मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले ☆

किशोर वयातले ते अल्लड, अबोध कळी पण हळूहळू उमलत जाते, तस तसे अवतीभोवतीचे खरे वास्तव लख्ख दिसायला लागते ,  जाणवायला लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यांची पाखरं फडफडायला लागतात,  मनाला फुलपाखरी पंख फुटतात. स्वप्नांच्या ढगांमध्ये मुक्तपणे संचार सुरू होतो. एवढ्याश्या मनामध्ये, इवल्याशा नजरेची स्वप्न असंख्य असतात, , अभ्यासाची असतात करियरची असतात, मोठेपणी आई-वडिलांना आधार देण्याची असतात, मित्र-मैत्रिणींची असतात, आयुष्याच्या जोडीदाराची असतात, मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची असतात.कोणाला मिलिटरी मध्ये जायचे असते, कोणाला क्रिकेटर बनायचे असते, कोणाला शास्त्रज्ञ तर कोणाला सर्जन!उन्हाळ्यामध्ये बहावा कसा फुलून, पिवळ्या जर्द नाजूक फुलांनी डवरलेला असतो, डोलत असतो, गुलमोहर गडद लाल फुलांनी आकर्षून घेत असतो, तसे तारुण्यातल्या मनाला ही सगळी स्वप्न खुणावत असतात.ती स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते.ज्यांना मनासारखे यश मिळते, ते सुखाने मनोराज्यात मुक्तपणे विहार करतात.ज्यांचे निम्मी किंवा अखे तरूणपण त्यांना पकडण्यात जाते, त्यांच्या मनाला ओरखडे पडतात, त्यांच्या स्वप्नांचे पक्षी दूर दूर भरकटत निघून जातात आणि उरते एकाकीपण!सभोवताली निराशेचे ढग जमायला लागतात.जीवनाला सुरवंटाचे काटे टोचायला लागतात आणि अपयशाने खचून जायला होते.यास  सुरवंटी अवस्थेमध्ये , एखादा जरी सोबतीचा हात मिळाला, सहानुभूतीची हलकीशी थाप पाठीवर पडली, तरी ते आयुष्य सावरायला मदत मिळते आणि बघता बघता आयुष्याची पन्नास-पंचावन्न वर्षे भुरकन सरतात.इतरांसाठी करता-करता, स्वतःच्या इच्छा , अपेक्षा, आवड गुंडाळून ठेवलेली असते.आयुष्याची संध्याकाळ खुणावायला लागते.

नेमक्या याच वळणावर आपल्या आयुष्याची, आरोग्याची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते.काहींना”संध्याछाया भिवविती हृदया”हे जाणवायला लागते तर अनेकांना अनेक व्याधींचा  विळखा पडलेला असतो. त्यांना दवाखान्याचे खेटे घालावे लागतात, वेळच्यावेळी औषध पाण्याच्या वेळा सांभाळण्यात सहकार्याची दमछाक होते.आपल्या गाडीचा वेग मंदावलाय हे समजते. काहीजण मात्र यासाठी नंतर अतिउत्साही बनतात. आपले छंद जोपासतात. आपला आनंद आपणच शोधतात. पर्यटनाचा आनंद उपभोगतात. मित्रमंडळीत रमतात. वाचन मनन चिंतन आणि चर्चा अशा मधून एकमेकांशी संवाद साधतात. तरुणपणी जे करायला मिळाले नाही, जे छंद जोपासायला मिळाले नाही त, आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे हातातून गेलेले असतात, ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाची संध्याकाळ मनासार खी उपभोगतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्यालासुद्धा आनंद देणारा.  उत्साह वर्धक असाच तो कार्यक्रम आहे असे मला वाटले.पण आपल्याकडे त्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती आहे असे मला जाणवले.आत्ता या घडीला साठे च्या पुढचे.  पंच्याहत्तरी पर्यंतच्या लोकांनाहे म्हणणे पटेल.हे लोक तरुण असताना.  तरुणां सारखे वागायला मिळाले का त्यांना?सतत वयाने मोठ्यांचा मान राखायचा.  त्यांचे सांगणे ऐकायचे आणि त्याच प्रमाणे वागायचे.अश्या जबरदस्त पगड्याखाली.  रहावे लागल्या कारणाने.  सतत एक प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता.त्यामुळे मनमुराद हसणे.  गप्पा मारणे.  सहकाऱ्यांबरोबर फिरणे अशा साध्या साध्या आनंदापासून ही मंडळी वंचित राहिली.घरचे काय म्हणतील?त्यांना आवडणार नाही.  त्यांनी एकदा नको म्हटले ना.  मग नको.अशा दबावाखाली त्यां चं तरुण पण संपलं .

विशेष करून महिलावर्ग या बाबतीत जास्तच दबला गेला .एखादी डिग्री मिळाली की त्यांचे पंख छाटले जायचे .संशोधन सुरू .मग इतरांच्या म्हणण्याला होकार देऊन.  माहेरचा मोकळा.  आनंदी स्वच्छंदी उंबरा ओलांडून.  टिपिकल वर्चस्वाचा दुसरा उंबरा ओलांडून. दुसऱ्या घरी जायचे. तिकडे गेल्यावर आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या.  स्वभाव बदलायचा.  पदरी पडले पवित्र झाले.  या नात्याने नवीन पण रटाळ आयुष्याला मन मारून सुरुवात करायची.खुर्चीत एखादी चे मत विचारले जायचे.  पण ते म्हणणेविचारात घेतले जाईल असे नाही .मग अशा सगळ्या वातावरणात तरुणपणीच.  मनाचे वृद्धत्व जाणवायला लागायचे.उडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यात कोंड्यावर तो लवकर म्हातारा होणारच ना!मग किती का गोड-धोड.  चांगले चांगले खायला घाला.  मानसिक वृद्धत्व आले किती घालवणे अवघड.

कोणालाही त्या त्या वयामध्ये.  जे येते.  जे करायला आवडते.  रुचते.  ते थोड्या प्रमाणात का होईना.  पण करायला मिळाले पाहिजे.सचिन तेंडुलकरच्या हातातून पंधराव्या वर्षी बॅट काढून घेतली असती.  तर त्याचे खेळणे फुलले असते का?त्याने इतके उत्तुंग ध्येय गाठले असते का?लता मंगेशकर ना मधुर गळ्यातून गायची संधी न देता.  दोन वेळेच्या भाकऱ्या बडवायला लावल्या असत्या.  तर आपल्याला अविट गाणी ऐकायला मिळा लीअस ती का?

आवडीचे काम करायला मिळाल्यावर शरीर हे सुदृढ राहते.  मन प्रसन्न राहते.  काम करायला उत्साह येतो आणि आनंदी आनंद उपभोगायला मिळतो.अशी व्यक्ती स्वतःही आनंदी राहते आणि दुसऱ्यालाही आनंद वाटते.असे हे सरळ वागणे .   फार थोड्यांच्या वाट्याला येते .बहुतेकांच्या बाबतीमध्ये सुरवंटाचे फुलपाखरू होण्याऐवजी फुलपाखराचे सुरवंट होते .

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गरज आहे.  ती सुरवंटाचे फुलपाखरू होऊ द्यायची.फुलपाखराचे गुन्हा सुरवंट न होऊ देण्याची.बाल्यावस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत प्रत्येकाला या संक्रमण आम मधून जावेच लागते.गरज आहे ती सावरण्याची !अशा कठीण प्रसंगी आपले मनोबल ढळू न देण्याची .कुणीतरी येईल आपल्याला मदत करेल.  या आशेवर न राहण्याची. विं.दा. नीसांगितल्याप्रमाणे “माझ्या मना बन दगड”ही अवस्था अनुभवण्याची.प्रसंगी मन कणखर बनवले.  तरच त्या व संतुलित अवस्थेत मधून संतुलन मिळू शकतो.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

घराच्या पल्याड, उसाच्या शेतात, बरीच वर्षे मोर वस्ती करून होते. सकाळी ते मधली भिंत ओलांडून, नारळाच्या बागेत आपल्या कुटुंबकबिल्यासह चारा टिपायला येत. तीनचार लांडोर आणि मोर मात्र एकटाच बापडा! लांडोर,  मोराच्या मागे मागे जात. बराच वेळ त्यांचा मुक्तपणे संचार चाले.

साखर झोपेतून जाग येई ती त्यांच्या केकानीच!पुन्हा:निद्राधीन होताहोता उजाडेच. रोज त्यांच्या हालचाली पाहता पाहता, मनात येई, एकदातरी,  पिसारा फुलवून तुझे ते मोरपंखी सौंदर्य मला दाखवशील का? आणि तो क्षण एकदा येऊन ठाकला. शेजारच्या अपर्णाने दूरध्वनीवर सांगितले,  “अग सुधा, लवकर बाहेर ये!” . मोराने पिसारा फुलवला आहे, आणि मग मागीलदारी जाण्याची धांदल उडाली.  मोरपंखी रंगाचा विलोभनीय सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहता पाहता मनाला रंगसुख देत होता.  तो पिसारा पाहता मनात आलं, उगाच नाही त्या मोरपंखी पिसाने, श्रीकृष्णाच्या मुकुटावर आढळस्थान मिळवलयं. त्या पिसाऱ्याचा मनोहारी रंग मनाला आनंद देतो. मन जेव्हां आनंदाने फुलून येते, तेंव्हा म्हटले जाते,  “बाई,  बाई,  मनमोराचा कसा पिसारा फुलला,  फुलला!”. काही आठवणी हळूवार मनात डोकावतात, आणि मग त्या अंगावर मोरपीस फिरवल्या सारख्या सुखद वाटतात.

लहानपणी,  त्या मोरपंखी रंगाचा ठेवा, पुस्तकाच्या पानात जपून ठेवताना रंगांची ऊब देते. एखादा फकीर आपल्या हातातील मोरपिसांच्या झुपकेदार पंखा धुपाटण्यावर  फिरवून ऐख्याद्याच्या डोक्यावर हळूवार फिरवत दुवा देतो. आशा असंख्य प्रसंगात, हे मोरपीस आपल्या रंगानी आणि विलोभनीय रूपाने दिमाखात मिरवीत असते. अशा ह्या बहुरंगी पक्ष्याची आपल्या देशाचा पक्षी म्हणून निवड झाली.

एकेदिवशी नारळाच्या बागेत येणारा मोर संध्याकाळच्या वेळेस चक्क नारळाच्या शेंड्यावर जाऊन बसला. ते पाहून मन चिंतेत पडले. अरे बापरे!आता याला खाली कसे आणायचे.  मोर खरंतर पाच फुटाच्यावर उडणारा पक्षी नव्हे. प्राणीमित्राना आता बोलवायला हवे. असे म्हणत सकाळ झाली. मागे उगाचचं मोराच्या काळजीने डोकावले तर हा त्या झाडाच्या शेंड्यावरून गायब!

रोज संध्याकाळी मागे नारळाच्या बागेत डोकावून, निरीक्षणाचा छंदच जडला.  एकेदिवशी, या मोराचे झाडावर चढणे, मी चोराला पकडल्यागत, पाहिलेच,  हा पठ्या आधी भिंतीवर मग भिंतीवरून लहान नारळाची झावळी, त्यावरून वरची,  त्यापुढची

असं करत वरचढून शेंड्याला जात असे, आपले शयनकक्षच  नारळाच्या झाडावर करू लागला. त्याच्यामागे लांडोर असत,  पण त्या कधी झाडावर चढत नसत. असे

कित्येक दिवस तो मोर झाडाचा व आमचाही  सोबती झाला.  केका  हा जीवनाचा रोजचा भाग झाल्या. मनाला सुखवणारे मोराचे हे रंगीत सुख नंतर, २००५च्या पुरात

वाहूनच गेले.  ऊसाची शेतं उजाड झाली. मोरांना बसायला,  आपला कुटुंबकबिला जपायला जागाच गेली. मोराने दुसरी सुरक्षित शेत पाहिले असावे. मोराच्या विरहाने मनाचा विरंगुळा हरवला. नारळाची बाग सुनीसुनी झाली. मनात त्या रंगसोहळ्याची

सुखद स्मृती जपत राहिलो.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -1 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -1☆ सौ. अंजली गोखले ☆

B.B C. वर नुकताच एक चांगला कार्यक्रम पहायला मिळाला. परदेशातील लोकांनी बनवलेला. विचार, प्रयोग, निरीक्षण, परिक्षण ‘ अनुमान निकाल या सगळ्या टप्यांवर आधारीत प्रयोगशील कार्यक्रम होता. प्रश्न निवडला होता तो जगातील सर्व स्त्री – पुरुषांसाठी चा

सर्वसामान्य पणे संपूर्ण जगामध्ये ६० वर्षे वयावरील सर्वाना सिनियर सिटिझन – अर्थात वृद्ध म्हणून संबोधले जाते. त्यांनी साठ वर्षे किंवा त्याहूनही कमी वयाचे स्त्री पुरुष निवडले होते. त्यांचे खरे वय नोंद केले गेले. त्यानंतर त्यांची उंची वजन ‘ काम करण्याची क्षमता, काय – किती खातात ‘ हे सगळे नोंद केले आणि एका मशिन व्दारे त्यांची स्थूलता ‘ त्यांच्या – मध्ये असलेले कोलेस्टिरॉल ‘ ते करत असलेले काम, व्यायाम या व्दारा त्यांच्या शरीराचे वय काढले. रिझर्टस् अचंबित करणारे होते.

एक ४९ वयाचा निवृत्त पोलीस अधिकारी होता. तो भरपूर जाड होता. नऊ महिन्याच्या गरोदर बाईचे पोट कसे वाढलेले दिसते ‘ तसे त्याचे सर्वसाधारण पोट होते. त्याच्या सगळ्या नोंदी केल्या गेल्या. मशिनव्दारे त्याचे वय काढले गेले. ४९ वयाच्या माणसाच्या शरीराचे वय किती यावे? तब्बल ९० वर्षे! तोही चमकलाच. त्याचा चेहरा इतका पडला की काही विचार नका. पण प्रयोग करणाऱ्या मंडळीनी त्याला दिलासा दिला. त्याला त्याचा व्यायाम खाणे पिणे, फिरणे, काम करण्याची पद्धत सगळे आखून दिले. तो खुर्चिमध्ये तासन्तास बसून कॉम्प्युटरवर काय करत होता. काय करणे तर त्याला सोडून चालणार नव्हते. त्यांनी त्याला उभे राहून कॉम्प्युटर उंच ठेऊन का म करण्याचा सल्ला दिला. त्याने तो मानला त्याचे खाणे किती काय खायचे ते ठरवून दिले. आणिसहा आठवड्यांनी पुनः परत बोलावले. त्यानेही मनापासून ते सगळे पाळले आणि ६ आठवड्यानंतर त्याच्या वजनामध्ये पोटाच्या घेरामध्ये ‘ त्याच्या कार्यक्षमते मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याच्या शरीराचे वजन ९० वरून ७२ पर्यंत कमी आले होते. आता त्याला त्यांचे सांगणे जास्तच पटले आणि वय आणखी कमी करण्याचा निर्धार त्याने केला.

एका प्रौद बाईवरही असाच प्रयोग केलेला दाखवला. ती फार जाड नव्हती, का मं करत होती कार्यरत होती. तरी तिच्या नैसर्गिक वयापेक्षा मशिनव्दारे शारीरिक वय जास्त आले. निरीक्षणामध्ये चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या आल्या होत्या. तिलाही त्यांनी योग्य तो व्यायाम. योग्य खाणे ठरवून दिले. ६ आठवड्यानंतर तिच्याही चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी झालेल्या आढळून आल्या. काम करण्यामध्ये तिचा उत्साह वाढला होता. शारीरिक वय कमी झाल्याची नोंद झाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. ती खूप खुष होऊन गेली.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझ्या आई-बाबांना माझ्यावर आलेल्या संकटाची,उद्भवणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आली होती. माझ्यासमोर त्याबद्दल काहीही बोलले जात नसे. इतर भावं डाप्रमाणेच मलाही वागवले जात होते .

शाळेमध्ये सुद्धा माझ्या वागण्यावर खूपच मर्यादा येत होत्या. कितीतरी उणीवा,अर्थात उणीवा असे मी आता म्हणू शकते, त्यावेळी इतके समजत नव्हते. त्या उणिवा म्हणजे लिहिणं नाही. मैत्रिणींचे चेहरे दिसत नव्हते, समोरच्या बाई दिसत नव्हत्या. ग्राउंड वर पळवणे नाही, लंगडी पळती खेळणे नाही. नवीन वस्तू समजत नव्हती. रंग डिझाईन काहीच दिसत नव्हते. अशा कितीतरी मर्यादा होत्या, तरी बाबांनी माझं डोकं वक्तृत्वा मध्ये घातल्यामुळे शाळेमध्ये भाषण करण्याचा मी सपाटाच लावला होत. कितीतरी स्पर्धांमध्ये भाग घेत होते. बरेचदा बक्षीसही मिळे, पण नाही मिळाले तरी वाईट वाटून घ्यायचे नाही, रडायचे तर नाहीच नाही असे मला बाबांनी बजावून ठेवले होते. थोडक्यात काय माझ्या व्यक्तीमत्वा मधली रिकामी जागा वक्तृत्वाने भरून काढली. अजूनही मला नवीन नवीन ऐकण्याचा,ऐकलेले लक्षात ठेवण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचा अतिशय उत्साह आहे च.

साधारण मी तिसरी-चौथीत असताना माझ्या बाबांना प्रोजेक्टर आणि स्लाईड्स बक्षीस मिळाल्या होत्या. त्यावेळी मला पुसट पुसट दिसत होते. म्हणजे पडद्यावरची आकृती थोडे थोडे रंग जे माझ्या मनावर चांगले बिंबवले गेले. त्या स्‍लाईड्समध्‍ये भारतातील निरनिराळ्या नृत्य प्रकार यांची माहिती होती. त्यातील नृत्यांगना, त्यांचे छान छान ड्रेस, मस्त मस्त दागिने, आलता लावलेले लाल हात हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आणि मनासमोर चांगलेच उमटले होते. ते नाच बघू न मी घरी गाण्यांवर आपली आपणच नाच करत होते .माझा मी आनंद मिळवत होते. साधारण सहावी मध्ये मला मिरजेतील विद्या गद्रे यांची मुलगी प्रतिमाही भेटली. ती मला गाण्यावर नाच शिकवू लागली. म्हणजे आता माझा अभ्यास, वक्तृत्व आणि नृत्य जोमात सुरू झाले. प्रतिमाने माझ्याकडून कटपुतली चा नाच बसवून घेतला होता. तो मला शाळेच्या स्टेजवर करायला मिळाला. सगळ्यांना खूप आवडला .भरपूर टाळ्या मिळाल्या. पण त्यावेळी मी माझ्या बाबांवर खूप रुसले होते, थोडीशी रागावले होते म्हणा ना! कारण नाचाच्या अधिक त्यांनी माझी ओळख अंध शिल्पा अशी करून दिली होती. जे मला अजिबात आवडले नव्हते. मी बाबांशी दोन दिवस अबोला धरला होता. त्यांना ते नंतर समजले .
विशेष म्हणजे मला कशाची पण भीती वाटत नव्हती. घरी बहिणी जसे करतात तसे करायचे असे मी थांब ठरवून ठेवले होते. एखादी गोष्ट आपल्याला करता येत नाही म्हणजे काय?आलेच पाहिजे असाच माझा हट्ट असे. एकदा मी देवासमोर दिवा म्हणजे समयी लावली होती, सगळं हाताने चाचपून. घरी काकांनी ते पाहिलं होतं. घरी मॅगी करून बघण्याची मला हौस. एकदा आई स्वयंपाक घरात नसताना मी एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवलं, मॅगीचा पुडाही काढला. तेवढ्यात आई आली आणि मला धपाटा खावा लागला.

माझ्या सगळ्या वस्तू,पुस्तके,कंपास जिथल्या तिथे जागेवर असायच्या.माझ्या भावाला किंवा बहिणीला ते माहिती होतं,त्यांचं सापडेना झालं की गुपचुप माझा कंपास ते घेऊन जायच,माझ्या लक्षात आल्यावर मात्र मी रागवायची.अर्थात हे सगळं लुटूपुटूच्या असायचं.

सांगलीच्या गांधी वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धा मला अजून आठवतात . पाचवी ते दहावी दरवर्षी मी भाग घेत होते. जवळजवळ पन्नास ते सत्तर मुलं-मुली सायची. दहावीपर्यंत मला नंबर मिळाला नाही. मात्र दहावीला माझं भाषण इतकं सुंदर झालं की त्यांना मला पहिला नंबर द्यावाच लागला.

शाळेपासूनच मला रायटर घेऊन परीक्षा देण्याची सवय लागली होती. दहावी मध्ये वनिता वडेर माझी मैत्रीण होती. अभ्यासामध्ये तिनं मला खूपच मदत केली .सगळं वाचून दाखवाय ची .मी ते लक्षात ठेवायची .दहावीत मला 80 टक्के मार्क्स मिळाले .वनिताला गणितात तेवढे माझ्यापेक्षा सात मार्क्स जास्त होते.

अकरावीमध्ये मी कन्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली. अर्थातच माझ्यासाठी आर्ट्स साईडच बरोबर होती. इथेही मी खूप स्पर्धेमध्ये भाग घेतला .तिथल्या सगळ्या प्राध्यापकांची मी लाडकी होते .सगळ्या मैत्रिणी मला खूप खूप मदत करायच्या .कॉलेजला जाताना एकदा पाऊस सुरू झाला .तर एका मुसलमान मैत्रिणीं ने तिची ओढणी काढू न दिली.

तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण गोड बोललो,की समाजातील सगळ्याच आपल्याला मदत करतात .मलाही आईच्या कामामध्ये मदत करायची खूप इच्छा असायची. भाजी निवडणे, शेंगा सोलणे अशी मदत मी करत होते. माझे असे सहज वागणे बघून शेजार पाजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. मला काम करताना बघून त्यांनाही आश्चर्य वाटे. आपण स्वतः मध्ये मॅग्नेटिक पॉवर निर्माण केली पाहिजे हे मी ठरवलं होतं.

कॉलेजमध्ये मी जे ऐकत होते,ते मनामध्ये टिपून ठेवत  होते. सगळे पीरियड्स अटेंड करत होते. त्यामुळे प्राध्यापकही माझ्यावर लक्ष ठेवून होते. माझे एकूण छान चालले होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचे दादा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ आमचे दादा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

आमचे दादा असं मी वर म्हंटलं खरं, पण ते आता आमचे राहिले नाहीत. ते आता देवाचे झालेत.

२६ ऑक्टोबरला त्यांना जाऊन वर्ष झालं. त्या निमित्ताने त्याचं स्मरणरंजन असंही मी म्हणणार नाही, कारण त्यांची आठवण तर आम्हाला रोज येते. दादा म्हणजे माझे मोठे दीर. गंगाधर नारायण केळकर. माधवनागर कॉटन मिल्सचे मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी काम पाहिले. शिस्त आणि सहानुभूती या दुहेरी विणीवर आधारलेलं त्यांचं व्यवस्थापन अतिशय यशस्वी झालेलं होतं. कामगार, ऑफीसमधील कर्मचारी वर्ग आणि मालक मंडळी यांच्यातील ते दुवा होते. हा दुवा अतिशय नाजूक होता. या पदावरून काम करताना, कुठलाही निर्णय घेताना, कुणावरही अन्याय होत नाही ना, हे बघणे अतिशय महत्वाचे असते. ते कौशल्य त्यांना चांगल्या रीतीने साध्य झाले होते.

माझं लग्न होऊन मी केळकरांच्या घरात आले. सगळे जण दादा म्हणत, म्हणून मीही भाऊजींना दादा आणि मोठ्या जाऊबाईंना वाहिनी म्हणू लागले. पण पुढे दादा हे केवळ म्हणण्यापुरते राहिले नाहीत. ‘दादा’पणाचं नातंचं मनात, वर्तनात घट्ट रूजलं. मला मोठा भाऊ नाही. मोठ्या भावाचं प्रेम, माया, काळजी, मार्गदर्शन सगळं सगळं मला त्यांच्याकडून मिळालं. त्यांना चार बहिणी. एक मोठी. तीन धाकट्या. त्यानंतर मी त्यांची पाचवी धाकटी बहीण झाले. लग्नानंतर एकही दिवाळी अशी गेली नाही, की त्या दिवाळीत मला भाऊबीज मिळाली नाही.

माझं लग्न झालं, तेव्हा जवळची- लांबची अशी तीस –पस्तीस जणं महिनाभर तरी घरात होती. त्यावेळी तिथे असलेल्या माझ्या चुलत मावस सासुबाई, इंदिरा जोशी आणि चुलत आत्ये सासुबाई, ताई सोमण मला म्हणाल्या होत्या, ‘तुझ्या घरात दोन देवमाणसं आहेत बघ. एक तुझ्या सासूबाई आणि दुसरे तुझे दीर दादा. त्या तेव्हा जे म्हणाल्या, ते पुढच्या काळात मी अनुभवलं. ‘जिथे कमी तिथे मी’ हा सासुबाईंचा बाणा. तिथे हजार असणं, हे शरीराने, मनाने, अर्थाने असे सर्वार्थाने असे. गरजावंताला आर्थिक मदत करण्यासाठी दादांचा हात सदाचाच वर उचललेला असे. विंदा करंदीकरांनी कुणापासून काय घावे, हे सांगताना म्हंटले, ‘ एक दिवस घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावे.’ दादांच्या बाबतीत मला नेहमीच वाटत आलय, की त्यांचे हात, म्हणजे त्यांचं दातृत्व घ्यायला हवं. कदाचित सरत्या शालेय वर्षात त्यांनी जी विपन्नावस्था अनुभवली, त्याचाही परिणाम असेल की अनेक परिचित, अपरिचित मुलांना शिक्षणासाठी त्यांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक मदत केली.

दादा दहावीत असताना एक मोठेच संकट कुटुंबावर कोसळले. त्यांचे वडील नाना स्वर्गवासी झाले. लहान वयात त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.

११वीचं वर्ष कसबस पार पडलं. त्यांनी शिक्षण सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला.  १९४४ साली माधवनागर कॉटन मिल्समध्ये क्लार्क म्हणून ते नोकरीला लागले. आपली हुशारी, बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा, सचोटी, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणे, या गुणांच्या बळावर अकाउंटंट आणि नंतर मॅनेजर या पदापर्यंत दादा पोचले. ते पदवीधर नव्हते पण जिद्द आणि कष्टाच्या बळावर त्यांना मॅनेजरची मानाची खुर्ची मिळाली. मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी मिलचे व्यवस्थापन बघितले. १९९४ साली ते सन्मानाने आणि समाधानाने निवृत्त झाले.

मिलचे, तिथल्या लोकांचे अनेक प्रश्न. अनेल समस्या. दादांना अनेक ताण-तणाव असणारच. पण ते, ते सगळं तिथेच ठेवून घरी येत. मनात असतीलही कदाचित. पण त्या विषयी ते घरी काही बोलत नसत. त्याचा त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनावर कधी परिणाम होऊ दिला नाही. दादा निवृत्त होण्यापूर्वी त्याच्या मुलांची, मुलींची लग्ने-कार्ये होऊन ती आपआपल्या संसाराला लागली होती. त्यांच्या प्रापंचिक जाबाबदार्‍या संपल्या होत्या. २००० साली आमच्या वाहिनीही गेल्या.  दादांना काहीसे एकटेपण जाणवले असणारच. पण त्यांनी कधी त्याचा बाऊ केला नाही..

मी नेहमी म्हणायची, आमची ‘गायत्री’ म्हणजे वृद्धाश्रम आहे. इथे सगळे ७५च्या वरचे तरुण राहतात. माझी वाहिनी सौ. अंजली गोखले यावर म्हणाली, तो ‘आनंदाश्रम’ आहे. तो ‘आनंदाश्रम’ होऊ शकला, याचे सर्व श्रेय दादांचे.

दादांचं जीवन सफल, संपूर्ण झालं. यशस्वी जीवन ते जगले. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते आणि पारमार्थिक वृत्ती हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. आम्हाला, मुलं- मुली- नातवंडांना त्यांनी संस्काराची शिदोरी दिली. त्याबाबत आम्ही किती भाग्यवान, पण दादा आम्हाला तुमच्याबद्दल किती कृतज्ञता वाटते, त्याच्याही पलिकडे काय काय वाटतं, हे तुम्हाला

कसं कळेल?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक असणाऱ्यांनी पुढील कानमंत्र अवश्य आचरणात आणायला हवेत.

नावे लक्षात ठेवणे —

जर तुम्हाला असे वाटत असेल की, लोकांमध्ये तुम्ही प्रिय व्हायला हवेत, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इतरांची नावे लक्षात ठेवणे. हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. जगातील कुठल्याही भाषिकाला आणि कोणत्याही देशातील रहिवाशाला जर सर्वात प्रिय काय असेल तर ते स्वत:चे नाव होय. स्वत:च्या नावाइतका महत्त्वाचा आणि गोड शब्द दुसरा असूच शकत नाही. खरे म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे लक्षात ठेवणे हे तुमच्या करिअरमधील महत्त्वाचे कौशल्य आहे आणि तुम्ही ते आत्मसात केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीची कितीही काळानंतर भेट झाली अन् तुम्ही त्या व्यक्तीला नावाने हाक मारलीत तर आपोआपच त्याच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी निर्माण होते.

नेपोलियन बोनापार्ट या महान योद्ध्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन, जो फ्रान्सचा सम्राट होता, अभिमानाने सांगत असे की, कामाच्या प्रचंड तणावातही तो इतरांची नावे लक्षात ठेवू शकत असे. याविषयी त्याचे तंत्र अगदी सोपे होते. जर एखाद्याचे नाव त्याला नीट ऐकू आले नाही, तर तो मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला म्हणायचा, ” माफ करा मला तुमचे नाव स्पष्ट ऐकू आले नाही.” आणि त्यानंतर सांगितलेले नाव तो लक्षात ठेवायचा. संभाषणादरम्यान समोरच्या अनोळखी माणसाचे नाव वारंवार उच्चारून ते नाव लक्षात ठेवणे ही त्याची खुबी होती.

चांगले श्रोते बना ….

स्वत:बद्दल बोलायला सर्वांनाच आवडते. पण ते मन:पूर्वक ऐकणारा श्रोता त्यांना हवा असतो.

जर तुम्ही चांगले संभाषणकर्ते बनू इच्छित असाल तर आधी चांगले श्रोते बना. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. अधूनमधून “हो का?”  “असं का?”  “त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात?” असे प्रश्न विचारा म्हणजे समोरचा माणूस आणखी उत्साहाने बोलू लागेल; आणि तुमच्या ध्यानीमनी नसतांना असे अनेक मित्र आपसूकच तुम्हाला मिळतील.

इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य दाखवा

सुप्रसिद्ध रोमन कवी पब्लीअस सायरस याने म्हटले आहे की, इतरांनी आपल्या गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवावे असे वाटत असेल तर आधी आपण इतरांच्या गोष्टीत स्वारस्य दाखवायला हवे. एक चांगला श्रोता होणे हे तर पुष्कळ महत्त्वाचे आहेच. पण त्यानंतरची पायरी म्हणजे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांच्या सुखदु:खात आस्था दाखवून खऱ्या अर्थाने समरस होता आले पाहिजे. कुणाचे कौटुंबिक प्रश्न असतील तर कुणाचे नोकरीतील प्रश्न असतील. त्यासंबंधी आस्थेवाईकपणे चौकशी करून, त्याविषयी काळजी व्यक्त करून दिलासा द्यायला हवा. “कुणीतरी आपली काळजी करणारे आहे,” या विचाराने माणसाला दिलासा मिळतो, धीर येतो; आणि यातूनच कधीही न तुटणारी नाती आणि प्रेमाचे बंध निर्माण होतात. आपल्या करिअरच्या यशस्वीतेसाठी हीसुद्धा एक गुरुकिल्ली आहे.

टीका करू नका.

परिस्थिती कुठलीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या. पण कुणावरही, कधीही उघडउघड टीका करू नका. नापसंती दर्शवू नका किंवा सरळसरळ तक्रारीचा सूर काढू नका. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्या नजरेत आणून द्या. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रगती होत नसते. इतरांना त्यांच्या चुकांबद्दल संशयाचा फायदा द्या. दोषी व्यक्ती आपोआपच स्वत:चे तोंड लपवील.

माझ्या तरुण मित्रांनो,  वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमचे करिअर यशस्वी झालेच म्हणून समजा.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मोबाईल वरील मेसेजेस वाचत होते .पेडोंगी नावाचे खेचर आर्मीमधे रसद पुरवत होते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडून आपल्याकडे कामाला लावले. संधी मिळताच पाठीवरच्या मशीन गन आणि बॉम्ब गोळ्या सहित 25 किलोमीटर चालून भारतीय हद्दीत आल. त्याचा सत्कार झाला. आणि गिनीज बुक मध्ये नाव पोचल . खरंच देशभक्त.

हे वाचत असताना आमच्या येथे घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. अनेक गाढवांचा घोळका निघाला होता. एक गाढव मात्र अगदी हळूहळू असहाय्यपणे लंगडत  चाललं होतं. माझ्यासारख्या प्राणी प्रेमिला गप्प बसवेना.  स्वप्नीलला हाक मारली. गाढव कोणाच का असेना पण त्यावर उपचार करायला हवेत. स्वप्नील एकटा काही करणे शक्य नव्हते. राहत संस्थेच्या किरण नाईक आणि पीपल फॉर ऍनिमल संस्थेच्या अशोक लकडे ना बोलावून घेतले. दोघांनी पकडून त्याला गॅरेजमध्ये ठेवलं. संपूर्ण पाय  सडला होता. त्यातून पाणी वहात होतं. त्यात किडे झाले होते. मालकाने काम करून घेऊन सोडून दिले होते .फोन करून डॉक्टरना  बोलावून घेतले. त्यांनी गाढवांचा पाय पाहिला मात्र आणि काय! यातून हे वाचणं शक्य नाही. इंजेक्शन देऊन सोडवायला हव असा सल्ला दिला.

जीव घेण दोन मिनिटाच काम  पण जीव वाचवायला काही दिवस लागतात .प्रयत्न तरी करून बघू. शेवटी त्याचं प्रारब्ध असं म्हणून प्रयत्न सुरू केले. गाढवाला खाण्याची सुद्धा  ताकत नव्हती. औषध लावलं तर जखमेवर रहात नव्हतं. जवळ जाणं शक्य नाही, इतका घाण वास येत होता .दोन दिवस पिचकारीने पाण्याने जखम धुवून काढली. दोन दिवसांनी औषध व बॅंडेज बांधले. पण तेही पायावर रहात नव्हते. शेवटी जखम उघडी ठेवली. एका वेळेला एक संपूर्ण ट्यूब लावावी लागायची. आता ते रोज ड्रेसिंग व्यवस्थित करून घ्यायला लागलं. किरण व अशोक गवताच्या  पेंड्या ,भरडा आणत होते .त्यांच्या गाडीचा आवाज त्याला कळायला लागला. आवाज आला की ते ओरडायला लागायचं. हळूहळू जखम भरून यायला लागली. आता गाढवाची सगळ्यांशी मैत्री झाली होती. किरणना तर आपण यशस्वी झाल्यासारखे वाटायचे. ते आले की पहिल्यांदा गाढवाला मिठी मारायचे. त्याच्याशी बोलायचे. जाता-येता कोणी कोणी विचारायचे “काय हो गाढव  पाळलंय काय ?”हसायला यायचे.

तीन आठवड्यांनी गाढवाची जखम  बरी झाली. एक दिवस गाढवाचा मालक  तणतणत आला.” माझं गाढव तुम्ही इथं ठेवलंय होय कधीचा हुडकतोय”. सगळ्यांनी त्यालाच  फैलावर घेतल. गाढवाच्या सडलेल्या पायाचे आणि बऱ्या झालेल्या पायाचे फोटो दाखवले.’ पावलावर दवाखाना असून त्याला उपचार न करता राबवून घेतलंस ,म्हणून सगळ्यांनी तोंडसुख घेतलं .आता त्याला बोलायला जागा नव्हती. त्याला तंबी दिली. औषधाचा खर्च 2000 आला म्हणून सांगितलं. शेवटी कसेबसे त्याने पाचशे रुपये काढून दिलेन .  त्याच पाचशे रुपयांची पुढील उपचारासाठी औषधे घेऊन त्याला दिली. गाढवही त्याच्या ताब्यात दिलं

दोन दिवसानी गाढव त्याच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायला लागलं. जाताना पाच मिनिट गॅरेज जवळ थांबून सगळ्यांकडे पहायचं. जीवदान मिळाल्याबद्दल धन्यवाद देण्याचा अविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसायचा. गाढवाचे प्रारब्ध, सगळ्यांचे प्रयत्न आणि सर्वात मोठी परमेश्वराची कृपा या. त्रयीतून गाढवाचा जीव वाचला.

काय म्हणावं गाढवाचा शहाणपणा की मालकाचा गाढवपणा!. वेडेपणाला गाढवाची उपमा का देतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

ऑस्ट्रेलियातील एका grandpa ची गोष्ट आहे. हे आजोबा रोज पहाटे समुद्र किनारी फिरायला जात. जाताना हातात एक टोपली असायची. किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले “Grandpa, हे काय करता?” आजोबा हसले आणि म्हणाले “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो,  अगं भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात पण त्यांची चाल मंद असल्याने बिचारे पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अश्याना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.” ही गोष्ट वाचल्यावर वाटले आपल्याही समाजात असे अनेक आजोबा, आजी  समाजातील मुलामुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडण्यास मदत करतात. त्यापैकीच ही एक देवी, ” मालती ताई निमोणकर”

नाव जरा अपरिचित  वाटले ना?  गुजरवाडीत एका उंच ठिकाणी एका आश्रमात राहायच्या. एकदा चैत्रात आम्हा मैत्रिणींना  बोलावून हळदी कुंकू केले होते. गुजरवाडीतील पण बायका आल्या होत्या. भजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच ह्या आजी. नागपूर जवळील मध्यप्रदेशातील एका छोट्याश्या गावात राहत होत्या. घरी अत्यंत कडक अश्या चालीरिती. पण सासू सासरे सुधारलेले होते. मॅट्रिक झालेल्या आजीने त्या काळी लग्न झाल्यावर BA केले. घरी खूप राबता होता. अश्या वातावरणात वाढलेल्या मालती ताई वरून पाहता खूप सुखी होत्या. दोन उच्चविद्याविभुषित मुली, उच्चविद्याविभुषित मुलगा,  सून,  सधन पती,  काय नव्हते?  परंतु मनातून मात्र  त्या समाधानी नव्हत्या.

सर्व जवाबदार्यांतून मुक्त झाल्यावर, लग्नाला ४० वर्षे झाल्यावर त्यांनी घरात एक निर्णय सांगितला. मी हे घर सोडून समाज कार्यासाठी बाहेर पडत आहे. थोडे समाजाचे देणे फेडून पहाते. घरातल्यांनी समजावले,  थोडे दटावले पण, म्हणाले, एकदा बाहेर पडलीस तर ह्या गृहस्थाश्रमात पुन्हा येणे नाही.. पण आजी ठाम राहिल्या आणि त्यांच्याच मुशीत घडलेल्या त्यांच्या लेकीने त्यांना पाठिंबा दिला.  एके दिवशी ह्या ध्येयाने पछाडून त्या आनंदवनात दाखल झाल्या. साधारण ५९-६० वर्षे वय. पहा, आपल्या घरातली वाटी, भांडी जरी हरवली तरी आपण कासावीस होतो. आजींनी क्षणात आपला भरलेला संसार सोडला. आनंदवनात बाबा व साधना ताईंनी त्यांना आपल्या बराकी जवळच खोली दिली. साधना ताईंचे आणि त्यांचे फार जुळले होते. पण अत्यंत कोमल हृदयाच्या मालतीताई कुष्ठरोग्यांची पीडा पाहून खिन्न होत. माणसाला पुस्तकाप्रमाणे वाचू शकणाऱ्या बाबांच्या डोळ्यांनी हे वाचले आणि त्यांनी डॉ. हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले ह्यांच्या बरोबर काम करण्यास सुचविले. आणि त्या तेथून पुण्यात दाखल झाल्या.

पुण्यात ओंकार ट्रस्ट व डॉ. हर्डीकर ह्या संयुक्त कामात त्या दाखल झाल्या.  गुजरवाडीत डॉ. शरयू घोले ह्यांच्या संस्कार वर्गाची धूरा त्या सांभाळू लागल्या. मुले आणि आजी खूपच रमून जात. आणि इथेच पुढे एक निवासी आश्रम सुरु झाला. ‘अनाथ आश्रम’ हा शब्द जरी उच्चारला तरी आजींना आणि त्यांच्या सहकारी  मानसी ताई ह्यांना राग येत असे. “अगं, आम्ही नाही का त्यांचे पालक?  सनाथच आहेत ही मुले. “शुभम,  मयूर अशी ५ व ३ वर्षाची मुले दाखल झाली आणि आजींचे विश्वाचं बदलले. आजींचे व शरयू ताईंचे कार्य वाढू लागले. हळू हळू मुलांची संख्या वाढली. तिथेच त्यांची शाळा सुरु झाली. आजी मुलांची खूप काळजी घेत. हे चालू असतानाच आजी वाडीतील स्रीयांना एकत्र करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवू लागल्या. अनेकांना त्यांचे निवास स्थान हे माहेरंच होते. मी पण त्याचा खूपदा अनुभव घेतला आहे. आजींच्या आश्रमात खूप प्रसन्न वातावरण होते. मुले तर आजींच्या भोवती सतत लुडबुडत असायची. मुलांसाठी आजींचा शब्द म्हणजे ‘वेद वाक्य’ होते. एक राम नावाचा छोटा तर म्हणायचा “मी मोठा होणार, खूप शिकणार आणि आजीला सोन्याची पैठणी आणणार.”

एक प्रसंग आठवतो! काही मुले अवती भोवती च्या परिसरात गवत काढायला गेली. रविवार होता, १-२ वाजे पर्यंत काम करून ती जेवायला आली. माझा ३ ला गणिताचा तास होता. मीही पोहोचले. तर काय! आजी सर्वांच्या हाताला तेल लावत होत्या. मी विचारले “काय झाले?” “अगं, गवत काढताना हाताला चरे पडलेत ना म्हणून मी तेल लावत आहे.” असे होते ते आजी-नातवांचे नाते. माझ्या तर डोळ्यात पाणीच आले. अनेक वर्ष ही माउली तिथे काम करत होती पण त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या दोन्ही लेकीने त्यांना नंतर घरी परत आणले. आज त्या ८५ वर्षाच्या आहेत आणि आपल्या लेकीकडे अमेरिकेत ध्यान साधना करत वानप्रस्थाश्रमात मग्न आहेत!

चला येणार का अमेरिकेत ह्या देवीचे दर्शन घ्यायला?

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा. … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,

भक्ती ते कठीण । सुळावरची पोळी   

निवडी तो बळी । विरळाशू

वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.

भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.

देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.

भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले.  असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.

भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.

व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.

‘भक्त’  या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय?  तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला,  तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय?  तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर?  ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच  निघाला. मग काय!  एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’.  आता साध्य आहे ‘व्यवहार’!  देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने  जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या  ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print