कपाटात माझी प्रकाशित पुस्तकं,अप्रकाशित लेखन, वाचकांची खुशी पत्र आणि काही स्मृती चिन्हं आहेत. बास. एव्हढीच माझी पुंजी आहे. ती तुझ्याकडे सुपूर्द करतो.’

मुलाला ठाऊक होतं, वडिलांनी जन्मभर साहित्य साधना केली होती. म्हणूनच तो अभिमानाने म्हणाला, ‘बाबा, ह्या घरात मी साहित्यसंग्रहालय काढीन, तुमचं अप्रकाशित लेखन मी प्रकाशकांकडे  पाठवीन, सगळ्या प्रशस्तीपत्रांचा एक अल्बम बनवीन, तुमचे पुरस्कार आणि स्मृती चिन्हं म्हणजे तर आपल्या घराण्याची अनामत ठेव होईल. कारण हे माझं वंश पारंपरिक धन आहे.’

खूप वेदना होत असतानाही  वडिलांच्या डोळ्यांत आनंदाची चमक आली.

 

मूळ हिंदी लघुकथा-‘विरासत’ – लेखक – श्री सेवा सदन प्रसाद, खारघर, नवी मुंबई 

मो. 9619025094.

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – क्रोधाचा परिणाम ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ६. क्रोधाचा परिणाम

कोण्या एका गावात ‘नरेश’ नावाचा एक माणूस रहात होता. त्याने एक माकड व एक बोकड यांचे प्रयत्नपूर्वक पालन केले होते.एकदा त्याला महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. माकडाला व बोकडाला कुठे ठेवावे हा त्याला मोठा प्रश्नच पडला. शेवटी नरेशने त्या दोघांना आपल्या बरोबर न्यायचे ठरवले.

नरेशने शिदोरी म्हणून बरोबर दहीभात घेतला. तिघेजण मार्गक्रमण करू लागले. चालता चालता थकल्याने नरेशने एका वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले. माकडाला व बोकडाला त्याच वृक्षाखाली बांधून व त्यांच्याजवळच शिदोरी ठेवून तो पाणी आणायला निघाला.

नरेश गेल्यावर माकडाने सगळा दहीभात खाऊन टाकला. हाताला लागलेले दही बोकडाच्या तोंडाला फासले व आपण त्या गावचेच नाही असे भासवीत दुसरीकडे जाऊन बसले. इकडे नरेश जेव्हा पाणी घेऊन परतला, तेव्हा तो भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने खाण्यासाठी शिदोरी उघडली आणि पाहतो तर काय! शिदोरीत अन्नाचा कणही उरलेला नव्हता. फक्त बोकडाच्या तोंडाला चिकटलेले दही त्याला दिसले.

‘मी माझ्यासाठी आणलेले सर्व अन्न ह्याने खाल्ले’ ह्या विचाराने नरेशच्या रागाचा पारा चढला, व रागाच्या भरात त्याने निष्पाप बोकडाला मारले.

तात्पर्य – खरोखरच क्रोध माणसाला अविवेकी बनवतो. न्याय-अन्यायाचे भान त्याला रहात नाही.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 5 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 5 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

चाचा विचार करत माहित आहेत. ते फॅक्टरी वरचे साहेब लोक आहेत ना.. हॉं तेच… ज्यांनी पंचवीस हजार रुपये दिले होते. ते भैय्याचा जवळजवळ अर्धा माल खरेदी करतात. निवडक माल, महॅंगे महॅंगे फल भैय्या त्यांना घरपोच करायचा… ते आहेत..इतरही लोक आहेत त्यांच्या मदतीने सगळं काम मार्गी लागेल. कॉलेज असेल तेव्हा सकाळी संध्याकाळी केव्हाही तो माल सप्लाय करू शकेल….. अच्छा, तुमचा ‘ मधला’ सकाळी पेपर टाकायचं काम करायला तयार असेल तर ते काम मी त्याला जोडून देईन. ‘तो’ आणि धाकटा सुट्टीच्या दिवशी गाड्या, मोटारी धुवायचं, साफ करायचं काम करणार असतील तर काही दिक्कत नाही. मी मिळवून देईन त्यांना काम.

आपल्या मुलांना लहान वयात काम करावं लागणार या कल्पनेने सुशीलेला रडूच फुटलं.

थोड्या वेळाने मन घट्ट करून ती म्हणाली, “माझ्या मेली च्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू वाढलाय…. अंधुकच दिसतंय… माझं शिवण काम ही तीन-चार महिने थांबलंय… ऑपरेशनचा खर्च आहे, बँकेत पैसाही नाहीय. ‘हे’ असते तर…. फुटक्या नशिबाची मी… माझ्या लेकरांना घर चालवण्यासाठी काम करावी लागणार.”

तिचे डोळे पाझरू लागले. विजयनं पुढे होऊन आईचे डोळे पुसले. पाठीवर हात फिरवून तिला सांत्वना दिली. अन् तिची समजूत घातली.

तो म्हणाला, “आम्ही इतके लहान नाहीयेआता. घर चालवायचं तर पैसे मिळवायलाच हवेत. कुठलंही काम हलकं मानून कसं चालेल.?.. आणि तिघं समजूतदार भावंडं कामाला लागली.

– – — – –

उन्हाचा चटका लागला तशी विजय एकदम भानावर आला.विचारात गुरफटून आपण गाडी बाजूला लावून फुटपाथवर बसून राहिलोय याची त्याला जाणीव झाली. आपण कित्ती वेळ वाया घालवला. अजून ‘बोहनी’ पण नाही झाली. मनात विचार येताच तो थोडासा खजील झाला… उठला… गाडी घेऊन पुढे जायला निघाला…

पण एकदम त्याला थांबावं लागलं. एका लाठीनं त्याची गाडी अडवली होती. लाठी वाल्याच्या केसाळ हाताकडे पाहून तो घाबरला. तो एका वर्दी वाल्या पोलिसाचा हात होता.

“काय रं पोरा, कसलं बारकं बारकं आंबं ठेवलंयस. “एक आंबा चाकूनं कापता कापता तो म्हणत होता.” पण बरं हाय. फळ गोड दिसतंय. चल दे “विजयच्या कानावर शब्द आदळले.

दर किंवा  किती हवेत हे न विचारता विजय दचकून त्याच्याकडे पाहू लागला. ‘पुनश्च,… पुनश्च तोच प्रसंग समोर उभा ठाकला आहे याची थरकाप उडवणारी जाणीव त्याला झाली. ज्या प्रसंगानं त्याच्या लाडक्या बाबांचं आयुष्य संपवून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. त्याला त्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नव्हती. सावध, सजग होऊन पोलिसाकडे पाहून तो कसंनुसं हसला. खाली वाकून मोठ्या अनिच्छेनं त्यानं एक मोठा बॉक्स गाडीच्या कप्यातून बाहेर काढला…. त्यात थोडं गवत टाकलं… आणि एक एक आंबा काढून तो बॉक्समध्ये भरू लागला.

 

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 4 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 4 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

‘दिवस’ झाले. नातेवाईक”सांभाळून रहा… काही मदत लागली तर आम्हाला ताबडतोब बोलवा. अर्ध्या रात्रीतनं पण आम्ही यायला तयार आहोत… वगैरे म्हणत आपल्या आपल्या परीने त्यांना धीर देत आपापल्या घरी परतले.

सगळं घरच जणू निष्प्राण झालं होतं. घरावर आलेली अवकळा अन् दुःखाची छटा काही कमी होत नव्हती. पुढच्या आठ दहा दिवसात इब्राहिम चाचा विजयला बरोबर घेऊन या-त्या ऑफिसच्या चकरा मारत होते. आवश्यक सर्टीफिकीटं, कागदपत्रं, दाखले हे सगळं  त्यांनी मिळवलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम सुरू झालं. पोलीस मुख्यालय, मानवाधिकार आयोग… महीला आयोग… विधवा सहायता कोष.. या सगळ्यांची ऑफिसं आणि ज्यांनी ज्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं ती मोठी माणसं… सगळ्यांकडे हेलपाटे सुरू झाले. पण प्रत्यक्षात ताबडतोब योग्य ती मदत कुठूनच मिळत नव्हती.पोलिस खात्यातून आश्वासन दिलेले दोन लाख रुपये पण मिळत नव्हते. सगळीकडून गुळमुळीत उत्तरं, चार-पाच महिन्यानंतरचे वादे, संस्थेचे नियम… मिटिंग सध्या घेता येत नाही अशी अगतिकता. दोन महिन्याच्या काळात हेच सगळं पदरी पडलं होतं . सदानंदनं मंडईतल्या गाळ्या साठी भरलेला ऍडव्हान्सही परत मिळणार नव्हता. हेलपाटे घालून घालून दोघांचे पाय तुटायची वेळ आली.

सगळ्या गोष्टींचा त्यांना वीट आला. चाचा तर कामाची खोटी करून त्याला मदत करत होता. शेवटी एके दिवशी सकाळी सकाळीच तो त्यांच्या घरी आला.

“विजऽय” त्यांनं हाक मारली. सुशीला ची चाहूल लागताच तो म्हणाला,”भाभीजी, बुरा मत मानना… पण आता आपल्याला इतरांवर अवलंबून राहून चालणार नाही. एक महत्वाची बाबा तुम्हाला सांगतो… मनापासून… बघा पटतंय का! तशी मी आणखी कोशिश चालूच ठेवणार आहे. पण काय आहे, सोळा वर्षाच्या विजयला आता नोकरी नाही मिळणार .! बरं, मुलांच्या शाळा सकाळी असतात का दुपारी?

“दुपारी” विजय म्हणाला.

“ठीक आहे. सध्या तर सुट्टी चालू आहे. विजयला मोठ्या मंडईत घेऊन जातो. गाडीवर फळ घालून विकायचं काम तो करेल.”

“गाडी…. फळं…….”मायलेक हादरलेच.

“तुम्हाला धक्का बसेल…. मी समजू शकतो. पर क्या करे… आपल्याला जरा धाडस दाखवावंच  लागेल.”

                           क्रमशः … भाग- 5

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

तो पर्यंत इब्राहीम पुढे झाला.

सांगू लागला, “या लोकांनीच सदा भैयाच्या मोबाईल वरनंआम्हा खूप जणांना फोन केले. मी पलीकडच्याच गल्लीत होतो… ताबडतोब पोहोचलो…. आम्ही सर्वांनी… तिथे दोन चार लोक होते त्यांनी मिळून सदाभैयाला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण… पण तो…!”

इब्राहिमला पुढं बोलवेना.. थोडे हुंदके आवरुन तो पुढं म्हणाला, “पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि पाच मिनिटांनी होत्याचं नव्हतं झालं.

विजयला घडलेल्या प्रकाराचा थोडा थोडा उलगडा झाला. बायकांचा गलका ऐकून त्यानं इकडं तिकडं पाहिलं… आई चक्कर येऊन पडली होती… त्याला एकदम जबाबदारीची जाणीव झाली. आता आपणच पुढे होऊन सगळं करायला पाहिजे या विचाराने डोळे पुसून, सुन्न  मन आणि बधीर, जड झालेलं डोकं या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो उठला. त्याला सुचत गेलं. आईला सावरायला हवं… काका, मामा, आत्या कोणा कोणाला फोन पोहोचलेत, सगळी विचारपूस करायला हवी. ‘त्यानं पाहिलं…..

जशी आई सावध झाली तसे कॅमेरे आणि स्पीकर तिच्याकडे वळलेत बाबांचा देह, भावंडांचं रडणं, आईचं आक्रंदन सगळं टिपलं जाऊ लागलंय… त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात दुःखद घटना त्यांचं घर सोडून इतरत्र सर्व टीव्ही चॅनेल वर आवेशा-आवेशात इतर बातम्या थांबून ब्रेकिंग न्यूजच्या रूपानं खणखणू लागली. मधूनच जे मीडिया कर्मी पोलीस चौकीत जाऊन पोहोचले होते ते तिथला वृत्तांत कव्हर करत होते. पोलिसांची हैवानियत, अत्याचार, गरिबांची पिळवणूक यावर भाष्य करता करता पोलीस इन्स्पेक्टर ला प्रश्न विचारून हैराण करत होते.

“त्या पोलिसाला अटक केलीये अन सस्पेंड केलंय. खात्यामार्फत चौकशीचे आदेश मिळालेत. अपराध्याला वाचवलं जाणार नाही. त्याला योग्य ती शिक्षा मिळेल.”ऑफिसर पाठ केल्यासारखी उत्तरं देत होते.

“सर, त्यांच्या गल्लीतल्या तरुणांना अटक केलीय?”

“हातात रॉकेल, डिझेलचे कॅन घेऊन पोलीस चौकी पेटवायला निघाले होते ते… पत्थरबाजी करून खिडक्यांच्या काचा फोडल्यात. दाखवा ते टीव्हीवर.”इन्स्पेक्टर आपली बाजू मांडत होता.

“ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन स्थिती नियंत्रणात आणलीय आम्ही…. आणि छोट्या चिल्यापिल्यांना  वॅनमधून पुन्हा गल्लीत सोडलंय.”मोठ्या फुशारकीनं ऑफिसर सांगत होता. “कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने हाताळलाय.”

“पण सर, त्याची विधवा पत्नी, छोटी छोटी मुलं… त्यांचं काय पुढं?… त्यांचा काय अपराध?…. त्यांनी आता कसं जगायचं?”

“चौकशी पूर्ण झाली की सरकार योग्य तो निर्णय घेईल. दोन लाख रुपये मृताच्या संबंधितास देण्यात येतील. एका मुलाला नोकरी देण्यात येईल… नो मोअर क्वेश्चन्स!” त्यांच्या बोलण्यात सहानुभूतीचा लवलेशही नव्हता.

जमलेल्या मित्रमंडळींनी जड अंत:करणानं उत्तर क्रियेची तयारी सुरू केली. नातेवाईक पण पहाटेपर्यंत येऊन पोहोचले. विजयनं यंत्रवत् सारा अंत्यविधी पार पडला. घरी पोहोचताहेत तो त्यांच्या परिवाराला भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली होती… तोच दोन-तीन मोठ्या मोठ्या कार गल्लीत येऊन पोहोचल्या’ मानवाधिकार आयोगाचे’ लोक घरात आले. पुन्हा कालचे तेच तेच प्रश्न आणि तीच उत्तरे… पोलीस व्यवस्थेवर ताशेरे उडवून झाले… शाब्दिक सहानुभूती देऊन झाली .”आमच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडतो. तुमच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही… सर्वतोपरी मदत करू… “आश्वासने देऊन धुरळा उडवत गाड्या निघून गेल्या. पाठोपाठच ‘महिला आयोग’ ‘विधवा पुनर्वसन मंडळ’ संस्थांच्या मोठमोठ्या कार्यकर्त्या महिला आल्या. “तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या आहोत. त्या पोलिसाला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला आर्थिक मदत करू.”आश्वासनाचा पाऊस पडला अन् त्यांच्या गाड्याही दृष्टीआड झाल्या.

                           क्रमशः … भाग- 4

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares