मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझी फजिती !

सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !

आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.

‘अभी अभी तो आयीं हो

अभी अभी जाना है ।’

असे सगळे होते.

मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या.  घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !

थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.

त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’   त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.

माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.

भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !!  खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता….. 

…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत  असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.

मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !

ह्या आझाद पंछीला जिने  पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !

(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)…. 

“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला

मैने एक लडका हेरून ठेवला

उडता पंछी पिंजडेमे बंद केला

आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ …. 

– इति मंगल टिल्लू

लेखक : श्री सुहास टिल्लू

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.   हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.

न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो?

निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .

” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !

त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !

बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे  कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !

अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !

जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून      चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण  ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .

बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”

 दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .

आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “

साैजन्य  :सुश्री  जयंती यशवंत देशमुख

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ – “स्त्रीचा पदर…”– अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ 🌹 “स्त्रीचा पदर…” – अज्ञात 🌹 ☆ प्र्स्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

पदर काय जादुई शब्द आहे !! हो मराठीतला !!

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.

पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात….!!

किती अर्थ, किती महत्त्व…

काय आहे हा पदर……!?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग..!

तो स्त्रीच्या ” लज्जेचं रक्षण” तर करतोच. सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं..!

पण,आणखी ही बरीच “कर्तव्यं” पार पाडत असतो..!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल ते सांगताच येत नाही..!?

सौंदर्य खुलवण्यासाठी “सुंदरसा” पदर असलेली ” साडी” निवडते..! सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.

सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. …..!!

लहान मूल आणि

“आईचा पदर “

हे अजब नातं आहे.!

मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन ” अमृत प्राशन” करण्याचा हक्क बजावतं……!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा ” पदर ” पुढे करते..!

मूल अजून मोठं झालं., शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या ” पदराचाच आधार ” लागतो..!

एवढंच काय…! जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी “आईचा पदरच” शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही..!

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला ” आईचा पदरच ” सापडतो…..!!

महाराष्ट्रात तो ” डाव्या खांद्या वरून ” मागे सोडला जातो…..!!

तर गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो..!

कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात..!

तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं ” पदरच ” झटकतात..!

सौभाग्यवतीची “ओटी “भरायची ती पदरातच अन्‌ “संक्रांतीचं वाण “लुटायचं ते ” पदर ” लावूनच..!

बाहेर जाताना ” उन्हाची दाहकता ” थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो.!

तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच ” छान ऊब ” मिळते….!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच ” गाठ ” बांधली जाते..

अन्‌ नव्या नवरीच्या

“जन्माची गाठ ” ही नवरीच्या पदरालाच.

नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते…..!!

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना…!?

नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते..!

पण संसाराचा राडा दिसला..! की पदर कमरेला खोचून कामाला लागते..!

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना …..?

माझ्या चुका ” पदरात ” घे..!

मुलगी मोठी झाली, की “आई ” तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते अगं.! चालताना तू पडलीस तरी चालेल..! पण, ” पदर ” पडू देऊ नकोस !

अशी आपली भारतीय संस्कृती…!

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा ” विनयभंग ” तर दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत..!

ऊलटे तिला वाट देण्यासाठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या पदरात..

ही आहे आपली भारतीय संस्कृती…

संग्राहिका – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

विश्वातील असा स्रोत आहे ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. सहाय्य, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा किंवा अस्पष्ट कंपनांपासून संरक्षणासाठी पांढर्‍या प्रकाशाला कोणीही (बरे करणारे, सहानुभूती देणारे कोणीही!) आवाहन करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या प्रकाशाचा वापर कोणालाही किंवा कशालाही इजा करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसेच त्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकत नाही.

 व्हाईट लाइट बोलावणे पांढऱ्या प्रकाशासाठी ओरडणे किंवा गुडघे टेकून प्रार्थना करण्याची विनंती करण्यासारखे नाही. आपण धार्मिक असणे आवश्यक नाही, फक्त तो प्राप्त करण्यासाठी खुले असावे. प्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे… जर तुम्ही त्याच्या उपचार आणि कंपनांना स्वीकारत असाल तर तो अधिक सहज उपलब्ध आहे.

शुद्धीकरण आणि परिवर्तनासाठी नकारात्मक किंवा  गलिच्छ  ऊर्जा पांढर्‍या प्रकाशाकडे पाठविली जाऊ शकते किंवा निर्देशित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही विनंती करू शकता की तुम्ही तुमच्या मधून बाहेर काढलेल्या अशुद्धता शुद्धीकरणासाठी पांढर्‍या प्रकाशाकडे पाठवत आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या परिवर्तनाची संकल्पना अगदी सोपी आहे.जसे तुमचे सर्व घाणेरडे कपडे पॅक करण्याचा आणि ड्राय क्लीनला टाकण्याचा विचार करा. तुमचे कपडे जसे एका बॅग मध्ये भरून लॉंड्रीत देता आणि  काही दिवसांनी  ते स्वच्छ  होऊन परत येतात तसेच हे आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या क्षेत्रात जे काही प्रवेश करते किंवा ज्यावर पांढरा प्रकाश पडतो ते स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर येते.

पांढरा प्रकाश देवदूत,चांगल्या शक्ती घेऊन येतात.

विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला पांढर्‍या प्रकाशाच्या संरक्षणाची इच्छा असेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. जसे की रिक्षा ला कॉल करणे. तुम्हाला फक्त दरवाजा उघडण्याची आणि प्रकाशाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे.

आपल्याला जीवनात मिळालेले धडे,वाईट अनुभव,नकळत केलेली चुकीची कर्म इत्यादी सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचे ठिकाण आहे.तसेच अत्यंत विश्रांतीची जागा आहे.

पांढर्‍या प्रकाशाचे व्हिज्युअलायझेशन व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. काहींना पांढर्‍या रंगात लहान धूमकेतूसारखे चमकणारे चमक दिसू शकतात, तर इतरांना चमकणारे मोठे पांढरे गोळे दिसू शकतात.काहींना पांढरे सोनेरी किरण दिसतात.काहींना प्रकाशाचा शॉवर दिसतो.काहींना उजेड दिसत नाही पण जाणवतो.काहीतरी आपल्या कडे येत आहे असे वाटते.अशा कोणत्याही स्वरूपात ही अनुभूती येते.

दिवसातून 10 मिनिटांनी सुरुवात करा, हळूहळू कालावधी 30 मिनिटांपर्यंत वाढवा.

श्वेत प्रकाश/white light ध्यान काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यापैकी काही येथे आहेत:

🪷 तुमची प्रेरणा सुधारते आणि वाढवते .

🪷 दृढनिश्चय आणि सहनशक्ती सामर्थ्य देते.

🪷 तुम्हाला तुमच्या ध्येयांवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

🪷 तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते .

🪷 आत्मविश्वास सुधारतो.

🪷 यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते.

🪷 स्पष्ट विचार प्रक्रिया करण्यास मदत करते.

🪷 अडकलेला गाभा स्वच्छ आणि साफ करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो.

पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानाचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटे लागतात. जेव्हा तुम्ही मनाच्या निवांत अवस्थेत याचा सराव करता तेव्हा परिणाम चांगले मिळतात, तुम्ही जागे होताच हे करणे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तुमच्या मनात ठेवल्याचे सुनिश्चित करा.

🪷 धीर धरा.

🪷 प्रामाणिक रहा.

🪷 परिणामांची अपेक्षा ठेवून कधीही ध्यान करू नका.

🪷 नकारात्मक विचार नेहमी तुमच्या फोकसपासून दूर ठेवा.

🪷 नेहमी सकारात्मक उर्जेने वावरत रहा.

🪷 पूर्णपणे दयाळूपणे ध्यान करा.

श्वेत प्रकाश ध्यान हे शुद्धीकरण आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुमचे शरीर आणि मन पुन्हा टवटवीत करण्यास मदत करते. आणि राग, चिंता आणि तणाव यासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते . यात प्रत्येक अवयवांना व मन त्यातील विचारांना स्थिर,शुद्ध करणे हे होत असते. त्यामुळे आपल्यातील प्रेरणा आणि सहनशक्ती वाढते, चांगले विचार करण्याचे प्रमाण वाढते, उद्दिष्टांकडे लक्ष  केंद्रित करणे जमू लागते, दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो,आपण स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करू लागतो. आणि शरीर शुद्ध होते. हे या ध्यान तंत्राचे काही प्रमुख फायदे आहेत. हे ध्यान दिवसातून किमान 10 मिनिटे आरामशीर मनःस्थितीसह स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन करण्यासाठी करा.

पांढरा प्रकाश ध्यान तुमची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवते असे मानले जाते.

हे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा सुधारते.

हे मन स्वच्छ करते आणि तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी दयाळू, प्रामाणिक आणि संयमाने ध्यान करा.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे — 

त्याच्या पुतणीचं अ‍ॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.

आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला.  त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.

मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!

मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!

संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.

नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none  अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी!  चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.

त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.

मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!

मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !

– समाप्त –

— एका पत्नीचे मनोगत

(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – ३… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – ३ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन.) – इथून पुढे —

भारती-माता, यांचे दुसरे नाव सरस्वती होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे सरस्वती देवींना भूलोकी जन्म घ्यावा लागला होता.  भगवान शिव जेव्हा भूलोकी जन्म घेतील,  तेव्हा त्यांच्या दर्शनाने या सरस्वती देवी मुक्त होतील,  असा श्री विष्णूंनी भारती देवींच्या वडिलांना दृष्टांत दिला होता.  आचार्य दुसऱ्या दिवशी महिष्मती सोडून निघणार होते.  त्या रात्री मंडन अत्यंत शांत व मूक होते.  त्यांच्या मनात कोणतीच शंका उरली नव्हती. कोणत्याच कामाची आसक्ती उरली नव्हती. त्यांनी मनाने केव्हाच संन्यास स्वीकारला होता.  त्या रात्री भारतीने आपल्या मुलाची करावी तशी आचार्यांची सेवा केली.  ती मनोमन समजली होती की आता आपले जीवन संपले आहे.  आचार्यांना निरोप देण्यासाठी रस्ते सजवले होते. सारे याज्ञिक, वेदज्ञ, प्रतिष्ठित नागरिक, ईश्वर भक्त मंडन मिश्रांच्या निवासाकडे आले होते.

आचार्य पुढे जात असता, अमृतपूरच्या राजाचे निधन झालेले दिसले. पर्वतावरील एका गुहेत आचार्यांनी , मी, देह ठेवणार असल्याचे व त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करणार असल्याचे सुखाचार्य, पद्मपादाचार्य व हस्तामलकाचार्य या तीनच शिष्यांना सांगितले.  त्या गुहेत त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवली.  कोणत्याही संकटाची चाहूल लागली तरी मला म्हणजे राजाला येऊन एक श्लोक सांगितला तो म्हणा.  त्याक्षणी मी माझ्या शरीरात प्रवेश करेन.

तिकडे राजाचे अंत्यदर्शनासाठी राजाला फुलांचे गादीवर ठेवले. इतक्यातच राजाने हालचाल केल्याचा भास झाला.  झोपेतून उठावे तसे राजा उठून बसला अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी प्रसंगावधान दाखवून कणकेची प्रतिमा करून तिचे दहन केले.  सर्व राज्यात आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजपुरोहिताने योग्य तो अभिषेक केल्यावर, राज्यकारभार सुरू झाला.  वेळच्यावेळी राज्यसभा सुरू व्हायची. पटापट निर्णय दिले जायचे.  राज दरबारात नवचैतन्य निर्माण झाले होते.  राज्यातील प्रजेत अपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला.  सर्वजण चांगले वागू लागले. मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले.  हरिभक्ति फुलून जाऊ लागली.

राणी पहिल्याच भेटीत मोहरून गेली.  राजा प्रेमाने वागतो, पण तो अलिप्त असल्याचे तिला जाणवत होते.  राजा पूर्वीप्रमाणे दासींकडे  पहात नसे.  त्यामुळे राणी स्वतः सर्व सेवा करू लागली.  

हळुहळू मंत्रिमंडळाला संशय येऊ लागला की आपला राजा इतका कसा बदलला?  वीस दिवसांनी मंत्रिमंडळाने गुप्त बैठक घेतली. त्यांना जाणवले की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला असावा.  मच्छिंद्रनाथांनी जसे आपले शरीर लपवून ठेवले होते,  तसे काही घडले का?  असे त्यांना वाटू लागले.  त्यामुळे गुप्तपणे शोध घेण्याचे व अशा योग्याचे ते शरीर शोधून अग्नी दिला पाहिजे,  म्हणजे हा योगी राजाचे शरीर सोडून कुठेही जाणार नाही व आपला राजा चक्रवर्ती होईल असे त्यांनी ठरवले.

ही बातमी चित्सुखानंदांनी राजवाड्यात येऊन,  ठरल्याप्रमाणे खुणेचा श्लोक म्हणून,  राजाला सांगितली.  आचार्य काय समजायचे ते समजले व परत गुहेत ठेवलेल्या शरीरात प्रवेश करून त्या स्थानापासून दूरवर निघून गेले.

हे शरीर ठेवले होते, ती जागा, नर्मदेकाठी, मंडलेश्वर या गावी, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आहे. 

दीड-दोन महिन्यातच ते परत महिष्मतीला आले. चर्चेमध्ये आचार्यांनी भारती देवींचे पूर्ण समाधान केले.  त्या म्हणाल्या,  आपण साक्षात सदाशिव आहात.  आपणास माझा नमस्कार. आपण साक्षात जगद्गुरुच आहात.  मी माझ्या पतीला संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.  आचार्यांनी मंडन मिश्रांना संन्यास दिला.

त्या काळात काश्मीर म्हणजे पंडितांचे आगर होते.  श्रीनगर मध्ये फार पूर्वी सर्वज्ञ पीठ स्थापन झाले होते.  त्या पीठाचे, तीन दिशांचे दरवाजे उघडलेले होते.  पंडितांनी तो मान मिळवला होता.  पण दक्षिणेकडचा दरवाजा बंद होता.  आचार्य दक्षिणेकडून आले होते. तेथील विद्वानांमध्ये चर्चा होऊन,  आचार्यांसाठी दक्षिणेकडील दार उघडले गेले व त्या सर्वज्ञ पिठावर बसण्याचा त्यांना मान मिळाला.  

बौद्ध व जैन पंथीय आचार्यांनी शंकराचार्यांना मनोमन मान्यता दिली.  पण सभा सोडून चालते झाले.  

नंतर त्यांनी द्वारकेमध्ये पहिल्या  धर्मपीठाची स्थापना केली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचे दर्शन घेतले.  तेव्हा अच्युताष्टकाची रचना केली.  नंतर प्रभास व उज्जैनीस भेट दिली. नेपाळला दर्शनासाठी गेले.  वैदिक सनातन धर्माच्या पताका, नेपाळच्या सर्व मंदिरांवर उभारल्या.  आचार्य यांना कैलास पर्वतावर जाऊन शिवदर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी, आचार्य यांचा उजवा हात धरला व आपल्या योगसामर्थ्याने एका क्षणात त्यांना भगवान शिवांच्या समीप कैलासावर आणले.  तिथे शतश्लोकी शिवानंद लहरींची रचना झाली.  आचार्यांनी केलेल्या, या भक्तीमय स्तोत्राने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी आचार्यांना पाच स्फटिकलिंगे दिली व सांगितले,  यांच्या पूजनाने तुला अमोघ ज्ञान प्राप्त होईल.

आचार्यांनी जगन्नाथ पुरी येथे मठ स्थापन केला. 

नंतर आचार्य,  महाराष्ट्रातल्या वैकुंठाकडे म्हणजेच पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन होताच पांडुरंगाष्टक म्हणून प्रार्थना करू लागले.

आचार्यांनी चौथ्या 

धर्मपीठाची स्थापना शृंगेरी येथे केली. 

शेवटी, कांची येथे 

धर्मपीठाची स्थापना केली. 

अशा प्रकारे चार दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली. 

कांचीमध्ये कोण,  कोणत्या धर्मापीठावर राहील,  ते सांगितले.

त्यांनी धारण केलेला दंड,  नर्मदा मातेने पावन केलेला कमंडलू,  त्यांच्या पादुका…. यांच्यावर कोणाचा हक्क राहील,  हे सांगितले.

ते म्हणाले माझा बहिश्चर प्राण, म्हणजे कैलासावर भगवान शिवांकडून प्राप्त झालेल्या त्या सौंदर्य लहरी,

माझ्या शिवानंद लहरींसह,  प्राणरूपाने आपणा सर्वांसाठी ठेवून जात आहे. व आपल्या मधुर वाणीने 

भज गोविंदम् 

भज गोविंदम।।

हे आपल्या गुरूंचा उल्लेख असलेले व गुरुगोविंदयतींना प्रिय असलेले भजन म्हणायला सुरुवात केली. 

सर्व शिष्यांच्या एका सुराने कांची मठाचा आसमंत भरून गेला. एका क्षणी धून थांबली; व सर्वत्र, नीरव शांतता पसरली. कारण आचार्य आसनावर नव्हते.

दंड तेजाळला होता. कमांडलू प्रभावी दिसत होता.

पादुका तेजःपुंज दिसत होत्या. 

आणि सौंदर्य लहरीच्या पोथीतून व त्याखाली असलेल्या शिवानंद लहरींच्या पोथीतून, दिव्य असा,  शीतल प्रकाश बाहेर पसरत होता. 

आचार्यांचे आसन रिकामे होते. 

चित्सुखाचार्य कातर स्वरात म्हणत होते….

चिदानंद रूप, शिवोsहम्  शिवोsहम।।

— समाप्त —

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सात किमती रत्ने… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ सात किमती रत्ने… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सात किमती रत्नं पाठवत  आहे.

पहिले रत्न – माफी 

तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने ‘माफ’ करा.

दुसरे रत्न – विसरा 

दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. ‘निःस्वार्थ’ भावना ठेवा.

तिसरे रत्न – विश्वास 

नेहमी ‘स्वकष्ट’ आणि ‘निसर्गा’वरअतूट विश्वास ठेवा.    हीच तुमच्या यशाची पावती असेल.

चौथे रत्न – नातं 

समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं. नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका.

पाचवे रत्न – दान 

नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान.आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.

सहावे रत्न – आरोग्य

दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.

सातवे रत्न – वैराग्य 

नेहमी लक्षात ठेवा की, ‘जन्म’ आणि ‘मरण’ कधीच कुणालाच चुकलेले नाही. ‘जन्म’ घेतला म्हणजे ‘मृत्यु’ अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू  नका. ‘जीवन’ खूप सुंदर आहे, आनंदाने जगा.                                                 

माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.

निसर्गाची ताकद आहे बघा.निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.

ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत,

तो तोडताना दहा वेळेस विचार करतो.

आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो,

मग ती झाडे  असो की नाती…

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मातृदिनानिमित्त स्व आईस पत्र… ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

?विविधा ?

☆ मातृदिनानिमित्त स्व आईस पत्र… ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

ति. आई

तुझ्या त्या…. चतु:आयामी ते अनंतआयामी.. दिक्कालातीत अनादी अनंताच्या अतर्क्य, प्रवासाला निघून आज ऐहिक काल गणनेनुसार सहा वर्षे लोटली. एकेका ऐहिक क्षणाला तुम्हा दोघांच्या श्रीमंत स्मृतीची भिजलेली  झालर असते. बाबा गेले तेंव्हा कदाचित दु:खाची तीव्रता तुझ्यामुळे तेवढी जाणवली नाही. तूच ते दु:ख स्वतः च्या खांद्यावर उचलून आम्हा भावंडांना जाणवू दिले नाही. पण आता तुझी उणीव ही एक निर्वात पोकळीच आहे.

आजही तुझा आम्हाला आभास होतो. मला तर असे अनेक वेळा वाटते की, कुठून तरी गाण्याची ती लकेर ऐकायला येईल! ” तू जहा,जहा चलेगा मेरा साया साथ होगा…”  आणि खरंच सांगतो मी थोडा आश्वस्त होतो. ” तू कभी उदास होगा तो उदास होंगी मै भी..  नजर आवू या ना आऊ…  ” ही ओळ स्मरताच मी आतून ओलाचिंब होतो…. पापण्यांना अश्रूंचा भार सोसवत नाही…

वाटतं कुठून तरी अवचित  ” मिलू… मुकुंदा… मुचकुंदा.. म्हणून लाडिक हाक ऐकू येईल.. पण आभासी विश्व आणि व्यावहारिक विश्व ह्यात महत अंतर आहे नाही ? इहलोकातील क्षणभंगूर   वास्तव्य हा मानवी जीवनाचा पूर्णविराम म्हणायचा कि अर्धविराम ? हाच संभ्रम मला पडतो. तुझ्या स्मृतिदिनी अनेक अनादी प्रश्नांची पुनःपुन्हा उजळणी होते. जीवन म्हणजे काय ?  मृत्यूची आवश्यकता काय ? जीवनाची सार्थकता कशात ? इत्यादी सर्व अनुत्तरीत प्रश्न सभोवताल फेर धरून नाचतात.

आई…  जाणिवेच्या पल्याड,  त्या ज्ञात अज्ञाताच्या प्रदेशात…  तुझ्या त्या अनंताच्या अनाकलनीय गूढ प्रवासात सुख, दुःख असतात कां  गं ?  स्मृती तरी ? 

तुला स्मृती असो, नसो ! इहलोकात तुझ्या स्मृती ठायी ठायी आहेत.

ठेच लागली तरी, भिती वाटली तरी, विस्मय वाटला तरीही.. आई गं.. म्हणून आपसूकच उदगार बाहेर पडतो. आई , शिक्षणासाठी माय लेक एकाच कॉलेज मध्ये एकत्र जाण्याची उदाहरणे दुर्मिळच! पण ते उदाहरण बाबांच्या प्रेरणेने तु प्रस्तुत केले. ती तुझी ज्ञानपिपासा ! तुझे ते संस्कृत, मराठी, इंग्रजीवरील प्रभुत्व ! शब्दोच्चाराचे महत्व !! प्रसंगा प्रसंगावर समयोचित संस्कृत श्लोक उद्धृत करणारी प्रतिभा .. प्रेरक उदाहरणे, उद्बोधक प्रसंग आजही स्तिमित करून जातात..

त्या काळी.. संसार सांभाळून मराठीत एमए करणे.. हे एक  समाजापुढे आदर्श असे उदाहरणच  होते. आणिबाणीतील ति.बाबांच्या अटके विरूद्ध  केन्द्र सरकारला ऐतिहासिक  न्यायालयीन लढा देत नमवणे… एका नृशंस उन्मत्त मदांध पाशवी राजसत्तेला झुकवणे… कुठून आणलेस गं इतके धाडस ? इतके बळ..? कुठून आले हे सामर्थ्य?  एक कुटुंब वत्सल स्त्री ते उन्मत्त राजसत्तेच्या कराल दाढेतून बाबांना सोडविणारी सावित्री हा प्रवास कसा तू साधला ?

मला आजही आठवून अस्वस्थ व्हायला होतं.. तू असतीस तर मला सांगूच दिले नसतेस. पण बाबा जेंव्हा मिसा ( म्हणे मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी अॅमक्ट ) अंतर्गत तुरूंगात नुकतेच गेलेले असतांना आपल्या घराच्या बाहेर रस्त्यावर अश्लाघ्य शब्दांत गलिच्छ लिहिलेले मी पहाटे पहाटे तुला तुझ्या हातांनी पुसतांना बघितले … माझ्या अंगाची तर लाही लाही होत होती. पण  ” दे डोन्ट नो व्हॉट दे आर डुईंग ” असे म्हणत आपल्या क्षमाशील, उदार अंतःकरणाचा परिचय दिलास… अविश्वसनीय वाटतं सगळं. युद्धस्थ कथा रम्य..! ह्या उक्तीप्रमाणे हे सर्व स्मरतांना आज रोमांचक वाटतं … नाही ?

आई ! मध्यंतरी आपली कामठीची वास्तू बघायला जाण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकलो नाही. पण आज तिथे तर फक्त श्रीमंत आठवणी आणि श्रीमंत वास्तूचे उदास भौतिकीय भग्नावशेषच उरलेत बघ. जेथे विद्यार्थ्यांचा एकेकाळी वावर होता … तेथे श्वापद ? मन अतिशय विदीर्ण आणि विषण्ण करणारा अनुभव होता तो !

आई ! तुझे ते प्रेयस आणि श्रेयस मधील फरक सांगणारे संस्काराचे तरल बंध आम्हाला अजूनही जखडून ठेवताहेत.. तसे ते दुर्दैवाने अव्यावहारिकच असतात. आज तुझ्या आणि ति. बाबांच्या संस्काराच्या श्रीमंत शिदोरीवर आम्हा सर्वांची ऐहिक दृष्ट्या यशस्वी वाटचाल सुरू आहे.

बाबांनी केलेले रेषांचे संस्कार, तू केलेले स्वरांचे, सुरांचे, शब्दांचे, सर्जनशील अक्षर संस्कार आज उपयोगी पडताहेत. शालेय निबंध लिहितांना तू केलेल्या तुझ्या सुचना आजही लिखाण करतांना उपयोगी पडतात. आज कलेच्या विस्तीर्ण प्रांगणात मी पदार्पण केलेले आहे. आई समाजाने तू केलेल्या सृजन संस्काराची माझ्या निमित्ताने का होईना पुरेशी दखल घेतलेली आहे. माझ्यावर पुरस्कारांची, सन्मानांची अक्षरशः लयलूट होत आहे. सन्मान स्विकारतांना, मी किती निमित्तमात्र आहे हे मनोमन  जाणवत राहतं.

पण  फक्त हे सर्व बघायला तू हवी होतीस.  बाबा असायला हवे होते.

 तुला ठावूक आहे ?तुमचे केवळ अस्तित्व सुद्धा आम्हा सर्वांनाच नव्हे तर शेकडो विद्यार्थ्यांना  उर्जादायी असेच होते.

आमच्या असंख्य चुका तुम्ही माफ केल्यात. आम्ही काही मागावे असे काहिच नाही.. पण तुम्ही दोघांनी थोडी घाई नसती केली तर..? मरण कल्पनेशी थांबे तर्क मानवाचा.. पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा….

तुला प्राध्यापक ग्रेस ( प्रा. माणिक गोडघाटे ) तू मराठीत एमए करतांना, नागपूरला मॉरिस कॉलेज मध्ये शिकवीत होते. त्या ग्रेसनी, ” ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..” ही कविता माझ्यासारख्या मातृवियोगींसाठीच लिहिली असावी.

तुझ्या मांडीवर डोके ठेऊन, तुझी खरखरीत बोटे जेंव्हा माझ्या केसांतून फिरताना जो रेशमी स्पर्श होत असे तो आता पुन्हा होणे नाही. असह्य आहे हे सारे ! एक मात्र खरंच की तू गेलीस आणि आमचे शैशव, बाल्य संपले.. आम्ही पोरके झालो.

आज खरोखरच मन पिळवटून  मातृभाव मनातून दाटून येतोय.. कृतज्ञता आहेच..  साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करण्याखेरीज माझ्यासारखा मर्त्य मानव आणखी काय करू शकतो ?

तुझाच…

मिलू, मुकुंदा ..मुचकुंदा

© श्री मिलिंद रथकंठीवार

रेखाचित्रकार, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याची एकसष्टी जवळ आलीये आणि मी त्यादिवशी काहीतरी करू शकते, याचा त्याला अंदाज होताच. हल्ली सरप्राईज देण्याची नाहीतरी पद्धतच पडून गेली आहे. परंतू याला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे महाकठीण. तो सेवानिवृत्त होण्याआधी ठीक होतं. सतत खात्याच्या कामात गर्क. अंगावर सरकारी आणि अधिकाराची वर्दी होती पण त्याचा रुबाब दिसायचा तो प्रशिक्षक म्हणून. त्यामुळे पायाला भिंगरी बांधलेली असायची त्याच्या. मी ही माझ्या नोकरीत असल्याने दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशातली गत होती. पण आता मात्र असं नव्हतं. आणि मला त्याला त्याच्या एकसष्टीचं सरप्राईज द्यायचंच होतं. पण हा सतत जेथे जातो तेथे तू माझा सांगातीच्या चालीवर सोबत. कदाचित इतक्या वर्षांची भरपाई करण्याचा त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असावा.

याची एकसष्टी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट शिजवण्यासारखी भानगड. आंतरराष्ट्रीय यासाठी की चिरंजीव आणि सूनबाई दूर तिकडे परदेशात. घरातल्या एकाला तरी माझ्या मनसुब्याची कल्पना असावी म्हणून आधी सूनबाईला कारस्थानात सहभागी करून घेणे आले. कारण तिच्याकडे सून आणि लेक अशा दुहेरी भूमिका आहेत. आम्हांला मुलगी नाही म्हणून सुनेलाच मुलगी मानायचं याचं खूप आधीपासून ठरलेलं होतंच. आणि इतक्या वर्षांत सूनबाई आमच्या लेकीच्या भुमिकेत अगदी फिट्ट बसल्यात. पण ही लेक आणि आमचा लेक या दोघांनाही त्यांच्या कामामुळे इथे येणे अशक्य होतं. त्यामुळे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येउन पडली. शहरात कार्यक्रम करण्यातला सर्वांत मोठा टप्पा म्हणजे कार्यालय मिळवणे. शिवाय ते जवळचे,सोईचे आणि परवडणारेही असावे लागते. शिवाय तारीख विशिष्ट असल्याने इतर कार्यक्रमांसारखी कार्यालयाची उपलब्ध तारीख बघून दिवस ठरवणे चालणारे नव्हते. कार्यालय बघायला म्हणून घराबाहेर निघाले तर साहेब सोबत यायला तत्परतेने तयार झाले. काहीतरी कारण सांगून मी एकटीच बाहेर पडले!

याचा मित्रपरिवार अनेक ठिकाणी विखुरलेला. त्यामुळे त्यांचेशी संपर्क साधणे जिकीरीचे होतेच. शिवाय ती मंडळी याच्या सतत संपर्कात असतात. त्या सर्वांना याची जन्मतारीख तोंडपाठ आहे कारण ही तारीखच लक्षात राहिल अशी आहे. पण यातील कोणी फितुर झाला तर गडबड होणार, हे नक्की!

मुळात असा कार्यक्रम करणे हे त्याच्या बुज-या स्वभावात बसेल की नाही,ही मोठीच शंका होती. कारण जबाबदारी आणि रुबाबाचा सरकारी रंगाचा गणवेश असूनही साहेबांनी तो कधी मिरवला नाही कामाव्यतिरिक्त. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा आणि अंगभूत सौजन्यशीलतेच्या हल्ली दुर्गुण भासणा-या गुणांमुळे तो प्रसिद्धीपासून आणि लाभांपासून चार हात दूरच राहिलेला माणूस. तीस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत फक्त एकदाच प्रमोशन मिळाले त्याला यावरूनच सर्व काही लक्षात यावे खरे तर. पण त्याची त्याला कधी ना खंत ना खेद. लहानपणी म्हणजे तो चौथीला असताना त्याच्या बाबांनी त्याच्याकडून भगवद गीता तोंडपाठ करून घेतलेली होती. पुढे त्यातील काही श्लोकांचं त्याला विस्मरण झाले थोडेसे. मात्र ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ तो विसरला नाही. जे काम मिळाले ते जीव ओतून करावे हा एक अर्थ त्याला उमगला होता. त्यामुळे त्याला मानणारा मोठा मित्रपरिवार त्याने जमवून ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवायचे तरी कुणाकुणाला असा सवाल उभा राहिला. पाचशे दोनशे दीडशे वरून गाडी सव्वाशेवर स्थिर केली. पाच पंचवीस इकडे तिकडे होतातच.

अगदी मुलीच्या लग्नाची आमंत्रणे करावीत अशी यादी तयार केली लपून छपून. कारण काहींचे संपर्क क्रमांक माझ्यापेक्षा त्यालाच जास्त ठाउक असतात. पण काहीतरी कारण सांगून,त्याच्या फेसबुकमध्ये घुसखोरी करून ते क्रमांक मी मिळवले….त्या सर्वांना कार्यक्रमाला यायचेच होते. पण इतक्या लांबून कार्यक्रमाच्या आधी एक दिवस इथे येणा-या मित्रांनी चुकून इथल्या त्यांच्या कॉमन मित्रांकडे भंडाफोड न केला म्हणजे मिळवली!

जावयाचा कार्यक्रम आणि त्याच्या माहेरच्या म्हणजे माझ्या सासरकडील लोकांना नाही कळवलं तर कसं जमेल? त्यात हा त्यांचा अतिशय लाडका जावई. जावई कम लेक. म्हणजे जावई कमी आणि लेकच जास्त. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पैकी एकाला जरी वगळलं तर अवघड झाले असते…भावनिकदृष्ट्या! जितकी सेवा त्याने त्याच्या वडिलांची केली तितकीच काळजी माझ्या घरच्यांचीही घेतली आजवर. अहो, नोकरी मुंबईत आणि घर पुण्यात. त्याच्या वडिलांच्या पायांना रोज तेल लावून मालिश करून द्यायचा याचा शिरस्ता. बाबांची मालिश करून देणं वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक तर होतेच. एखादा पगारी माणूस नेमून हे काम खरे तर त्याला करून घेता आले असते…. पण मुलाचे कर्तव्य म्हणून तो हे काम न कंटाळता करत असे. त्यामुळे साहेब भल्या पहाटे रेल्वेने मुंबापुरीला प्रयाण करायचे आणि रात्री उशीरा पुण्यात परतायचे…असा क्रम थोडाथोडका नव्हे…कित्येक वर्षे चालला. याला भक्त पुंडलीक म्हणावं की श्रावण बाळ असा प्रश्न पडायचा.

माझ्या नणंदेचे म्हणजे याच्या बहिणीचे यजमान अकाली निवर्तले तेंव्हा याने मला ठामपणे सांगितले…दीदीची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली! आणि त्याने ती आजवर निभावली आहे. कार्यक्रमात दीदीच्या पोरींना म्हणजे भाच्यांना आणि भावाच्या मुलींना सहभागी न करून घेउन कसे भागणार? या भाऊरायाच्या सोहळ्याला बहिण आणि मामाश्रीच्या कार्यक्रमाला भाच्या, आणि पुतण्या तर हव्यातच. म्हणून मग सव्वाशेची निमंत्रण यादी दिडशेच्या घरात सहजच गेली. शिवाय गाणे शिकलेल्या भाचीबाई सूत्रसंचालनासाठी सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्याच. त्यामुळे दीप-प्रज्वलन,स्वागत गीत, प्रार्थना,आभारासह सूत्रसंचलन इत्यादीचा प्रश्न परस्पर मिटला. फ्लेक्स,आमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट,केक, एकसष्ट दिवे,जेवणाचा मेन्यू फोटोग्राफर,फुलांच्या पायघड्या,रंगमंच इत्यादी शेकडो बाबी पटापट फायनल झाल्या….त्याची माझ्यावर नजर होतीच… काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.

– क्रमशः भाग पहिला 

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – २ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – २ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.) इथून पुढे —-

ज्या काशीमध्ये महर्षी व्यासांनी आचार्यांना आशीर्वाद दिला होता त्याच काशी पासून आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर प्रवचने सुरू केली.  ही प्रवचनें ऐकून , काशीच्या विद्वानांची  मने तृप्त होऊ लागली.  आचार्य, खूप सोप्या भाषेत, तसेच सामान्य मनुष्यालाही, सहज समजेल अशी भावपूर्ण स्तोत्रे रचू लागले.  आचार्यांनी वैदिक सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.  यात अआध्यात्मिक दृष्ट्या जीवन जगण्याचा मार्ग दाखवला होता. त्यात भक्ती मार्ग,  ज्ञानमार्ग, योग मार्ग इत्यादींचा समावेश होता.  

एक अतिवृद्ध,  जरा जर्जर  व्यक्ती,  पहाटेच्या वेळी ओट्यावर बसून डु व कृं असे क्षीण स्वरात उच्चारण करीत,  पाठ करीत होती.  आचार्यांना त्या वृद्धाची दया आली. क्षणाचाही विलंब न लावता आचार्यांनी,

भजगोविंदं भज गोविंदम

भज गोविंदम मूढमते – हे स्तोत्र रचले.

त्या वृद्धाला, तो, व्याकरणाचा पाठ थांबवायला लावला व हरिनामाचा गजर करण्याचा उपदेश दिला.

बाबा रे, हे .. तुझे व्याकरण पाठ करणे काही तुला सद्गती देणार नाही. तुझ्यावर आता मृत्यू केव्हा झडप घालील, हे माहिती नाही अशा प्रकारे झटून हा व्याकरण पाठ करण्याऐवजी, तू भगवन्- नामस्मरण कर. त्यामुळे तुला सद्गती तरी प्राप्त होईल.  

आनंदित होऊन त्याने आचार्यांना विचारले,  आपण केलेल्या उपदेशाच्या स्तोत्राचे नाव काय बरे?  

तेव्हा त्याच्या तोंडाचे बोळके झालेले पाहून,  आचार्य हसत हसत म्हणाले, चर्पटपंजरी चर्पट म्हणजे खमंग. पंजरी म्हणजे कुटून बारीक केलेले खाद्य. 

अशा प्रकारे, आचार्य, सामान्य मनुष्यांना भक्ती मार्ग दाखवत होते,  तर विद्वानांना ब्रह्मसूत्राच्या भाष्याने प्रभावित करून परमार्थी बनवत होते. वास्तविक पाहता हे स्तोत्र आपल्यालाही कसे लागू आहे याचा विचार करून आपणही गेयम गीता नाम सहस्त्रम हा आचार्यांचा उपदेश आचरणात आणलाच पाहिजे. 

प्रयागमध्ये,  त्याकाळी वैदिक परंपरेमध्ये अनेक पंथ निर्माण झाले होते. उदाहरणार्थ जैन, बौद्ध, मांत्रिक, तांत्रिक, कर्मठ, भैरव, शैव, वैष्णव इत्यादी.  त्या त्या पंथाच्या संस्थापकांनी घालून दिलेले तारतम्य लोप पावलेले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करताना सहिष्णुतेऐवजी कर्मठपणावरच भर दिला जात होता.  जो तो आपल्या पंथाचा अभिमान उराशी बाळगून इतर पंथांना, कनिष्ठ समजत होता. सहकाराची जागा द्वेष, मत्सर व स्वार्थ यांनी जी घेतली होती,  तेच आचार्यांना नाहिसे करायचे होते. आचार्यांनी  शिकवलेल्या धार्मिक सहिष्णुतेमुळे, समाजात एकजूट होऊ लागली. त्यामुळे जैन, बौद्ध, शैव व वैष्णव इत्यादी विविध पंथातील लोकांनी आचार्यांना आपले गुरु मानले.  कारण आचार्य आपले मत कोणावरही लादत नसत.  तर समोर असलेल्या व्यक्तीचे मत-परिवर्तन करीत असत.  घराघरातील वाद नष्ट होऊन एकोपा नांदावा म्हणून आचार्यांनी पंचायतन पूजेची संकल्पना,  भक्ति मार्गातील लोकांना सांगितली.  ती अत्यंत यशस्वी झाली. कारण त्यामुळे भ्रातृभाव वाढत गेला.  अद्वैत तत्त्वज्ञानातील  अति- सूक्ष्म तत्त्वे सुद्धा आचार्यांनी सुलभ पद्धतीने स्पष्ट केल्यामुळे ज्ञानमार्गाचे कट्टर पुरस्कर्ते सुद्धा, आचार्यांना सत्पुरुष मानत.  कारण त्यांच्या प्रवचनांमुळे त्यांना शांती मिळत असे.  केवळ नाम संकीर्तनाने अध्यात्म कसे साध्य होऊ शकते,  ते सामान्य माणसाला समजावून सांगू लागले.   त्यामुळे अगणित लोक त्यांची दीक्षा घेऊ लागले.  जैन व बौद्ध पंथातील लोक सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानू लागले.  जसे सोन्याचा कोणताही दागिना वितळवला की त्याचे निखळ सोनेच होते.  त्याप्रमाणे जीवाचे जीव-पण लोपले,  की,  तो भगवत स्वरूपच होतो.  त्यालाच अद्वैत म्हणतात.  आचार्यांची अशी शिकवण होती की,  आपले वेगळेपण विसरून भगवंतांशी एकरूप होणे म्हणजेच अद्वैत.  

आचार्यांची विजय पताका चारी दिशांना फडकू लागली. प्रभाकरा सारख्या  श्रीवल्ली येथील सुविख्यात मीमांसकानेही,  आचार्यांचे शिष्यत्व पत्करले.  त्यामुळे सर्वसामान्यच काय,  पण वेदांतीही आचार्यांकडे येऊन,  त्यांना आपले मोक्षगुरू मानून,  दीक्षा घेऊ लागले.  प्रयागच्या सर्व परिसरात आचार्यांचा जयघोष, आकाशात घुमू लागला.  घरोघरी आचार्यांच्या प्रतिमा स्थापन होऊन,  त्यांनी रचलेली विविध स्तोत्रे भक्ती भावाने गायली जाऊ लागली.  वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले.  अनेक बुद्धपंथीय,  वेद प्रमाण मानून,  आचार्य जे सांगतात ते प्रमाण मानू लागले.  

कौशांबी नावाच्या गावात आचार्यांनी मृत बालकाला जिवंत केले. देवीची स्तुती गायली,  त्यामुळे हे बालक जिवंत झाले. 

भट्टपाद नावाच्या, मंडन मिश्रांच्या गुरूंनी आचार्याने सांगितले की तू महिष्मती नगरीत जा. तिथे माझा मेव्हणा मंडन मिश्र आहे.  त्याला वादात हरवून घे.  म्हणजे तू सर्वत्र विजयी होशील व धर्म स्थापना होईल.  महिष्मती नगरीत मंडन मिश्रांचे खूप मोठे प्रस्थ होते.  त्यांच्या अनेक पाठशाळा होत्या. पोपटांचे असंख्य पिंजरे होते.  ते पोपट सदा तत्त्व चर्चा करायचे. आचार्य सर्व शिष्यांसहित मंडन मिश्रांचे घरासमोर आले. मंडन मिश्रांचे वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने  कोणालाही आत सोडायचे नाही अशी रक्षकांना आज्ञा होती. आचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना भिक्षाटनासाठी गावात पाठवून दिले. आचार्य स्वतः योग मार्गाने मंडन मिश्रांच्या घरात,  ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन बसले. मंडन मिश्रांना संन्याशांबद्दल राग असल्याने,  त्यांनी आचार्यांबरोबर खूप वाद घातला.  शेवटी आचार्यांनी त्यांना सांगितले, की तुमचे गुरु कुमारीलभट्टपाद यांचे सांगण्यावरून मी येथे आलो आहे.  ते आता या जगात नाहीत. ते ऐकून मंडन मिश्रांना फार वाईट वाटले. झाल्या गोष्टीबद्दल त्यांनी क्षमा मागितली. व चर्चा म्हणजेच वाद विवाद करण्याची तयारी दाखवली.  निर्णय, हा .. मंडन मिश्रांची पत्नी भारतीदेवी यांनी करावा असे ठरले.  भारती देवी अत्यंत विद्वान व वेदज्ञ होत्या.  धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषांच्या त्या अधिकारी होत्या.  पण वाद विवाद करण्यात प्रत्यक्ष आपला पती व दुसरीकडे मानसपुत्र शंकर आहे, त्यामुळे त्या स्तब्ध होत्या.  मंडन ने स्वतः अनुमती दिली व भारती देवींनी त्या पदाचा स्वीकार केला. वादविवाद ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भारती देवींनी दोन हार आणले.  दोघांच्या गळ्यात घातले.  ज्यांच्या गळ्यातील हार प्रथम सुकेल,  तो हरला असे समजावे असे ठरले.  एक, दोन, तीन, चार असे वीस दिवस सलग चर्चासत्र चालूच होते.  आचार्य बोलत होते.  मंडन मिश्रा हे ऐकता ऐकता अंतर्मुख झाले.  त्यांची जवळजवळ समाधीच लागली.  संपूर्ण शरीरभर, उष्णता निर्माण होऊ लागली.  शरीरातील पापांना तेथे राहणे असह्य होऊ लागले. श्वासाची उष्णता वाढून,   हळुहळू संपूर्ण माळ कोमेजू लागली.  मंडन एकदम शांत झाले. भारती देवी पुढे आल्या व म्हणाल्या की जरी माझ्या पतीची माळ कोमेजली असली,  तरी चर्चा मी पुढे चालवणार आहे. आचार्य जोपर्यंत माझ्या प्रश्नांना समर्थक उत्तर देणार नाहीत, तोपर्यंत माझे पती संन्यास घेणार नाहीत. भारती देवी म्हणाल्या की आचार्य,  या सर्व चर्चेत आपण फक्त तीनच पुरुषार्थ विचारात घेतले.  चौथा पुरुषार्थ काम राहिला आहे. मला याबाबत चर्चा करायची आहे.  आचार्य म्हणाले,  माते तू म्हणते तसेच घडेल.  मी नवव्या वर्षी संन्यास घेतला आहे.  त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन. 

– क्रमशः भाग दुसरा. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares