मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– नक्षत्रे अवतरली पोस्टात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – नक्षत्रे अवतरली पोस्टात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

 (पोस्टाची संगीतसेवा…)

९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे…

३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!

भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते. 

स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्‍यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.

यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!

अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..

पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.

‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!

पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…

उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.

आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!

मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.

आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्‍याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!

आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?

आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (aathawi माळ) – ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – जन्मदात्री सैन्याधिकारी….लेफ़्टनंट श्वेता शर्मा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मुजफ्फरपुर एक्सप्रेस आपल्या सुसाट वेगात धावते आहे. दुसरे स्टेशन येण्यास आणखी बराच वेळ लागणार होता….आणि एकीच्या पोटातलं बाळ आत्ताच जन्म घ्यायचा यावर हटून बसलं. रेल्वेच्या त्या डब्यात बहुसंख्य पुरूषांचाच भरणा आणि ज्या महिला होत्या त्या भांबावून गेलेल्या. त्या फक्त धीर देऊ शकत होत्या. प्रसुतिकळांनी जीव नकोसा वाटू लागलेली ती आकांत मांडून बसलेली. अवघड या शब्दाची प्रचिती यावी अशी स्थिती….!

त्याच रेल्वे गाडीत प्रवासात असलेल्या लेफ़्ट्नंट श्वेता शर्मा यांचेपर्यंत हा आवाज पोहोचला ! आणि अशा प्रसंगी काय करायचं हे श्वेता यांना अनुभवाने आणि प्रशिक्षणामुळे माहीत होतं.

श्वेताजींचे आजोबा बलदेवदास शर्मा आणि पणजोबा मुसद्दी राम हे दोघेही भारतीय लष्करात सेवा बजावून गेलेले. वडील विनोदकुमार शर्मा आय.टी.बी.पी अर्थात इंडो तिबेट बॉर्डर पोलिस मध्ये डेप्युटी कमांडत पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मागील तिन्ही पिढ्या देशसेवेत.  श्वेता यांनी काहीही करून याच क्षेत्रात जायचं ठरवलं. भारतीय सेना एक महासागर आहे. इथं ज्याला खरंच इच्छा आहे, तो हरतऱ्हेने देशसेवा करू शकतो. आणि प्रत्येक सेवेकऱ्यास गणवेश आणि सन्मान आहे.

वैद्यकीय सेवा हा या सेनेमधला एक मोठा आणि महत्त्वाचा विभाग आहे. डॉक्टर म्हणून तर सेनेत खूप महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. आपल्या मराठी माणसांचा अभिमान असणाऱ्या डॉ.माधुरी कानिटकर मॅडम तर लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचल्या होत्या. पण ज्यांना डॉक्टर होणं काही कारणांमुळे शक्य होत नाही, अशा महिला नर्सिंग असिस्टंट म्हणूनही कमिशन्ड होऊ शकतात. पुरूषांनाही ही संधी असतेच. आणि नर्सिंग असिस्टंट अर्थात वैद्यकीय परिचारिका साहाय्यकांनाही सन्मानाची पदे मिळतात.

घराण्याचा लष्करी सेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी श्वेता शर्मा यांनी मग परिचर्येचा मार्ग निवडला. मागील वर्षी मार्च २०२२ मध्ये त्यांना ‘सोल्जर नर्सिंग असिस्टंट’ म्हणून नेमणूक मिळाली आणि त्यांनी लष्करी गणवेश परिधान केला. बारावी शास्त्र शाखा आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या विषयातील उत्तम गुण, उत्तम शारीरिक पात्रता, या गोष्टी तर गरजेच्या आहेतच. परंतु भारतभरातून या पदासाठी मोठी स्पर्धा असते. यातून पार पडावे लागते. मेहनत तर अनिवार्य. श्वेता यांनी २०१७ मध्येच यासाठीची आवश्यक पात्रता प्राप्त केलेली होती. त्या सध्या हमीरपूर हवाईदल केंद्रात कार्यरत आहेत.असो.

लेफ्टनंट श्वेता यांनी त्यावेळी रेल्वेत घडत असलेल्या त्या परिस्थितीचे गांभीर्य ताबडतोब ओळखले. डब्यातील गर्दी हटवली. ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांना सूचना दिल्या. महिलांना मदतीला घेतले. आणि हाती काहीही वैद्यकीय साधनं नसताना केवळ अनुभव, वैद्यकीय कौशल्य आणि कर्तव्य पूर्तीची अदम्य इच्छा, या बळावर धावत्या रेल्वेगाडीत एका महिलेची सुखरूप सुटका केली…एका महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवला ! एका सैनिक अधिका-याच्या हस्ते या जगात पदार्पण करणारे ते बालक सुदैवीच म्हटले पाहिजे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत !

एका सैनिक मुलीस अशा प्रकारे हा पराक्रम करण्याची संधी मिळाली आणि तिने ती यशस्वीही केली. होय, त्या परिस्थितीत हे कार्य करणे याला पराक्रमच म्हटले पाहिजे. नवरात्राच्या या दिवसांत माता दुर्गाच सुईण बनून धावून आली असे म्हटले तर वावगे ठरेल काय?

नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट श्वेता शर्मा…आम्हांला आपला अत्यंत अभिमान वाटतो. परिस्थिती गंभीर तर सेना खंबीर याची तुम्ही प्रचिती आणून दिलीत. नारीशक्तीला सलाम. …. आपल्यामुळे देशातील असंख्य तरुणी प्रोत्साहित होतील आणि देशसेवेच्या याही मार्गाचा अवलंब करतील अशी आशा आहे.

(नवरात्रीत नऊ कथा कशा लिहायच्या ही चिंता नाही. अशा अनेक दुर्गा आहेत आसपास…त्यांच्याबद्द्ल लिहायला अशा शेकडो नवरात्री अपु-या पडतील. सकारात्मक गोष्टी सर्वांना समजायला हव्यात म्हणून हा अट्टाहास.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 191 ⇒ व्यंग्य के सरपंच… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका ललित आलेख – “व्यंग्य के सरपंच”।)

?अभी अभी # 191 ⇒ व्यंग्य के सरपंच… ? श्री प्रदीप शर्मा  ?

जो अंतर हास्य और व्यंग्य में है, वही अंतर एक पंच और सरपंच में है। पंच और हास्य में एक समानता है, दोनों ही ढाई आखर के हैं। वैसे भी पढ़ा लिखा पंच नहीं मारता, बहुत बड़ा हाथ मारता है। सरपंच और व्यंग्य की तो बात ही अलग है। प्रेमचंद की भाषा में तो पंच ही परमेश्वर है, जब कि व्यंग्य की दुनिया में तो सभी सरपंच ही विराजमान है।

अगर इस अभी अभी का शीर्षक पंच और सरपंच होता, तो कुछ लोग इसे राग दरबारी की तरह पंचायती राज से जोड़ देते। जिन्होंने राग दरबारी नहीं पढ़ी, वे उसे आसानी से संगीत से जोड़ सकते हैं।।

वैसे हास्य का संगीत से वही संबंध है जो व्यंग्य का पंच से है। हाथरस हास्य का तीर्थ ही नहीं, वहां प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी का संगीत कार्यालय भी है। छोटे मोटे पंच मारकर कुछ लोग हास्य सम्राट बन बैठते हैं, जब कि व्यंग्य की पंचायत में कई सरपंच रात दिन नि:स्वार्थ भाव से सेवारत हैं।

अकबर के नवरत्नों में पंच प्रमुख बीरबल का वही स्थान था, जो नवरस में हास्य रस का होता है। हमारे आज के जीवन में भी अगर हास्य पंच है तो व्यंग्य सरपंच। जैसे बिना पंच के पंचायती राज नहीं, वैसे ही बिना पंच के हास्य नहीं। बिना सरपंच के कहां पंचायत बैठती है और, बिना व्यंग्य के सरपंच के, कहां व्यंग्य की दाल गलती है।।

जिसके व्यंग्य में अधिक पंच होते हैं, वे व्यंग्य के सरपंच कहलाते हैं। इन सरपंचों के अपने संगठन होते हैं, जिनकी समय समय पर गोष्ठियां और सम्मेलन भी होते हैं। सरपंचों को पुरस्कृत और सम्मानित भी किया जाता है। इनमें युवा वृद्ध, महिला पुरुष सभी होते हैं।

पंच बच्चों का खेल नहीं !

वैसे तो व्यंग्य के पंच अहिंसक होते हैं, लेकिन मार भारी करते हैं। कभी कभी जब पंच व्यंग्य पर ही भारी पड़ जाता है, तो सरपंच के लिए सरदर्द बन जाता है। माफीनामे से भी काम नहीं चलता और नौकरी जाने का अंदेशा तक बना रहता है।।

आए दिन बिनाका गीत माला की तरह व्यंग्य के सरपंचों की सूची जारी हुआ करती है। निष्पक्ष होते हुए भी इसके दो पक्ष होते हैं, शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष। हम आचार्य रामचंद्र शुक्ल की नहीं, श्रीलाल शुक्ल की बात कर रहे हैं। कुछ त्यागी सरपंच ऐसे भी हैं, जो सभी प्रपंचों से दूर हैं।

व्यंग्य के सरपंचों में ज्ञान और विवेक की भी कमी नहीं। हलाहल पीने वाले हरिशंकर और जोशीले शरद निर्विवाद रूप से व्यंग्य के सरपंचों में सर्वोपरि हैं।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिषासूरमर्दिनी.. ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?विविधा ?

☆ महिषासूरमर्दिनी.. ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

झेंडूच्या फुलांच्या पायघड्यांवरून अलगदशी शारदीय नवरात्रीची मंगलमय सुरुवात झाली.तसा सगळीकडेच उत्साह नुसता ओसंडून राहिला आहे.नवरात्र म्हणजे नऊ दिवस, नऊ रात्रीचा आदिशक्ती आदिमातेच्या उपासनेचा दरवर्षी येणारा उत्सव..!

अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते म्हणजे देवीच्या नवरात्रीची सुरुवात होते.या आदिशक्तिला आपली संस्कृती स्त्रीरुपात पहाते. आपण तिची श्रध्देने पूजा-अर्चा करतो.तिला आई,माता,माय-माऊली संबोधतो.

आपल्या परिवारालाच नाही तर अवघ्या जगताला प्रसन्न करणारी ती जगदंबा जगतजननी आहे.आपल्या पुराणातील कथांमध्ये देवी आणि असुरीशक्ति यांचे द्वंव्द वर्णन केले आहे.त्यातील एक कथा प्रसिद्ध आहे महिषासूर या असुरांच्या राजाने उन्मत्तपणे पृथ्वीवर तर धमाकूळ घातला होताच पण देवतांनाही जिंकून 

घेतले व  स्वर्गावर राज्य करण्याची तयारी केली.तेव्हा ब्रम्हां,विष्णु,शंकर यांनी आपल्या तेजातून एक आदिशक्ती निर्माण केली.तिने नऊ दिवस नऊ रात्र महिषासूराशी युध्द करुन त्याचा वध केला.म्हणजे आसुरीशक्ती नष्ट केली.

प्रत्येक माणसामध्ये चांगली-वाईट प्रवृत्ती असतेच.त्यातील वाईट प्रवृत्ती म्हणजे आपल्या मनांवर ,बुध्दीवर असलेले महिषासूराचे वर्चस्व, साम्राज्य.. ते नष्ट व्हावे,आपणास सदैव सद्बुध्दी लाभावी यासाठी कलश-घट यांची पूजा म्हणजे आपल्याच देहातील आत्म्याची पूजा करुन, अखंड ‘दीप’ लावून आत्मतेज मिळवावे.,ही कल्पनाच किती सुंदर वाटते.

यासाठी श्रध्दा,भक्ती आणि आंतरिक अशी परमेश्वराची ओढ असावी लागते.केवळ कर्मकांड असून चालत नाही.नवरात्रात जागरण म्हणजे देवीचा जागर,पूजापाठ,आरती,ही महत्वाची असली तरी देवीची उपासना करणे हा मुख्य उद्देश आहे.मग देवी कोणत्याही रुपात असो.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती या तीन महाशक्ती यांची उपासना करुन आपण आपल्या षड्रिपूंवर विजय मिळावा, अवगुणांचा -हास व्हावा,संकटांना,वाईट प्रवृत्तींना सामोर जाण्याची क्षमता प्राप्त व्हावी यासाठी या आदिशक्तिला शरण जातो.तिला जोगवा मागतो.’ गोंधळाला ये ‘..अशी आपुलकीची साद घालतो.

सगळीकडे भ्रष्टाचार, अत्त्याचार, हिंसाचार, व्देष,नैसर्गिक आपत्ती,रोगराई पसरली असेल अशावेळी आत्मतेज वाढवून, दुर्जनांचा नाश करुन,प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला तारुन नेणाऱ्या आदिमातेला -शक्तीला

मनांपासून प्रार्थना करुयात..

‘हे महिषासूरमर्दिनी…’

आई तुझ्या पदाचा..

देई सर्व काल संग..।

दावी तुझ्या कृपेचे..

तेजोमयी तरंग..।।

या मनांपासून दिलेल्या सादाला ती

जगत् जननी नक्कीच धांवून येईल.

तिच्या चरणाशी दुजाभाव नसतोच.

सगळी तिचीच लेकरे!मग वाईट गोष्टींतून केवळ वर्तमान काळच नव्हे तर आपला भविष्यकाळही कायमचा मुक्त होईल…अन् खऱ्या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा,विजयपताका फडकविण्याचा ‘दसरा ‘ उजाडेल.!

‘सोनियाचा दिवस’ म्हणून सोने लुटतांना आगळाच आनंद लुटता येईल…!

© सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे .३८

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कंडक्टर…” भाग-२ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “कंडक्टर…” भाग-२ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.) इथून पुढे — 

नेहमीप्रमाणे वाशीच्या बस स्थानकात वेलचीचं बाजकं घेऊन उभा होतो. आज पुण्यात लवकर पोचायचं म्हणून मिळेल त्या पहिल्या बसनं जायचं ठरवलं होतं. नेमकी कर्नाटकची बस आली,  बस कोथरूड वरून जाते याची खात्री करून घेतली आणि बसमध्ये बसलो. वेलचीचं बाजकं सिटखाली ठेवलं. कंडक्टर आला, तिकीट देताना त्याला वेलचीचा वास जाणवला असणार, त्यानं मला एकदा निरखून पाहिलं आणि मला म्हणाला काही वर्षापूर्वी तुम्ही एका बाईला तिकीट काढायला पैसे दिले होते का? माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हिच ती बस आणि हाच तो कंडक्टर. मी हो म्हणालो.

तो काही न बोलता पुढे निघून गेला. सर्व प्रवाशांची तिकीटं झाली आणि नंतर तो माझ्या बाजूला येऊन बसला. आणि म्हणाला, “अहो साहेब मी तुम्हाला किती शोधत होतो. तुम्ही बुधवारी इथूनच पुण्याला जातो असं  म्हणाला होता म्हणून कितीतरी वेळा बस वाशी स्टॅंडवर थांबवत होतो. खाली उतरून तुम्ही कुठे दिसताय का बघत होतो, आणि आज दोन वर्षांनी भेटलात.”

 नंतर त्यानं जे सांगितले ते ऐकून अक्षरशः थक्क झालो. 

त्यानं सांगितलेली ती घटना अशी होती….

त्यादिवशी ज्या बाईला मदत केली होती तिला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून दिलं आणि थोडेफार पैसे पण खर्चासाठी दिले. आणि त्याचं दिवशी दुपारी ती बाई आपल्या वडिलांना घेऊन स्टॅंडवर आली आणि या कंडक्टरला शोधून काढलं. हातात ४००/- रू. असलेलं पाकीट आणि शेतातील भुईमूगाच्या शेंगांची पिशवी त्याच्या हातात दिली आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या “अण्णाला ” म्हणजे मला द्या असं विनवू लागली. कंडक्टर म्हणाला, “ अहो, असा पॅसेंजर काय रोज रोज भेटत 

नसतोय “ . पण त्यांनी आग्रह करून दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या आणि “ माझा नवरा पण आज येणार आहे आणि आम्ही परत भांडणार नाही. एक दोन दिवसांनी मी पण परत मुंबईला जाणार आहे नव-याबरोबर, हे पण त्या अण्णाला सांगा “  असं बोलून आणि नमस्कार करून तिच्या गावाकडे परत गेली. 

आता त्या कंडक्टर पुढे धर्मसंकट उभं राहिलं. कसं शोधायचं मला ? मग वर सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी तो माझा शोध घेत राहिला. महिनाभरानंतर त्या शेंगा त्याने इतर प्रवाशांमधे वाटून टाकल्या. 

एवढं बोलून तो उठून उभा राहिला आणि त्याच्या सिटकडे गेला, वर ठेवलेली त्याची बॅग काढून उघडली आणि काहीतरी घेऊन पुन्हा माझ्याजवळ आला आणि एक मळकट खाकी पाकीट माझ्याकडे दिलं.

‘हे काय आहे ‘ असं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो तेव्हा तो जे म्हणाला ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला, ” साहेब, ही तुमची अमानत आहे, गेली दोन वर्षे मी सांभाळून ठेवली होती, आता तुमची तुम्ही घ्या आणि मला मोकळं करा.” ते ऐकून मला काय बोलायचं हेच सुचेना. मी ते पाकीट फोडून बघितलं तर काय….. आत मध्ये १०० च्या चार नोटा….. बरेच दिवस पाकीटात बंद असल्याने चिकटून गेल्या होत्या. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आवंढा गिळून एवढंच म्हणालो  की ‘ नाही नाही हे पैसे मी घेऊच शकत नाही.’ त्यावर कंडक्टर एवढंच म्हणाला की “ अहो त्या बाईला मी कबूल केलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन, आता तुम्हीच सांगा या पैशांचं करायचं काय ….”  नंतर लगेच तो म्हणाला की 

“एखाद्या संस्थेला मदत करू किंवा एखाद्या देवळात देवापुढे ठेवून देवू .’  मग मीच तोडगा काढला. त्याला सांगितलं की पुढे मागे एखाद्या पॅसेंजरला अशी अडचण आली तर तू हे पैसे वापरून टाक. बोलेबोलेपर्यंत माझा थांबा आला म्हणून मी उतरण्याआधी त्या कंडक्टरला घट्ट मिठी मारली. आणि आभाळभरल्या डोळ्यांनी खाली उतरलो. त्या सुहृद कंडक्टरचं नाव चिदानंद हेगडे.  गुलबर्गा डेपो . त्यांचा फोटो त्यांनी काढू दिला नाही किंवा मोबाइल नंबर पण दिला नाही.

या गोष्टीला आता ८/९ वर्षं झाली. पण अजून माझा गोंधळ होतो की , सचोटी आणि प्रामाणिकपणा जर उणे अधिक करायचा असेल तर तो कुणाचा करायचा….. कबूल केल्याप्रमाणे तिकीटाचे पैसे न विसरता परत करणा-या त्या माऊलीचा, की ते पैसे मिळाल्यावर अफरातफर न करता २ वर्षं व्यवस्थित सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन करणा-या चिदानंद हेगडे यांचा…

तुम्हीच सांगा…

– समाप्त – 

लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे. 

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल्या कर्मांची फळे… संकलन : ह. भ. प. किसन महाराज जगताप ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल्या कर्मांची फळे… संकलन : ह. भ. प. किसन महाराज जगताप ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…!!

एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते. एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे… “ तुमचं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील,आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल ” तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतचं काय तरी म्हणतोय. तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे. तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली.  त्याक्षणी तिला वाटले… ‘ हे मी काय करतेय? ‘ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली. नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, ” तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल “.आणि तो चपाती घेऊन गेला.

तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.एक दिवस तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं. कपडे फाटलेले  होते. त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला, ” आई मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता. पण तेथे  बाबा आले. मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा  म्हणाला ” रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे “ … हे  ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. 

आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.’ तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं ‘.

चांगल्या कर्माचा परतावा… नेहमी चांगलाच मिळतो कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका.! आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास, ते काम सोडूच नका.!! जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.!! चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात.

!! राम कृष्ण हरी!!

संकलन – ह भ प किसन महाराज जगताप वलांडीकर

मो ९४२१३४७१२१

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी बाई ! माझं नावच बाई. बाईचं नाव बाईच ठेवायचं आईबापाला का बरं सुचलं असावं हे काही सांगता यायचं नाही मला. लग्न झालं तेव्हा तशी लहानच होते मी म्हणायचं. कारण काहीही समजत नव्हतं संसारातलं. पण ‘ संसार काय आपोआप होतच राहतो… परमार्थ करावा लागतो‘.. असं आई म्हणायची. 

तसे मला दोन आईबाप. एक जन्म दिलेले आणि दुसरे पंढरीतले. सासरची शेती रग्गड आणि ती कसायला माणसं कमी पडायची. घामाच्या धारांनी शिवारं पिकायची..  पण माझं पोटपाणी पिकलंच नाही…पदरी एक तरी लेकरू घालायला पाहिजे होतं विठुरायानं. पण त्याच्या मनातलं जिथं रखुमाईला ओळखता येत नाही तिथं माझं म्हणजे ..  पायीची वहाण पायी बरी अशातली गत. तक्रार नव्हती आणि मालकांनी सवत आणली तिचा दु:स्वासही नाही. देवाच्या दोन्ही भार्यांची एकमेकींत धुसफूस होत असेलही, मात्र आम्ही एका जीवाने राहिलो. पण दैवाने मालकांना भररस्त्यातून माघारी बोलावलं आणि आमच्या दोघींच्याही कपाळांवरचे सूर्य मावळून गेले. जमलं तसं रेटलं आयुष्य. राहता वाडा ऐसपैस होता आणि माझ्यासाठी वाडयातल्या आतल्या खोल्या पक्क्या करायचं हाती घेतलं होतं. पण ते राहून गेलं आणि आता तर मला त्यात काही राम वाटत नाही. विठ्ठलच नाही राऊळात तर ते राऊळ सजवायचं तरी कशाला?

सवयीने शेतात जात राहिले, धान्य घरात येऊन पडत राहिलं. पण या सर्वांत लक्ष कुठं लागतंय. ‘ देव भक्तालागी करू न दे संसार ‘असं तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहेच. त्यांना तरी कुठं नीट रमू दिलं होतं त्यानं. इथं तर माझा तुकोबा वैकुंठाला निघून गेला होता आणि कुणासाठी कमवायचं, कुणासाठी स्थावर जंगम माघारी ठेवून जायचं हा प्रश्न होताच. भाकरीच्या दुरडीतली जास्तीची भाकरी देतोच की आपण, मग ही जास्तीची कमाई आपला जीव आहे तोवर ज्याची त्याला दिलेली काय वाईट? पण द्यायची तरी कुणाला आणि का म्हणून? लोक देवाकडं धाव घेतात. देवाशिवाय माणसांनी दुसरीकडं कुठं जाऊच नये, असं मला सारखं वाटत राहतं. देवाला द्यायचं म्हणते खरं मी, पण देवाला कुठं कशाची कमी असते. देवस्थानं म्हणजे दवाखानेच की जणू. शरीराला बरं करणारे दवाखाने पुष्कळ असतील आणि असायला पाहिजेत. पण मनालाही बरं करायलाच पाहिजे की. म्हणून मी ठरवलं .. जमतील त्या देवस्थानांना काही न काही द्यायचं.  आधी धान्य पाठवून देत होते. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी लाखो लोक येतात कुठून कुठून. प्रसादाच्या स्वयंपाकाला आणखीन चांगली भांडी पाहिजेतच की…दिली मला जमली तेव्हढी. द्यायला लागले तसं देण्याची सवय वाढायला लागली. मंदीरांचे कळस झाले, रंगरंगोटी झाली, बांधकामं झाली, ती मी दिलेल्या खारीच्या वाटयातून झालेली या डोळ्यांनी पाहिली. 

वय झालंय आता…देहाचा भरवसा नाही. कधी जाईल काही नेम नाही. सवतीच्या वाटचं तिचं तिला मिळालेलं आहेच की. तिचं गणगोत आहे, त्यांची ती कष्ट करून खाताहेत…..त्यांचा त्यांना संसार आहेच.  माझ्या माघारी माझं उरेल त्यावरून कुणी तंडायला नको. म्हणून गंगेतून भरून घेतलेली ओंजळ, तहान भागल्यावर उरलेलं तीर्थ इकडं तिकडं शिंपडून न टाकता परत गंगामायला अर्पण केलेलं काय वाईट? आता माझा पैसा…माझ्या मालकानं माझ्यासाठी मागे ठेवलेला मला देवाला द्यावासा वाटतो त्यात कुणाचं काय जातं? 

एकटीच्या पोटाला लागतीय तेवढी जमीन हातात ठेवली आणि बाकीची देऊन टाकली. पैशांतलं काही कळत नाही. पण नातू आहेत चांगले..कागदाची कामं करून देतात. नाहीतर एवढे लाखा-लाखाचे व्यवहार मला अंगठा बहादरणीला कसं जमलं असतं,तुम्हीच सांगा ! 

मी म्हणलं…मला माझ्या बापाला सोन्याचा करदोडा घालायचाय….आईला मंगळसूत्र घालायचंय. बाप म्हणजे विठोबा आणि आई म्हणजे रखुमाई माझी. होऊन गेलं हातून…हिशेब अठरा लाखावर गेलाय म्हणतात. कुणी म्हणतंय आजवर पन्नास लाख गेले असतील म्हातारीच्या हातून. जाईनात का ! 

हे फेसबुक का काय म्हणतात,त्यामुळे मी माहिती झाले सर्वांना. तशी खरं तर गरज नव्हती. देवानं मला एवढं भरभरून दिलं तेव्हा कुठं सर्वांना तो सांगत सुटला? लोकांना माहित नव्हतं तेच बरं होतं. कुणी म्हणतं या पैशांतून दुसरं बरंच काहीबाही करता आलं असतं. लाख तोंडं आणि त्यांची मतं. पण मी म्हणते माझ्या बुद्धीनुसार मला वाटलं ते मी केलं .. आणि आणिक करणार आहेच शेवटपर्यंत. मला काळ्या दगडातला विठोबा सगुण साकार वाटतो, त्याच काळ्या दगडातली गोरी रखुमाई आवडते…त्यांना सजवायला नको? मी काही कुठं बाहेर देवाला जात नाही…पण दुस-या मुलखातल्या देवांची श्रीमंती ऐकून आहे की मी. होऊ द्या की आपलेही देव ऐश्वर्यवान…अहो, पंढरीश…पंढरीचा राजाच आहे नव्हे का? राजासारखाच दिसला पाहिजे माझा बाप. 

आता देवस्थानांनी भक्तांसाठी काय काय करायचं हे सांगायला जाणती माणसं आहेतच की जागोजाग.  त्यांनी सांगावं आणि देवस्थानांनी ऐकावं म्हणजे झालं. माझ्यासारख्या अडाणी बाईचा हा अडाणी विचार. .. मी माझं माझ्या देवाला देते आहे…तो तुम्हांलाही देईलच.

देवाच्या दयेने माझे हात देणारे आहेत…आणि माझ्या देवाच्या हातात झोळी नाही…मी त्याच्या चरणाशी वाहते ते त्यानेच माझ्या हवाली केलेलं….देणा-याने देत रहावे ! 

(बाई लिंबा वाघे….मराठवाड्यातल्या एका खेड्यातली शेतकरी वृद्धा…मनाने, विचाराने, वर्तनाने देवभक्त.  त्यांनी त्यांच्या पदरात असलेलं दान पुन्हा देवाच्या पायाशी ठेवलं. आपण त्यांना नमस्काराशिवाय काय देऊ शकतो. जुन्या पिढीच्या रक्तात अजूनही विठूचा अंश आहे…तो असाच कायम रहावा, देवस्थानांनी आणखी लोकाभिमुख व्हावं, अशी प्रार्थना त्या देवस्थानांच्या आराध्य देवतांकडे करूयात का? या नवरात्रात ही एक सातवी माळ अशी श्रीमंत ठरली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अंतर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ अंतर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?”

सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो, आणि म्हणूनच कदाचित ओरडून बोलतो.”

यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो, ती समोरच असते. तरीसुध्दा आपण ओरडतो.जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो.”

यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.

शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.

ते म्हणाले, “जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरता ते चढ्या आवाजात बोलतात.”

“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात, तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?”

असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले, “कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढू लागते तसतसा त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याचीदेखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे, ते ओळखतात.

शिकवण – परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात. मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका.तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत मुक्ताबाई… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ संत मुक्ताबाई… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

संत मुक्ताबाई

(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).

  मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी

थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला

विंचू पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय

माशी व्याली घार झाली , देखोनी मुक्ताई हासली…

-संत मुक्ताबाई

आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही. आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्‍या छळाला  कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. देहांत प्रायश्चित्त घेतात. त्या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.

भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. समाजाने केलेला अन्याय आणि अपमान सहन करत करत लहनाची मोठी होत असते मुक्ताई,

तात आणि माता गेलीसे येथून,तेंव्हा आम्ही लहान पांडुरंगा |

निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न ,सांभाळी सोपान मजलागी || 

तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ…

असे काही अंशी दुख मुक्ताईच्या शब्दात दिसते. शिवाय त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे.

समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. संन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एकाने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना. मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. “लोक कितीही वाईट वागले तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून बाहेर या”. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत. योगी कसा असावा , आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.  

चिंता क्रोध मागे सारा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

.

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।

विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।

.
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।

विश्वपट ब्रह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

.

ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा वडील भूतें सारी

अहो क्रोधें यावें कोठे अवघे आपण निघोटे

जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली

मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा

ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुक्ताबाईना जाणवते . या वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते आणि स्वच्छ, सात्विक, पावन मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात, शांत होतात आणि पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या         चिमुकल्या मुक्ताबाईत होतं. याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली. मुक्ताबाईंचे ताटीचे ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले आहेत.  

गुरु संत निवृत्तीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधु-भगिनी झाले होते, प्रेम, आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्‍या आघता मुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ नुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.

मुक्ताई ने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत. साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात. 

अशा अनेक घटना मुक्ता बाईंच्या आयुष्यात घडलेल्या दिसतात की, ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ते आपल्याला लक्षात येतं.यामुळेच मुक्ता बाई तेराव्या शतकातली संत परंपरेतली एक ‘स्त्री गुरु’ होऊन गेली हे कळतं. गुरु शिष्य परंपरेत तर वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती.चांगदेवांना तिने पासष्टीचा अर्थ सांगितला.हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य.  

संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ /भांडे आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .

मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत  हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका आहे. अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.

तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच  सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली.  आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच.या सगळ्या घटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत, वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की ही अवतार समाप्ती आहे.

ऐकावा हा अर्थ  मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी नाही कोणी ||

निवृत्तीनाथ मुक्ताई सोडून गेल्यावर जो मनात आकांत झाला त्यावेळी हे म्हणतात. मुक्ताई ही मोठ्या भावांची छोटी आई तर होतीच पण त्यांची एक चांगली मैत्रीण, सखी पण होती. आता अशी मैत्रीण त्यांना शोधूनही सापडणार नव्हती.   

संत नामदेवांनी पण तिची अवतार समाप्ती अनुभवली आणि त्याचे वर्णन केले आहे ते म्हणतात-             

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l

जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l

नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l

संत जनाबाईंनी आदराने म्हटले आहे , “आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||”!

अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !

 

ले- डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा,  त्यांच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण ८/९ वर्षांपूर्वी घडलेल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात . मानवी स्वभावाची जडणघडण, त्यांचे वेगळेपण, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या, पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तूपाठ पाहायला मिळाला त्यामुळे त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहात नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणा स्थानं आहेत याची नव्याने जाणीव झाली.

ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे २०१५ ते  २०१८ या काळात घडलेल्या आहेत.

त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे.

जाताना सकाळी लवकर रेल्वेनं जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं हे अनेक वर्षं रुटीन चालू होतं. येताना  आमच्या व्यवसायाकरीता लागणारी वेलची वाशी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रूटीनचा भाग होता.

असंच एका बुधवारी वाशीहून  पुण्याकडे जाणा-या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं दहा किलोचं छोटं बाजकं पण बरोबर होतंच. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या एक दोन आल्या त्या भरुन येत होत्या. त्यामुळे दोन तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून ५/६ जणच होते. कंडक्टर आला तिकीट घेतलं, त्यानं चौकशी केली साब ” वेलची का अच्छा खुशबू आता है ”  मग  वेलची कुठून आणली, कशासाठी आणली,  त्याचा उपयोग काय इ.ची जुजबी माहिती त्याला दिली. इतरांना तिकीटं देण्यासाठी पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे वाचन करायला सुरुवात केली.

काही वेळाने कानावर कानडीमध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं पण बहुदा तिकीटाच्या पैशाबाबत काही तरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेंव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिचं एक वर्षांचं बाळ आणि ३/४ वर्षांचा मुलगा पण रडायला लागले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे हे विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला….. 

…… ती बाई म्हणे नव-याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती. पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्याला उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाका  प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो पण त्या बाईला कानडीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरलाच  दुभाष्या बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली, ” तुम्हीच माझे अण्णा (मोठा भाऊ) आहात, मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू ? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनीऑर्डर करून पैसे परत पाठवते.”  

अशा गोष्टींचा अनुभव असल्याने माझा तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं.  पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत, जाऊ देत बुडीत खात्यात, असा विचार मनात आला. नाहीतरी शिवनेरी बसनं गेलो असतो तर ४५०/- रुपये तिकीट पडलं असतं आणि आताच्या बसला १५०/- रू खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता ५०/- रू. जवळ ठेवून ४००/- रू. कंडक्टरकडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुस-या पुढच्या बसचं तिकीट जाऊन १०/२० रू. शिल्लक राहतील असं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर ४/५ जणांनी २००/- रू  गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली , पाया पडायला लागली. तुमचा पत्ता द्या. मनीऑर्डरने पैसे पाठवते असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि गावाला गेलीस की नव-याला बोलावून घेऊन भांडणं मिटवून टाक असा सल्ला कंडक्टरकरवी दिला.

कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी, तिला जपून जा, मुलांकडे लक्ष दे असं सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावरसुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो. अर्थात हे प्रकरण आठवडा भरात विसरून गेलो. माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.

क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे. 

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares