भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, दूरदृष्टी महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक खानदानी व्यक्ती अंगावरच्या श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. दूरदृष्टी महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. रोजच्या प्रमाणे खिशातून पाचशेच्या नोटांची दोन कोरी बंडल्स काढली आणि महाराजांच्या पायाशी ठेवली. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन, परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार रोज सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.
“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे. ” “अस्स, उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”
“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांची कोरी बंडल्स……… ” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे मी करतोय!” “नाही पण तुमच्या IT business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार आपल्याकडची बडी मंडळी आणि अनेक उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती मी मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे….. ” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा आमच्या फॉरीनच्या शिष्यानी दिलेली अनेक चलनातली अगणित रोख रक्कम…… ” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”
“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये. ” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज. ” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या. ” “होय महाराज. “
“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे. ” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं. “
☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे☆
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.
पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
.. याचा अर्थ असा आहे – तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!
याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे! याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं!
सोनागाची हा कोलकत्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गामातेशी संबंधित आहे! कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या विशिष्ठ तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे येथे मांडतोय.
वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.
दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल! या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे!
तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे! एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे! मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो! स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे! याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे.
दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे. वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबार’ची बैठक बोलवण्यात आली होती नि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गतसाली हे अनुदान ७०००० रुपये होतं यंदा सरकारने ८५००० रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे!
या स्त्री सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो! सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट शोषण होतं! तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात, त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे! ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत! जिवंत कलेवरं असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे!
सोनागाचीमधील माता-भगिनींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ! 💐
त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो !🙏
लेखक : श्री समीर गायकवाड
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
… हे बघ ना सुधीर ! या पुस्तकातलं ताजमहालाचं चित्र किती भारी वाटतयं.. अगदी खराखरा ताजमहाल दिसतोय… आणि त्याच्या खाली.. शहेनशहा शहाॅंजान ने आपल्या सौंदर्यवती बिवी मुमताजच्या आठवणी प्रित्यर्थ बांधला असं दिलयं… त्या दोघांचं प्रेमाचं प्रतिक चिरकाल तसचं उभं आहे… खरचं दोन प्रेमिकांनी प्रेम करावं तर असं असावं.. मला हा ताजमहाल खुप आवडतो.. हवाहवासा वाटतो.. सुधीर तु एक शिल्पकार आहेस ना मग आपल्यासाठी या ताजमहालाची प्रतिकृती करुन आण की… आपणही प्रेम अगदी तसंच करायचं हं… कधीही एकमेकांशी बिल्कुल भांडण तंडण, राग, रूसवा करायचा नाही… अगदी मी जरी हट्टाला पडले, चिडले तरी तू मात्र मला प्रेमानं समजूत घालायची, माझा हट्ट उशिराने का होईना पण पुरवावास.. म्हणजे आपलं प्रेम अधिक दृढ होईल… तुला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनवर न्यायला रोज येत जाईन मग फिरत फिरत कधी ड्रेस, टाॅप, जीन, मेक अपचं सामान असं किरकोळ खरेदी करून घरी येऊ.. घरी आल्यावर स्विगीवरून मागवलेलं जेवणं जेऊन घेऊ.. रात्री मग मी माझ्याआईला फोन करेन त्यावेळी तू वाॅशिंग मशीन लाव नि दिवसभराची पडलेली दोन चार भांडी तेव्हढी घासून काढ… आईशी फोन वरचं बोलणं झालं कि मग दोघं मिळून काॅटवरचं बेडशीट बदलुन झोपी जाऊया… जानू तू सकाळी एकदा ऑफिसला गेल्यावर घर मला खायला उठतं बघ… चैन कसली पडत नाही.. इतकं बोर होतं म्हणून सांगू.. टि. व्ही. वरच्या सगळ्या सिरियल्स नि मोबाईल वरचे नेटफ्लिक्स, प्राईम, च्या वेब सिरीज बघून देखील कंटाळा दूर होत नाही.. वेळ जाता जात नाही.. मग घरातलं कुठलचं काम करायचा मुड लागत नाही.. मग तू येण्याची आतुरतेने वाट पाहत बसते… घरातलं पडलेलं काम तसच टाकून देते.. ऑफिसमधून तू घरी आल्यावर तु हि कामं न सांगता करणारच हा माझा विश्वास असतो… कारण आपल्या खऱ्या प्रेमाची तर ती ओळख आहे…
सगळ्यांनीच काही शहाजहानसारखा मुमताजसाठी बांधलेल्या सारखाच ताजमहाल बांधायला हवा असं नाही.. तर अगदी घरची धुणी भांडी, झाडू पोछा आपल्या बायको च्या प्रेमाखातर इतकं केलं तरी पुरेसे आहे… दुसऱ्याला आनंद देण्यात खरा आनंद आपल्यालाच मिळतो.. नाही का?. मग जानू माझ्यासाठी तुझ्या लाडक्या सुधासाठी छोटीशी मदत करणार नाही का… मग मी दरवर्षी वट सावित्रीच्या पूजेच्या वेळी सात जन्मच काय जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून मागून घेईन नि दोन तासाचा उपवास करीन… आपल्या माणसासाठी ईतकं तरी मला करायलाच हवं नाही का. ?.. मगं शेजारचे पाजारचे, सगेसोयरे आपल्यावर जळफळतील.. म्हणतील क्या रब ने बनायी जोडी…! ”
(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला बदली झाल्याची ऑर्डर आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात!त्या त्या वेळचे माझी कसोटी पहाणारे क्षण, त्या क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा त्यावेळी अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता, आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं त्या क्षणी नजरेसमोरुन सरकत गेलं. या सगळ्या घटीतांच्या रूपाने ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत असायचा!) – इथून पुढे –
महाबळेश्वरमधला माझा जुलै ८४ ते एप्रिल ८७ दरम्यानचा कार्यकाळ, तिथली यशस्वी कारकीर्द आणि आधी उल्लेख केलेल्या सर्व अकल्पित घटनांमुळे माझ्यासाठी यशदायी, आणि अविस्मरणीय ठरलेला आहे. तिथून माझी बदली अपेक्षित होतीच पण मला पोस्टींग मिळाले ते मात्र अनपेक्षित! जणूकांही माझं दर पौर्णिमेचं दत्तदर्शन विनाविघ्न घडत रहावं म्हणूनच झाल्यासारखं माझं पोस्टींग पुणे, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा अशा कुठल्याही दूर, गैरसोयीच्या ठिकाणी न होता, मी आवर्जून तशी विनंती न करताच माधवनगर ब्रॅंचला झालं!
ही बदली/पोस्टींगच नव्हे तर त्यानंतरच्या संपूर्ण सर्व्हीस-लाईफमधली सगळीच पोस्टींग्ज आणि प्रमोशन्सही माझ्या आयुष्यातल्या त्या त्या वेळी चमत्कार वाटाव्यात अशाच अनपेक्षित कलाटण्या होत्या! प्रत्येकवेळी श्रीदत्तकृपेचं सुरक्षाकवच म्हणजे काय याची नव्याने प्रचिती देणारे ते अनुभव म्हणजे माझ्या आठवणींमधला अतिशय मौल्यवान असा ठेवाच आहेत माझ्यासाठी!
आता लगोलग महाबळेश्वर सोडायचं म्हणजे आधी आरतीच्या शाळेतील नोकरीचा राजीनामा देणं अपरिहार्य होतं. तसं तिने त्याच दिवशी मुख्याध्यापकांना सांगूनही ठेवलं होतं. अर्थात कधीतरी हे होणारच होतं हे त्यांनीही गृहीत धरलेलं होतं. त्यामुळे त्याक्षणी त्यांच्या दृष्टीने ते अनपेक्षित असलं तरी त्यात फारशी कांही तांत्रिक अडचण यायचा प्रश्न नव्हताच. तरीही तिथलं शैक्षणिक वर्ष मेअखेर संपत असल्यामुळे तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्रश्नच नव्हता. पण आमच्या तातडीने महाबळेश्वर सोडण्यामुळे विद्यार्थ्यांचा राहिलेला पोर्शन पूर्ण करणे आणि त्यांची वार्षिक परीक्षेसाठीची पूर्वतयारी करून घेणे ही महत्त्वाची कामे अर्धवट रहाणार होती. त्यामुळेच मुख्याध्यापकांनी ‘जून अखेरपर्यंत तरी तुम्ही काम करावे आणि मग राजीनामा द्यावा’ अशी विनंती केली. हे आमच्या दृष्टीने थोडं गैरसोयीचं होणार असलं तरी ते नाकारणं योग्यही नव्हतं. त्यामुळे फॅमिली शिफ्टिंग महिनाभर पुढे ढकलून ते जूनमधे करायचं असं ठरवलं आणि एप्रिलमधे मी एकटाच माधवनगरला जाऊन ब्रॅंचमधे हजर झालो.
अर्थात हा निर्णय केवळ कर्तव्यापोटी आणि कोणत्याही नफा-नुकसानीचा विचार न करता आम्ही मनापासून घेतला होता हे खरं, पण या सर्व घटना याच क्रमाने घडण्यात आमची नकळत का होईना पण खूप मोठी दीर्घकालीन सोय आणि फायदा लपलेला होता याचा अनुभव पुढे लगेचच आला. परमेश्वरी कृपाच वाटावी असं ते सगळं आपसूक आणि अचानक घडत गेलं होतं! त्या पुढच्या सगळ्याच घटनांचा शुभसंकेतच असावा अशी एक घटना मी माधवनगरला चार्ज घेतला त्या पहिल्याच दिवशीच घडली!!
मी शाळकरी वयात किर्लोस्करवाडीला असताना श्री. भ. रा. नाईकसर आम्हाला ‘किर्लोस्कर हायस्कूल’मधे मुख्याध्यापक होते. बाबांच्या निवृत्तीनंतर किर्लोस्करवाडी सोडून आम्ही साधारण १९६७-६८ मधे माझ्या कॉलेजशिक्षणाच्या सोयीसाठी मिरजेला रहायला आलो होतो. त्यामुळे नंतरची सलग २२-२३ वर्षे आमचा सरांशी संपर्कच राहिला नव्हता. मी माधवनगरला जाॅईन झालो त्या पहिल्याच दिवशी मी मस्टरवर सही करण्यापूर्वीच ‘मे आय कम इन सर’ म्हणत, हातात बचत खात्याचा अकाउंट ओपनिंग फॉर्म घेऊन भ. रा. नाईकसर माझ्या केबिनच्या दारात उभे राहिले! मी मान वर करुन पाहिलं न् सरांना पहाताच अदबीने उठून उभा राहिलो.
“सर, तुम्ही.. ?” मी आश्चर्याने विचारलं.
“तू.. तू.. हो.. लिमये.. अरविंद लिमये.. हो ना?” त्यांचा अनपेक्षित प्रश्न!
“हो सर.. या.. बसा ना सर” मी शिपायाला बोलावून पाणी आणायला सांगितलं.
“सर, तुम्ही इतक्या वर्षांनंतर भेटूनही मला नावासकट कसं काय ओळखलंत?” मी विचारलं.
“तुला पहाताच कशी कुणास ठाऊक मला तुझ्या बाबांची आठवण झाली आणि मी तुला ओळखलं. त्यांना आणि त्यामुळेच तुम्हा भावंडानाही मी विसरलो कुठे होतो?” ते म्हणाले.
माझ्या बाबांबद्दल सरांच्या मनात किती आदर होता हे आणि त्यामागचे ऋणानुबंधही सरांशी नंतर सातत्याने होणाऱ्या भेटींमधील गप्पांमधून मला प्रथमच समजले होते.
योगायोग असा की या ब्रॅंचमधला माझा तो पहिला दिवस हाच सरांचा त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकीर्दीतला अखेरचा दिवस होता! माधवनगरच्या ‘शेठ रतिलाल गोसलीया हायस्कूल’ मधून सर त्याच दिवशी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होणार होते. त्यांचे पेन्शन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे अनिवार्य होते आणि जवळची बँक म्हणून सर त्यादिवशी सकाळीच आमच्या बँकेत आले होते. नॉर्मल रुटीननुसार सर परस्पर खाते उघडून बाहेरच्या बाहेर गेलेही असते, पण खात्यावर त्यांना ओळखणाऱ्या एखाद्या खातेदाराची सही आवश्यक होती ज्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे काऊंटरवरील क्लार्कने त्यांना सांगितल्यामुळे त्यांची अडचण दूर करायची विनंती करण्यासाठी सर माझ्या केबीनमधे आले होते. मी इन्ट्राॅड्युसर म्हणून स्वत:च त्या फाॅर्मवर सही केली आणि तो फाॅर्म न् पैसे शिपायाकडे देऊन त्याला नवीन खात्याचे पासबुक तयार करुन आणायची सूचना दिली.
गोष्ट तशी अगदी साधीच पण त्या क्षणाचा विचार करता सरांच्यादृष्टीने अतिशय मोलाची. मी पासबुक त्यांच्या हातात दिलं तेव्हा त्याकडे ते क्षणभर अविश्वासाने पहातच राहिले.
“तुझे कसे आभार मानावेत तेच समजत नाहीये” ते म्हणाले.
“आभार कशाला मानायचे सर?तुम्ही आशिर्वाद द्यायचे”
सर समाधानाने हसले. माझे हात अलगद हातात घेऊन त्यांनी मला थोपटलं. म्हणाले, “इथे तुझी भरभराट होणाराय लक्षात ठेव. बघशील तू. माझे आशिर्वाद आहेत तुला…!”
त्यांचे अतिशय प्रेमाने ओथंबलेले ते शब्द ऐकले आणि मला माझे बाबाच आशीर्वाद देतायत असा भास झाला… !
सरांनी मनापासून दिलेल्या आशिर्वादाचे ते शब्द सरांच्या मनातल्या तत्क्षणीच्या भावना व्यक्त करीत होते हे खरेच पण त्याच शब्दांत नजीकच्या भविष्यकाळात घडू पहाणाऱ्या अनेक उत्साहवर्धक घटनांचे भविष्यसूचनही लपलेले होते याचा प्रत्ययही मला लवकरच येणाराय याची मात्र मला त्याक्षणी पुसटशीही कल्पना नव्हती.. !!
आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 50 60 वर्षे मागे भूतकाळात गेले. असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला. राव काय दिवस होते ते. माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख !
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्री हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत.. मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे. त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे.
आम्ही कुठे कुठे जायचो. कसेही कुठेही बसायचो. रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून, अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो. त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.
प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची. गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लेडीज बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण जेन्टस नेहमी अपोझिट साईडला. त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर, खडीवर बसून बघावे लागायचे. ती खडी टोचायची. जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे. सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे. त्यांना टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा.
त्यावेळी. सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे, मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो. एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे. ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.
सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर. इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.
केश्तो, असितसेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल. वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.
मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर राजा गोसावी निळू फुले सूर्यकांत रमेश देव अशोक सराफ दादा कोंडके रवींद्र महाजनी सीमा चित्रा रेखा जयश्री गडकर रंजना उमा यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे, दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉप कॉर्न ला येणार नाही. आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विश्वेश्वरैयायांचेवंशज… — लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे ☆
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं स्मरण करतो.
या निमित्ताने आजवर अनुभवलेल्या.. विश्वेश्वरैया यांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.
(१)२०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं.
परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता. पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डान मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.
याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती… फिरोजमोमीनहातोअवलिया.
(२) विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना.. ” ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का ?” असा टोमणा त्यातील एकाने मारला.. त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.
पुढे त्यांनी किमान जवळपास ५० नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.
१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time याने इचलकरंजीमध्ये १२ सेकंदात बसवून दाखवलं.
(३) युरोपमध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी तो महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरांना एका लोहाराच्या पालावर नेलं.. पणशीकरांनी अगदी अनिच्छेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला, जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.
किर्लोस्करांनी डिझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हा या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला, जो डिझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.
(४)उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एक तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत, वस्त्रोद्योग, ऊर्जा, महामार्ग, बांधकाम यासारख्या क्षेत्रात त्याने आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.
(५) सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक, मुंबईतील माझगाव डॉकवर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे.
२०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हेआहेतमुंबईतील DAS Offshore चेश्रीअशोकखाडे….
आणि DAS चाफुल्लफॉर्मआहे – दत्ता, अशोक, सुरेश.
(६) टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा एस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २. ५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५, ००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…..
२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service, मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.
आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे आहे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये यांचं नाव अग्रक्रमावर येतं.
आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मूळचेरहिमतपूरचेआणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनिअरअसणारे BVG म्हणजेचभारतविकासग्रुपचेसंस्थापकश्रीहणमंतरावगायकवाड —-
— या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.
सीतामातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला रामसेतू म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू उभारला…. त्याला “ सीता सेतू “ म्हणूयात का?
दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली… शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सकाळी ही बातमी इतरांना समजली. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते. या गावांच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले.
या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजरसीताअशोकरावशेळके या शूर महिलेकडे. या सीता ‘माई ‘ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजीनियारींग कॉलेजमधून त्यांनी (मेकॅनिकल)अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली. त्यांना अंगावर अभिमानाची, अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी घालायची होती. म्हणून आधी त्यांनी आय. पी. एस. होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरूच होते. तिस-या प्रयत्नात त्या एस. एस. बी. परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नई मध्ये. ना प्रदेश ओळखीचा ना भाषा. परंतु सीतामाई डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला. व मद्रास इंजीनियरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत.
मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत ३६ तास पावसात, चिखलात उभे राहून काम केले. आपले सारे शिक्षण, ज्ञान, लष्करी प्रशिक्षण पणाला लावले. जवानांना त्या थंबी म्हणजे भाऊ म्हणतात! त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ १६ तासांमध्ये हा १९० फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला. या कामाच्या वेळी प्रचंड पाउस सुरू होता. पुराचे पाणी वाढत होते. मेजर जनरल व्ही. टी. थॉमस हे प्रमुख अधिकारी होते. मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते. प्रमुख सर्वत्र चिखल, पुराचे वाढते पाणी, बघ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण. सत्तर पैकी एकाही जवानाने तीन मिनिटांपेक्षा जास्त विश्रांती घेतली नाही, की आपले भिजलेले, चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही. जेवण, झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्यादिवशी गायब झाले होते…. निसर्गाशी त्यांची लढाई सुरू होती… Indian army never gives up! … १९० फूट लांबीचा, पुरेशा रुंदीचा, अवजड वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार झाला होता… मदतकार्य जोमाने सुरू होऊ शकले !
☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
… लाखो जीव घेणार्या क्रूर “हिटलरने” शेवटी आत्महत्या केली !.
सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे “स्वामी विज्ञानानंद” मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे “ भैय्युजी महाराज ” आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही “सुशांत सिंग राजपुतनं” नैराश्यातून आत्महत्या केली.
आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या “शीतल (आमटे) करजगी” आपलं जीवन संपवतात.
आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या डोक्यावर सुमारे १८० कोटी रुपयांचे कर्ज झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.
– – या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातून काय शिकायचं आपण?……..
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.
माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय.. ? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. “ भैय्यूजी महाराज ” स्वतः एक “ अध्यात्मिक गुरू होते.. परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात – त्याचंही अगदी भैय्यु महाराजासारखं झाले.)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet? …. तर होय.
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outletच दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir
… मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीर रूपी धरण फुटेल की राहील?
मुंबई का तुंबते? कारण पुरेसे outlets राहिले नाहीत
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा….. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट outlet परिवार आणि मित्र!
बघता बघता गणपतीचे दहा दिवस संपत येतात. दरवर्षी गणपती बाप्पा चे स्वागत आपण जोरात करतो आणि दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्याला निरोप ही देतो! “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात गणपतीचे विसर्जन होते. तो पाहुणा गणपती आपल्याला इतका लळा लावतो की त्याचे विसर्जन करताना खूप वाईट वाटते!
कोरोनामुळे गणपती उत्सवावर आलेल्या मर्यादा संपल्या आणि पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात, डॉल्बी म्युझिक मध्ये गणपतीचे आगमन झाले! तसाही माणूस उत्सव प्रिय असतो. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धी दाता गणेश आणि शक्ती स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हीचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्हीचा उद्देश समाजात स्फूर्ती राहावी, जिवंतपणा राहावा, समरसता यावी असाच आहे!
पण अलीकडच्या काळात या उत्सवांना काही वाईट गोष्टींची किनार लागलेली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणूका, सजावटी मधील अतिरिक्त स्पर्धा तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवा दरम्याने होऊ लागल्या.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परमेश्वर तिथे हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटतं!हे आपल्या ला कोरोनाच्या निमित्ताने बघायला मिळाले. अजूनहीघरगुती गणपती बसवतात तिथे गणपतीचे पावित्र्य टिकवले जाते.. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी ही गणेशाचे पावित्र्य रहावे यादृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातात. तरीही
काही वेळा स्वच्छतेसंबंधी गोष्टी लोकांकडून पाळल्या जात नाहीत. महानगरपालिका विसर्जनासाठी विविध ठिकाणी निर्माल्य कुंडआणि विसर्जनासाठी पाण्याचे टॅंक ठेवते, त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर असतो आणि महाराष्ट्रातच काय तर देश परदेशातही त्याचे महत्त्व फार आहे!
दरवर्षी अनंत चतुर्दशी येते, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी! पण काही वेळा हा दिवस अगदी लक्षात राहण्याजोगा गेला आहे,. जसे की लातूर, किल्लारीचा मोठा भूकंप अनंत चतुर्दशीच्या पहाटे झाला, हजारो लोक बेघर झाले, घरे कोसळली, लोक मृत्युमुखी पडले, पण त्या ठिकाणी सर्व समाजाने भरभरून मदत पाठवली. कधी कधी या काळात अतिरिक्त पावसामुळे पूर येणे, गावंच्या गावे पाण्याखाली जाणे यासारख्या घटनाही घडल्या. विघ्नहर्ता गणेशाने अशा काळात लोकांमध्ये एकमेकाबद्दल सहभावना निर्माण केली की ज्यामुळे लोकांना समाजभान आले. कित्येक ठिकाणी अशी संकटे येऊन गेल्यावर उत्सव खर्च कमी करून मदतीसाठी पैसा पाठवला गेला. श्री गजानन अशा गोष्टींना प्रेरित करत असतो असे वाटते..
वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दल चे राग, द्वेष, मतभेद याचे विसर्जन माणूस करतो. यासाठी दुर्वा या प्रतीकात्मक आहेत. दूर्वा किंवा हरळी जशी जमिनीला चिकटून वाढत वाढत जाते, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून हरळी प्रमाणे आपल्या समाज जीवनाचा विस्तार केला पाहिजे. दुर्वांप्रमाणेच चांगल्या भावना वाढीला लावल्या पाहिजेत! शाडू मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो पण ती माती विरघळून जशी पाण्यात तळाशी पुन्हा एकत्र येते, पुढच्या वर्षी नवीन निर्माणासाठी उपयोगी असते. तशीच आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची आणि चांगले निर्माण करण्याची राहण्यासाठी हा गणराया आपल्याला शिकवत असतो!
जाता जाता गणराया आपल्याला किती गोष्टी शिकवत असतो. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. लहान मुलाबाळां पासून सर्वांनाच गणपती बाप्पा जवळचा वाटतो. अलीकडे शाळांमध्ये सुद्धा गणपती स्थापन करतात. त्यानिमित्ताने अथर्वशीर्ष, गणपतीच्या आरत्या आणि काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येते. नकळतच मुलांवर चांगले संस्कार घडतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा काही ना काही कारणाने धार्मिकते बरोबरच समाजाशी ही जोडलेला आहे. गणपतीचा संबंध बुद्धीशी जोडलेला असल्यामुळे सहाजिकच मुलांना बुद्धीदात्या गणपती बद्दल खूप प्रेम असते!
गणपती विसर्जनासाठी उचलल्यानंतर ती जागा रिकामी राहू नये म्हणून त्या जागी एखादे देवाचे पुस्तक ठेवायचे प्रथा आमच्या घरी होती. प्रत्येक गोष्टीबाबत आपल्या पूर्वजांनी इतका बारीक विचार केला आहे याचे विशेष वाटते!
असा हा गणपती बाप्पा विसर्जन करताना सर्वांनाच वाईट वाटते. यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोरभट” म्हणून वाचलेली एक कथा आठवते. त्यातील कथेतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन विषण्ण होत असे. पाट रिकामा घरी येऊ नये म्हणून त्या रिकाम्या पाटावर वाळू किंवा विसर्जनाच्या ठिकाणची माती घरी आणून तो पाट गणपती च्या जागी ठेवण्याची प्रथा आहे…
गणपतीचे विसर्जन म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीला आपण पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेला म्हणजेच पाण्यामध्ये, मातीत रूपांतर करून सोडून देतो. गणपतीचे हे विसर्जन आपल्याला थोडे विरक्त व्हायला शिकवते. या गणपती प्रमाणेच आपल्याला सुद्धा एक दिवस या माती आणि पाण्यात विसर्जित होऊन जायचे आहे, हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव मनापासून होत राहते! अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होताना खरोखरच अंतरीचा उमाळा भरभरून वाहतो आणि आपण म्हणतो, “गणपती बाप्पा मोरया” पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला!”