मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नववधू प्रिया मी बावरते— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆

सौ. राधिका (माजगांवकर) पंडित 

? मनमंजुषेतून ?

☆ नववधू प्रिया मी बावरते — ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित

श्रावण धारा कोसळत होत्या अंगणात ऊन पावसाचा खेळ सुरु होता, तर माझ्या मनात त्या मंगळागौरीच्या आठवणींचा फेर चालू होता.

त्याचं असं झालं, भाऊजींचं लग्न झालं आणि जावेच्या रुपानें मैत्रीण म्हणून बिल्वा आमच्या घरांत आली. पहिला वहिला सण आला मंगळागौरीचा. भाऊजींची आणि बिल्वाची नव्याची नवलाई अजून ताजी, साजरी, गोजरी आणि लाजरी अशी टवटवीत होती. चोरटे स्पर्श, कुठं बिल्वाची लांबसडक वेणी ओढ, तर कधी पाणी उडव: असे चोरटे क्षण ते  दोघेजण लाजून साजून साजरे  करत होते.

सौ. बिल्वा खूप साधी आणि मुलखाची लाजाळू होती. सासु- सासरे समोर असले की ही नवऱ्याच्या वाऱ्याला ही उभी राहात नसे. भाऊजींना चहा देतांना सुद्धा या लाजाळू  झाडाच्या पापण्या खाली झुकलेल्याच असायच्या. तिचं म्हणणं “वडिलधाऱ्यां समोर बरं दिसतं कां हे असले अल्लड अवखळ वागणं ?”

तर अश्या या बिल्वाची, माझ्या जावेची पहिली मंगळागौर होती. दोन्ही घरचे पाहुणे उपस्थित झाले होते. हिरव्यागार शालूमध्ये ठसठशीत दागिन्यांमध्ये आमची ही नववधु चौरंगावरच्या मंगळागौरीइतकीच सजली होती. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे भाऊजींची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. भाऊजींच्या खाणाखुणांना दाद न देता या बाईसाहेब त्यांना नजरेनीच दटावत होत्या.

दिवसभराचा कार्यक्रम संपला. आता आली झिम्मा फुगडी खेळण्याची वेळ. तेव्हा मात्र हे लाजाळूचं झाड संकोच सोडून अवखळ वारं झालं होतं.

सगळ्यांबरोबर सगळे खेळ अगदी दणक्यात, अगदी देहभान विसरून खेळले गेले. तिची ती भरारा फुगडी बघून कुणी तरी म्हणालं, “चल बाकीचें राहूदे, आता तुझ्या नवऱ्याला गरागरा फिरव. “

“इश्य !”असं म्हणून पळायच्या बेतात होत्या बाईसाहेब. पण भाऊजींनी मात्र हात धरून तिला मैदानातच आणलन. सभोवती आम्ही लगेच फेर धरला आणि ओरडलो, “भाऊजी सोडू नका हं हिला. ” आणि मग काय भाऊजींना तेच तर पाहिजे होते.

बोलताबोलता पायांचा ताल आणि फुगडीचा वेग यांनी सूर धरला. मग रिंगणांत नवराबायकोची फुगडी चांगलीच रंगली. अगदी दणदण दणक्यात.

कशी कोण जाणे, बिल्वाला एकदम भोंवळ आली आणि ती भाउजींच्या अंगावर कोसळली. त्यांनी तिला सावरलं.

बराच वेळ झाला, ती दोघं दूर होईनांत. आम्हाला वाटलं भाऊजी तिला सोडत नव्हते म्हणजे मस्करीच चाललीय.

मध्येच कुणीतरी वडिलधारं ओरडलं, “अरे तिला चक्कर आली असेल. खाली बसवा  तिला हात धरून. कुणीतरी पाणी आणा रे लवकर. “

खाली बसायच्या ऐवजी बिल्वाने तर डोळेच मिटून घेतले. होते. आणि भाऊजींचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झालेला होता.

हा काय प्रकार आहे बाई । कुणाला काहींच कळेना, आणि ते दोघे तर जागचेही हलेनात. अखेर भाऊजींच्या खट्याळ मेव्हणीच्या लक्षांत सारा प्रकार आला. पुढे होऊन जिजाजींच्या शर्टच्या बटणामधून सौ. ताईची नाजुक केसांची बट तिनें नाजुकपणे सोडवली आणि म्हणाली. ” जिजाजी, पुढच्या मंगळागौरीला बटणांऐवजी हुक असलेला शर्ट घाला, म्हणजे सगळ्यांसमोर नेहमी नेहमी असा सिनेमा घडायला नको. ” 

सगळे गडगडाटी हसले. नुसता टाळ्यांचा, हास्याचा धबधबाच जणू काही कोसळला. आणि बिल्वा !! ती तर गालावर गुलाब फुलवून केव्हाच आत पळाली होती.

…. तर मंडळी अशी फुलली ही आमच्या घरातील बिल्वा-भाऊजींची पहिली वहिली मंगळागौर.

© सौ. सौ. राधिका गोपीनाथ (माजगांवकर) पंडित

पुणे

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

शेगाव रेल्वे स्टेशन. संध्याकाळची शेवटची एक्सप्रेस निघून गेली आणि काही मिनिटांतच फलाट रिकामा झाला. रेखताईंची ड्युटी थोड्याच वेळात ड्युटी संपणार होती. आता युनिफॉर्म बदलून सिव्हिल ड्रेस चढवायचा आणि घराकडे निघायचे अशा विचारात असतानाच त्यांना ती दिसली… फलाटावरील शेवटच्या एका बाकड्यावर काहीशा विचारमग्न अवस्थेत… शून्यात नजर लावून! रेखाताईंनी आपल्या चेंजिंग रुमकडे जाण्याचा विचार बदलला. तिच्याकडे काही पिशवी वगैरे दिसत नव्हती. सोबत कुणीही नव्हते आणि इतक्यात कोणतीही प्रवासी गाडी या स्टेशनवर थांबणार नव्हती… शिवाय ती बाई दोन जीवांची दिसत होती… दिवस भरत आलेले!

ताईंनी तिच्याजवळ जाऊन तिला हटकले तर म्हणाली “आत्या येणार आहे.. तिला घ्यायला आलेय!”. “एक्स्प्रेस तर मघाशीच निघून गेली की तुझ्यासमोरूनच! नाही आली का तुझी आत्या?” त्यावर ती बाई निरुत्तर झाली… तिला बाई म्हणायचं कारण तिच्या गळ्यात असलेलं ते मंगळसूत्र! लग्नाला एका वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले असतील असं वाटतं नव्हतं. एकोणीस- वीस वर्षांची पोरच ती!

ती खोटं बोलते आहे हे ताईंनी अनुभवाने ओळखलं. तिला जरा जरबेच्या आवाजातच सांगितले… ”घरी जा.. आणि रिक्षेने जा! अशा अवस्थेत तुझं पायी जाणं बरोबर नाही!” 

“कुठे राहतेस?” या प्रश्नावर तिने तिचे राहण्याचे ठिकाण सांगितले. याच गावातल्या स्टेशनवर GRP मध्ये म्हणजे General Railway Police खात्यात खूप वर्षे सेवा करीत असल्याने आणि जवळपास राहत असल्याने ताईंना सारा परिसर चांगलाच माहित होता. सहज चालत जाण्यासारखे अंतर तर नव्हतं.. आणि गर्भारपणात आणि ते ही दिवस भरत आल्याच्या दिवसांत तर नव्हतंच नव्हतं!

   ती पोर हळूहळू पावलं टाकीत स्टेशनच्या बाहेर जायला निघाली. स्टेशनच्या पाय-या उतरून बाहेर पडली आणि तिथेच घुटमळली. ताईंचे तिच्यावर लक्ष होतंच. ती पोरगी काही रिक्षात बसली नाही. ती काही घरी जाण्याच्या मन:स्थितीमध्ये असेल असं दिसत नव्हतं!

ताई स्टेशन सोडून तिच्या मागोमाग निघाल्या. तशी ती फार दूर गेलेली नव्हती. पण आपण तिचा पाठलाग करतो आहोत, असे तिला वाटू नये म्हणून ताईंनी आपला वेग कमी ठेवला होता. अन्यथा तिने भलतंच काही केलं असतं.. अशी शक्यता होती.

ताईंचा सहकारी विशाल जाधव त्याची ड्युटी संपवून स्टेशन बाहेर पडत होता. ताई स्टेशन सोडून बाहेर का पडत आहेत.. आणि ते सुद्धा युनिफॉर्मवर.. हे त्याला समजेना.

नियमानुसार ताईंची जबाबदारी सस्टेशनच्या हद्दीपुरती मर्यादित होती. पण का कुणास ठाऊक आज त्यांना या मर्यादेबाहेर जावंसं वाटलं. असंच होतं त्यांच्याबाबतीत. का कुणास ठाऊक पण काही विपरीत घटना घडायची असली की त्यांचं मन त्या ठिकाणी जा असं सुचवायचं. गेल्या कित्येक वर्षांच्या सेवेत त्यांनी कितीतरी अपघात, आत्महत्या पाहिल्या होत्या. जमेल त्यांना स्वतःहून मदतीचा हात दिला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवापाड मेहनत करून त्या रेल्वे पोलिसात भरती झाल्या होत्या आणि आज हवालदार पदावर पोहोचल्या होत्या. आज यावेळी स्टेशनबाहेर पडताना ताईंनी वरीष्ठांना कल्पना दिली नाही.. कारण एकतर ड्युटी संपली होती आणि तेव्हढा वेळच नव्हता!

त्यांच्यापुढे चालणारी ती पोरगी तिच्या घराच्या रस्त्याकडे वळणार नाही हे त्यांनी ताडले.

“ताई, इकडे कुठं स्टेशन सोडून?” विशालने विचारले. तो तिला ताई म्हणायचा! “ती समोर चाललेली पोरगी बघतलीस का? तिचा काहीतरी भलताच विचार दिसतोय. एक काम कर… तुझ्या अंगावर सिविल ड्रेस आहे. तू तिच्या मागोमाग चाल… मी मागून येतेच.. मला युनिफॉर्म वर बघून तिला संशय येईल! आणि लोकही विनाकारण गर्दी करतील” 

आणि तिला शंका होती तसंच झाली… ती पुढं चालणारी घराच्या दिशेने न वळता गजानन महाराजांच्या मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या दुस-या रेल्वे ट्रॅकच्या दिशेने निघालेली होती… त्या मार्गावरून यावेळी ब-याच ट्रेन्स जात-येत असतात… आणि त्याबाजूला तशी कुणाची गजबजही नसते. काही वेळातच अंधार पडणार होता. आता या दोघांनीही आपल्या पावलांचा वेग वाढवला. ती पोरगी सारखी मागे वळून बघत होती… तिला आपण दिसू नये म्हणून ताई एखाद्या आडोशाला जात… आणि पुन्हा पाठलाग सुरू करत. येणा-या जाणा-यांना विनाकारण संशय येऊ नये याची काळजी घेत ते दोघे तिच्या दिशेने निघाले. कारण विनाकारण आरडाओरडा केला असता तर ती पोरगी भेदरली असती आणि काही भलतंच होउन बसलं असतं! त्या पोरीचं लक्ष नव्हतंच. ट्रॅक वरचे दोन्ही बाजूंचे सिग्नल हिरवे झालेले होते… ट्रेन तिथून जाण्याची वेळ झालीच होती.. कोणतीही ट्रेन काही क्षणांत तिथे पोहोचणार होती!  

आता मात्र हे दोघेही पळत निघाले… तिचं लक्ष नव्हतंच.. आवाज देऊनही काही उपयोग नव्हता… विशाल दादाने पुढे धावत जाऊन तिला रुळावर जाण्याच्या आधीच आडवे होऊन तिचा रस्ता रोखून धरला…. तेंव्हा ती भानावर आली! ताई क्षणार्धात तिच्याजवळ पोहोचल्या!

“काय विचार आहे? घरी जायचं सोडून इकडं कशाला आलीस? मरायचंय पोटातल्या बाळाला सोबत घेऊन?” या प्रश्नांची तिच्याकडे उत्तरे होतीच कुठे? डोळे अश्रूंनी डबडबले आणि पाठोपाठ जोराचा हुंदका उमटला गळ्यातून. ताईंनी तिच्या खांद्यावर थोपटले आणि मग तिला स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवू दिले! 

“शांत हो! काय झालं मला सांगशील? तुझ्या नव-याचा मोबाईल नंबर दे! त्याने तुला असं एकटीला घराबाहेर पडू दिलंच कसं?” एवढ्यात एक मालगाडी भरधाव अप ट्रॅकवरून धडधडत निघून गेली! त्या पोरीनं त्या गाडीकडे एकदा पाहिलं आणि डोळे मिटून घेतले!

बराच वेळ झाल्यावर तिने कसाबसा नव-याचा नंबर सांगितला. ताईंनी आपल्या मोबाईलवरून त्याला कॉल लावला. पलीकडून हॅलो असे काळजीच्या सुरातील प्रत्युत्तर ऐकताक्षणीच ताईचा रागाचा पार चढला…. ”असशील तिथून आणि असशील तसा निघून ये… !” तिचा नवरा होता फोनवर. त्याने कसाबसा ठिकाण विचारले आणि तो बाईकवर निघाला…. ”लगेच पोहोचतो, मॅडम!”

तो पर्यंत त्या बाजूने जाणारे काही बघे तिथे थांबून झाला प्रकार समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. ताईंनी त्यांना पिटाळून लावले. त्या पोरीचा नवरा पोहोचलाच… घामाघूम होऊन. ती घरातून निघून बराच वेळ झाला होता आणि तो तिला गावभर शोधत होता. ती मोबाईल घरीच ठेवून बाहेर पडली होती.. घरात काहीतरी कटकट निश्चित झाली असावी!

ताईंनी त्याला झापझाप झापलं. या पोरीच्या जीवाला याच्यापुढं काही झालं ना तर पहिलं तुला आत टाकीन.. असा सज्जड दम दिला! “अरे, या दिवसांत व्याकूळ असतात पोरी. त्यांना समजून घ्यायला पाहिजे की नको? तुझ्याही बहिणी असतीलच की लग्न करून सासरी गेलेल्या? त्यांच्या सासरच्यांनी त्यांना असं वागवलं तर चालेल का तुला? तुझ्या घरच्यांना समजावून सांग…. म्हणावं…. ही सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!” 

तो खाली मान घालून सारं ऐकून घेत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी होतं… आज आपण बायको आणि मूल अशी दोन माणसं गमावून बसलो असतो, याची जाणीव त्याला झालेली दिसत होती. ताईंनी एका कागदाच्या तुकड्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून तिच्याकडे दिला. “घरी जाऊन आधी तुझ्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह कर आणि कधी गरज पडली तर विनासंकोच फोन कर.. आणि असा वेडेपणा पुन्हा कधीच करू नकोस…. बाळ झाल्यावर सगळं काही ठीक होईल!” 

त्या पोरीचा नवरा रेखाताईंचे, विशालदादांचे पुन्हा पुन्हा आभार मानून बायकोला बाईकवर घेऊन सावकाश गाडी चालवत तिथून निघाला. ती पोरगी ताईंकडे पहात हात हालवत राहिली… नजरेआड होईतोवर! 

इकडे ताई स्टेशनकडे लगबगीने निघाल्या. ताई स्टेशनबाहेर गेल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. ताईंनीही कुणाला काही सांगितलं नाही.. out of the way आणि out of jurisdiction जाऊन काम करण्याची परंपरा तशी कमीच आपल्याकडे!

युनिफॉर्म बदलून ताई घराकडे निघाल्या! गजानन बाबांच्या मंदिरासमोरून जाताना त्यांनी कळसाकडे पाहून हात जोडले… आणि आरती सुरू झाल्याचा शंख वाजू लागला…. ताईंची सेवा गजानन महाराजांच्या चरणी रुजू झाली होती ! रेखाताईंनी आजवर अशा अनेक लोकांना बचावले आहे. त्यांचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले आहेत. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रेखताईंचे पती नुकत्याच झालेल्या एका गंभीर अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. चांगल्या कर्मांची फळे परमेश्वर आपल्याला देतोच, अशी रेखाताईंची श्रध्दा आहे. त्यांच्या अनुभवांचे संकलन त्या करणार आहेत. सकारात्मक गोष्टींचा प्रसार व्हावा, म्हणून मी हा लेख त्यांच्या संमतीने लिहिला आहे. यात प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नाही.

(नुकत्याच केलेल्या शेगाव-पुणे रेल्वे प्रवासात GRP हवालदार रेखाताई वानखेडे नावाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेशी संवाद करण्याचा योग आला. त्यांच्याकडून अशा कितीतरी गोष्टी ऐकायला मिळाल्या. प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात ‘आऊट ऑफ वे ‘ जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून समाजाची सेवा करणारी माणसं आपल्या भोवती आहेत, याचा आनंद झाला. त्यांनी सांगितलेल्या अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव थोडेसे लेखन स्वातंत्र्य घेऊन सुहृद वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रेखाताईंना, विशाल जाधव यांना तुम्ही मनातून का होईना… आशीर्वाद, शुभेच्छा द्यालच, कौतुकाचे चार शब्द लिहाल, अशी खात्री आहे ! ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशाची यशस्विता… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ यशाची यशस्विता… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

काही वर्षापूर्वी एक माणूस खाकी अर्धी चड्डी घालून मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये गाडीतून उतरला. मालवणहून मुंबईत तो पहिल्यांदाच आलेला असतो….

उतरताच मुंबईने त्याला आपला रंग दाखवला, त्याची पिशवी चोरीला जाते. आता करायचे काय ह्या मायानगरीत? असा प्रश्न त्याच्या मनात आला..

मुंबईत एकमेव माणूस ओळखीचा माणूस आणि आधार तो म्हणजे गंगाधर. खिश्यात पैसा नाही, मग चालत गंगाधरचे घर गाठले. त्याकाळी दुसर्‍याला आधार देण्याची प्रथा होती. दुसर्‍या दिवशी गंगाधरने त्याला ह. रा. महाजनी (लोकसत्ता दैनिकचे संपादक आणि अभिनेता रविंद्रचे वडील)च्या पुढ्यात उभे केले, कारण त्याला नोकरीची गरज होती. या अर्धचड्डीत उभ्या असलेल्या माणसाला महाजनीने नाव, गाव विचारले आणि ते ऐकताच महाजनी म्हणाले, अरे शब्दकोडे सोडवून पाठवतोस तो तूच का.. ?

मग आजपासून शब्दकोडे रोज बनवून देणे, हीच तुझी नोकरी. अश्यातर्‍हेने पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढे वेळ मिळेल तेव्हा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्याने नाव कमावले आणि त्यामुळे त्याची ओळख महाराष्ट्राच्या मान्यवर लोकांबरोबर झाली..

पुढे स्वस्थ न बसता दिनदर्शिका काढली, ती सुरुवातीला दुसर्‍याकडून छापून घेतली, पण नंतर स्वतःची प्रेस काढून, दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकाचे मागचे पान रिकामे असे, म्हणून त्यावर भविष्य आणि अनेक गृहोपयोगी गोष्टी छापल्या. त्यामुळे दिनदर्शिकेची लोकप्रियता  आणि खप खूप वाढला, मग दुसर्‍या भाषेत पण, दिनदर्शिका छापणे सुरू केले. खूप पैसा मिळवल्यावर दादर इथे एक इमारत विकत घेतली. ज्या इमारतीमध्ये आज पारसी लोक त्याचे भाडेकरू आहेत…

ही यशोगाथा आहे मालवणहून आलेल्या एका मराठी तरुणाची, ज्यांचे नाव आहे…

“कालनिर्णयकार.. “

“आदरणीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर” यांची आणि त्यांना सुरुवातीच्या काळात मदत करणारा तो सद्गृहस्थ गंगाधर म्हणजे “कवि गंगाधर महांबरे”..

एका मराठी माणसाची ही यशोगाथा केवळ प्रेरणा मिळावी म्हणून थोडक्यात सादर…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

१) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा

२) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा

३) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको

४) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं

५) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही

६) मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- आमची मुलगी खूप शांत स्वभावाची आहे

७) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो

८) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत

९) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतोआणि सर्वात कळस म्हणजे

१०) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट – तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.

सर्वच खोटं.. पण खरंय..

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रावण मास… एक उत्सव पर्व…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ श्रावण मास… एक उत्सव पर्व…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

सख्या रे श्रावणा…

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

झरझरणारी तुझीच धारा

थरथरणारा अधीर वारा

पडघम वाजती नाद घुमे गगनात

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

माझ्या काव्यातून उतरणारा हा श्रावण आणि याचे सौंदर्य, त्याचबरोबर याचे असलेले सांस्कृतिक महत्त्व, याला असलेले अध्यात्मिक स्थान आपण प्रस्तुत लेखात पाहूयात. पौर्णिमेच्या मागेपुढे श्रवण नक्षत्र येते. म्हणून श्रावण नाव असलेल्या या महिन्याला नभ व सावन ही उपनावे असून नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, पिठोरी अमावस्या या सण व उत्सवांचा आनंद श्रावणात मिळतो.

श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव संपन्न करतात. मुलींचे लग्न झाल्यावर पहिले पाच वर्षे हे व्रत घराघरात संपन्न करतात. त्यानिमित्ताने समाजातील सुवासिनींना आमंत्रित करून त्यांना भोजन घालणे व ओटी भरणे, रात्री मंगळागौर जागविणे हे कार्यक्रम होतात. त्यानिमित्ताने स्त्रिया संघटित होतात. आज-काल तर मंगळागौरीचे खेळ करताना स्त्रिया समाज प्रबोधनही मोठ्या प्रमाणात करत आहेत. उत्सवाचा आनंद घेत समाज प्रबोधन करणारा हा सण आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

बालकवींनी श्रावण मास या कवितेमध्ये ऊन पावसाचा खेळ खेळणाऱ्या या श्रावणात सगळीकडे असलेल्या हिरवळीमुळे मन कसे प्रसन्न होते याचे सुरेख वर्णन केले आहे. मंगळागौरीच्या पूजेची पत्री फुले गोळा करणाऱ्या मुलींचे सुंदर वर्णन केले आहे 

सुंदर परडी घेऊन हाती 

परोपकंठी शुद्धमती 

सुंदर बाला या फुलमाला 

रम्य फुले पत्री खुडती

रात्री मंगळागौरीला सोळा वातींची आरती ओवाळतात, कहाणी वाचतात, खेळ, नृत्य, फुगड्या, झिम्मा आधी प्रकाराने गौरीची आळवणी करून अखंड सौभाग्याचे वरदान मागतात.

श्रावण सोमवारी महादेवाची षोडशोपचार पूजा करतात. एकदा अन्न सेवन करून उपवास करतात. श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांना सुख समाधान लाभावे म्हणून जिवतीची कहाणी सांगतात. मुलांना ओवाळतात. तसेच श्रावणातील शनिवार हा शनि देवाचे स्मरण व्हावे म्हणून मुंजा मुलाला जेवू घालून साजरा केला जातो.

कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे सर्वम खल्विदम् ब्रह्म हा भाव असलेल्या भारतीयांनी पशुपक्षाची ही कृतज्ञ भावाने पूजा करण्याची प्रथा निर्माण केली. दूध देणाऱ्या गाईसाठी वसुबारस. शेतीची कामे करणाऱ्या बैलासाठी बैलपोळा तर शेतीचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी.

सर्पाणाम् अस्मि वासुकि:॥ अनंतस् चस्मि नागानाम्॥

भगवान श्रीविष्णूच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झाली. नागाचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत. श्रीविष्णुला क्षीरसागरात बसण्यासाठी स्वतःच्या अंगाचे आसन करणारा शेषशाही नाग. विष प्राशन केल्यावर अंगाचा दाह नाहीसा व्हावा म्हणून आपल्या थंड शरीराचे वेटोळे घालून भगवान शंकरास आनंद देणारा नाग. गोकुळात यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने भगवान गोपालकृष्णाने कालीयाला शिक्षा करून यमुनेतून हाकलून दिले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा आणि त्याची स्मृती म्हणून नागपंचमीचा सण घराघरात संपन्न केला जातो.

माझ्या माहेरी (मुरुडला) माझ्या बाबांच्या घरी श्रीयाळ षष्ठी म्हणजे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी मोठा उत्सव असतो. सकाळी सात आठ कुंभार घरी येतात काळी माती व राख मिसळून एक छान मातीचा किल्ला तयार करतात. त्याला सजवण्यासाठी करडई लावतात. वेगवेगळ्या फुलांनी त्याला सजवतात मग तो सुरेख चार बुरुजांचा वाडाच जणू दिसतो त्यामध्ये नागोबा ठेवतात व सर्वांच्या दर्शनासाठी तो ठेवला जातो. या दिवशी सासुरवाशीणी मुली आपल्या माहेरी येतात व 

चल ग सखे…. वारुळाला वारुळाला गं…. नागोबाला पूजायाला पूजायाला गं

हे गाणे म्हणत फेर धरतात. फुगड्या, झिम्मा खेळतात झाडाला झोके बांधून झोके घेतात. घरात नागोबाला दूध लाह्या वाहतात. औट घटकेच्या राज्यानंतर गौर सासरी जाणार म्हणून तिला वळवटाची खीर व कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो. हे कशासाठी तर त्या गौरीने वळून वळून परत माहेरी यावे ही सुरेख भावना यामागे आहे. श्रियाळ नावाच्या राजाचे राज्य म्हणजे श्रियाळ षष्ठी ह्या साडेतीन घटकात माझ्या बाबांचे घर माणसांनी गजबजून जाते. पुरुष पान सुपारीला व गौराईच्या दर्शनाला येतात तसेच स्त्रिया भरजरी साड्या दाग दागिने घालून फेर धरतात. गाणी म्हणतात. गौरीच्या विसर्जनाला जाताना खरोखरीच लेक सासरी जात असल्याचा भास होतो व सर्वांचे डोळे भरून येतात. लेकीची पाठवणी करतात तसे बँडबाजा सोबत वाजत गाजत गौरीला निरोप देऊन परत आल्यावर सर्व सुवासिनींची लाह्यांनी ( ज्वारीच्या ) ओटी भरली जाते. व कार्यक्रमाची सांगता होते. ग्रामीण भागात गावोगावी हा नागपंचमीचा सोहळा पहावयास मिळतो. नागपंचमीला राखी पंचमी असेही म्हणतात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे या गावी नागदेवतेची फार मोठी यात्रा भरते.

याच महिन्यात येणारा आपला राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या मंगल दिनाची स्मृती म्हणून स्वातंत्र्य दिन संपन्न केला जातो. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभा करून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करून राष्ट्राला संबोधित करतात. आपल्या देशाला सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांचे बलिदान आठवण्यासाठी व स्वातंत्र्याचे मोल आपल्या सर्व पिढ्यांना समजावे यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो. प्रत्येक भारतीयांच्या मनात हीच भावना असते…. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा।

 येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वां अनुबंध्नानमि रक्षे मा चल मा चल॥

या मंत्राचा उच्चार करून बहीण भावाच्या हातात, भावाने आपले रक्षण करावे या सद्भावाने राखी बांधते. रक्षाबंधनाचा सण अनादी कालापासून चालत आला आहे. असूरांबरोबर युद्ध करताना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राला इंद्राणीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली त्यामुळे त्याला आत्मविश्वास आला व त्याने असूरांचा पराभव केला. त्या मंगल घटनेची स्मृती म्हणून रक्षाबंधनाचा सण संपन्न केला जातो. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली असा महाभारतात उल्लेख आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमा असते. त्या दिवशी सागराची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला उचंबळणारा सागर श्रावण पौर्णिमेला शांत होतो अशी कोळ्याची श्रद्धा आहे. आपल्या या सागरबंधूने मासे पकडण्यासाठी सागरात गेलेल्या आपल्या पतीचे रक्षण करावे म्हणून कोळ्यांच्या महिला सागराला राखी सोडतात व कोळी लोक सागर पूजन करून श्रीफळ अर्पण करतात. याच दिवशी यज्ञोपवित (जानवे) बदलण्यासाठी श्रावणी हा विधी संपन्न केला जातो.

कर्षति आकर्षति इति कृष्ण:।

जो सर्वांचे आकर्षण करतो तो कृष्ण. श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभराशीत असताना रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. असा कृष्ण आमचे आराध्य दैवत आहे. जो एक प्रेमळ सखा, भाऊ, प्रियकर, पती ह्या प्रत्येक रूपामध्ये आज आमच्या मनात विराजमान आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.

जन्म कर्म च मे दिव्यम्॥

माझा जन्म व कर्म सर्वच अद्भुत आहे. मी सर्वात असून कोणातही नाही आणि कुणाच्या कर्मात वा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही तर सर्वांना स्वातंत्र्य देतो. मला हाक मारणाऱ्या द्रौपदीसाठी मी वस्त्र घेऊन धावत येतो तर मला न विचारता द्यूत खेळणाऱ्या युद्धिष्ठीराचेच दुःख मी निवारण करण्याच्या भानगडी पडत नाही कारण कर्म करणाऱ्यांनी त्या कर्माचे प्रायश्चित्त भोगले पाहिजे. अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताची मी कधीही उपेक्षा करत नाही. धर्माला ग्लानी आली, सज्जनांना त्रास होऊ लागला तर मी जन्म घेतो.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥

श्रीकृष्णाचे स्मरण व्हावे. त्यांच्या कार्याची महती पुढच्या पिढीला कळावी यासाठी आपण श्रीकृष्ण अष्टमी साजरी करतो. घरोघरी मातीचे गोप, गोपी, यशोदा इत्यादी सारे गोकुळ तयार केले जातात. मातीच्या पाळण्यामध्ये गोपाळकृष्ण व बलराम यांचा जन्मोत्सव केला जातो. डिंक वडा व सुंठवडा यांचा प्रसाद दिला जातो. श्रीकृष्णाचा पाळणा म्हटला जातो. सारे गोविंदा मिळून दहीहंडी फोडतात. समाजाचे एकत्रीकरण व त्यातून संस्कारक्षम उत्सव संवर्धन गोकुळाष्टमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घडून येते. बासरीचे स्वर, गोपीप्रेम, गीताज्ञान व निरपेक्षवृत्ती असलेले पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्ण भारतीयांचा आत्मा आहे.

श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा, मातृदिन व पिठोरी अमावस्या या सणांचे आयोजन केले जाते. बलिवर्द या संस्कृत शब्दापासून बैल हा शब्द निर्माण झाला. वृषभ, नंदी, बसव, गोपुत्र, कृषीमित्र, शिव वाहन या नावाने ज्ञात असलेला बैल प्रत्येक गावातील शिव मंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन अंघोळ घालतात. अलंकार घालून मिरवणूक काढतात. घरी आल्यावर पूजा करून बैल व गाईचे लग्न लावून त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात. या दिवशी बैलाकडून काम करून घेतले जात नाही.

बंदीगृहात असलेल्या देवकीने गोकुळात यशोदेकडे राहणाऱ्या गोपालकृष्णासाठी मातृदिनाचे हे व्रत केले. या दिवशी आई आपल्या मुलाला मागे उभे करून, मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकून अतीत कोण असे विचारते तेव्हा अतिथ मी आहे असे मुलाने म्हटल्यावर, आई पुरणाच्या पुऱ्या, गव्हल्याची खीर व निरांजनासहित ते वाण आपल्या मुलाला देते. या दिवशी आईला नवीन वस्त्रे देऊन तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे.

ज्या महिलांना मूल होत नाही व झालेले मूल जिवंत राहत नाही अशा महिला पिठोरी अमावस्येचे हे व्रत करतात. नदीवर जाऊन अप्सरांशी व आपल्या घरातील चौंसष्ठ योगिनींच्या चित्राची पूजा करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवून हे व्रत संपन्न करतात. याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशाप्रकारे श्रावण मासात पावसाच्या सरींबरोबर सणांच्या व उत्सवांच्या सरी देखील बरसत असतात व त्यात आपण चिंब भिजून जातो.

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि  हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक.

दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा. पचण्यासाठी.

पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानेच  व्हायचा. मला आठवतंय, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात ताकासाठी आळं करायचा, ताक वाढणारा/वाढणारी  आल्यावर आधी ओंजळ पुढे करून ताकाचा भुरका मारायचा, सणसणीत आवाज करत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला नाही शिवायचा. आज जरी तो  नसला, पण ताकभात खाताना त्याच्या भुरक्याची मात्र हमखास आठवण होते. असा भात जेवताना इतस्ततः पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची तरीही तो ताकभात त्याच पद्धतीने जेवायचा.

ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साज चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि ते चढवण्यात आपल्या गृहिणींचा हातखंडा असतो. वादातीत.

आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद, लसूण  इत्यादी लेण्यांनी मढवले की त्याची कढी तयार होते. या कढीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे क्या बात. थोडासा फडफडीत भात, सोबत लोणच्याची फोड आणि कढी हे ज्यानं अनुभवलंय तोच त्याची महती जाणो.

हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण. कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ. बोटांनी चाटूनपुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी. कितीही खाल्ली तरी कंटाळा न येणारी. ती चाखुनच तिचा अनुभव घ्यावी अशी. हेच  वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घालून म्हणजे आणखी एक भारीतली चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा, निःसंशय !!!

पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात  जेंव्हा पंक्ती उठायच्या तेंव्हा मठ्ठा पंक्तीचा समारोप करायचा. ताक, मिरच्या कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर असं लावून तयार झालेला मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची? जिलबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची.

मठ्ठा आणि जिलबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीस तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर पाक पिणारे बहाद्दर पण मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह, cholesterol वगैरे राक्षसांची दहशत? का अज्ञानात सुख होतं? का  देवाक् काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? त्यांनाच विचारायला हवं होतं.

नुसतं मीठ घालून ताक, जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेलं असताना पंचवीस रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलोय आणि आयुष्यभर देत राहीन हे नक्की.

हल्ली बरेच  पॅकबंद  ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात पण ते अडीनडीला ठीक. आईनं केलेलं, रवीनं घुसळलेलं, जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे खरंखुरं ताक. त्याची कशाशीच तुलना नाही ही मात्र काळ्या दगडावरची रेघ, कधीच न पुसली जाणारी.

ता. क: बायकोला ताकास तूर लागू न देता हे लिहितोय, नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची…

लेखक : पराग गोडबोले

मो. ९३२३२ ७७६२०

प्रस्तुती : अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

ब्रह्मदेवाने स्वतः आणखी प्रजा विस्तार करण्यासाठी अनेक ऋषी उत्पन्न केले. त्यांना प्रजापती  ऋषी असे म्हणतात. त्यापैकीच एक कृतु हे प्रजापती ऋषी. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाच्या हातातून त्यांचा जन्म झाला.

ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी दक्ष प्रजापती आणि क्रिया यांची कन्या सन्नती हिच्याशी विवाह केला. उभयतांना बालीखिल्य नावाचे साठ हजार पुत्र झाले. त्या पुत्रांचा आकार अंगठ्याएवढा होता. ते सगळे सूर्याचे उपासक होते. ते सदैव सूर्याच्या रथाच्या समोर आपले मुख करून चालत रहात. सूर्याची स्तुती करत. ते सारे ब्रम्हर्षी होते. त्यांची तपस्या आणि शक्ती सूर्य देवाला मिळत असे.

एकदा महर्षी कश्यप ऋषींनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कृतुंना सांगितले ,या यज्ञात आपण ब्रम्हाचे स्थान ग्रहण करा. महर्षी कृतुंनी ते मान्य केले. आपल्या साठ हजार पुत्रांना घेऊन ते यज्ञ स्थळी आले. तेथे देवराज इंद्र आणि कृतूंचे पुत्र यांच्यामध्ये वाद सुरू झाला. महर्षी कृतु आणि महर्षी कश्यप दोघांनी मध्यस्थी केली. कृतुंच्या  पुत्रांनी पक्षी राज गरुडाला महर्षी कश्यपांना पुत्र रूपात देऊन टाकले.

महर्षी कृतुंना दोन बहिणी होत्या . त्यांची नावे पुण्य आणि सत्यवती अशी होती. महर्षी कृतु आणि सन्नती यांच्या एका मुलीचे नावही पुण्य होते.

सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी एकच वेद निर्माण केला. त्यानंतर महर्षी कृतुंनी वेदांचे चार भागात विभाजन करण्यासाठी त्यांना मदत केली. पुढे वराहकल्प युगात महर्षी कृतुच वेदव्यास या नावाने जन्माला आले.

स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांचा पुत्र उत्तानपाद. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव. ध्रुववर महर्षी कृतुंचे खूप प्रेम होते. जेव्हा ध्रुव अपमानित होऊन अढळस्थान मिळवण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा तो प्रथम महर्षी कृतु यांच्याकडेच आला. कृतु ऋषींनी त्याला विष्णूची आराधना करण्यास सांगितले. देवर्षी नारदांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच ध्रुवाला अढळस्थान मिळाले. ध्रुवावर खूप प्रेम असल्यामुळे महर्षी कृतु अखेर धृवाकडेच गेले. म्हणूनच आजही ध्रुवताऱ्याच्या जवळ कृतु ऋषींचा  तारा आहे.

पुराणात महर्षी कृतुंबद्दल अनेक कथा आहेत. महर्षी अगस्ती यांचा पुत्र ईधवाहा याला त्यांनी दत्तक घेतले होते. शिवाय महाराज भरतने देवांच्या चरित्राविषयी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. महर्षींनी त्यांच्या शंकांचे समाधान केले. अशा या थोर महर्षींना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वसई मधील साने गुरुजी… फादर फ्रान्सिस दिब्रिटो’ ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

(४ डिसेंबर, इ. स. १९४३) नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र – (२५ जुलै २०२४ राहत्या घरी निधन)

वसई मधील साने गुरुजी… फादर फ्रान्सिस दिब्रिटो ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक होते. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले.

इ. स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ. स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए., तर धर्मशास्त्रात एम. ए. केले.

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’ च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली होती. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य 

  1. आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
  2. ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ – दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर ‘इन सर्च ऑफ दि ओॲसिस’; अनुवादक – फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
  3. ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
  4. ख्रिस्ती सण आणि उत्सव
  5. तेजाची पाऊले (ललित)
  6. नाही मी एकला (आत्मकथन)
  7. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
  8. सुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)(पृष्ठसंख्या – ११२५)
  9. सृजनाचा मळा
  10. सृजनाचा मोहोर
  11. परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
  12. मुलांचे बायबल (चरित्र)

सन्मान

  • सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
  • फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
  • उस्मानाबाद येथे जानेवारी २०२०मध्ये ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • जळगावला भरलेल्या अकराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

माहिती प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “उपदेश करु नका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “उपदेश करु नका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की…

” देवाधिदेवा…, भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?

इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ?

भगवद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे, युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसृत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंडल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.

आणि… एके दिवशी मला श्रीकृष्णाचा व्हिडीओ कॉल आला.

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार, हे मला अगोदरच ठाऊक होते.

थेट स्वर्गातून, पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे, खूप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला.

“ वत्सा, कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले. ”

“ देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दच झाले नसते.. हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्त्वाचा नाही का ?”

“मला उपदेश करू नकोस”  ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा, माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची! “…. मी गयावया केली.

“ वत्सा, … अरे तुला नाही म्हणालो. ”

… मला हायसे वाटले.

“ ‘मला उपदेश करू नका’… असे दुर्योधन मला म्हणाला होता.

… तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन ?

भगवद्गीतेमधील न्याय अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगूनदेखील त्याला ते कळले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला ‘उपदेश  करू नका’ म्हणाला ?”

“ वत्सा, अगदी असेच घडले बघ.

दुर्योधन म्हणाला….. ‘मला चांगले-वाईट, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो, त्याचा उपदेश मला करू नका ‘.

वत्सा, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्हीसुद्धा जाणता.. पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधनही अन् तुम्हीही ओळखता, पण टाळत नाही.

तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे, हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला.

“ मला उपदेश करू नका“…… वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन.

मित्रांबरोबर उनाडक्या करणे, चुकीचे होते हे मला माहीत होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना, “उपदेश करू नका” असे सांगत होतो.

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठाऊक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणि “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला, “उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीच होतो.

“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका “, हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते, हे आम्हाला ठाऊक आहे. पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही. कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय…. याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या.

कधीतरी स्वत:च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा…… तरच भगवदगीता वर्तनात येईल… वाचण्याची इच्छा होईल. इच्छा होईल तोच  सूर्योदय.

सध्यातरी मी कौरव नंबर ‘१०१’ आहे….

 

.. तुम्ही? 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हेच ते विसरून जातात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ हेच ते विसरून जातात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आभाळभर चांदण्यातला, एकटाच चंद्र कसा काय डोळ्यात भरतो.

पण तो कधी मोठा, कधी लहान होतो

तर कधी ठराविक मुदतीत गायब होतो.

टिमटिमणा-या चांदण्या तर कायमच असतात रात्रीच्या त्याच्या सोबतीला.

 

आपले अस्तित्व दाखवायला चंद्राला ही कसरत करावीच लागते.

कारण आपण कायमच क्षितीजावर राहिलो तर आवडते लोकही कानाडोळा करतील बघायला.

हे त्याने आपल्या मनात नक्कीच नोंदवून ठेवलेले असणार शहाण्यासारखे.

 

आरडाओरडा करत लोकांचे लक्ष वेधून घेणारे लोक काही कमी नाहीत या जगात,

टिचभर कर्तृत्वाची वावर पावती मागणारेही आहेत.

 

पदरमोड करून, लाचारीने, पाय धरून, ते ती मिळवतातच.

कारण त्या मागे त्यांचा भकास, उदास, कळकटलेला चेहरा उजळलेला फक्त त्यानाच दिसतो.

क्षणिक आत्मसमाधानासाठी, चमकण्यासाठी,

 

त्यांची केविलवाणी धडपड कामी येते काही काळ,

पण तिलाही शेवटी कंटाळून, वैतागून, प्रवाहपतित होवून जलसमाधीच घ्यावी लागते. हेच ते विसरून जातात… सोईस्करपणे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares