जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…
तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.
निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला.
कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं. पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!
काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते…..
… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही
ओढून घेणार तो टिपकागद…?”
“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “
न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!
नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !
लेखिका : सौ विदुला जोगळेकर
प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind!
भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.
“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं.
साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ”
साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला…
चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”
यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला !
“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं !
“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे.
युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.
… क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !
पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना !
अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय.
१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.
… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते.
नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत. त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले… Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की !
सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य !
…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार?
नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच.
२४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला….. आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —
— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं ! पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी !
नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…
जयहिंद! 🇮🇳
पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात.
हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !
🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)
☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहीत नाही. मी आमोर फाती असा करतोय.
याचा अर्थ आहे नशिबाचा स्वीकार.
आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली, तरीही ती तशी घडणे आवश्यक होते. अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्वीकारणे. ती गोष्ट आवडली नाही, तरीही ती स्वीकारणे. अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्वीकारणे.
थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल, असे वाटते?
“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?
की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे, तुझ्या आईला आधी बोलाव. तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”
स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली, हे बरं झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”
आमोर फाती म्हणजे काय, याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल – आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरूपात आनंदाने स्वीकारणे.
६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.
मी या आमोर फाती कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशीब स्वीकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे, की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारणे हे तुमच्या हातात असते.
कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,
कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,
कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणूक दिली असेल,
कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल, ज्यातून तुमची सुटका नाही.
तुम्ही हे सगळं हसत स्वीकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला आमोर फाती म्हणतात.
तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच, तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगलं वाटावं, हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्वीकारावं हा उद्देश आहे.
जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा, हा उद्देश आहे.
एखादी आपत्ती आली असताना शांत रहाणं, हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.
जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नवीन उर्जा देणारं ठरेल.
बस आता, झालं तेवढं खुप झालं, असं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल.
सगळं विपरीत घडत असताना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल.
हताशा आली असताना ते शांत रहाणं, तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल.
आमोर फाती हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे.
कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्पं होतं.
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सगळेच फुकट? का?”- लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.
देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हीच अवस्था आहे, हेच प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत, त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते. अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.
यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे अशी की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये. ९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरुण पिढीचा भविष्यकाळ खूप कठीण असणार आहे.
ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते….. आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते….. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.
आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः, बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.
सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार.
कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.
स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला. आपल्याला स्विट्झरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.
आपल्याला जर खरंच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर ‘ सगळेच फुकट ‘ ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेन. सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.
अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्यापेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना! ते जीवन जगलेच ना.
आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर देशात कुठेही नाही.
मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो…
… आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्याप्रमाणे ‘ रिकामे मन, सैतानाचे घर ‘ यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते.
*आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच विचार करा!”
लेखक : श्री अनिल शिंदे
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पर्वती चा वर्धापन दिन… श्री रमेश भागवत – संकलन श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆
१७ मे — पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या #पर्वती चा वर्धापन दिन.
वैशाख शुध्द पंचमी हा पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराचा स्थापना दिवस.
— मातुश्री काशीबाई बाजीराव पेशवा यांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आज्ञेप्रमाणे चिरंजीव श्रीमंत नानासाहेब पेशवा व त्यांच्या पत्नी श्रीमंत गोपीकाबाई पेशवा यांनी सन १७४९ मध्ये या दिवशी श्री देवदेवेश्वराची स्थापना केली. याला आज दिनांक १७ मे २०२३ रोजी २७४ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी आद्य शंकाराचार्य जयंती सुध्दा साजरी केली जाते. हिंदू धर्मातील विविध पंथाना एकत्र आणण्यासाठी श्री शंकराचार्यानी पंचायतन पूजा पध्दती निर्माण केली अशी मान्यता आहे. त्यांच्या चतुर कल्पकतेचे पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर शिवपंचायतन हे एक उदाहरण असून या पंचायतनामधे वायव्य कोप-यात मूळ देवी श्रीपर्वताईदेवी या तावरे घराण्याच्या कुलस्वामीनीचाही समावेश करण्यात आला आहे.
पुण्याचाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानचा मानबिंदू असलेले पर्वती हे एक ठिकाण आहे. पेशवाईतील किंबहुना मराठेशाहीतील सर्व चढ-उतार या देवस्थानाने अनुभवलेले आहेत. याची एक मुकी साक्ष पर्वतीवर चाफ्याच्या झाडाच्या रूपाने अजूनही उभी आहे, कारण त्या झाडालाही अंदाजे २५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्वतीचे आताचे दिसणारे स्वरूप हे विविध पेशव्यांनी त्यांच्या कारकीर्दीतच पूर्ण केलेले आहे.
पर्वती हे पुणेकरांना उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मदत करणारी व्यायाम शाळा आहे असे म्हणणे उचित ठरेल. असंख्य यु. पी. एस. सी., एम. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यासह जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी पर्वतीवर सकाळ संध्याकाळ अंगमेहनत करतांना दिसतात. तसेच गेली कित्येक वर्ष हनुमान व्यायाम मंडळ, पसायदान मंडळ, पर्वती मंडळ आपल्या परीने पर्वतीचे महत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न संस्थान- -बरोबर करत आहेत.
१९५० साली पर्वतीच्या आजूबाजूस काही भागावर वन खात्याने वनीकरण करून वृक्ष जोपासना केली आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात कै. डॉ. रमेश गोडबोले व श्री देवदेवेश्वर संस्थानने संस्थानच्या जागेत वृक्षारोपण केले आहे. हाच वारसा गेल्या पाच सहा वर्षापासून ‘ पर्वती हरितक्रांती संस्था ‘ यांच्या माध्यमातून पुढे उत्तम प्रकारे सुरू आहे. पर्वतीचे जुने स्वरूप कायम ठेऊन पर्वतीवर सध्या स्थानिक आमदार व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत.
पानिपताच्या पराभवाचा धक्का सहन न होऊन श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर देह ठेवला. त्यांचे व पानिपत रण संगामात बलिदान दिले अशा शूर वीरांचे स्मारक पर्वतीवर उभारले जाणार आहे. १४ जानेवारी २०१५ रोजी त्याची प्रतिकात्मक सुरुवात विद्यमान पेशवे कुटुंबियांच्या हस्ते जरीपटका लावून करण्यात आली आहे. या ठिकाणी इतिहास आधारभूत पानिपत युद्धात वीरमरण आलेल्या २६५ योद्ध्यांचा नामनिर्देश करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात येथे युध्द स्मारक करण्याचे काम प्रगतीपथावर असून या ठिकाणी संरक्षणासह इतर सेवा दलातील राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे.
तसेच इसवी सनाच्या सुरवातीपासून महाराष्ट्रावर राज्य केलेल्या विविध घराण्यांचा त्यांच्या कारकीर्दीच्या कालखंडासह त्यांनी केलेला पराक्रम म्युरलच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.
पर्वतीची महती ही पुणेकरांसह सर्वांनाच आहे हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीचे तत्कालीन अव्वल कारकून श्री चिंतामण भिकाजी डिके यांनी सन १९१४ साली लिहिलेली ‘पर्वती संस्थानाचे वर्णन’ ही पुस्तिका.
स्वातंत्र प्राप्तीनंतर १९५० मध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सार्वजनिक विश्वस्त निधि (Public Trust) म्हणून नोंदले गेले. मा. जिल्हाधिकारी, पुणे, हे संस्थानचे पदसिध्द विश्वस्त असून यांच्या समवेत इतर प्रतिष्ठित पंच मंडळी संस्थानचा कारभार पहातात.
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीवरील मंदिरे, वास्तुसह पुण्यातील इतर मंदिरे—
श्री देवदेवेश्वर मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री कार्तिकस्वामी मंदिर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा वाडा व निधनस्थान, पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा संग्रह असलेले पेशवा संग्रहालय. इतर मंदिरे– श्री सिध्दिविनायक मंदिर, सारसबाग, श्री दशभुजा गणपती मंदिर, पौड फाटा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, श्री रमणा गणपती मंदिर लक्ष्मीनगर, श्री काळी जोगेश्वरी मंदिर बुधवार पेठ, श्री राम मंदिर, ७३४ सदाशिव पेठ, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवा यांची समाधी सासवड.
या व्यतिरिक्त पुण्यातील ऐतिहासिक ३४ देवालयांना संस्थानकडून वर्षासन (अनुदान) दिले जाते. या निमित्ताने या संस्थानशी श्री देवदेवश्वर संस्थानचा ऋणानुबंध आहे.
लेखक : श्री रमेश भागवत
(संस्थानचे विद्यमान विश्वस्त)
संकलन : श्री संजीव वेलणकर
पुणे
प्रस्तुती : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.
सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता.
कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.
मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला
स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा…
माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी? काही विशेष कारण आहे का? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी?
माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘
फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘
मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं? कोमेजायचं कशाला? दुर्मुखलेलं का राहायचं? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.
फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘
मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.
तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘
फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.
सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.
☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग -2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो ! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक !) इथून पुढे —-
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।
— अर्थात, आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने दग्ध झालेल्या पीडित व अत्यंत व्यथित असल्यामुळे यक्षाच्या मणिबंधातील (मनगटातील) सुवर्णकंकण, तो देहाने क्षीण झाल्यामुळे शिथिल (ढिले) होऊन भूमीवर पडल्यामुळे, त्याचे मणिबंध सुने सुने दिसत होते! आषाढाच्या प्रथम दिनी त्याच्या दृष्टीस पडला तो एक कृष्णवर्णी मेघ! तो रामगिरी पर्वताच्या शिखराला कवेत घेऊन क्रीडा करीत होता, जणू एखादा हत्ती मातीच्या ढिगाऱ्याची माती उपटण्याचा खेळ करीत असतो.
कालिदास स्मारक, रामटेक
प्रिय मित्रांनो, हाच तो श्लोकातील जणू काही काव्यप्रतिभेचा तीन अक्षरी बीजमंत्र “आषाढस्य प्रथम दिवसे”! या मंत्राचे प्रणेते कालिदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रत्येक वर्षी आपण आषाढ महिन्याच्या प्रथम दिनी (आषाढ शुक्ल प्रतिपदा) कालिदास दिन साजरा करतो. ज्या रामगिरी (आत्ताचे रामटेक) पर्वतावर कालिदासांना हे काव्य स्फुरले, त्याच कालिदासांच्या स्मारकाला लोक भेट देतात, अखिल भारतात याच दिनी कालिदासमहोत्सव साजरा केल्या जातो! मंडळी, आपल्याला अभिमान वाटेल, असे महाराष्ट्रातील प्रथम कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे स्थापन झाले. यंदा कालिदास दिन आहे १९ जूनला.
मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे यक्षाला आषाढाच्या प्रथम दिनी पर्वतशिखरांना लिप्त करून आलिंगन देणारा मेघ, क्रीडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्तीप्रमाणे दिसला. १२१ श्लोक (पूर्वार्ध म्हणजे पूर्वमेघ ६६ श्लोक आणि उत्तरार्ध म्हणजे उत्तरमेघ ५५ श्लोक) असलेले हे सकल खंडकाव्य फक्त आणि फक्त एकच वृत्त, मंदाक्रांता वृत्तात (ह्या वृत्ताचे प्रणेते स्वतः कालिदासच!) गेय काव्यात छंदबद्ध करणे ही प्रतिभा (आणि प्रतिमा नव्हे तर प्रत्यक्षात) केवळ आणि केवळ कालिदासांचीच!
यक्ष आकाशातील मेघालाच आपला सखा समजून दूत बनवतो, त्याला रामगिरी ते अलकापुरीचा मार्ग सांगतो, आपल्या प्रियतमेचे विरहाने झालेले क्षतिग्रस्त शरीर इत्यादीचे वर्णन करून, मेघाला आपला संदेश त्याच्या प्रियतमेपर्यंत पोचवण्याची काकुळतेने विनंती करतो! मंडळी, यक्ष आहे जमिनीवर, पण पूर्वमेघात तो मेघाला प्रियतमेच्या अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो, यात ९ प्रदेश, ६६ नगर, ८ पर्वत आणि १० नद्यांचे भौगोलिक असूनही विहंगम अन रमणीय वर्णन आले आहे. विदर्भातील रामगिरी येथून या मेघदूताचा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास यात वर्णन केला आहे. शेवटी कैलासाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत मेघ पोचतो. या वर्णनात मेघाची प्रियतमा विद्युल्लता आपल्याला भेटते. उत्तर मेघ हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे. प्रियेने विरहव्याधीमुळे प्राणत्याग करू नये आणि धीर धरावा, असा संदेश तो यक्ष मेघाकरवी पाठवतो. तिला तो मेघाद्वारे संदेश देतोय “आता शाप समाप्त व्हायला अवघे चार मासच उरले आहेत, मी कार्तिक मासात येतोच आहे”. काव्याच्या अंतिम श्लोकात हा यक्ष मेघाला म्हणतो, “तुझा मात्र तुझ्या प्रिय विद्युलतेशी कधीही वियोग न घडो!” असे हे यक्षाचे विरहगान आहे.
मित्रांनो! स्टोरी काही विशेष नाही, आपण अरसिक पत्र लिहितो तेव्हा पोस्टल ऍड्रेस लिहितो, आत ख्यालीखुशालीच्या ४ ओळी! पण ऍड्रेस बिनचूक, विस्तृत अन आतला मजकूर रोमँटिक असल्यामुळे पोस्टखात्याला भावेल असा असेल तर मग पोस्टखाते पोस्टाचे तिकीट काढून त्या लेखकाला सन्मानित करेल की नाही! खालील पोस्टाचे सुंदर तिकीट हे कालिदासांच्या ऍड्रेस लिहिण्याच्या कौशल्याला केलेला दंडवतच समजा! या काळात कालिदास असते तर, तेच निर्विवादपणे या खात्याचे Brand Ambassador राहिले असते! कालिदासांनी आपल्या अद्वितीय दूतकाव्यात दूत म्हणून अत्यंत विचारपूर्वक आषाढातील निर्जीव पण बाष्पयुक्त धूसर वर्णाच्या मेघाची निवड केलीय, कारण हा जलयुक्त मेघसखा रामगिरी ते अलकापुरी हा दीर्घ प्रवास करू शकेल याची त्याला खात्री आहे! शरदऋतूत मेघ रिताच असतो, शिवाय आषाढ महिन्यात संदेश पाठवला तर तो त्याच्या प्रियेपर्यंत शीघ्र पोचेल असे यक्षाला वाटले असावे!
(“आषाढस्य प्रथम दिवसे”- प्रहर वोरा, आलाप देसाई “सूर वर्षा”)
मंडळी, आषाढ मासाचा प्रथम दिन आणि कृष्णवर्णी, श्यामलतनु, जलनिधीने परिपूर्ण असा मेघ होतो संदेशदूत! पत्ता सांगणे आणि संदेश पोचवणे, बस, इतकीच शॉर्ट अँड स्वीट स्टोरी, पण कालिदासांचा परीसस्पर्श लाभला व हा आषाढमेघ अमर दूत झाला! रामगिरी ते अलकानगरी, मध्ये हॉल्ट उज्जयिनी (वाट वाकडी करून, कारण उज्जयिनी ही कालिदासांची अतिप्रिय रम्य नगरी!) असा मेघाला कसा प्रवास करावा लागेल, वाटेत कुठले माईल स्टोन्स असतील, त्याची विरहव्याकूळ पत्नी (अन मेघाची भावजय बरं का, no confusion!) दुःखात विव्हळ होऊन कशी अश्रुपात करीत असेल हे तो यक्ष मेघाला उत्कट आणि भावमधूर काव्यात सांगतोय! यानंतर संस्कृत साहित्यात दूतकाव्यांची जणू फॅशनच आली (त्यातील महत्वाचे म्हणजे नल-दमयंतीचे आख्यान), पण मेघदूत हा “या सम हाच” राहिला! प्रेमभावनांचा इंद्रधनुषी आविष्कार असणारे, वाचकाला यक्षाच्या विरहव्यथेत व्याकुळ करणारेच नाही तर आपल्या काव्यप्रतिभेने मंत्रमुग्ध करणारे “मेघदूत!’ म्हणूनच आषाढ मासाच्या प्रथम दिनी या काव्याचे आणि त्याच्या निर्मात्याचे स्मरण करणे अपरिहार्यच!
प्रिय वाचकांनो, आता कालिदासांच्या महान सप्त रचनांचा अत्यल्प परिचय करून देते! या साहित्यात ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम् व मेघदूत या चार काव्यरचना आहेत, तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील तीन नाटक-वजा-महाकाव्ये आहेत!
आचार्य विश्वनाथ म्हणतात “वाक्यं रसात्मकं काव्यम्” अर्थात रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य!
कालिदासांच्या काव्यरचना आहेत निव्वळ चार! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत!
रघुवंशम् (महाकाव्य)
हे महाकाव्य कालिदासांची सर्वोत्कृष्ट काव्यरचना मानली जाते! यात १९ सर्ग असून सूर्यवंशी राजांच्या दैदिप्यमान वंशावलीचे यात तेजस्वी वर्णन आहे. या वंशातील अनेक राजांचे, मुख्यतः दिलीप, रघु, अज आणि दशरथ यांचे चरित्र या महाकाव्यात चित्रित केले गेले आहे! सूर्यवंशी राजा दिलीपपासून तर श्रीराम आणि त्यांचे वंशज असे हे या काव्यातील अनेक नायक आहेत.
कुमारसंभवम् (महाकाव्य)
हे आहे कालिदासांचे प्रसिद्ध महाकाव्य! यात शिवपार्वती विवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म आणि त्याच्या द्वारे तारकासुराचा वध या प्रमुख कथा आहेत.
मेघदूत (खंडकाव्य)
या दूतकाव्याविषयी मी आधीच लिहिले आहे.
ऋतुसंहार (खंडकाव्य)
ही कालिदासांची सर्वप्रथम रचना आहे, या गेयकाव्यात सहा सर्ग आहेत, ज्यांत षडऋतूंचे (ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत) वर्णन आहे.
कालिदासांच्या नाट्यरचना आहेत निव्वळ तीन! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत!)
अभिज्ञानशाकुन्तलम् (नाटक)
या नाटकाविषयी काय म्हटले आहे बघा,”काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला” (कवितेच्या विविध रूपांत जर कुठले नाटक असेल, तर नाटकातील सर्वात अनुपमेय रम्य नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्). महाकवी कालिदासांचे हे नाटक सर्वपरिचित आणि सुप्रसिद्ध आहे. महाभारताच्या आदिपर्वात वर्णित शकुंतलेच्या जीवनावर आधारित संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्!
विक्रमोर्यवशियम् (नाटक)
महान कवी कालिदासांचे हे एक रोमांचक, रहस्यमय आणि चित्तथरारक कथानक असलेले ५ अंकी नाटक! यात कालिदासांनी राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमसंबंधाचे काव्यात्मक वर्णन केले आहे.
मालविकाग्निमित्र (नाटक)
कवी कालिदासांचे हे नाटक शुंगवंशाचा राजा अग्निमित्र आणि एका सेवकाची कन्या मालविका यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ही कालिदासांची प्रथम नाट्यकृती होय!
तर मैत्रांनो, ‘कालिदास दिना’ निमित्त या महान कविराजाला माझा पुनश्च साष्टांग प्रणिपात !
कोणताही प्रवास म्हटला की निघायचे ठिकाण नक्की असते. कुठे पोहोचायचे तेही ठरलेले असते. कसे आणि कधी निघायचे तेही ठरवलेले असते . लहानपणापासूनच मला प्रवासाची फार आवड ! वडिलांच्या बदली निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या गावी गेलो. बदली झाली की आई वडिलांना टेन्शन असे. नवीन गावात जागा मिळवणे, मुलांच्या शाळा बघणे अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागे. आम्हाला मात्र या सगळ्याची गंमत वाटत असे. जसजसे मोठे होत गेलो, हायस्कूल शिक्षण संपले तशी प्रवासाचीही सवय झाली आणि त्यातील गंमत कमी होऊन जबाबदारीची जाणीव वाढू लागली !
अजूनही प्रवास म्हटला की माझी तयारी जोरात चालू असते. कुठलीही ट्रीप असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो, प्रवासाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. माझे मिस्टर तर मला कायमच चिडवतात, ‘ तुझा प्रत्येक प्रवास हा पहिलाच असल्यासारखे टेन्शन घेतेस !’ पण स्वभावाला औषध नसते
ना ! कुठेही गेले तरी प्रवासात आपली गैरसोय होऊ नये आणि दुसरीकडे गेल्यावर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत असते. पैसे, मौल्यवान वस्तू, कपडे सगळं जागच्या जागी असावं असं मला वाटतं !
आम्ही जेव्हा प्रथमच एका लांबच्या ट्रीपला गेलो त्यावेळी किती पैसे लागतील याचा अंदाज नव्हता. ह्यांच्या एका बॅंकर मित्राने आग्रह केला आणि पैशाचा प्राॅब्लेम आला तर आमच्या बॅंकेची ब्रॅच तिथे आहे, मी पैसे काढून देऊ शकतो असा दिलासा दिला. ट्रिपला निघणार होतो त्या दिवशी शनिवार होता.त्यामुळे बॅंकही बंद झाली होती. अचानकच ठरल्यामुळे आहे ते पैसे घेऊन ट्रीपला गेलो. त्यामुळे ऐन वेळी ठरलेल्या त्या ट्रीपला आम्ही उत्साहाने निघालो.
प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर हाॅटेल खर्च, प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी गाडीचे बुकिंग केले आणि मार्केटमध्ये गेलो. बंगलोरमध्ये जाऊन बंगलोर सिल्क घ्यायची नाही असं कसं होईल ! बरीच खरेदी केली..
२/४ दिवस हाॅटेलवर रहाणे, फिरणे, खाणे पिणे यांवर भरपूर पैसे खर्च केले. बॅंकवाल्या मित्राला ऐनवेळी पैसे मिळू शकले नाहीत आणि शेवटी परतीच्या तिकिटाचे पैसे जेमतेम उरले ! आणि असा तो प्रवास संपवून घरी आलो तेव्हा एक मोठा धडा शिकलो की प्रवासाला जाताना जरा जास्तच पैसे बरोबर लागतात !
असा हा पहिला पहिला मोठा प्रवास मला कायमचा स्मरणात राहिला !
आता वयाची साठी उलटली तरी यात फारसा बदल झाला आहे असं वाटत नाही. उलट विसरायला नको म्हणून आधीपासूनच तयारीला सुरुवात होते.
हा झाला व्यावहारिक जीवनातला नेहमीचा प्रवास ! पण अलीकडे मात्र मन वेगळ्याच दिशेला धावतं !
हा जीवन प्रवास केव्हा सुरू झाला? माणूस जन्माला येतो तोच आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करून !
या प्रवासाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही माहिती नाही. तरीही आपण त्या जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देतो. जीवनातील सुखदुःख भोगतो. जीवनाचा आनंद घेतो. वृद्धत्वाने खचून जातो, तर कधीतरी मृत्यू हा त्याचा शेवट आहे या जाणिवेने परिस्थितीला सामोरा जातो !
काही वेळा कोणाच्यातरी मृत्यूची बातमी येते .कोणी वृद्धत्वाने, तर कोणी आजाराने, तर कोणी आत्महत्येने, अकाली जीवन संपवते. असे काही ऐकले की मन नकळत मृत्यूचा विचार करू लागते.
कधी वाटते की हे मानवी आयुष्य किती छोटे, मर्यादित आहे. देवाने माणसाला विचारशक्ती, बुद्धी दिली आहे. त्या जोरावर तो निसर्गाला टक्कर देत असतो. खरंतर निसर्ग हा अनाकलनीय आहे, त्याच्याशी आपल्या बुद्धीची तुलना करणे अशक्य आहे. तरीही आधुनिक काळात माणसाने केलेली प्रगती पाहिली की अश्मयुगापासून आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीने खूपच थक्क व्हायला होते. हा तर अखंड जीवन स्त्रोत आहे आणि या स्त्रोताचे आपण एक बिंदू आहोत.
त्या प्रवासाची आपल्या बुद्धीला कल्पना सुद्धा करता येणार नाही ! असंख्य विचारांचा गुंता कधी कधी मनाला अस्वस्थ करतो. निसर्गाच्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचे एक बिंदू रूप म्हणून आपला हा जीवन प्रवास सुरू होतो. तो अधिकाधिक चांगला श्रेयस्कर करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.
आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा जगताना आपण जे चांगले करता येईल ते करावे. जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा, तरच शेवटचा दिस गोड जावा असे म्हणत त्या जीवन प्रवासाचा निरोप आपल्याला घेता येईल….. शेवटी काय, सारे प्रवासी घडीचे !
☆ तार… लेखक : श्री जयंत कोपर्डेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
अगदी लहानपणापासून हा दोन अक्षरी शब्द जिवाभावाचा वाटत आलाय. नकळत्या वयापासून तो ऐकत आहे. पुढे हळूहळू त्याचा अर्थ कळू लागला. पोस्टमन तार घेऊन यायचा. दारातूनच ” तार आली ” असे ओरडायचा. आणि मग घरातले सगळेच दरवाज्याकडे धावायचे. सगळ्यांच्याच डोळ्यापुढे अनेक प्रश्नचिन्हे उभे राहायची. हृदय जास्तच जोरात धडधडायचे. अनेक उलटसुलट विचार प्रत्येकाच्या डोक्यात पिंगा घालू लागायचे. प्रत्येक जण आपापल्या परीने तारेत काय मजकूर असेल याचा अंदाज बांधू लागे. प्रत्येकाच्या चेहर्यावर काळजी दिसू लागे. चांगला विचार क्वचितच कोणाला तरी यायचा. पण बाकी सारे गंभीर व्हायचे.
मग घरातले मोठे कोणीतरी हळूच पुढे व्हायचे. प्रश्नार्थक मुद्रेने पोस्टमन कडून तार हातात घ्यायचे.
त्याच्या कागदावर सही करायचे आणि मग धडधडत्या अंतकरणाने ती तार उघडून वाचायचे. अंतर्देशीय पत्रा प्रमाणे ती तार असे. त्यावर इंग्रजीत टाईप केलेल्या पट्ट्या चिटकवलेले असायच्या. पोस्टमन मात्र तिथेच घुटमळायचा. मग त्याला बक्षीस दिले की तो जायचा. या वेळेपर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. मग तो मोठा जाणता माणूस ती तार वाचायचा. आणि त्याचा अर्थ मराठीत सर्वांना सांगायचा. आणि मग घरातले वातावरण एकदम बदलून जायचे.
पूर्वी दोन मुख्य कारणासाठी तार पाठवली जायची एक म्हणजे कोणीतरी परीक्षा पास झाले अथवा कुणाचेतरी लग्न ठरलेले असायचे. आणि दुसरे कारण म्हणजे कुणाच्यातरी मृत्यूची बातमी असायची. आणि मग त्यानुसार घरातले वातावरण बदलायचे.
त्याकाळी फोन फक्त पोस्टातच असायचा. पण संदेश पाठवण्यासाठी तारेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. प्रत्येक पोस्टात पितळेचे एक छोटे यंत्र बसवलेले असायचे. त्यावर काळा प्लास्टिकच्या गोल गोळा असायचा. तार येताना किंवा पाठवताना त्यावर ऑपरेटर ठराविक पद्धतीने बोटाने दाबून संदेश पाठवला जायचा. कट्ट…….कडकट्ट…….कट्ट…….कडकट्ट . असा काहीसा त्याचा आवाज यायचा. ते बघणे तो आवाज ऐकणे फारच छान वाटायचे.
तार पाठवायची असल्यास पोस्टाचा एक फॉर्म भरून द्यावा लागे. पाठवणाऱ्याचे नाव पत्ता, ज्याला पाठवायचे त्याचे नाव पत्ता व मजकूर लिहावा लागे. किती शब्द झाले त्यावर पोस्टमास्तर फी आकारायचे. व एक छोटी पावती द्यायचे. तार केव्हा पोहोचेल हे मात्र सर्व जण आवर्जून विचारायचे.
काही ठराविक मेसेज पोस्टात रेडी असायचे. उदाहरणार्थ, १) दिवाळी शुभेच्छा. २) लग्नाच्या शुभेच्छा. ३) नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ४) मुलगा झाला. वगैरे. मग मजकूर लिहिण्या ऐवजी फक्त तो नंबर लिहावा लागायचा. त्यामुळे पैसे पण कमी लागायचे.
खरे तर युद्धात संदेश पाठवण्यासाठी तारेचे उपयोग करीत होते. नंतर मात्र तार सर्वांचीच लाडकी झाली. आता संदेश पाठवण्याची अनेक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे तार मागे पडली. आणि आता तर ती इतिहासजमा झाली आहे.
पण हसू आणि आसू घेऊन येणारी ती तार त्याकाळी सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय होती.
लेखक : श्री जयंत कोपर्डेकर
पुणे.
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈