मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा?”

या शेवटच्या वाक्यात ‘बाहुबली भाग- २ ची बीजे रोवली होती आणी भाग- २ येणार हे नक्की होते.

*”भाई”  वरचा लेख व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यावर* टुकार लेखकाचे कौतुक करायला अनेकजण पुढे आले.  टुकार लेखकाच्या लक्षात आले की भाई- भाग २ ची बीजे पहिल्या लेखात आहेतच की,  मग काय .

लिहायचे निमित्य बाकी काही नाही. (नाहीतर लिहायची हिंम्मत तरी झाली असती का? , आता या टुकार लेखकाला कसे समजवायचे की भाग- १ चीच हवा जास्त होते. २,३ वगैरे कामाचे नसतात. असो ).

तर पहिल्या भागात, भाईं सुनिताबाईंना सांगत होते की बरं झालं अत्रे ढाराढूर झोपले होते नाहीतर सकाळी आपल्याला विडंबन रुपी  गाण्याचा ‘झेंडूच्या फुलांचा’ हार  मिळाला असता.

मंडळी, अत्रे अजिबात झोपले नव्हते बरं का.   त्या दोघांचे बोलणे आचार्यनी सगळे ऐकले.  भाई आणि सुनिताबाईं पुण्याला गेल्यावर “फाॅर अ चेंज” अत्रे भाईंच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी झेंडूच्या फुलांचा हार विणायला घेतला.

चाल:  बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला)

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ….

चिमणा गटणे, साहेब रावा
चिमण्या थेटरात, “म्हैस” थांबवा
चिमणी पोर , घेऊन गाडी
हेल्मेट घालते, आपल्या नव-याला
चिमणं चिमणं “सिंबा” थांबवलं ,त्याही थेटरला

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

शिलेदार ‘महाराष्ट्र भूषण’ माझा, थोर असा साहित्याचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या कलेला .

‘आहे मनोहर तरी’ पसारा, खेळ पाहुनी जीव रंगला
गोजिरवाणी  जुगलबंदी, वाजवितो भाई पेटी गाण्याला
येडं यडं मन येडं झालं पाहून “भाईला”

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावर क्र-१ वरुन सुटणा-या “दख्खनच्या राणीने” आपल्या नियोजीत वेळेत एक शिट्टी जोरात मारून मुंबई कडे झेप घेतली. आज तिला माहित होते की गाडीत अख्या मराठी सृजनांचे लाडके “भाई आणि सुनिता बाई ” विराजमान आहेत. तळेगावत ते लोणावळा धुकं जास्त असल्याने राणीला मुंबईला पोहोचायला थोडा उशीरच झाला पण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर ‘धावपट्टीच्या’ कामासाठी मेगा-ब्लाॅग घेतल्याने भाईंचे पुष्पक थोडे उशिराच सुटणार होतं त्यामुळे काळजीचे काम नव्हतं.

इकडे आचार्य झेंडूच्या फुलांचा हार हातात घेऊन स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी  ‘ भाई’ अजून कसे आले नाहीत म्हणून येरझा-या घालत आहेत.

*पु. ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य,  लाडक्या भाईंना टुकार लेखकाकडून ही लेखनांजली समर्पित* ?

©  श्री अमोल अनंत केळकर

५/१/१९
शनी अमावस्या

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

संध्याकाळची वेळ होती. टेरेवर वनिता फेऱ्या मारत होती. आपण किती चाललो हे पाहण्यासाठी सोबत मोबाईल ही होता. आवडती गाणी ऐकत शांत फिरण्यातील मौज काही औरच होती.तो आनंद घेत असताना मोबाईलची रिंग वाजली. बघते तर भाचीचा होता.ही प्राची पुण्यात जाॅब करते.” हं… बोल प्राचू,काय म्हणतेस?”

“अगं… अतू आज ना… मी मुलगा बघायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली.”

“तूला कसा वाटला तो? काय करतो? कसा दिसतो? कुठे असतो?”

“अगं किती प्रश्न ते? हे बघ त्याचा फोटो आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी तुला सेंट केले आहे.  मग मला कळव. तुला कसा वाटला तो? या बाबत तूच माझी गुरू आहेस बरं. बरं फोन ठेवते, मला एक काॅल येतोय रात्री निवांत बोलू,बाय..बाय..आय लव्ह यू.”

फोन कट झाला.

मनात आले. ही पिढी किती प्रक्टिकल आहे. बरोबर चूक हा भाग पुढचा. ही पिढी उगाच गुंतून पडत नाही. त्रास करून घेत नाही.भाऊ माहिती पाठवतो. मग प्राची पुण्यात नोकरी सांभाळत मुलांना बघते. ते ही एका हाॅटेल मध्ये एकटी जाते. बोलते. विचारांची देवाण घेवाण होते.हे सारं किती सुटसुटीत छान आहे. एका क्षणात माझे मन भूतकाळात गेले. आमच्या वेळी पस्तीस, चाळीस वर्षा पूर्वी घरात मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणजे किती गडबड, किती लोकांची ऊठबस, किती तयारी, किती दमणूक होत असे.

घर स्वच्छ करा, बैठकीची खोली सजवा, ठेवणीतल्या कपबश्या काढा स्वच्छ करून ठेवा, कांद्यापोह्यानची तयारी करा, कांदेपोहे सुधा एकदम स्पेशल. त्यात शेंगदाणे हवेत, बटाटा हवा, खोबरंकोथिंबीर हव, लिंबू,बारीक शेव हवी. किती मिजास असे पोह्यांची. असे गरमागरम पोहे समोर आले की सगळं विसरायला होत असे. एवढ करून ही मुलाला बिधास्त बघता येत नसे. बघण्यांची चोरी. कुठेन तरी लांबून, एखाद्या फटीतून चोरुन बघाच आणि मग अंदाज करत बसायचं यातला नेमका नवरदेव कोण? मुलीला बघताना मुले आपल्या सोबत तीन चार मित्रांना हमखास घेऊन येत, साडी सांभाळत खाली मान घालून बसायचं, चोरट्या नजरेने बघायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हळू आवाजात उत्तरे द्याची. आपली इच्छा असली तरी मुलाला प्रश्न विचारण्यांची हिंमत नसायची. घरातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आधी दटावून ठेवलेले असायचे तुझा शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. तिथं वर तोंड करून काही बोलून आपली अक्कल पाजळू नकोस. खर तर परक्या माणसा समोर जाताना आधी मनात भिती असायची, चारचौघात बोलण्यांची सवय नसायची, मग  काय बऱ्याच वेळा ततपप व्हायच. अश्या वेंधळा मुली लगेच पसंतीला उतयाच्या. पुढे ही मुलगी घरात निमुट वागेल असा अंदाज बांधला जायचा. खर तर बऱ्याच मुलीच्या मनाचा तिथे चोळामोळा होत असे. तिच्या विचारांना फारशी किंमत नसे.ती मिळवती असली तरी ही. घराण्यांची अब्रु जायला नको म्हणून बोलायचे नाही. चांगल्या वळणाची, सुसंस्कृत, शिवणटीपन करणारी, स्वयंपाकपाणी करणारी अशी किती तरी लेबलं चिटकवली जायची. ती मुलगी मात्र मुक. घरच्या पुढे चालत नसे. बऱ्याच वेळा मुलींची फसगत होत असे. दोघांनी भेटून मन समजून घेणे खुप पुढची गोष्ट. पुन्हा एकदा बघण्यांची पध्दत नव्हती, लग्न नंतर समजे तिला आवडलेला मुलगा नेमका मुलाचा मित्र होता. मग काय आलीया भोगाशी असावे सादर. हसतमुख राहून संसार नेटका करावा लागे.

माझ्या बाबतीत तर अजून वेगळे आम्ही पाच भावंडे.दोन बहिणी मोठ्या तर एक छोटी. भाऊ माझ्या पाठीवर.मोठ्या बहिणीना बघायला येणार त्याना त्रास नको म्हणून प्रत्येक वेळी घर आवरण्या पासून पोहे करे पर्यंत सगळं कामे मी करत असे. पोहे इतके बनवले की डोळे बांधून ही आज  बनवेन. पण माझ्या वेळी मात्र घरी कोणीच नव्हते. मीच घर आवरायचे, बैठकीची खोली सजवायचे, पोहे करायचे, साडी नेसून पाटावर बसायचे. किती वेळा पाहुण्याना पत्र व्यवहार ही मीच करे. मी यात एकदम तंज्ञ झाले.

प्राचीमुळे आज इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा मिळाला. आज काल अशी झंझटे नाहीत. हाॅटेल मध्ये सगळं तयार असतं, कसली आवरा आवर नाही, सजावट नाही, कांदेपोहे नाहीत, मनावर दडपण नाही, सगळ कस मस्त मोकळं. मुलामुलीना आपलं मत मांडता येते, एकमेकांना जाणून घेता येते. अडचणी मांडता येतात, हे सारं चांगले आहे. याचा पुरस्कार व्हायला हवा. मुलीनां ही एक व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे दिली गेली पाहिजे. लग्न ठरवताना मुला मुलीचा बाजार होता कामा नये.

आजवर कांदेपोह्यांनी अनेक संसार उभारले, जीवनात आनंद पेरला, आज संकल्पना बदलत आहे. मुलामुलीची बघण्यांची ठिकाण बदलत आहेत. खाण्यांचे पदार्थ बदलत आहेत पण लग्न जुळवण्याचा विषय आला की कांदेपोहे समोर येतातच त्यांचे लग्न जमवण्यात अतूट नाते आहे. आता फेऱ्या मारताना माझ्या समोर हा भूतकाळाचा का उभा राहावा? काही झालं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, नातं दृढय करण्यासाठी काही तरी निमित्त हवं असतं ते निमित्त आजवर समाजाने त्या कांदेपोहे यात शोधले यात त्यांचा काय दोष?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भाई, चला आवरलंय माझं. उशीर होईल  नाहीतर खेळाला पोचायला.

आग सुनिता, थांब एवढ  शेवटचं पान लिहितोय, पण कुठला खेळ ?

काय हे भाई, “भाई” सिनेमाचा पहिला शो.

सुनीता अग या हिंदुस्थानात भाईचा सिनेमा फक्त ईदला येतो. मार्गशिर्ष कृष्ण १४ ला अमावस्येच्या पूर्वसंध्येला  येणारा हा कुठला ‘भाई’ ?

भाई, बास झालं हा माझी फिरकी घेणे.  ज्याने आयुष्यात अनेक अमावस्यां सोसून  मराठी सारस्वताच्या दुनियेत ‘पोर्णीमा’ खुलवली त्या भाईचा म्हणजे तू अर्थात “पुरुषोत्तम  लक्ष्मण   देशपांडे” यांच्या वरचा ‘भाई ‘ सिनेमा.

बरं  बरं. त्या उबेराला  विचार राफेल तयार आहे का?

काय?  भाई कालच्या संसदेतील चर्चा  फारच मनावर घेतलीयस तू? त्या रंभेला सांगून  २०१९  लोकसभा होई पर्यत केबल बंद करायला सांगते.

त्या कुबेराला पुष्पक विमान तयार आहे का असं म्हणायचंय का तूला?

हो. हो  तसेच

भाई, त्यांनी आधीच सांगितले आहे  पुष्पक तयार आहे  तुम्हाला मुंबईकर, नागपूरकर का पुणेकर म्हणून जायचंय?

बघ सुनीता, त्या नागपूर मधील  उणे तापमानातील थंडी काही आपल्याला सहन व्हायची नाही,  १२ अंश तापमानाला गिरगावकर, पार्लेकर, डोबिवलीकराना जणू इकडे काश्मीर, महाबळेश्वर अवतरलं असे वाटत असलं तरी तिकडे मराठी सिनेमा कुठे लागला आहे हे हुडकण्यात आपला वेळ जाईल

*तेव्हा आपले पुणेच बरे*

माझ्या मनातलं बोललात भाई

अग  सुनीता तो बघितलास का अंतू बर्वा, ‘ बटाट्याच्या चाळीत ‘  कुठली स्कीम घेऊन गेलाय. ‘असामी असामी’  व ‘अपूर्वाई’ पुस्तक घेतल्यास  ‘भाई’  सिनेमाचे एक तिकीट  मोफत असं ओरडत सुटलाय

अमॅझीग  ना भाई?

नाही सुनीता कलियुगात त्याला ‘अमेझॉन’ का काय म्हणतात ?

घ्या आता  हेच बघायचे राहिले होते मी म्हणतच होतो ‘सखाराम गटनेने’ अजून ‘व्हाट्सअप वर’ चारोळी कशी पाठवली नाही ते. बघ काय म्हणतोय तो :-

हेल्मेट सक्तीने पुण्यात

सगळ्यांना आली ‘फिट’

अन ‘भाई’  ऐन हिवाळ्यात

एकदम होणार ‘हिट’

आपलाच  – सखाराम गटणे

चितळे मास्तरांनी तर आज शाळेच्या मुलांना सहलीला नेतो म्हणून ‘भाई’ दाखवायचं ठरवलं आहे, बरं का सुनीता

भाई  किती प्रेम आहे तुझे तुझ्या या पात्रांवर आणि त्यांचे तुझ्यावर. आता फक्त एवढे सांगू नकोस की ती  रत्नागिरी  – मुबंई बसच्या वाटेत हातखंब्याला आडवी आलेली

“म्हैस”  कोथरूडला सिटीप्राईडचा प्रागंणात रवंथ करत लाडक्या ‘भाईची’ वाट बघतेय आणि  तिने दिलेल्या शेणाच्या  गोण्यांची शेकोटी करून ‘नाथा कामत’, नंदा प्रधान, अण्णा वडगावकर, नामू परीट, गजा खोत, रावसाहेब तिकीटाच्या रांगेत उभे आहेत.

?

अगदी बरोबर सुनीता, आणि तो नारायण  तिकीटाच्या रांगेत स्वतःच्या नावाचा दगड ठेऊन, सगळ्यासाठी पॉपकॉर्न रूपी लाह्या फुटाणे आणायला पळालाय.

किती चेष्टा करशील  सुनीता तू माझी, हे काय वय आहे का? आपण स्वर्गात आलोय आपण आता पुण्यात नाही आहोत. काल रात्री झोपेत काय गाणं बडबडत होतीस माहीत आहे?

‘भाई भाई, व्यक्ती वल्लीचा, कसा सिनेमा घडला, बाई बाई’

नशीब ‘आचार्य अत्रे’ बाजूला ढाराढुर झोपले होते नाहीतर आज काळी पूर्ण गाण्यांसह

‘झेंडूच्या फुलांचा’ हार गळ्यात पडला असता आपल्या

भाई, ते जाऊ दे. चला ना जरा लवकर निघून मस्त  पर्वतीवर जाऊन सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊ.

मी तर म्हणतो सुनीता  एक दिवसाची रजा टाकू स्वर्गात. तू म्हणतीस तसे पर्वतीवर जाऊ, सारसबागेत जाऊन स्वेटर घातलेल्या बाप्पाचे दर्शन घेऊ, सिनेमा बघू, आणि हो  तुझ्या मनातले

तुळशीबागेत संध्याकाळी जाऊ, सर्व देव -गणांसाठी  चितळ्यांची अंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊ  आणि *सगळ्यात महत्वाचे* रात्री मुक्कामाला डेक्कनला  “मालती – माधव” मधै जाऊन  त्या चोराने पुस्तकाचा घातलेला पसारा आवरु  अन सकाळच्या

आपल्या लाडक्या  ‘दक्खनच्या राणीने’ मुंबई पर्यत जाऊ.

परतीचे  पुष्पक विमान  मुंबई हुन  सोडण्याची विनंती करायला भाई  चित्रगुप्तां कडे गेले. पाठमो-या भाईंकडे पाहताना सुनीता ताईंना त्यांचे गुणगुणे  ऐकू आले

हृदयांबुजी लीन लोभी अली हा !

मकरंद ठेवा लुटण्यासी आला  !

बाधी जीवाला सुखाशा मनी !!

*मर्म बंधातली ठेव ही* !!!

*भाई, खूप खूप शुभेच्छा*

 

©  श्री अमोल अनंत केळकर

३/१/१९

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वप्न हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. ते जागेपणी बघितलं तर ते एखाद्या चित्रासारखं, रांगोळी सारखं माणूस  त्याला हवं तसं रेखाटू शकतो. त्यांत मनासारखे  रंग भरु शकतो. क्षणभरासाठी का होईना कृतकृत्य  होतो.

एखादी अल्लड तरुणी परीकथेतील राजकुमारला साद घालून स्वप्नात बोलावते. किंवा एखादा जेमतेम सुमार असलेला तरुण त्याच्या  समोर राहणारी सुंदर तरुणी आपली जीवनसाथी झाल्याचे स्वप्न  रेखाटतो.एखादा देवानंद आपल्या प्रेयसी बरोबर संसाराचे स्वप्न रंगवतो. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है….

एखादं नवदांपत्य, त्याना नुकतीच बाळाची चाहूल लागते.मग त्यांचा स्वप्नाचा चलत् चित्रपट चालू.आपल्याला मुलगा होणार का मुलगी, मग त्या बाळाचे नाव काय ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे.मग त्याला/तिला कोण बनवायचे? वडिलांचे एक मत तर आईचे दुसरेच मत.मग त्यावर गोड वादविवाद. मग ती मुलगी झाली तर तिला शिकवायचे,लाडाकोडात वाढवायची आणि दुस-याला द्यायची. ह्या कल्पनेनेच आताच डोळ्यांत पाणी.म्हणजे स्वप्न बघायला आणि ते किती काळापर्यंत त्याला मर्यादा नसते.

“मला ना सिनेमा, नाटकात काम करायची लहानपणापासून खूप इच्छा होती. पण आमचे आजीआजोबा  जुन्या वळणाचे त्याना पटलं नसतं म्हणून माझंअपुरं लिहिलेलं स्वप्न आता मी माझ्या मुलीकरवी पूर्ण करणार”. मग त्या मुलीला त्याची आवड आहे का? तिचा कल तिची,कुवत आहे का? ह्याचा विचार

न करता आईचं स्वप्न पूर्ण मुलीच्या करवी करायच्या अट्टाहासापायी त्या मुलीवर लादायचे. त्या मुलीच्या स्वतःच्य स्वप्नाची राखरांगोळी होते.तिला काही ध्येय रहात नाही.हे लक्षात घ्यायचे नाही.फक्त आपली स्वप्नपूर्ती. अशा कित्येक मुलांना हेच सहन करावं लागतं. मनाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत धावावं लागतं केवळ आईवडिलांची स्वप्नपूर्ती. जी ते त्यांच्या वेळी करु शकले नाहीत.एखाद्याचे भाषेवर प्रभुत्व असते.आवड असते. पण आई,वडील डाॅक्टरी पेशात म्हणून त्याला विज्ञान शाखेला जायची सक्ती. मग काय डाॅक्टर तर दूरच पण कम्पौडरच्या पण लायकीचा न रहाता गटांगळ्या खाऊन नैराश्याच्या गर्तेत पडतो.

काही माणसे एखादं स्वप्न बघतात आणि मग ते सत्यात उतरवायला पाठपुरावा करतात.यशस्वी होतात.म्हणून स्वप्न नेहमी मोठी बघावी.आणि ती पूर्ण करण्यासाठी झटावं.हीच यशस्वी जीवनाची किल्ली आहे.

रात्रीची स्वप्न मात्र बेभरवंशाची.कधी आपल्या मर्जीची,कधी मनाविरुद्ध. कधी मनाला पटणारी,हवीहवीशी वाटणारी, संपूच नये कोणी झोपेतून उठवू नये.असं वाटणारी.तर कधी भयानक,कल्पना शक्ती च्या बाहेरची घाबरवणारी. घाम फुटवणारी, जाग आल्यावर ‘चला स्वप्न होते, सुटलो म्हणून आनंदी करणारी.

काही स्वप्न इतकी छानच असतात कि देवाघरी गेलेले आपले आईवडील, किंवा अन्य कोणी परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही,बोलू  शकत नाही ते स्वप्नात येऊन खूप वेळ आपल्याशी पूर्वीसारख्या च गप्पा मारतात. आताशा व्हिडिओ काॅल करुन दूर अंतरावर  असलेल्या आपल्या मुलाला आईवडील पाहू शकतात बोलू शकतात. पण पूर्वी ही सोय नसल्याने स्वप्नात आलेल्या मुलाला बघून समाधान मानायचे.कधी जागेपणी  आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर त्याच्या विवाहाचे स्वप्न रंगवायचे.कधी हे स्वप्न पूर्ण ह्वायचे  तर कधी तो परस्पर ठरवून नमस्काराला येऊन ह्यांचे स्वप्नभंग करायचा.

कलियुगात माणूस  आपल्या स्वप्नाचा सोईस्कर नेहमीप्रमाणे  अर्थ लावतो. सोडून देतो.पण त्रेतायुगात स्वप्नात दिलेल्या वचनाला जागण्यासाठी सत्यवादी हरीश्चंद्राने स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

आपण सारखा जो विचार करतो त्याचच झोपल्यावर स्वप्न पडते. कधी त्यामुळे  इच्छापूर्ती होते,कधी विरस होतो.

स्वप्न कोणी कसलेही बघावं म्हणजे तो बघू शकतो त्याच्या मर्जीनुसार.त्याला पैसा लागत नाही.स्थळ,काळ,वेळाचं बंधन नसतं.कोण व्यक्ती आपल्या स्वप्नात यावी, कोण नको हे पण स्वातंत्र्य असते.एखादा कंगाल माणूस स्वप्नात स्वर्गात रंभा,उर्वशी बरोबर विहार करतो तर एखादा क्रिकेटवीर गावस्कर, तेंडुलकर बरोबर स्वप्नांत खेळू शकतो.एखाद्या देवभोळ्या माणसाला विठू भेटतो.

! मनी वसे ते स्वप्नी दिसे !

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले

☆  विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

यंदा दिवाळीत बायकोला for a change फ़राळ ‘खाण्यासाठी’ नव्हे तर ‘बनवण्यासाठी’ मदत करावी असे ठरवले होते. खार्‍या शंकरपाळ्याला मदत कर असे बायकोने सुचवले. ह्याचे कारण असे सांगण्यात आले की ह्या पदार्थाला शक्ती जास्त आणि कौशल्य कमी लागते. ह्या निकषावर माझी निवड होणे थोडे मानहानिकारक असले तरी त्यामुळे हिरमुसून न जाता अब्राहम लिंकनने एका रस्ता झाडणार्‍या कर्मचार्‍याला सांगितलेले वाक्य मी मनामध्ये स्मरले. लिंकन साहेब त्याला म्हणाले होते की “रस्ता पण असा स्वच्छ कर की पाहणार्‍याने म्हणावे, “वा, रस्ता काय छान झाडलाय!”

उत्साहाने पोळपाट-लाटणे घेऊन अस्मादिक फ़रशीवर ठाण मांडून बसले. मैदा मळून त्याचा गोळा मला सुपूर्द करण्यात आला. पहिल्यांदाच मैदा लाटत असल्याने एक छोटा गोळा बाजूला काढून दोन्ही हाताने मळून चकती करून लाटायला घेतला. कणकेपेक्षा मैद्याला थोडा जास्त जोर लागतोय असे जाणवले. एकदम परफ़ेक्ट गोल लाटून बायकोला चकित करावे असा माझा प्लान होता. त्यामुळे थोडा हलक्या हात वापरत होतो. पण गोल हा एकमेव आकार सोडून इतरच भलतेसलते आकार त्यामधून उदयास येऊ लागले, उदा. अमीबा, पॅरॅमॅशियम, हत्ती, डायनासॉर, भारताचा नकाशा इ.इ. एकदा तर चीनी ड्रॅगन मला वाकुल्या दाखवू लागला. ह्यावर मात्र माझे देशप्रेम उफ़ाळून आले आणि मी ताबडतोब ती पोळी त्वेषाने गोळामोळा करून पुन्हा लाटायला घेतली. पहिली पोळी लाटून बायकोला दाखवल्यावर ती म्हणाली “अरे किती जाड लाटलीस, जास्तीत जास्त पातळ लाट ना!” असे म्हणून थांबली नाही तर तीच पोळी स्वत: ५० टक्क्याने वाढवून दाखवली. “तुला शिकवण्यापेक्षा ना, मीच लाटले तर काम लवकर होईल!” असे कुणीतरी पुटपुटले परंतु हे वाक्य मी ऐकून न ऐकल्यासारखे केले.

नंतर कातण्याने त्यावर पटापट उभ्या-आडव्या रेषा मारायला शिकलो. हे मात्र काम सोपे आणि मजेशीर वाटले. पण इथे उलटी समज मिळाली की हलक्या हाताने कातण फ़िरवावे म्हणजे पोळपाटापासून विलग करायला त्रास पडत नाही. बायकोने मी काढून दिलेले शंकरपाळे तळायला घेतले. आसमंतात छान सुवास दरवळायला लागला. सुरवातीच्या चुकांनंतर जरा वेग पकडता आला आणि साधारण दीड तासानंतर सर्व शंकरपाळे तयार झाले.

दिवाळीत पाहुण्यांना फ़राळ देताना बायकोने माझ्या नावाचा कवतिकाने उल्लेख केल्यामुळे अस्मादिक धन्य-धन्य जाहले!!?

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆  वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

वर्क फ्रॉम होम, ही कनसेप्ट आता साऱ्या जगभर दुमदुमते आहे. या बाबतीत कुणाला काही माहिती नाही असे नाही किंबहुना त्याचे महत्व ही आता सगळ्यांना पटायला लागले आहे. अर्थात हे काम इंजिनियर्स, टिचर्स. ऑफीस  वर्कर्स यांच्याच साठी अॅप्लिकेबल आहे असेच मानले जाते.

पण खरं सांगू का? शतको न शतके आपल्या संर्वांच्या घरातील महिला, गृहिणी वर्क फ्रॉम होम करतच आल्या आहेत. पण त्यांच्या कामाची, कष्टाची कोणीही दखल घेतली नाही. अन् घेतली जाणार ही नाही. घरीच असते म्हणजे घरातील कामे तिचीच असेच गृहीत धरले जाते. ती कामे करताना ती किती दमून जाते याचा कोणी विचारच करत नाही. ऑफीसचे काम घरामधून केले की निदान त्याचा रिटर्न पगाराच्या रुपामध्ये मिळतो. बँक बॅलेन्स वाढत जातो. एक प्रकारे मानसिक शांतता ‘ ऊ ब, समाधान नकीच मिळते. मात्र गृहिणी ना तेवढा आधारही नाही. पगार वाढ करा म्हणून संप करू शकत नाहीत की हौसेनं एखादी वस्तू मनात आले म्हणून घेऊ शकत नाही.

काही वर्षापूर्वी मलेशियाला जाण्याचा, तिथे रहाण्याचा मला योग आला होता. तेव्हा तिथल्या मित्रांना यांनी घरी जेवायला बोलावले होते. आपल्या पद्धती प्रमाणे मी जेवण वाढत होते. साधे मीठ वाढले, भांड्यात प्यायला पाणी घातले तरी ते प्रत्येक वेळी ‘ थँक्यू ‘ म्हणत होते. पहिल्यांदा ते थँक्यू ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यात पाणी जमायचेच बाकी राहिले होते. मला आपल्या सगळ्यांच्या घरातल्या आई, आजी काकू, मावशी, आत्या सगळ्या सगळ्या आठवल्या. आयुष्यभर संसाराचा रामरगाडा ओढला तरी एकदाही तिला ऐकायला मिळाला नसेल ‘ धन्यवाद’ शब्द !

अर्थात आपल्या कडे तशी अपेक्षा नाही आणि प्रथा तर नाहीच नाही. पण घरातल्या कोणीतरी मनापासून दखल जरी घेतली तरी तिला आणखीनच काय करण्याचा उत्साह येतो. पण गृहीत धरणे हे आपल्या कडे रुटीन असल्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष्य जात नाही.

असे दुर्लक्ष्य फक्त महिलांचे होते असेही नाही. पूर्वी एकत्र कुटुंब काळामध्ये मोठ्या व्यक्तिचा घरावर दरारा असायचा, दबदबा असायचा. त्याचाच लहान भाऊ किती जरी कर्तबगार असला, तरी त्याचे एका शब्दानेही कौतुक होत नसे. त्याची दखलही घेतली जायची नाही. हे कुणाच्या लक्षातही यायचे नाही.

आजच्या वर्क फ्रॉम होम मुळे निदान सर्वांना गृहिणीचे अस्तित्व, कर्तृत्व अन् महत्व समजायला लागले आहे असे आपण आनंदाने मानूया.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

 ☆  विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे ☆ 

फोडणी वरती कधी लेख लिहावा लागेल असे वाटले नव्हते.. चार दिवसांपूर्वी शेवटची अपॉइंटमेंट आणि गप्पिष्ट रुग्ण असा योग जुळून आल्याने ‘खाण्यावर’ गप्पा रंगल्या होत्या. लॉकडाउन मधे अनेक निरनिराळे ‘ट्रेंड’ आले. लोकांनी फावल्या वेळात अनेक पदार्थ करून पाहिले. विविध पदार्थानी सोशल मीडिया सजला. आपण घरी जिलेबी, खारी, ब्रेड, पफ-पेटीस असे पदार्थ करू शकतो असा आत्मविश्वास अनेकांना आला. सर्वांच्या कष्टाचे आणि हौसेचे अभिनंदन! रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग फोडणी हे शास्त्र आणि कला मात्र अस्तंगत होत आहे असे सामान्य निरीक्षण आहे ! त्यावर थोडे मत प्रदर्शन.. चुकून कोणाला ठसका लागला कोणाला उचकी लागली तर जमल्यास मला माफ करावे!

हिंदुस्तानची ओळख ‘मसाल्यांचा’ देश अशी होती. आजही आहे. दक्षिणेत मसाल्याचे पदार्थ फार उत्तम पद्धतीने वापरतात. ठराविक प्रमाणात वापरतात. आपल्याकडे आताच्या पिढीला मसाल्याचे पदार्थ एकतर सगळे ठाऊक नसतात. असले तर ते कोठे, का आणि कसे वापरायचे याची माहिती नसते. खरं सांगू.. आजीबाईच्या बटव्यात कधी त्रिभुवनकीर्ती, सूतशेखर, सितोपलादी, चंद्रप्रभा नव्हतेच. तिला यांची कधी गरजच लागली नाही. जिरे, मिरे, हिंग, ओवा, ओव्याची पानं, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जिरे, शहाजिरे, वेलदोडा, मोठा वेलदोडा -मसाला वेलदोडा, जायफळ, धने, जावित्री, कसुरी मेथी, सुके खोबरे, मेथी, आमचूर, बडीशेप, मोहरी, काकडी बी, भोपळा बी, आवळकाठी, लसूण, चिंच, कोकम, खसखस, सैंधव, शेंदेलोण, पादेलोण, काबाबचिनी, केशर, सुंठ, चक्र फुल, हळद, तीळ, डिंक, खडीसाखर हा आजीबाईचा बटवा आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्यात औषधी कल्प घातले आणि आजीबाईच्या नावाअडून ‘बिन डिग्री फुल अधिकरी’ हातचलाख्या सुरु केल्या. असो !

आजीबाईचा बटवा आणि त्यातील शास्त्र स्वयंपाकघरात खुलतो. आम्ही अन्न हे “महा भेषज” – सर्वोत्तम औषध असे म्हणतो त्याचे मूळ फोडणीत असते. टोमॅटो प्युरी मधे नाही ! सध्या सगळेच पदार्थ टोमॅटो प्युरी मधे करायची घाणेरडी सवय रुळली आहे. हॉटेल असो किंवा घर अशा प्युरी चे डबे फ्रिज मधे तयार असतात. टोमॅटो प्युरी भाजीचा ‘बेस’ असो म्हणे ‘बेस’! अतिशय अयोग्य आणि अशास्त्रीय पद्धतीने आपल्या आरोग्याचा बेस बिघडवला आहे हे नक्की! टोमॅटो हिंदुस्तानात पोर्तुगीजांनी आणला १६ व्या शतकात. त्याच्या आधी अत्यंत चविष्ट, शास्त्रीय हिंदुस्थानी खाद्याचा ‘बेस’ काय होता ?? आजकाल कांदे पोहे मसाला पासून मिसळ मसाला याची पाकिटं मिळतात. पाकीट फोडले की विषय संपला. इन्स्टंट पदार्थ तयार… ज्या घरात फोडणी व्यवस्थित होते ते घर निरोगी आणि घरातील व्यक्ती नशीबवान !

तेल गरम झाल्यावर त्यात आधी कमी प्रमाण असलेले जिन्नस, त्यांचा अर्क तेलात उतरला की पुढील पदार्थ सर्वात शेवटी भाजी असा सामान्य क्रम आहे. स्वयंपाकाचा हात उत्तम असला की पळीभर तेलात टाकलेले चिमूटभर हिंग सुद्धा जळत नाही. आपली सवय अशी.. तेल गरम करायचे, कांदा टोमॅटो मिरची कढईत टाकायची वरून मसाला भुरभुरायचा किंवा मसाला फक्त दोन तीनदा झाऱ्याने हलवून त्यात भाजी घालायची. सोपे उदाहरण देतो.. महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य कांदे पोहे आपण सगळेच खातो. त्यात खुसखुशीत कढीपत्ता कोणाला कधी सापडला आहे का? दही पोहे यावर काही लोक फोडणी घालतात त्यात भरलेली मिरची घालतात.. मिरचीचे आतील सारण किती वेळा खुसखुशीत फ्राय झालेले असते? एखाद्या म्हणजे एखाद्या तरी भाजीला ”अहाहा.. जिऱ्याचा काय सुंदर वास लागलाय?’ असे होते का? हॉटेल मधे ३०० रुपयाला वाटीभर मिळणाऱ्या जिरा राईस मधे जिरा चा आस्वाद कितीसा असतो ? हे सांगायचे कारण असे.. खाद्य हे पौष्टिक होण्या पेक्षा प्रेझेंटेबल होण्याकडे कल बराच वाढला आहे.. तेलात/तुपात भाजलेला हिंग-लसूण पोटात जात नाही. ओवा लवंग तिखट लागतो म्हणून आपण वापरत नाही. कढीपत्ता बोअर असतो म्हणून पानाच्या साईड ला काढून ठेवतो. त्यामुळे पोटात अन्न भरपूर जाते शास्त्र मात्र जात नाही!

पचन संस्थेचे वाढत चालणारे आजार आणि उठसुठ होणाऱ्या एन्डोस्कोपी-कोलोनोस्कोपी याचे कारण अशास्त्रीय पद्धतीने बनवलेला – खाल्लेला आहार आहे. फोडणीत भाजलेला लसूण चावून खाणे किंवा बटाटा भाजी सारख्या पचायला जड असलेल्या भाजीच्या फोडणीत ओवा जिरे असणे हा आजीबाईचा वारसा आहे. पोट टम्म झाल्यावर इनो पिऊन बुलबुले काढणे हा ग्रॅनी चा वारसा आहे. अधोरेखित करायचा मुद्दा असा, मिरच्यांच्या धुरी आणि लालेलाल स्वयंपाक मौज म्हणून करायला हरकत नाही. फोडणी मात्र बायपास व्हायला नको… चिंच कधी आणि आमसूल कधी हे गृहिणीला बरोबर माहित असते. त्याच घरात आरोग्य असते.. कामाच्या व्यापामुळे अनेकांकडे स्वयंपाकाला बाई असते. हरकत नाही.. ऑफिस मधे जसे आपण प्रोजेकट डिझाईन करतो तसे आपला स्वयंपाक डिझाईन करून द्यायला काहीच हरकत नाही!

कोणत्याच तयार मसाल्यात काहीच ‘मॅजिक’ नसते. मॅजिक असते ते करणाऱ्याच्या हातात. केलेल्या फोडणीत.फोडणीत आपले सत्व सोडणाऱ्या मसाल्यात. केलेले अन्न आनंदाने खाणाऱ्या व्यक्तीत. वैद्य असो किंवा अन्नपूर्णा ”योजक: तत्र दुर्लभ:” हा सिद्धांत दोघांनाही लागू होतो !

 

© वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

एम डी (आयुर्वेद )

आरोग्य मंदीर, सांगली -पुणे -कणकवली

7276338585

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

‘ ती नसताना ‘

मी नसताना …. कल्पनेने…..मी पुरुषी कल्पनेतून पतीचे  पत्नीबद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय…..

तिच्या श्वासतील ऊबेने मी रोमांचित होत असताना, मला अचानक जाग आली….आणि बघतो तर ‘ती’ नव्हती जवळ…ती ४ दिवसांसाठी ट्रीपला गेली होती.  मी विचार करू लागलो की……किती सुखद भास होता तो! मग मी उठून सगळ्या खोल्यात फीरलो…ती नाहीए कुठेही हे माहित असतानाही…मी सर्व खोल्यात गेलो…कारण मला अनुभवायचं होत ती! त्या त्या खोलीत असतानाची… कल्पनेतील तीच वास्तव्य, विचार करता जाणवलं की आभासी असलं तरीही सुखावणार होत! कारण गेल्या अनेक वर्षात ती असताना मी ते अनुभवलं होत.

देवघरात देवाची पूजा करताना….त्या देवांची ठराविक जागा,तिचे अथर्वशीर्ष,श्रीसुक्त म्हणणे, फुल घालताना ती सर्व देवांशी त्यांची नाव घेऊन बोलते!ते तिलाच जमत, आणि तिला जे जमत ते मला आवडत!?

आम्ही दोन दिवसात ओट्यावर खूपच पसारा करून ठेवलाय…पण पसारा किती केलाय म्हणून आता ओरडायला ती नाहीए…नेहमी नाही पण, तीही पसारा करते कधीतरी…पण ते आवरण्याचं चातुर्य, time मॅनेजमेंट,चटपटीतपणा तिलाच जमत सगळं…कारण ह्या आम्ही केलेल्या पसाऱ्यात मला तर आवरायला नक्की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहिए. ?

फ्रिज मध्ये दूध आणि ताकाच पातेलं बघून खूप गोंधळ झाला, वास व चव घेऊन बघता ताक व दुध कोणत.. हे लक्षत आलं.किती साधी सोपी गोष्ट, पण ती करते सगळं म्हणून कधी फार लक्ष दिल गेलं नव्हतं.

तिच्या कवितेच्या डायरीची एक एक पान उलटली… आणि तीची कवितेची साहित्याची ओढ आणि तिचे विविध विषयांवरील लेख कविता किती सध्या भाषेतील पण प्रगल्भ विचार आहेत हे लक्ष्यात आलं. कवितेतील जास्त काही मला कळत नाही पण त्यात माझ्यावरील काही कविता होत्या…मी त्या जोरात म्हणू लागलो आणि जणू तीच त्या कविता म्हणत आहे असा भास मला होत होता…. तीच ते कवितांचं सादरीकरण… त्यात माझयाबद्दलची रोमँटिक कविता… त्यात हळूच तीचं माझ्याकडे चोरून बघणं… लाजण…. मी सगळं जणू कल्पनेनेच पण  खरंखुरं अनुभवत होतो!

मुलांच्या कपड्याच कपाट उघडून मी आत बघणार तोवर सगळे कपडे धाडकन अंगावर पडले..मग परत आठवली ती, तीव्रतेने….मुलांचे कपडे धुवून कसे नीटनेटके ठेवते..आता तर ह्या कपड्यात धुतलेले कळेना, न धुतलेले कळेना.

कधीकधी वाटायचं …काय करते ही? घरी असते,पण हिला कुठं काय इतकं काम असत?

पण साखर सम्पली तेव्हा गुळ घालून चहा केला… तेव्हा आठवली ती! Emergency बटाट्याच्या काचऱ्या कशा करायच्या हे तिने शिकवलेलं होत ते करताना आठवली ती! भाताचा अंदाज किती वेळा सांगितला होता तिने, पण कधी प्रयत्नच नाही केला…शिकलो असतो तर आलं असतआज,असा विचार करताना आठवली ती! पोळ्या तर विकतच आणल्या आम्ही…पण तीचं  पोळी लाटतानाच दृश्य समोर आलं, खरच ती किती गोल व लुसलुशीत पोळ्या करते हे बाहेरच्या पोळ्या तोडताना जाणवलं, तीच घरासाठी करणं हे मनापासून  असत आणि त्यात तिचा जीव असतो. ती अनेकदा काही स्तोत्र म्हणत स्वयंपाक करते, त्यावर तीच वाक्य मला नेहमी च पटत की त्या स्तोत्रामधून  positive vibration अन्नात उतरतात, आणि ते शरीर व मनासाठी खूप पोषक व सकारात्मक असतात, हितकारक असतात.

बारीक बारीक गोष्टीत मला आठवत आहे ती!  आठवते म्हणण्यापेक्षा उणीव भासते अस म्हणावं लागेल.

हे, कुलदेवता, वास्तुदेवता तुझ्या आशीर्वादाने  ह्या वास्तूतील वस्तू आम्ही घेतल्या, ज्या भौतिक रूपाने मला फक्त माहिती आहेत. पण ‘ती’चा प्रत्येक वस्तू मध्ये प्राण आहे,आत्मा आहे . त्या सर्वानाही आमच्यापेक्षा तीच जास्त हवी असते अस जाणवलं.

ती नसतानाची वास्तूही, ‘ती’ च्या केवळ विचारांनी, कल्पनेने आनंद देते, सकारात्मक ऊर्जा देते, मला, मुलांना, आमच्या गॅलरी मधील झाडांनाही…मग ती असतानाची वास्तू व प्रसन्नता, ती असतानाचे नंदनवन काय वर्णू?

बोलताना आणि जगताना…बाला, प्रेमला आणि वत्सला अशा विविध रूपातील ती, खूप साधी….

येताजाता तिच्या बांगडयांच्यां मंजूळ नादाने, पावलांच्या लगबगिने, कधी गोड प्रेमळ बोलण्यातून,तर कधी स्पष्टवक्ते पणाने, आपले विचार मांडणारी…

‘ती’… माझी अर्धांगिनी?

ती नसतानाही…ती स्पर्शली!!!!?

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माती किती शहाणी असते ना? तशी ती दगडापासून बनते.  पण मातीजवळ सृजनाची एक वेगळीच ताकद आहे. दगडाचा कठीणपणा मातीला नाही. तिच्या जवळ दगडात असलेलीच मूलद्रव्य आहेत. पाणी शोषून घेण्याची क्षमता मात्र फक्त मातीकडं! दगड थोडेसे ही पाणी शोषून घेऊ शकत नाही. पाणी शोषून घेऊन मातीचा मात्र चिखल होतो. वरवर जो चिखल वाटतो, तो सहजपणे कशालाही चिकटतो. असं लाघव दगडाजवळ नाही. ऊन्हानं, पावसानं दगड झिजतो, तडकतो पण याच ऊन-पावसानं माती सुगंधीत होते. सगळ्या विश्वाला आधार देण्यासाठी सज्ज होते. तिच्या रंध्रारंध्रातून जीवन अंकुरते. तिच्या गात्रागात्रातून इवलाली हिरवी पानं टाळ्या वाजवू लागतात. हिरवळीचा गारवा सगळ्या सजीव सृष्टीला थंडावा देतो. छोटे छोटे जीव जिवाणू तिच्या कुशीत वाढू लागतात. आधार शोधतात. आनंदानं, ऊत्साहानं जीवन जगतात. शेवटी धावून धावून थकतात तेंव्हा तीच हात पसरून सगळ्यांना सहजपणानं सामावून घेते. मातीतच मिसळल्याशिवाय, एकरुप झाल्याशिवाय शांती नाही. माती लागू नये म्हणून आयुष्यभर जपलं तरी मातीतच माती होऊन मिसळण्याची आस शेवटी लागतेच. ही आस तरी कशासाठी? नव्यानं अंकुरण्यासाठी!, पुनःश्च पालवण्यासाठी!!

कवयित्री  इंदिरा संत म्हणतात,

रक्तामध्ये ओढ मातीची

मनास मातीचे ताजेपण

मातीतून मी आले वरती

मातीचे मज अधुरे जीवन

केशवकुमार मात्र ‘होता डोंगर माथ्यावर पडला धोंडा भला थोरला’ …. असं म्हणत दगडातही काव्य शोधतात. खरंतर दगड केव्हढा सामर्थ्यवान! किती कठीण! म्हणूनच तो भक्कम इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येतो. कित्येक मजली उंच टोलेजंग देखण्या वास्तूंचा पाया बळकट करतो. तरीही नुसता दगड इमारत बनवू शकत नाही. दोन दगड सांधायला चिकट मातीच लागते.

काही दगड सागरगोटे बनून अल्लड सान हातात खेळत राहतात. गोफणीतून भिरकावलेला दगड शेतातील पिकांचे रक्षण करतो. तर लगोरीचा दगड ववात्रटपणाचा शिक्का घेऊन कैऱ्या, चिंचा पाडतो.

दगडाला टाकीचे घाव घातले की तो देव बनतो. गाभाऱ्यात सजवला जातो. पूजला जातो.

पायरी ओळखून पायरीशीच थांबणारे काही

असले तरी, देवाआधी त्यांनाच पहिला नमस्कार मिळतो. काही दगड कळसावर सुवर्ण कलश घेऊन सजतात.

हाच दगड कोरीव नक्षीकामानं सजवला की, महालांची, राजवाड्यांची शोभा वाढवणारा खांब बनतो. एखादा कुशल कारागीर त्यातून सारेगमचे सप्तसूर उमटवतो. कोरीव शिल्पकाम करून कुणी शिलाकार त्या दगडाला इतिहासाच्या कागदावर कायमस्वरूपी कोरुन ठेवतो.काही दगडांना पाटीचा, सरस्वती पूजनाचा मान मिळतो. काही दगडांना शीलालेखानी अजरामर केले. पाऊस, पाणी, ऊन, वारा यांना वर्षानुवर्षे तोंड देत तो इतिहासाचा साक्षीदार बनतो अनेक पिढ्यांना शौर्य, शृंगार, धैर्य, देशप्रेमाच्या रसात चिंब करतो. संगमरवरी असेल तर ताजमहाल बनून प्रेमकहाणी सांगतो….. तरीही.. तरीही… जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी मातीलाच नतमस्तक होतो.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.कारण तो परावलंबी आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी बुध्दिचा वापर करून तो कोणत्या ही थराला जावू शकतो.तो स्वार्थी आहे. गरजे पेक्षा जास्त घेण्याची आणि साठवण्याची त्याला सवय लागली आहे.ही सवय निसर्गातील कोणत्यांच सजीवात दिसत नाही. खरं तर वनस्पती सोडल्या तर कोणच स्वत:चे अन्न स्वत:करू शकत नाही.निसर्गात प्रत्येकाच्या अन्नाची सोय आहे.”जीवो जीवस्य जीवनम्”या साखळीत सजीव जगत आहे.आपले अन्न तो शोधतो मिळवण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रत्यय निसर्गात पावलो पावली दिसतो.

पाखरांच्या किलकिलाटाने मी बाहेर आले.रस्त्यावर चिमण्या आनंदाने दाणे टिपत होत्या, उडत होत्या.इकडून तिकडे जात होत्या. त्या स्वछंदी होत्या.हलचाली मोहक होत्या.सकाळी सकाळी तो चिवचिवाट प्रसन्न वाटत होता.आपल्या नादात होत्या. एवढ्यात… गल्लीतली दोन तीन कुत्री तिथे आली.चिमण्यांना बघून ती हरकून गेली.त्यांच्या जिभेला पाणी सुटले.आज आपली चांगली मेजवानी होणार, या आविर्भावात ते होते. दबा धरून राहीले. हळूहळू पुढे झाले. आता ते चिमण्यावर  झडप घालणार..त्या बळी पडणार. असे मला वाटले,. त्यांना मी हाताने  उसकवणार… तेवढ्यात सगळ्या चिमण्या भूर्र…कन्…उडाल्या. कुत्री… भुंकली चरफडली.मागे फिरली.चला चिमण्या वाचल्या… म्हणून मी खुश झाले, मागे फिरले ,तो पुन्हा चिमण्यांचा थवा दाणे टिपायला  आला.चिमण्यांची चाहूल लागताच कुत्र्यांची झुंड पुन्हा मागे फिरली. पुन्हा आशा पालवल्या.पुन्हा दबा धरून राहिले. चिमण्या वर  झडप टाकणार… तेवढ्यात चिमण्या उडाल्या.आता मात्र कुत्रे मुक झाले.त्याच्या डोळ्यात आता भूक  दिसू लागली.मला त्याची कीव आली.मी पडले शाकाहारी. घरातल्या पावाचे तुकडे कुत्र्यांना टाकले.चिमण्याना  दाणे टाकले.

दोघे ही भूक भागवण्याचा आपला मार्ग सोडत नव्हते.रोजच हे हेच दृश्य बघत होते.

निसर्गत: आपलं रक्षण करण्याचे ,भूक भागवण्याचे सामर्थ्य सर्वाना बहाल केले आहे.तरी मझ्या मनात आले या कुत्र्यांना माणसांसारखी  बुध्दी असती तर….भूक भागविण्यासाठी, त्यांनी या चिमण्यांनसाठी जाळे टाकले असते.त्यात दाणे पेरले असते.अगतिक चिमण्या फसल्या असत्या,तडफडल्या असत्या.कुत्र्याची भूक भागली असती.पण एवढी बुध्दी निसर्गाने कुत्र्याला दिली नाही,हे बरेच झाले, नाही का?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares