आज काहीतरी लिहिण्याची हुक्की आली. पेन व कागद घेऊन बसले. पण काय लिहावे? विषय कोणता असावा? निसर्गावर लिहावे का अध्यात्मावर लिहावे? मन एकच पण त्याचेही एकमत होत नव्हते. आपण लिहितो ते शब्दात. शब्द तयार होतात अक्षरातून. अक्षरे म्हणजे स्वर आणि व्यंजने. त्यालाच वर्णमाला म्हणतात. प्रत्येक भाषेत त्याची संख्या वेगळी मराठीत 52 तर इंग्रजीत 26. हे वर्ण कशातून तर ओंकारातून असे सांगितले जाते. ओंकार म्हणजे तीन मात्रा (अ, उ, म )आणि अर्ध मात्रा म्हणजे वरचा चंद्राकार. यातून सर्व वर्णमाला. पण ओंकार तरी कुठून आला? तर हा परब्रह्मवाचक शब्द. त्या निर्गुण निराकाराचे व्यक्त रूप. म्हणून त्याला परब्रम्हची सही म्हटले जाते. आपलीही सर्व कामे सहीनेच होतात. म्हणजे शब्दाचे मूळ त्या परब्रम्हाचे ठिकाणी. तोच शब्दाचा अर्थ. आपण मात्र त्याला वेगवेगळ्या अर्थ देतो.
येथे एक गोष्ट आठवली. एक छोटी मुलगी होती, पाच सहा वर्षांची असेल. रोज नित्य नेमाने देवळात जाऊन देवापुढे उभी राहत असे. हात जोडून डोळे मिटून काहीतरी हळू आवाजात तुटपुटत असे. पुजार्याला उत्सुकता होती, ही रोज काय म्हणत असेल? देवाकडे काय मागत असेल? म्हणून त्याने त्या मुलीला सहज प्रश्न विचारला’ बाळ तू देवाकडे रोज काय मागतेस?काय म्हणतेस?’ तिचे उत्तर आपणा सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे.
ती म्हणाली, ‘मला स्तोत्र, मंत्र म्हणजे काय कळत नाही. मला काही येत नाही. म्हणून मला येणारी सर्व अक्षरे अ आ इ ई….. आणि क ख ग…. मी रोज देवापुढे शांतपणे म्हणते. आणि देवाला सांगते यातून तू तुला पाहिजे तो आवडेल तो मंत्र किंवा स्तोत्र तयार करून घे. ‘आणि देव माझ्याकडे पाहून हसतो. मला आनंद होतो. गोष्ट छोटीशीच पण केवढे तत्त्वज्ञान सांगून गेली.
पूजेची तयारी नाही, देवाला आवडती फुले नाहीत, आरती येत नाही म्हणून आपण पूजा करायचे टाळतो. पण देवाला कशाचीच गरज नाही. तोच सर्व निर्माण करणारा, त्याचे त्याला देऊन आपण काय साधतो? तेव्हा त्याची पूजा म्हणजे आपला भाव आपला अहंकार त्याला अर्पण करणे. त्यासाठी शब्दांची गरज नाही. मी पेन खाली ठेवले.
सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.
तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.
फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.
तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “
त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.
कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.
मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.
पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.
घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.
नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.
पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.
तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.
पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.
त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.
“I Love You” हे तीन शब्द कुणी कुणालाही सहजपणाने म्हणता येऊ नयेत इतके वाईट आहेत का?
आपण आजच्या काळात जाता येता सर्रास शिव्या ऐकतो… त्याही आपल्याला सहजच वाटतात, पण कुणी ‘I love you’ हे सहजपणाने जरी बोलून गेलं तरी येणार्याजाणार्याच्या भुवया उंचावतात. अशिक्षित आणि सुशिक्षीत सगळीच माणसे याबाबतीत सारखीच.
तुमचं एखाद्यावर/एखादीवर प्रेम आहे, एखादा/एखादी तुम्हाला आवडते… हे त्याला/तिला सांगणं कसं चुकीचं आहे; हेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवल जातं. आणि मग हीच मुलं मोठी झाल्यावर खर्या प्रेमातही… ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे साधंसं वाक्यही बोलायला कचरतात… बोलू शकत नाहीत… बहुधा घाबरतातच… कारण काही काही गोष्टी शिकवतांनाही त्या चुकीच्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत, असं मला बर्याचदा वाटतं.
अगदी ‘नमस्कार’ म्हणतो ना आपण ओळखणार्या प्रत्येकाला तेवढ्या सहजतेने… अगदी तस्सचं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे म्हणता यायला हवं. कारण प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष संबंधातच असतं असं नाही; तर कोणत्याही दोन माणसात (gay and lesbian too) ते होऊ शकतं. असे घडले तरच आपण प्रेमाला सरकारात्मकतेने घेऊ शकू, आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चा चुकीचा अर्थ काढणे बंद करू. मग जसे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आपण निमित्त शोधत असतो तसाच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सुद्धा आपल्याच संस्कृतीतील सण निमित्त म्हणून आहे असे समजता येईल. असे झाले तर प्रेम व्यक्त करायला एका दिवसाची गरज काय, असा उथळ प्रश्न विचारणे बंद होईल.
म्हणून मला वाटतं I love you म्हणणं हे इतकं सहजपणाने असायला हवं की, आपल्याला आवडणार्या कुणाही माणसाला ते न घाबरता म्हणता यायला हवं… जितक्या सहजपणे आपण आपला अहम दुखावल्यावर द्वेष करू लागतो. पण आजची परिस्थिती पाहता भारतात द्वेष करणे सोपे आणि प्रेम करणे तेवढेच कठीण! कारण प्रेमासाठी लागते मोकळे मन! ते किती लोकांकडे आहे?
♥ “व्हॅलेंटाईन डे…” ♥ – लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर ☆
“ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. ♥ सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे♥.“
काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे. आपण का म्हणून साजरा करायचा ?
… आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?
व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार ! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली.
रोमच्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६.
तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात.
दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे म्हणता येईल.
आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही.
सगळ्या सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गाकरता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं.
पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार ! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत. भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा करतो.
असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give.
… कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण —
True love knows no reason
आणि
Love has no boundaries.
सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे.
पूर्वी सगळे नोकरदार एक तारखेला खुश असायचे –
“खुश है जमाना, आज पहिली तारीख है”.
… आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला पण खुश असतात –
☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
श्रीकृष्णासाठी विष पिणाऱ्या मीराबाई सर्वांना माहीत आहे पण रामरायासाठी विष पिणाऱ्या संत वेण्णाबाई माहित आहे का?
मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेण्णाबाईंनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केशसंभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवेसाठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.
ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.
चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नामस्मरण करा असे सांगितले.
विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.
समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.
समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.
त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगा वेगळी शिष्या 🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- लिलाताईच्या आई सहज बोलण्याच्या ओघात बराच वेळ लिलाताईच्या वाचासिद्धीच्या
अनुभवांबद्दलच सांगत होत्या. ते सगळं आरतीला अचंबित आणि मला निश्चिंत करणारच होतं! सगळं ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर लिलाताईच्या पत्रातला शब्द न् शब्द तरळत होता. तो प्रत्येक शब्द खरा होणाराय हा माझ्या मनातला विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला होता!)
तिथून बाहेर पडल्यावर पुत्रवियोगाच्या दुःखातून आरतीला सावरायची हीच योग्य वेळ आहे असंच मला वाटत राहिलं. ती मात्र गप्प गप्पच होती.
“लीलाताईच्या आईना भेटायला आलो ते बरं झालं ना?” मी विषयाला हात घातला. तिने होकारार्थी मान हलवली. मला तेवढं पुरेसं होतं.
“तुला.. एक सांगायचं होतं.. “
“कशाबद्दल?”
“हेच. समीरबद्दल. “
“त्याचं काय.. ?”
“.. जे तुला माहित नाहीय असं.. बरंच कांही… “
“म्हणजे?”तिने आश्चर्याने विचारले.
“म्हणजे जे मी फक्त तुलाच नव्हे तर कुणालाच सांगितलेलं नाहीय असं.. “
तेवढ्यांत समोरून रिक्षा येताना दिसताच मी रिक्षा थांबवली. एकतर रस्त्यात सगळं सांगणं शक्य नव्हतं न् योग्यही. जे सांगायचं ते मनात जिवंत होऊन मलाच अस्वस्थ करत राहिलं होतं.
डाॅ. जोशींकडून त्यांच्या मनाविरुद्ध डिस्चार्ज घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळजवळ महिनाभर समीर डाॅ. देवधरांच्या निगराणीखाली होता तेव्हाची गोष्ट. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे कणाकणानं कां होईना समीर सुधारु लागला होता. तरीही तेव्हाचे त्याचे हाल आणि अवस्था सातत्याने सुरु असलेल्या ऍलोपॅथी औषधांच्या अपरिहार्यतेमुळे अतिशय नाजूक आणि केविलवाणी होत चालली होती. त्या दरम्यानचा एक अतिशय करूण प्रसंग आठवला तरी अजूनसुध्दा अंगावर सरसरून काटा येतो.. !
डाॅ. देवधरांकडे ट्रिटमेंट सुरु झाली तेव्हा सुरुवातीला समीरला सलाईन लावल्यावर ‘थेंबभर पाणीही त्याच्या पोटात घालू नका’ असं नर्सने बजावून सांगितलं होतं. मी तिथे गेलो तेव्हा आरतीने मला अजिबात आवाज न करण्याची खूण केली.
“का?” मी हलक्या आवाजात विचारलं.
“खूप रडत होता. सलाईन
लावल्यामुळे त्याचा हातही दुखत असेल. सकाळपासून थेंबभरही पाणी पोटात नाहीये. त्यामुळे तहानही लागली असेल. बघा ना हो किती सुकून गेलाय.. ” आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. ते ऐकणंही मला वेदनादायी वाटत होतं. समीरच्या चेहऱ्यावरचं थिजून गेलेलं दुःख आणि केविलवाणेपण मला त्रास देऊ लागलं. तिथेच मागे टेबलवर भरून ठेवलेल्या तांब्याभांड्याकडे सहजच माझं लक्ष गेलं आणि तहानेने कधीपासून आपल्या घशाला कोरड पडलीय हे मला प्रथमच जाणवलं. मी उठलो. ते तांब्याभांडं अलगद उचललं. तांब्यातलं पाणी भांड्यात ओतत असताना त्या बारीकशा धारेच्या आवाजानेच जणू संकेत दिल्यासारखे समीरने इवलेसे डोळे उघडून त्या आवाजात लपून राहिलेल्या तृप्तीच्या हव्यासानेच जणू आपली व्याकुळ नजर त्या दिशेला वळवली. त्या नजरेचा त्या पाण्याच्या धारेला स्पर्श झाला मात्र.. तळपत्या उन्हातल्या तहानलेल्या कुत्र्यासारखी त्याची जीभ आत बाहेर लवलव करु लागली. तहानेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी
थेंबभर पाणीही देऊ शकत नसताना भांड्यातलं ते पाणी माझ्या घशाखाली उतरणं शक्य तरी होतं का? समीरची अगतिक अवस्था पाहून मी तहान विसरलो. भांड्यातलं पाणी न पिताच तसंच तांब्यात ओतून ते तांब्याभांडं कोरडेपणानं बाजूला सारलं. पाणी दृष्टीआड होताच बाळाच्या जिभेची लवलव मार खाल्ल्यासारखी थांबली, पण ती कासावीस करणारी तहान मात्र त्याच्या केविलवाण्या नजरेतून झिरपतच होती.. !
“बोला ना.. गप्प कां असे? काय सांगत होतात?”
घरी येताच आरतीने विचारले.
“हो.. सांगतो. पण तू शांतपणे ऐकून घेणार असशील, तेच मनात ठेवून त्रास करून घेणार नसशील तरच सांगतो.. ” मी बोललो आणि पाय धुवायला आत निघून गेलो.
मला सांगणं टाळायचं तर नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं. डॉक्टरांच्या औषधोपचारांनी समीरची तब्येत थोडीफार सुधारु लागली होती. त्याचं किरकिरणं, रडणं बऱ्याच प्रमाणात कमी होत चाललं होतं. अधूनमधून घोटभर पाणी, अंदाज घेत दिलेलं दोन-तीन चमचे दूध हळूहळू पचू लागलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना आणि समीरबाळाच्या सहनशक्तीला यश मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्या मनावरचं भीतीचं सावट विरु लागलं. त्याला सलग शांत झोप लागू लागली तसं मी जमेल तसं दोन-तीन तास बँकेत जाऊन साचत राहिलेली महत्त्वाची कामे हातावेगळी करू लागलो. आरती न् मी जवळजवळ दोन महिने अक्षरशः जागून काढले होते. घरी माझी आई, लहान भाऊ, सासूसासरे सर्वजण मदतीला होतेच. तेही आता आलटून पालटून दवाखान्यात येऊन आम्हाला थोडावेळ रिलिव्ह करु लागले.
पण… हे सकारात्मक बदल, हा दिलासा हे सगळं एक चकवाच होतं याचा प्रत्यय पुढं चार-सहा दिवसातच आम्हाला आला आणि तोही अतिशय धक्कादायक पध्दतीनं! तो आजारी पडला तेव्हापासूनचे हे दोन अडीच महिने तेव्हाचे माझे ब्रॅंच मॅनेजर श्री. घोरपडेसाहेब यांनी मला अतिशय मोलाचा असा भावनिक आधार दिला होता. आता त्यांचं कामाचं ओझं कमी करणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळेच समीरची तब्येत थोडी सुधारु लागल्यानंतर मी बँकेत हजर झालो. एक-दोन दिवस निर्विघ्नपणे गेले. तो शनिवार होता. रविवारी आमच्या पुण्यातल्या रीजनल ऑफिसमधे ब्रॅंच मॅनेजर्स मीटिंग होती. त्यासाठी घोरपडे साहेबांना संध्याकाळी उशिरा बसून मीटिंगची तयारी करण्यासाठी मी मदत करत होतो. मिटींगला जाताना एक महत्त्वाचं लोन प्रपोजल त्यांना तयार करुन अॅप्रूव्हलसाठी न्यायचं होतं. ते तयार करत आम्ही त्यांच्या केबिनमधे बसलो होतो. टायपिस्ट घरी गेल्यामुळे आता हे प्रपोजल स्वतःच लिहिणे आवश्यक होते. घोरपडे साहेबांचा हात लिहिताना थरथरत असे. त्यामुळे मला ते डिक्टेट करीत आणि मी ते लिहित होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. सगळं काम आवरत आलं. खूप अंधारून आलंय हे लक्षात आलं ते केबिनच्या खिडकीबाहेर उभं राहून धुवांधार पावसात कशीबशी छत्री सावरत उभ्या माझ्या आईने आणि लहान भावाने मला हाक मारली तेव्हा!
“बाळ खूप सिरीयस आहे. डॉक्टरनी तुला लगेच बोलवलंय. ” आई सांगत होती.
“आम्ही रिक्षानेच आलोय. रिक्षा थांबवलीय.. चल लगेच ” भाऊ म्हणाला. मी मनातून थोडा हबकलो. समीरच्या काळजीने व्याकुळ झालो. पण नेमक्या त्या क्षणीचं माझं घोरपडे साहेबांच्या संदर्भातलं माझं कर्तव्य मी विसरूही शकत नव्हतो.
” हो.. मी.. मी आलोच. लग्गेच निघतो. पण तुम्ही थांबू नका. त्या रिक्षानं तुम्ही पुढं व्हा. मागोमाग मीही पोचतोच.. “
आई आणि भाऊ क्षणभर घुटमळले.
“आरती तिथं एकटी असेल.. खरंच निघा तुम्ही.. मी आलोच.. “
ते घाईघाईने निघाले. लोन प्रपोजलमधली शेवटची ओळ मी पूर्ण करू लागलो.
“एs.. वेडा आहेस का तू? काय करतोयस हे ? जा.. ऊठ मुकाट्यानं.. थांबव त्यांना.. नीघ तूही.. ” घोरपडे साहेब ओरडले. माझ्या हातातलं पेन काढून घ्यायला त्यांनी हात पुढं केला. मी अजिजीनं त्यांच्याकडं पाहिलं.
“साहेब, मी हे रिकमंडेशनचं शेवटचं एक वाक्य राहिलंय फक्त ते पूर्ण करतो न् निघतोच लगेच. तुम्हाला सलग लिहिता येणार नाही. अक्षरात फरक पडू नये म्हणून. झालंच. “
मी माझी सही करून प्रस्ताव त्यांच्यापुढे सरकवला आणि ताडकन् उठलो. तो स्वतःच्या ब्रिफकेसमधे ठेवून घोरपडे साहेबही घाईघाईने उठलेच.
” एक.. एक मिनिट. मीही आलोच. पाऊस थांबलाय तोवर मी तुला बाईकवरून हॉस्पिटलमधे सोडतो न् मग घरी जातो ” ते म्हणाले.
मी घड्याळ्याकडे पाहिलं.
“नाही सर. तुमचं जेवण व्हायचंय अजून. ट्रेन चुकेल. मी जाईन रिक्षानं. खरंच. “
बोलता बोलता मी ब्रॅंचचं ग्रील ओढून कुलूप लावलं. तोवर घोरपडेसाहेबांनी त्यांची बाईक गेटच्या बाहेर काढलीही होती.
“बैस लवकर.. “
हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो तोवर बाईक लॉक करून तेही माझ्या मागून येत होते.
” मी जाईन. तुम्ही नका येऊ… खरंच. “
“हो.. मी थांबणार नाहीय.. पण डॉक्टरांना भेटतो न् निघतो लगेच.. “
आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर खुर्च्यांवर बसले होते. तिघांचेही डोळे भरून वहात होते. मी आरतीजवळ गेलो..
“काय झालंय.. ?कसा आहे समीर.. ?”
तिला हुंदकाच आला.
“तो सिरियस आहे.. डाॅक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच.. बोल त्यांच्याशी… “आई म्हणाली.
आत माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वत:ला सावरत डाॅक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली…!!
☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
☆
आत्ता नुकतेच महाकुंभला जाता आले. तीन रात्री आणि चार दिवस असे वास्तव्य होते. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आगमन’ ह्या टेन्ट सिटी मध्ये बुकिंग केले होते.
दुर्दैवानी माझी मैत्रीण आणि मी असे जाणार होतो. पण ऐनवेळी काही कारणांनी तिचे येणे cancel झाले. त्यामुळे एकटीने जाण्याचे धैर्य केले.
माझ्या जावयानी बुकिंग केले, त्या एजन्टनी दिलासा दिलान की “खूप सुरक्षित आहे तुम्ही जा. मी गाईडची व्यवस्थाही केली आहे. “
पुणे दिल्ली प्रयागराज असा विमान प्रवास करून तारीख 15 जानेवारीच्या रात्री टेन्ट सिटी ला पोहोचले. Reception मध्ये गळ्यात एक सिल्कीश स्कार्फ घालून स्वागत झाले. अतिशय उत्कृष्ट असा डिलिक्स टेन्ट आणि त्यालाच लागून असलेले स्वतंत्र न्हाणीघर अशी व्यवस्था
होती. मुख्य आखाडे, नदी, त्रिवेणी संगम सर्वांपासून हे हॉटेल किमान दोन किलोमीटर इतक्या दूर वर आहे. हॉटेलचा एकूणच परिसर खूप मोठा होता. त्यामुळे सर्वदूर जायला गोल्फ कार्ट्स होत्या. जेवणघर, स्वागतकक्ष आणि शेकडो टेन्ट्स.
बरेच परदेशी लोकही होते. मोठमोठ्या गाड्या भरून पाहुणे येतच होते.
मुख्य प्रश्न होता दुसरी कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना मी दुसऱ्या दिवशी गावात कशी जाणार? कारण गाडीचे भाडे दर दिवसाला 7. 8 हजार, गाईडचे भाडे 6 हजार एका दिवसाला. मी तीन रात्री चार दिवसांचे बुकिंग केले होते. मग गाईड असला तरी जाणे परवडणारेच नव्हते.
गाईडशी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलल्यावर कळले ते वेगळेच. विद्यार्थ्यांची एक टीम यात्रेकारुंना सर्व दाखविण्यासाठी प्रशिक्षित केली आहे. पण त्याच्या पैकी कोणाला टेन्ट सिटी च्या आत प्रवेश नव्हता.. त्यामुळे बाहेर उभे राहून त्यातले तीनजण माझ्याशी बोलत होते. हॉटेलच्या स्टाफ पैकी एका मुलीने माझे गाईडसाठी पुण्याहून येण्यापूर्वी पैसे घेतले होतेन. तिनी आश्वस्त केल्यावर त्यांनी एक सुझाव मांडला की मी एकटी आहे आणि जर मला चालणार असेल तर ह्या मुलाच्या मोटर सायकलवर मागे बसून तो मला हा सर्व परिसर, देवळे, संगम इत्यादी दाखवेल. मी तयार झाले. कारण दुसरा काही पर्याय नव्हता. पण ह्या मुलानी तिनही दिवस माझी खूप काळजी घेतलीन. मला सर्व वेळ माझे वय पाहून मला दादीदादी म्हणत फिरवून आणले! 😄
ह्याच हॉटेलच्या मागे गंगेचा एक प्रवाह येत होता. तिथे ह्या टेन्ट सिटी च्या लोकांसाठी स्नानाची व्यवस्था होती.
सकाळपासून आणि रात्री तर खूपच थंडी होती.
त्यामुळे पाण्यात जाण्याचे धाडस होत नव्हते.
आंघोळीला पाणी नळाला गंगेचेच येत होते मग वेगळे थंडीत जाऊन पाण्यात स्नान करण्याचे धाडस होतं नव्हते. 😄 पण अखेर शेवटच्या दिवशी गार आणि स्वच्छ पाण्यात नाक दाबून डुबी घेतल्या तेव्हा जाणवले की, हा अनुभव आधीच हे का घेतला नाही 🙆♂️ इतके छान वाटत होते.
कुंभ मधील शाही स्नानाचे दिवस सोडले तर गर्दी खूपच कमी होती सर्वच रस्त्यांवर. आणि
तिथल्या हॉटेल्सचे रेट्स अश्यावेळी निम्मे होतात.
पहिल्या दिवशी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती ह्याच्या संगमाला भेट दिली.
वेणी माधव हे प्रसिध्द विष्णू – लक्ष्मी मंदिर, वासुकी नागाचे मंदीर ह्यांना भेट दिली.
झोपलेल्या हनुमानाच्या मंदिराला काही वर्षांपूर्वी भेट दिली असल्यामुळे गर्दीत गेले नाही.
त्या आधी विविध आखाड्यांना भेट दिली. जुना आखाडा येथे नागा साधू. एकानी डोक्यावर काही किलोंचे ओझे रात्रंदिवस बाळगणारा साधू, तर एकानी, त्याचा दावा हात, सतत आकाशात उंच ठेवण्याचे
आव्हान पेललेले दिसले.
तो फक्त फळांहारावर जगतो आहे.
पुढे त्यांना नेमून दिलेल्या जागांवर धुनी इतवून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची राख कपाळाला लावत होते.
त्यानंतर किन्नरांच्या आखाड्याला भेट दिली.
अनेक साधू त्यांच्यापुढे ताट ठेवून त्याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांना पैसे टाकण्याची विनंती करत होते. हे सर्व खूप कमर्शिअल वाटलं तरी सुद्धा त्या साधूंच्या पोटापाण्याच्या व्यवस्थे करता लोकांना आशीर्वाद देणे हा त्यांचा व्यवसाय असावा असेही वाटले.
स्वामी अवधेशानंद यांच्या आश्रमाला भेट दिली हा एक अगदी फाईव्ह स्टार मोठा आखाडा आहे. पुण्याची माझी एक मैत्रीण तिथे सेवा देत आहे.
म्हणून तिथे भेट दिली.
स्वामीजींचे दर्शन मिळाले. त्यांची राम कथा एक तास ऐकली. या स्वामीजींना भेटायला अनेक मोठी मान्यवर लोक येतात असे समजले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यायचे होते असेही समजले.
चौथ्या दिवशी आचार्य रामभद्राचार्य जे स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत अनेक भाषांचे तज्ञ स्वतःचे विद्यापीठ असलेले आणि संत तुलसीदास यांचे रामायण मुखोद्गत असलेले गीता तसेच अनेक संस्कृत वेद मुखदगत असलेले अशी त्यांची ख्याती असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती तिथे गेल्यानंतर किमान दोन तास वाट पाहावी लागली प्रचंड गर्दीतून वाट काढत त्यांची अखेर दर्शन झाले.
वासुकी मंदिर बद्दल एक कथा कळली
जेव्हा देव आणि दानव यांचे युद्ध झाले आणि समुद्रमंथनावेळी ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्यातील जो अमृत कलश बाहेर पडला. त्याचे चार थेंब चार ठिकाणी जिथे पडले तिथे आता कुंभ आयोजित केला जातो हे सर्वश्रुत आहे उज्जैन हरिद्वार नाशिक आणि प्रयाग. देव आणि दानवांच्या या युद्धानंतर विविध वस्तू दोघांनाही मिळाल्यानंतर युद्ध समाप्त झाले परंतु ज्या वासुकीला ह्या मंथनासाठी घुसळण्यासाठी वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण अंग सोलवटल्यामुळे तो जखमी झाला. म्हणून त्यानी देवाकडे प्रार्थना केली की मला काय मिळाले?त्यावर देवाने त्याला असे सांगितले की गंगेकाठी तुझे मंदिर बांधले जाईल. तू येथे विश्रांती घे.
वेणी माधव मंदिर आणि नागवासुकीचे दर्शन झाल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होणार नाही.
अशा या नागवासुकी मंदिराला जाण्यासाठी देखील प्रचंड रांग होती तरी सुदैवाने मला लवकर दर्शन मिळाले.
अशा रीतीने चौथ्या दिवशी माझी यात्रा समाप्त झाली.
अजून बरेच आखाडे आहेत परंतु त्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. अनेक आखाड्यांमधून विविध प्रकारची भजने मोठ्या आवाजामध्ये चालू असतात जणू त्यांची स्पर्धाच आहे. परंतु तोही हा सर्व महा कुंभाचाच एक भाग होय. मोठमोठे वॉच टॉवर्स त्रिवेणीच्या काठी बांधलेले आहेत तेथे हरवलेल्या लोकांच्या वस्तू आणि हरवलेली माणसे यांच्यासाठी स्पीकर वरून घोषणा केल्या जातात. त्यातील एक घोषणा खूपच गमतीशीर वाटली. तो पोलीस स्पीकर वरून सांगत होता की, अजमेर से आई हुई एक सीता मैया अपने राम की राह देख रही है त्या सीतामय्याचं आणि रामाचं नाव घेऊन तीन वेळा तो पुकारत होता!
महाकुंभला भेट देण्याचा
अनुभव फक्त
‘महसूस’ करना चाहिए, असाच आहे!
स्वच्छतेच्या जनजागृतीबद्दल सरकारचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. प्लास्टिक आणि कागद मुक्त रस्ते आणि नदीघाट बघून सरकारचे, सतत झाडत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि भक्तांचेही आभार. अनेक ठिकाणी कचरापेट्या ठेवाल्याचाही परिणाम.
नदी काठी झालेली गंगा आरती आणि त्यानंतर शेकडो लोकांनी एकावेळी म्हटलेले राष्ट्रगीत निःशब्द करणारे होते! 🙏
त्यावेळी निर्माण झालेली प्रचंड सकारात्मक ऊर्जा आजही अंग रोमांचित करते आणि ह्या इतक्या उत्तम देशात आपण जन्मलो ह्याबद्दल परमेश्वरपुढे नतमस्तक होतो.
गंगेच्या पाण्याच्या जलतत्वाशी एकरूप होण्यासाठी गंगेकाठी काही काळ तरी बसणे हवे.
तेव्हा सुरु झालेल्या आतल्या प्रवासाचा आनंदमयी अनुभव हा सर्वस्वी आपला स्वतःचाच आणि प्रत्येकाचा वेगळा.
त्याचा प्रत्यय घ्यावा मात्र जरूर.
पुराणकथांमधील कथांच्या
सत्या -सत्यतेचा ऊहापोह न करता श्रद्धा आणि भक्तीने ओताप्रोत भरलेल्या आणि मैलोनमैल डोक्यावर सामान घेऊन चालणाऱ्या भाविकांच्या सागरात आपणही बुडून जावे हे खरे.
त्याचमुळे दैनंदिन जीवनातील संकटांना आपण तो आपला भाग
समजून नवी उमेद घेऊन जगू शकतो. हे सर्व केवळ स्तिमीत करणारे आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्याला अनेक हातांनी केवळ देणाऱ्या भंडाऱ्यांमधील अन्नछत्रे तिथे येणाऱ्या हजारो भाविकांचा मोठा आधार आहेत.
तिथल्या जेवणाला खरंच वेगळी रुची होती ह्याचा अनुभव घ्यायला मिळाला.
एकूणताच उर्वरित दिवसांमध्ये एकदा तरी सर्वांनी महाकुंभला जरूर भेट द्यावी आणि त्या एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव घ्यावा
🌹 🙏
लेखिका : सुश्री रविबाला काकतकर
पुणे.
प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपण एखाद्या निर्णय घेतो तेव्हा एकदा दुसऱ्या बाजूचा ही विचार व्हावा. जरी पटत नसली तरी दुसरी बाजू तरीही शांतपणे एकदा पुन्हा विवेकाने निःपक्षपातीपणे विचार करावा व मगच ठोस निर्णय घ्यावा. कारण आपण स्वतः घेतलेला एक निर्णय आपलेच जीवन बदलवत असतो.
बुध्दी व हृदय दोन्ही एकत्र करून विवेकाने, जागृतपणे, सावधानतेने सारासार विचार करूनच पक्का निश्चय करावा.
☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.
झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.
*
संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :
या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.
*
विश्वविक्रमी गाणे :
15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.
*
लतादीदीची एन्ट्री :
खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी…. मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते”
आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे…. कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.
*
प्रसिद्ध धबधबा :
या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले !
*
ताजमहाल शूटिंग किस्सा :
या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.
*
गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.
*
दोन महत्वाच्या रेल्वे :
या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते !
आहे न अभिमानाची गोष्ट !
*
कोरस मंडळींचा मोठेपणा :
या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे.
*
स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार :
गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.
*
कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री
दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण…. त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”
यावर कैलाशजी म्हणाले की, ” संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही “
आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.
*
जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी :
एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं…. त्या मागे किती काय काय घडत असत अन किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतं. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच !
थोडक्यात सांगायचं तर…
… असं गाणं पुन्हा होणे नाही !!!
*
लेखक : डॉ. धनंजय देशपांडे
प्रस्तुती : सुलभा तेरणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
काही घटना, काही शब्द, काही ओळी काळजावर छिन्नीने अशा कोरल्या जातात की सदैव दिसत राहतात. काळाची धूळ बसली तरी तो झिरझिरीत पडदा त्यांचे अस्तित्व पुसू शकत नाही. कधीतरी आनुषंगिक संदर्भ ती धूळ पुसतात आणि मग ते कोरीव काम लख्ख दिसू लागते.
गेली अनेक वर्षे अशी अनेक कोरीव लेणी मनात टिकून राहिली आहेत.
काल आपटे हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने एक जुना फोटो पाठवला. त्याच्या खाली त्याने लिहिले होते, ” बाई, सततआठवते का?”
ही आव्हाने जितकी नाजूक असतात, तितकीच मुश्किलही असतात. पण एखाद्या लहान मुलीने स्वतःच डोक्यावर चादर घ्यावी आणि काही क्षणात स्वतःच ती दूर करून बोळके पसरून हसावे तशी त्यांच्यावरची अनेक आवरणं झुगारून ती कधीकधी स्वतःच उघड होतात.
तसेच झाले आणि त्या फोटोतला काळ दूर गेलाच नसल्यासारखा समोर येऊन उलगडला.
परमवीरचक्र विजेत्या पैगंबरवासी अब्दुल हमीदच्या वीरपत्नीला शिवणकाम करून पोट भरावे लागते, अशा बातमीने व्यथित होऊन ती मी माझ्या ९ वी ब च्या वर्गात वाचून दाखवली. त्या व्यथेतून एक मोठा उपक्रम आकाराला आला-‘ पै. अब्दुल हमीद कृतज्ञता निधी. ‘७८ मुलांच्या वर्गानं स्वकमाईने ‘कृतज्ञता निधी’ उभारला. त्यात नंतर ९वी क देखील सामील झाला व समाजातल्या काही संवेदनशील व्यक्तींनीही थोडी भर घातली.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, एका भव्य कार्यक्रमात, ल. आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पु. ग. वैद्य, श्री. शशिकांत सुतार, विक्रम बोके, पुण्यात स्थायिक झालेल्या परमवीरचक्र विजेत्या श्री. रामराव राणे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजेश्वरी राणे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत दै. सकाळचे तत्कालीन व्यवस्थापक श्री. के मो. भिडे यांच्याकडे तो निधी जाहीरपणे सुपूर्त केला गेला.
याची दोन कारणे होती. एक म्हणजे तो उपक्रम दै. सकाळमधील बातमीमुळेच आकाराला आला होता आणि दुसरे म्हणजे हा निधी सार्वजनिक कामातून उभा राहिला होता म्हणून तो सार्वजनिक रूपातच जाहीरपणे हस्तांतरित होणे गरजेचे होते.
राखीपौर्णिमेचा दिवस यासाठी निवडला होता कारण ती भावनाही या कार्यक्रमाच्या मागे होती. मुलांच्या तुडुंब उत्साही गर्दीत कार्यक्रम शानदारपणे पार पडला. पाटेकरांनीही या निधीत मोलाची भर घातली. व्यासपीठावरच्या संपूर्ण कार्यक्रमातल्या सर्व भूमिका मुलांनी जबाबदारीने अचूक पार पाडल्या. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्तींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे सतत मागवली जात होती. टिळक स्मारकच्या खालच्या कँटिनमधून भरलेले ट्रे वर येत होते. माझ्याही भोवती गर्दी असल्याने मला याचा कोणताही हिशेब ठेवता येत नव्हता….
हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला आणि कँटिनचे मालक श्री. भागवत माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात झालेल्या चहापाण्याचे बिल होते. माझ्या पोटात गोळा आला. स्टेजवर जाणारे ते भरलेले ट्रे दिसू लागले. किती रक्कम मांडली असेल कोणास ठाऊक अशा विचारातच मी ते बिल हातात घेतले.
बिलातल्या रकमेच्या खालच्या जागेत लिहिले होते- ‘ही रक्कम आमच्यातर्फे आपल्या ‘कृतज्ञता निधी’त जमा करावी. ‘ उपक्रमाचे कौतुक करून, नमस्कार करून ते शांतपणे निघून गेले. शाळेत शिकवत असलेल्या कवितेच्या कोरीव ओळी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या-
‘ज्योत ज्योतीने जागवा
करा प्रकाश सोहळा
इवल्याश्या पणतीने
होई काळोख पांगळा. ‘
* * *
आपटे प्रशालेच्या नववी ब व ९ वी क च्या मुलांनी हा ‘कृतज्ञता निधी’ जिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उभारला होता त्या वीरपत्नीला – श्रीमती रसूलन बेगम यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ८० किलो मीटर दूर असलेल्या धामुपूर येथे प्रत्यक्ष जाऊन तो देण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हते.
दै. सकाळने मुलांचे कष्ट, त्यांच्या भावना व त्यांच्यातील सामाजिक कर्तव्यांचे भान यांचे मोल जाणून त्यांचे लखनौ येथील प्रतिनिधी श्री. शरद प्रधान यांच्याकडे हे काम सोपवले. मुलांनी वीरपत्नीसाठी हिंदी व उर्दूमध्ये लिहिलेले प्रातिनिधिक, हृदयस्पर्शी पत्रही त्यांच्याकडे दिले होते.
गाझियाबादपासून धामुपूर येथे जाण्यासाठी वेळेवर काही वाहन न मिळाल्याने श्री. प्रधान यांनी एका ट्रकचालकाला विनंती केली. त्यासाठी शंभर रुपये आकार मान्य करून प्रधान ट्रकमध्ये चालकाशेजारी बसले. वाटेत गप्पा सुरू झाल्या. इतक्या आडगावात हा सुशिक्षित माणूस कशासाठी चालला आहे, अशी उत्सुकता त्याला वाटणे स्वाभाविक होते. दूरवरच्या महाराष्ट्रातल्या एका पुणे नावाच्या गावातल्या शाळकरी मुलांनी स्वतः कष्ट करून हा निधी उभा केला आहे, हे कळताच त्याचे डोळे विस्फारले. “साब, इतने साल यहाँ से आते-जाते हॆं, कभी उनसे मिलने की भी बात हमारे दिमाग में नहीं आई और इतनी बड़ी बात इतनी दूर के छोटे बच्चों ने सोची?”
बोलता बोलता धामुपूर गाव दिसू लागलं. प्रधानांनी आपल्या पाकिटातून शंभराची नोट काढून चालकापुढे धरली. त्यांचे हात हातात धरीत चालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ” नहीं, नहीं साहब! ये पॆसे लूँगा तो अपने आपको आइने में नहीं देख पाऊँगा! शरमिंदा मत कीजिए। चलो, इस बहाने हमसे भी देश की थोड़ी-सी सेवा हो गई।”
प्रधान खाली उतरले आणि ती नोट त्यांनी मुलांनी दिलेल्या मखमली बटव्यात सरकवून दिली. नंतर फोन करून त्यांनी ही गोष्ट मला कळवली व फोटो पाठवले.
एक शाळकरी ज्योत किती ज्योती लावत गेली…. गोष्ट जुनी पण आज आठवली.. !
(‘आत्मचित्र’ मधून)
लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈