मराठी साहित्य – विविधा ☆ कौतुक ☆ सुश्री अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा : कौतुक –  सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆

कौतुक!एक आपलासा करणारा शब्द! कुणी कुणाचं कौतुक करावं?

जे खरच आवडतं आणि भावतंही …जे सहज सुंदर असतं… मग ते काव्य असो,लिखाण असो,चित्र असो, एखादी कलाकृती असो… एखाद्याच्या खेळातील यश असो…एखाद्याचा जबरदस्त विचार असो!

एखाद्याच्या शब्दाच कौतुक करावं, सुंदर हस्ताक्षराच करावं ,  एखाद्याच्या प्रगतीच, एखाद्याच्या निखळ आणि नितांत सुंदर भावनांचं कौतुक करावं! एखाद्याने केलेल्या पाककृतींचे कौतुक कराव, एखाद्याच्या अंगी असलेल्या छंदाच कौतुक करावं, तर प्रत्येकातील चांगलं काय? हे शोधून आणि ओळखून त्याच कौतुक करावं!

एखाद्याचा किरकोळ दोष सोडून देऊन, त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीला न तोडता, तिच्या  गुणांना जर आपुलकीच्या शब्दांनी कौतुकाच प्रेम दिल तर नक्कीच अवगुणही लयास जाऊ शकतील  !

कौतुक मारून मुटकून करता येत नसत. ते आतूनच करता येण म्हणजेच दुसऱ्यांच्या भावना जपण एकमेकांना आदर व आधार देण भावना न दुखावणार व माणुसकी जपणार, अस म्हणता येईल. खूप अवास्तव कौतुक करण्यापेक्षा एका शब्दाच झालेलं कौतुक, शाबासकी व पुढील वाटचालीस  प्रेरणा दायी ठरेल अस असाव! आपला एखादा कौतुकाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा शब्द कित्येकांचे यशाचे आलेख उंचावू शकतो.

कौतुक करताना ती अतिशयोक्ती आहे असं वाटू नये…वरवर कौतुक करणारेही कळतात आणि तोंड देखल करणारे ही कळतात….

जे चांगलं आणि कौतुक करण्यायोग्य असत, त्याच कौतुक करायला पैसे पडत नसतात. समोरच्याची बुद्धिमत्ता, हुशारी, चांगुलपणा, ह्याच कौतुक करायलाही खर तर मन मोठं असावं लागतं….ते सर्वानाच जमत नाही. मी का म्हणून? हा ‘मी’ जो आहे तोच खरा नाशक असतो आपल्या प्रगतीचा आणि भावी आयुष्याचाही!

आणि दुसर एक… मत्सर! एक मोठा भयावह दंश!हा दंश ज्यांना झालेला असतो त्यांचा तर विचारच सोडून द्यावा….

मन साफ आणि निर्मळ असावं! कायमच … म्हणचे भाव स्वभाव होऊन जातो!

दुसर्यांना चांगलं द्यावं ,माफ करावं, दुसऱ्यांकडून शिकाव, दुसऱ्यांचे चांगलं चिंताव! दुसऱ्यांच्या आनंदात जे खरोखर आनंदी होतात ते खरच मनापासून कौतूक करत असतात, आणि दुसऱ्याच्या कौतुकास ही पात्र होतात!

 © सुश्री अश्विनी कुलकर्णी 

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाळ- एक संस्कृती ☆ श्री राजीव दिवाण

☆ मनमंजुषेतून :  चाळ- एक संस्कृती –  श्री राजीव दिवाण ☆

ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती …. कोर्टाची..

महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला.

सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत….तीला “चाळ”म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं…सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही ” चाळ” म्हणजे “आसेतूहिमाचल” भारताची प्रतिनिधीच… गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला…ती हि “चाळ”. ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा… एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा… तीच बाब इतर सर्व सणांची… होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं उत्साहाने हजर. चाळीच्या गणपतीच्या सजावटीची सगळी जबाबदारी शेखसाबची..चाचा मंडप,सजावट, टेबल,खूर्च्या भाड्याने देत होते ना…ईदचा शीरकुर्म्याची लज्जत सगळे लुटायचे.  देवधरांच्या सुली( सुलेखा) ची डिलीव्हरी झाली..मुलगा झाला तो ईदच्या दिवशी तर भाभीला काय आनंद झाला..म्हणाली..”चाळमंदी महम्मद आया….शुभशकून हूया” . हीच सुली शाळेचा अभ्यास जिन्यावर बसून करताना ,इस्त्रीवाल्या भैय्याला ओरडायची ” चाचाss..गावो मत,मै अभ्यास करती हूँ “..” हां हां मालूम है.बडी आयी डागदर बननेवाली” .  दिवसातून चारवेळा तरी दोघाचं असं भांडण व्हायंचच…सुली दहावीच्या पेपरला जाताना सगळ्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून निघाली नि जाता जाता जिन्याखाली बस्तान ठोकलेल्या इस्त्री वाल्या भैयालाही नमस्कार करायची विसरली नाही. सुली ग्रॅज्युएट झाली…दोन वर्ष नोकरी झाली नि लग्न ठरलं… लग्नाला निघताना चाचाला नमस्कार करायला गेली तेंव्हा भरल्या डोळ्यांनी चाचा बोलला” हे गंगामैया..का बोलू , हमार बिटूवा भी अब बडी हुई होगी..!!!”

पाटील काकांचा अर्जुन  लहानपणापासून  एक नंबरचा दंगेखोर नि , टग्या. सगळ्यांना अगदी नको जीव करून सोडलेलं.हाच टग्या  मिलीट्रीत भरती झाला तेंव्हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. एकेक घुंगरू एकमेकांना बांधून तयार करतात त्यालाही ” चाळ” म्हणतात..सार्यांचाताल,सूर,लय,जसं एकंच असतं ना तशीच एकरूपता ह्या इमारतीच्या माणसांच्या वागण्यातून व्यक्त व्हायची ..म्हणूनच ती “चाळ”असावी.

अशीही चाळ आता पडली. दोनतीन वर्षात उंच मनोरेवजा फ्लॅटसिस्टीम उभी राहिली. कुटूंबं रहायला आली. काळ पुढे जात होता, पण चाळीतला जिवंतपणा नि जिव्हाळा काही जाणवेना. चाळ असताना सदैव उघडे असलेले घराचे दरवाजे आता सेफ्टी डोअरसह सतत बंदच दिसू लागले. पोरांचा किलबिलाट नाही, जिन्याखालील भैयाचं गाणं नाही. कुणाकडे कोण आला,कोण गेला कशाचा कशाला पत्ता नाही.

मोडक्या चाळीतून निघताना पाहिलेली सारी स्वप्नं ह्या फ्लॅटसिस्टीम मधे जणू “ फ्लॅट” होवून गेली.

 

© श्री राजीव दिवाण.

भ्रमणध्वनी ९६१९४२५१५१

वॉटस्अप ८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिलोरी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा : बिलोरी  ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

उगवतीला पीतवसनाची आभा अलगद पसरत जाते अन् सृष्टी जागी होऊ लागते… दशदिशांत सामावलेला, अवघं चराचर व्यापून उरलेला अनंत रूपांतला कान्हुला आपल्या अंत:चक्षूंना जाणवू लागतो… पक्षांची किलबिल, झरे-नद्यांच्या प्रवाहांना बहाल करतो तो आपल्या बासरीतले सूर… नुकतेच भुईतून उगवलेले मौजेत डुलणारे कोंब, इवलुशी रोपटुली म्हणजे त्याच्यातल्या बाळलीलांना आलेलं उधाण…  झाडांच्या पालवीतल्या कोवळेपणात, अनेक हिरव्या रंगछटांच्या पानांच्या सळसळीत, फुलांच्या मनमोहक सुगंधात, त्यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या फुलपाखरांच्या बागडण्यात ओसंडत राहातं त्याच्यातलं सळसळतं चैतन्य… गुरा-वासरांच्या डोळ्यांतल्या मायाळूपणातही तोच वसलेला…

विशाल पर्वत-डोंगररांगांतून फैलावते त्याच्यातली भव्यता… अथांग, शांत सागराच्या सखोलतेत विसावतो त्याच्यातला तत्ववेत्ता, खळाळत्या लाटांतून बहरणारा ‘तो’ म्हणजे रासलीलेतला आवेगी शृंगार अन्  ओहोटीतल्या लाटांतून शांतावत जाणारा ‘तो’ म्हणजे त्याला अंतरी जपून ठेवणाऱ्या राधेच्या मनातलं त्याचं चिरंतन… ऋतूबदलात सामावलेली त्याच्या भावनांची आंदोलनं… झरणाऱ्या मेघसरींनी वसुंधरेला उल्हसित करणारा तो… प्रखर उन्हाच्या झळांतून ओसंडणारा त्याचा क्रोध आणि तो निमाल्यानंतर सुखावणारं शारदचांदणं घेऊन येणाराही तोच…

अस्ताचलाच्या भावविभोर क्षणांत मावळतीला आभाळभर सांडलेले रंग त्यानं मस्तकी धारण केलेल्या मोरपिसाचं नभदर्पणातलं प्रतिबिंब तर नव्हे!? असं वाटू लागतं आणि भूल पडत जाते ते निरखण्यात हरवून जाण्याची… हळूहळू ती रंगभूल साकार करत जाते यमुनेचा किनारा, रंगक्षणांत माखलेला घननीळ आणि त्याला डोळ्यांत साठवणारं अवघं गोकुळ… शृंगाराचं ते अद्भुत लेणं मनात अवतरत असताना भान हरपून जातं… अचानक त्याक्षणी तिथलेच होऊन जाताना यमुनेच्या तीरी चाललेल्या लगबगीत मन सामील होऊन जातं…

साक्षात मनभावन मनमोहन आपल्याला सामोरा आणि त्याच्या रंगांचं गारूड अनुभवण्यासाठीचं आपल्या जिवाचं आतुरलेपण, तो बिलोरी पीतवसन नवोन्मेष रोमारोमांत साठवून ठेवण्याची ओढ, त्या खट्याळ नजरेतले नाजूक सोनसळी संकेत टिपताना नुरलेपणातलं बेभानफूल माळण्याची अधीरता, त्याच्या ओठांवर रेंगाळणारी सानिका होण्याचा मोह आणि एका क्षणी अवघं तनमन कृष्ण झाल्याची जाणीव!…

अंतर्बाह्य व्यापणारा झंकार चैतन्यरंगाची उधळण करणारा आणि मनाच्या तारा छेडत राहून सौख्यधून अनुभवायला देणारा… तीच चाहूल त्यानं वेढून घेतल्याची, तीच खूण त्यानं त्याच्या रंगात माखून टाकल्याची आणि देहभान हरपवून त्याच्यात सामावून घेतल्याची!… तिथून पुढं बाकी रंगांचे रंग फिके पडत जात सावळरंगाचं देखणेपण अवतीभवती पसरत जातं… काळजाला चांदणभास देणारी शीतलता जाणवू लागते आणि अख्खं आभाळ नीरव शांततेत न्हात सावळरंग पांघरतं…!

त्या नीरवतेच्या कुशीत पहुडले असताना चेहरामोहरा नसलेलं कुणी काळजाचा ठाव घेत गालावर मोरपीस फिरल्याचे भास होऊ लागतात… आजूबाजूला एक धून विहरत असल्याची जाणीव होते… स्वत्व विरून जात मन त्या क्षणाच्या स्वाधीन होतं आणि आपल्यातल्याच त्याची नव्यानं ओळख पटते..

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर,

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

माझ्या खिडकीतून दिसतात

रात्री नक्षत्रे नि तारे

आणि दिवसा वाहत असतात

झुळूझुळू मंजुळ वारे ….

 

खरंच् …खिडकी…! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे…मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी … वा…वा..वा….! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर…घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही…घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे…! वा….!

काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे….! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ….?

माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते….! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते …. , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच …व माझ्या हातून टेबला- वरील कागदांवर चांगले काही लिहूनही होते… बघा खिडकी किती महत्वाची आहे…!अख्ख्या घराचा कंट्रोल मी खिडकीतून बसल्या जागी करते ..वॅाच  ही ठेवते..! बसल्या जागेवरून… कळले का मंडळी खिडकीचे महत्व ? म्हणून मी माझ्या रूम मध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत …. शुद्ध हवा ,प्रकाश , मनोरंजन,लेखन ,वाचन, गाणी ऐकणे, पेपर वाचणे ,अऽऽऽऽऽऽऽबबबब !

खिडकी कित्ती कामाची

मनोरंजन करण्याची

येणारे नि जाणारे …

हसून त्यांना बघण्याची…..!

ह्या खिडकी मुळे माझ्या मनाची खिडकी सदैव उघडी ताजीतवानी असते.भरभरून उत्साह ही खिडकी मला देते….कसा…?

उठल्या बरोबर बघावे तर …छान दाट धुके ,शुभ्र धुके .. प्रसन्न धुके ,दुधा नि पारदर्शक धुके जणू माझी वाट पाहत असते….कधी खिडकीची काच बाजूला होईल नि मॅडम आम्हाला बघतील …असे जणू धुक्याला वाटते.. आणि मग …? मी बघताच धुके प्रसन्न हसते.

आळस पळतो . अनिमिष नेत्रंनी मी धुक्याकडे पाहत राहते … न जाणे दृष्टी आड झाले तर ….!

हरवले तर ..?त्याला मनसोक्त पाहून घ्यावे ,मनात साठवावे हो … अदृश्य झाले तर… म्हणून मग मी तिथेच झोपाळ्यावर ठाणं मांडत झुलत मनसोक्त त्याचा आस्वाद घेते.हळू हळू मनावरील पडदा दूर व्हावा तसे ते धुके अलगद हळू हळू काढता पाय घेते …विरत जाते…

नि मग …डोळे मिचकावत किरणांची स्वारी दंवबिंदूंना चिडवत ,चकाकत अळवावरच्या पानांवरून ओघळणाऱ्या दवांत चमकत  मिश्किलपणे हसत माझ्या खिडकीत समोरच्या टेकडीवर झाडांवर शेंड्यांवर वेलींवर किरणे  अवखळ पणे खेळू लागतात. पाने हसतात, फुले हसतात ,दंव हसते , गवत पाती डुलतात, वेली पुढे झुकतात,  हलतात ,अंग घासतात नि किरणे हळूहळू बालकाने लोळावे तशी पहुडतात , स्थिरावतात.

हे सारे दो नयनांनी तृप्त होत मी अनिमिष नेत्रांनी बघत असते. वा …! किती सुंदर सुंदर देणग्यांचा वर्षाव निसर्ग करतो आपल्यावर..!

धुके ,किरणे,पाने  ,फुले ,फुलपांखरे ,पक्षी,सारे समोर झाडांवर ,चराचरांवर आपल्या स्वागतासाठी हजर असतात . ..हसत असतात, डुलत असतात, ओसांडत असतात …आनंद घ्या म्हणत असतात…केवढी कृपा ! असीम…!

रात्री तर माझ्या खिडकीत चांदणीच अवतरते तिच्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन… समोर टेकडीव नि:शब्द शांतता असते… झाडे काळोखात बुडून गुडूप शांत झोपी जातात, वारे स्वस्थ शांत होतात , पाने अंग मिटून स्तब्ध होतात ,पक्षी गप्पा मारून झोपी जातात….खिडकीतल्या चिकूवर मात्र वटवाघळे नि पाकोळ्या घिरट्या घालतात . वटवाघळे उलटी लटकून मुटूमुटू चिकू खातात , गर खातात …सालं खाली पडतात . सकाळी झाडाखाली मला ती दिसतात … समोर टेकडीवर मात्र डोळे फाडून पाहिले तरी काही दिसत नाही….

मला वाटते , दिवसभर माझी करमणूक करून सारी मंडळी थकली वाटतं .आता त्यांना विश्रांतीची गरज आहे.मग मी शहाण्या मुलीसारखी कुरकुर न करता आपल्या लेखन कार्यात रमून जाते ते थेट बारा साडेबारा पर्यंत ….. मला मुळी कंटाळाच येत नाही माझ्या भोवताली असलेल्या या साऱ्या मंडळींमुळे…. कारण आता एवढ्या रात्री सुद्धा मी ….. हो .. खिडकीतच असते ना? हसूआलं ना ?

अहो … आहेच माझी खिडकी गुणी ? जगाची खिडकी किती ही मोठी असो ..कुणीही असो मला त्याच्याशी देणे घेणे नसते .मी माझ्या खिडकीवर एकदम खूष  आहे…हो … माझी …खिडकी ….

कंटाळा न येऊ देणारी

साऱ्या जगाची खबर देणारी ..

कोण आलं कोण गेलं सांगणारी

माझ्याशी गप्पा मारणारी

मला आनंदात ठेवणारी…..

मला खूप काही देणारी…

अशी माझी खिडकी आपल्याला बघाविशी

वाटली तर …जरूर ….या …

खिडकी तुमची वाट पाहते आहे…

 

तिचा पत्ता…. सारंग बंगला वाघ गुरूजी शाळेसमोर नाशिक १३

येताय् ना मग… ?

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

अल्प परिचय  
सतीश स. कुलकर्णी : साधारण तीस वर्षांपासून पत्रकारितेत. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकांमध्ये उपसंपादक ते वृत्तसंपादक. तीन वर्षांपासून मुक्त पत्रकारिता व व्यावसायिक लेखन, ब्लॉगलेखन. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ उपक्रमात  khidaki.blogspot.com ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस. ललित लेखनाचे ‘शब्दसंवाद’  पुस्तक प्रकाशित. शब्दांकन, संपादन, पुनःलेखन, मुद्रितशोधन, पुस्तक परिचय आदी काम व्यावसायिक तत्त्वावर करतो.

☆ विविधा : फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆

(डॉ. एडनवाला ह्यांना ‘स्माईल ट्रेन’ चा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.)

अहमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘स्माईल मेकर’ ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३० मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरातील ११, नगरवाला रस्ता पत्त्यावरचा बंगला, हेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी ‘पारशी टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली.

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या ‘ज्युबिली मिशन हॉस्पिटल’ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील ‘चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर’ ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत.

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचार करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे ‘स्माईल ट्रेन’. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचाच एक घटक बनले. त्यांच्या निधनानंतर ‘स्माईल ट्रेन’ ने संकेतस्थळावर विशेष श्रद्धांजली लेख प्रसिद्ध केला.

हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली.  श्री बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अगदी अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

… सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं भेट द्या >> – https://khidaki.blogspot.com/2020/07/Adenwalla.html

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई 

☆ विविधा : मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

 

परवाच संकष्टी झाली गणपतीची आरती आणि नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागलो ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…… त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी असं म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती, गणेश, गजानन, विनायक, अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली रत्नजडित किरीट घातलेली तुंदिल तनु असलेली जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का?

मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात. एक डोळ्याला दिसणार किंवा व्यक्त रूप आणि दुसर डोळ्याला न दिसणारे सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं असं आहे.” गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह हे अनंत अपरिमित आहे. या ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलाच एक अगदी छोटा भाग आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमितापासून परिमिता पर्यंत येत तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. ही  मोजमाप करणारी शक्ती गणित तज्ञांचा गणित तज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते जसं चिकू आंबा फणस यातील प्रत्येकाचं पान ,फुल, फळ निरनिराळ असत. आंब्याच्या झाडाला लिंबू किंवा चिकू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई चमेली ही फुलं लागत नाहीत. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच  ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी ,अनावृष्टी, साथीचे  आजार अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्राता तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायु आकाश अशा पंचमहा तत्वांनी बनलेले आहे. ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरण अर्ध्या आकाश तत्वात पुरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम). ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओमकारातून जन्माला आली व प्रत्येक गोष्ट ओ मच आहे असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व ,आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्ही मधील गाठ हे पृथ्वीतत्त्व, तेथून निघणारी रेषा हे वायू तत्व ,वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी .आणि त्यावरील टिंब हे चैतन्य.  आणि हे  सगळं सगळं ज्याच्या मध्ये सामावलं आहे ते आकाश तत्व. .अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा वस्तूचा सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणू केंद्रकात प्रोटॉन भोवती न्यूट्रॉन फिरत असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यापर्यंत गणना करून देतो ती शक्ती म्हणजेच गणेश .कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू, आणि विलय करणारा तो महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश आपण तरी काय करतो? पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने कौतुकाने त्याची पूजा करतो. उत्सव करतो आणि विसर्जन म्हणजे पृथ्वी तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे पर्वत बेटे यांची  उत्पत्ती होते. स्थैर्य येते आणि आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! आणि या या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश. या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. हे गूढ आहे.  उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय विज्ञानमय असा गणेश च असतो. गणेश उत्सव सुरू झाला आहे.. सर्व शक्तीच्या प्रतीकांची पार्थिव गणेशाची पूजा करीत असताना निसर्गाचा समतोल राखून त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कामाचे नियोजन … ☆ सुश्री अमृता देशपांडे 

☆ मनमंजुषेतून : कामाचे नियोजन… ☆ सुश्री अमृता देशपांडे

काम   काम  काम

आज काय केलं? ..आज काय झालं? ….. हे रात्री कागदावर उतरवण्यापेक्षा आज काय करायचं आहे, हे सकाळीच कागदावर नमूद करणं मला जास्त योग्य वाटतं. अशी कामांची यादी करत असताना ‘ आजच करणे आवश्यक आहे ‘ अशा कामांना प्राधान्य दिले जाते. अगदी देवाच्या फुलवायची तुपात भिजवण्या पासून बँकेत FD पुनर्जीवित करण्यापर्य॔त, घरातले पडदे धुवायला काढण्या पासून गाडीचा टायर बदलण्या पर्यंत, स्वयंपाकघरातला ओला पुसायचा स्पंज ते मागील दारातील पायपुसणे आणण्या पर्यंत, खिडक्यांचे गज स्वच्छ करण्यापासून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्या पर्यंत, सर्व कामांना सारखंच आणि महत्त्वाचं स्थान मिळतं. एकदा का यादी तयार झाली की स्वतःलाच best of luck देऊन ती कामे पार पाडण्याच्या तयारीला मी लागते.देवपूजेनंतर त्या दिवसाच्या कामाची यादी देवासमोर ( मनात) ठेवली की वाटतं, अर्धं काम झालं.वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं.

सुरवातीला केलीच पाहिजेत (must) अशी यादीत न घालायची कामे सुध्दा असतातंच की. ती तर रोजची. अंघोळ, पूजा, नाश्ता, स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक.  पिण्याचे पाणी उकळून थर्मास भरणे, अशी अनेक. ती सर्व करता करता मध्येच बाहेर जाऊन बिलं भरणे, पण हल्ली online payment मुळे खूपच फायदा झाला आहे. जेवण झालं की आवरा आवरी  करून वर्तमानपत्र हातात घेते.कोडं सोडवता सोडवता एक डुलकी काढतेच. एखादा wrong number किंवा idea वाले, बँकेत खातं उघडायला सांगणारा फोन दुपारी जागं करायला मदतच करतात.

काही कामं अचानक समोर येतात. सकाळी मुलांची शाळेला जायची रवानगी करताना भराभर सगळं आवरून झालं की, आठ वर्षाचा चंद्रू, ”  आई, चड्डीचं बटण तुटलं” म्हणतो तेव्हा शिवण्याचं काम जसं पटकन करावं लागतं तसं अनेक कामे ” मी आधी मी आधी ” म्हणत उभी ठाकतात. एकेक काम हातावेगळं करताना, आणि एकावेळी दोन तीन कामांचा फडशा पाडताना अष्टभुजा देवी संचारल्याचा भास होतो. संध्याकाळ कधी होते कळतच नाही.

निजताना यादीतली झालेली कामे  टिक् करताना झालेला आनंद खूप सुख आणि समाधान देतो. स्वतःवर खूष होऊन ” अपनेपे गुरूर आ जाता है” म्हणत मीच पाठीवर शाबासकी देते. दिवसभरात वेळोवेळी मदत केल्याबद्दल देवाचे मनोमन आभार मानून शांतपणे उशीवर विसावते.

हां! उरलेली कामे  carry forward…… कारण कागदावरची कामे आणि प्रत्यक्ष होणारी कामे यांत माझी होणारी कसरत फक्त मीच जाणे.

पण  काहीच न करण्या पेक्षा दुसर्यावर अवलंबून न रहाता कामे करणे मला जास्त उचित वाटतं. त्यामुळे Time management, work management, situation handle करणे, priorities ठरवणे अशा  management च्या अनेक कला, skills, मी आत्मसात केल्या आहेत. कुठलंही लहान काम कमी महत्वाचं नसतं. Each work has it’s own dignity. म्हणून प्रत्येक काम महत्वाचेच असते.

Mother Teresa यांचं एक वाक्य आहे- Do small things with great love. ” कित्ती खरं आहे ना!

कुठलंही काम लहान असो  वा मोठं असो, ते जर प्रेमाने, आपुलकीने, नेकीने केलं तर ते काम केल्याचा त्रास जाणवत नाही, दमायला होत नाही, कंटाळा येत नाही. काम करण्याची सवय लागते. काहीतरी  छान करण्याची नशा काही औरच असते.  कारण मिळणारा आनंद हा स्वर्गीय असतो.

 

© सुश्री अमृता देशपांडे

पर्वरी – गोवा

मो.  9822176170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सकारात्मकता-एक अभेद्य तटबंदी☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

जीवन परिचय

शिक्षण : M. Com. CAIIB

व्यवसाय : स्टेट बॅंक ऑफ इंडिया मधून अधिकारी म्हणून निवृत्त

छंद : वाचन, संगीत ऐकणे, ललित लेखन व कविता करणे. “अंतर्नाद” हा कविता संग्रह प्रकाशित. आत्तापर्यंत १० इंग्लिश व एका हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे (मेहता पब्लिशिंग हाउस आणि अजब प्रकाशन).

☆ विविधा: सकारात्मकता – एक अभेद्य तटबंदी – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

परवा सहजच मनात असा एक विचार आला की, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक जीवनातही  बऱ्याच गोष्टी, बरेच विचार, एखादी मोठी लाट यावी तसे येतात, काही काळ त्यात आपण भिजतो, आणि मग ती लाट नकळतच आपोआप ओसरून जाते. एखाद्या फॅशनची लाट आलीये म्हणतात ना तसेच. वैचारिक लाटा तर अनेक प्रकारच्या असतात. जागतिक किंवा राष्ट्रीय परिस्थितीनुसार सतत वेगाने उफाळणाऱ्या, पण तितक्याच वेगाने अनिश्चिततेच्या किनाऱ्यावर आपटून विरून जाणाऱ्या लाटांची तर गणती करणेच अशक्य आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातही, प्रत्येकाच्या भौतिक परिस्थितीनुसार, स्वभावानुसार, त्याच्या मानसिक आरोग्य कसे आहे त्यानुसार, शब्दशः असंख्य विचारांची मनात अशी सतत भरती- ओहोटी चालू असते, ज्याचा अनुभव प्रत्येकच माणूस क्वचित जाणतेपणाने आणि बहुतांशी अजाणतेपणी घेतच असतो. आणि बरेचदा या अशा लाटांचा माणसाला आनंद होण्याऐवजी त्रासच जास्त होत असतो हे सांगण्यासाठी स्वतःचे उदाहरण पुरेसे असते.

एकदा कुठेतरी मी असे एक वाक्य वाचले होते की, मनातले विचार नकारात्मक असोत की सकारात्मक, पण या दोन्ही प्रकारच्या विचारांचा माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर प्रचंड प्रभाव, किंवा दबाव म्हणुयात, पडत असतो. आणि अर्थातच सकारात्मक विचारांचा प्रभावही सकारात्मक  च असतो, ज्यातून सुख – शांती- समाधान यांचा अनुभव आयुष्यभर कळत नकळत पण आवर्जून येत रहातो. मनात असे  ठरवून, विचार करून, विचार आणता येत असतात का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. आणि मला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘ हो ‘ असेच द्यावेसे वाटते. सकारात्मक विचार किती मोलाचे आणि महत्वाचे असतात हे खूप पूर्वीपासून अनेक विचारवंत, तत्वज्ञ, आणि जाणकार लोक सांगत आलेलेच आहेत. पण असे विचार आणि त्यांचे महत्त्व अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत, त्याच्या जाणिवेच्या पातळीपर्यंत, झिरपत जाऊन तिथे कायमचे मुरलेले राहण्याची आत्यंतिक आणि कालातीत गरज आहे असे मला निःसंशयपणे म्हणावेसे वाटते.

पण मग मनात बहुसंख्येने येणारे नकारात्मक विचार, सकारात्मक कसे होऊ शकतील, हा प्रश्नही तितक्याच  स्वाभाविकपणे पडणारा आहे. त्यासाठीच इथे आणखी काही सांगावेसे वाटते आहे. आपण कसा विचार करतो, यावर आपले संपूर्ण आयुष्य कसे असेल हे अवलंबून आहे, ही गोष्ट सर्वप्रथम, प्राधान्याने समजून घ्यायला हवी, आणि मान्य करायला हवी. हेही मान्य करायला हवे की नकारात्मक विचारांच्या सतत सांनिध्यात राहिले तर आपोआपच उदास पणा, भय, दुःख, या भावनांना खत पाणी मिळत राहते आणि नकळतच नैराश्याच्या वाटेवर पावले पडायला लागतात. खरे तर स्वतः कडे, स्वतःच्या विचार  प्रक्रियेकडे त्रयस्थपणे आणि सजगपणे पाहिले तर ही गोष्ट सहजपणे लक्षात येण्यासारखी आहे. पण सामान्यतः तसे पाहिले जात नाही, कारण ‘ माझे काही चुकते आहे ‘ हेच मुळात मान्य न करण्याचा मानवी स्वभाव असतो.  पण एक अधिक एक म्हणजे दोनच, हे जसे आपण निःशंकपणे आणि सहजपणे मान्य करतो, अगदी तसेच हेही मान्य करायचे की सकारात्मक विचार आपली शक्ती, आपला आत्मविश्वास आणि आपले मनोबल निःसंशय वाढवतात. आणि मग स्वतःच्याच मनाशी जणू युद्ध करून, नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांना देता येऊ शकते. आणि केवळ आपला दृष्टिकोन बदलून हे युद्ध जिंकता येते. याचे एक सर्वश्रुत उदाहरण आहे ते शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचे. विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी अथक प्रयोग करत असताना हजाराव्या प्रयोगात त्यांना यश मिळाले. आधीच्या फसलेल्या ९९९ प्रयत्नांबद्दल ते म्हणायचे की ‘ ते प्रयोग फसले असे मी मानतच नाही. उलट, कोणत्या कोणत्या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही हे मी ९९९ वेळा सिद्ध करून दाखविले आहे‘. .. याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. या बाबतीत पाण्याने अर्ध्या भरलेल्या ग्लासचे जे उदाहरण दिले जाते, ते तर समजायला आणि पचनी पडायला अगदीच सोप्पे आहे. ग्लास पाण्याने अर्धा का होईना पण भरलेला आहे यात समाधान मानायचे की अर्धा रिकामा आहे याचे दुःख करत हताश निराश व्हायचे हे ठरविणे खरे तर कुणासाठीही अजिबातच अवघड नाही. पण त्यासाठी क्षणभर विचार मात्र करावा लागतो. आणि असा विचार करण्याची मनाला सवयच लावून घेण्याचा निश्चय एकदा का मनापासून केला की मग सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. मन आपोआप प्रसन्न रहाते, मनाची आणि शरीराची ही ऊर्जा वाढते, कामाचा उत्साह आणि गतीही वाढते. आणि अर्थातच आत्मविश्वास ही वाढतो.

एखादी वाईट घटना घडली, तर त्याहीपेक्षा वाईट काहीतरी घडू शकले असते, पण तसे घडलेले नाही, यात समाधान मानता आले तर घडलेली वाईट घटना सुसह्य वाटू लागते, आणि हा फक्त सकारात्मक विचारसरणीचा परिणाम असतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते, आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ते सिद्धही करता येते याची अनेक उदाहरणे डोळसपणे पाहिले तर आपल्याच अवती भोवती दिसतात.

म्हणूनच जगातल्या प्रत्येक माणसाने अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच ही आणखी एक गोष्टही अत्यंत मूलभत गरजेची मानली पाहिजे की, अनिर्बंध नकारात्मक विचार आणि त्यामुळे निर्माण होणारा नकारात्मक दृष्टिकोन यांना, अत्यंत जागरूकपणे आणि निश्चयपूर्वक स्वतःच्या मनात अजिबातच थारा द्यायचा नाही. स्वतःचे विचार आणि दृष्टिकोन ही सतत सकारात्मकच राहील याची जाणीवपूर्वक दक्षता घ्यायची. मग नक्कीच लक्षात येईल की सकारात्मक विचार ही , कितीही जोराने उफाळून आल्यावरही शेवटी वास्तवाच्या किनाऱ्यावर फुटून, क्षणात विखरून जाणारी विचारांची लाट नसतेच. तर ती असते एक अभेद्य तटबंदी ……. सतत प्रचंड उसळणाऱ्या, भयभीत करणाऱ्या, केव्हाही अक्राळ विक्राळ रूप धारण करून मनाला अक्षरशः हतबल करून टाकणाऱ्या सगळ्याच लहान मोठ्या नकारात्मक विचारांच्या क्रूर लाटांना, आपल्या पायाशी स्वतःचे अस्तित्वच विसरून पराभव पत्करायला भाग पाडणारी, निग्रहपूर्वक मनाला घातलेली अभेद्य तटबंदी.

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महपुरानंतरची एक आठवण ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

☆ मनमंजुषेतून : महपुरानंतरची एक आठवण  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

पद्मिनी सातलाच कामाला आली. भराभरा बोलत होती.”आत्ताच काय ती भांडी टाका वयनी. सांजच्याला काय मी येनार न्हाई”.

म्हणाली तेव्हा तिचा  ठसका मला जरा बोचलाच.”आता पूर उतरून बरेच दिवस झाले. आता का तुझ रडगाणं?आम्हाला सुध्दा त्रास झालाय महापुराचा. खूप स्वच्छता करायची आहे घराची. त्यात तुझा खाडा. आम्हालाही त्रास झालाय पुराचा. किती स्वच्छता करायची आहे.”

“आज पैसे द्यायला येनार हाईत.रासन कार्ड, फोटो तयार ठ्येवायला सांगितलंय कवाबी येनार म्हनं.मानसं मोजून तितके हजार देनार”

“होय का? महत्वाचंच काम आहे. कर सगळं व्यवस्थित. नि मग ये.”

मी तिला म्हटलं. निरक्षर आहे पण व्यवहारज्ञान चांगलं आहे तिला. दोन दिवसांनी ती कामाला आली.”किती मिळाले पैसे?”

“मिळाले की चार हजार.”.

“आता ते पोस्टात ठेव. अडिअडचणीला उपयोगी पडतील.”

“व्हय, साठले की गंठन करनार. हौस भागवून घेनार.”

दुसरे दिवशी पोस्टाचं काम करणाऱ्या बाई माझ्याकडे आल्या.

नि त्याच वेळी पद्मिनी पण आली.”आणलेस का पैसे? ”

“आज आण ग बाई तीन हजार. त्या बाई सारख्या मागे लागल्यात.”

“न्हाई जमायच वयनी. पावनं म्हनाय लागलेत” कुलदैवत करून या.”

“अग पद्मे, सरकारने हे पैसे तुम्हाला का दिलेत? तुमचं महापुरातलं  नुकसान भरून काढण्यासाठी. देवाला जायला, साड्या घ्यायला नाही दिलेले. बचत कर मी म्हणतेय.”

पैसे ठेवायचा तिचा निश्चय डळमळीत झालाय हे माझ्या लक्षात आल, तरी दोन दिवसांनी तिला पुन्हा आठवण केली.

मी विचारलं. तर थोडी गोंधळलीच.म्हणाली,”भावाला राकी बांधायला त्यांच्या भैनी आल्यात.त्यानी साड्या मागितल्यात. नवरा  म्हनतोय, माजे एक हजार दे. कंदी न्हाई ते साड्या देतो त्यास्नी.”

पद्मिनी तडतडली. आणखी दोन दिवस गेले.

“पद्मे, आता उरलेले पैसे तरी ठेव ग. कधी नाही ते एकदम इतके मिळालेत. जिवाला शांतता लाभेल तुझ्या. ऊठसूठ कर्ज काढतेस. व्याज भरतेस ह्याच्यातून वर कधी येणार तू? पैसे खर्च करण सोपं असतं . शहाणी ना तू? कळत नाही?”

“वयनी, घरात पानी शिरलं तवा भिंती पार विरघळल्यात.बुरशी चढलीय.न्हवरा म्हनतोय” भिंती रंगवुयात..गनपती येनार., लोक बघायला येनार. घर झकमक करुया की.यंदा दिवाळीबी झोकात करायची असं वाटतंय घरातल्यास्नी.”

शेवटी पैसापैसा तरी कशाला मिळवायचा ?सुखासाठीच न्हवं?महापुरातलं दुःख विसरायसाटी ह्यो सुखाचा उतारा.

मी परोपरीने सांगत राहिले नि  ती कारणं पुढे ढकलत राहिली. तिला त्याचं काहीच नाही. उलट ती हसत म्हणाली,”वयनी, तुम्ही का घोर लाऊन घेताय जिवाला?तुम्ही बचत करा म्हनताय खरं, पर आम्हाला तरी येवढ्या रकमेची चैन करायला कंदी मिळनार वं? चार हजार मिळाले. घरच्या समद्यास्नी जे जे हवं त्ये करायला मिळतय,करनी धरनी झाली, द्येवाच्या नावावर ट्रिप होईल,गनपती साटी का होईना घर साजरं दिसायला लागलं,पोराची दिवाळी हुनार पद्मिनीचं ते चार्वाकी तत्वज्ञान समजायला मला जरा उशीर झाला. पण समजलं तेव्हा मी  बिनघोर झाले.

 

© सुश्री मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वर्णगौरी ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

डाॅ. मंजूषा देशपांडे

Brief  Introduction:  M.Sc. Ph. D. (Women and Migration Studies), Director,  Center for Community Development,  Shivaji University, Kolhapur, Asiatic Research Fellow, (2019) (Forgotten Food: Impact of Migration and Urbanisation ), Research Associate(2007-2008) Overseas Development Institute, London, UK and sponsored by International Institute of Environment and Development

☆ विविधा : स्वर्णगौरी ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

हा दक्षिण कर्नाटकातला मोठा सण!  स्वर्णगौरी गणेश चतुर्थीच्या अगोदर एक दिवस म्हणजे आपल्या हरतालिकेच्या दिवशी येते. ही गौर म्हणजे श्रीगणेश यांची आई पार्वती.

ती गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी  येऊन घरात आपल्या मुलाला खाण्यासाठी पुरेसे धान्य, फराळाची व्यवस्था, फळफळावळ, दूध,  दही,  तूप, तिच्या मुलाला खेळण्यासाठी काही खेळण,  त्याला बागडण्यासाठी शेतीवाडी,  पुरेसे भरजरी कपडे, … अशी सगळी व्यवस्था पाहण्यासाठी ज्या घरात गणपती बसवणार आहेत त्या घरी येते. सगळी व्यवस्था पाहून ती जर खूश झाली तर स्वतः सुवर्ण गौरी असल्यामुळे ‘ सोन्यासारखे झळाळते आयुष्य मिळू दे’ असा आशीर्वाद देऊन गणेशाला त्या घरी पाठवते. या गौरीच्या दिवशी साडी,  खण,  सर्व प्रकारची धान्ये,  डाळी,  गूळ, साखर, तूप बांगड्या,  एखादा दागिना, खेळणी, फळे,  सुका मेवा,  लाडू, करंज्या,  चकल्या असे सर्व सूप भरून वाण द्यायची पध्दत आहे. यापैकी एक वाण सर्वार्थाने तृप्त स्त्री ला द्यायचे आणि उरलेली 15 वाणे ज्या घरी गणपती बसवण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसेल अशा घरी द्यायची पध्दत आहे.

या गोड पध्दतीचे अजून एक वैशिष्ट्य आहे.  हे वाण देण्यासाठी त्या स्त्रीचे लग्न झाले आहे,  तिला नवरा,  मुले बाळे आहेत किंवा कसे असे कोणतेही बंधन नसते.

© डॉ. मंजुषा देशपांडे

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print