साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापड, कुर्डया आता हवाबंद डब्यात जाऊन बसतात. डाळ, पन्हं, आईस्क्रीम, सरबतं, सवयीची होत जातात. माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.
… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.
दुर्वास ऋषींच्या आविर्भावात आग ओकणारा रवी..
काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..
अंधत्वाचे काही प्रकार असतात, वेगवेगळी कारणे असतात, पण काही अंधांना दृष्टी आपण देऊ शकतो. त्याला नेत्रदान म्हणतात. नेत्रदान म्हणजे मृत व्यक्तीच्या डोळयातील बुबुळावरचा पारदर्शक पडदा, कॉर्निया, काढून घेणे. हे काम दहा मिनिटात होते, रक्तस्त्राव होत नाही, डोळे विद्रुप दिसत नाहीत. किंबहुना काही केले आहे असे वाटतही नाही. पण दोन डोळयांना आपण दृष्टी देऊ शकतो. नेत्रदान संमतीचे कार्ड जवळ ठेवावे. ते नाही म्हणूनही काही बिघडत नाही. मृताचे नातेवाईक ऐनवेळी सुद्धा नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात. वयस्कर व्यक्तींनी तशी इच्छा नातेवाईकाना सांगून ठेवावी. नेत्रदान तरी वय, डोळ्यांची परिस्थिती यावर अवलंबून असत नाही, फक्त कॉर्निया चांगल्या स्थितीत असावा लागतो. व्यक्ती मृत झाल्यावर सहा तासाच्या आत कॉर्निया काढावा लागतो.
खरं म्हणजे आपण सगळे नेत्रदान करू शकतो. प्रत्येकाची इच्छाही असते.पण प्रत्यक्षात तेवढे नेत्रदान होत नाही. त्याचे कारण मला असे वाटते हं, बरोबर की चूक माहित नाही…
… जेंव्हा घरातली व्यक्ती मृत होते त्यावेळी घरातली माणसे दुःखात असतात. पुरुष जरा लवकर सावरतात, पण त्यांच्या डोक्यात त्यावेळी कुणाकुणाला फोन करायला हवेत, पुढच्या गोष्टी काय काय करायच्या असतात हे सगळं असतं. एखादी व्यक्ती खूप हळवी असते, तिला सावरायचं असतं. अशावेळी त्यांना काही सुचत नसतं. पण मला वाटतं अशा प्रसंगात मदत करणारा (म्हणजे अर्थीचं सामान आणणं, शववाहिका सांगणं इत्यादी) एक नारायण असतोच. त्याने घरातल्या सावरलेल्या व्यक्तीला विचारावं. आय बँकेला फोन करावा. एक पुण्य आपल्या नावावर जमा करावं. अगदी नारायण विसरू शकतो असं समजून तिथे असलेल्यांपैकी कुणीही लक्षात ठेऊन ही गोष्ट करावी. खालची माहिती वाचलीत की तुम्हाला त्याचे महत्व समजेल. मग प्रत्येक मृत व्यक्तीचे डोळे सत्कारणी लावण्याचे काम कराल ना, नक्की?
जगातल्या ५ लाख अंधांपैकी एक लाखाच्यावर अंध लोक भारतात आहेत. त्यापैकी ६० टक्के १२ वर्षाखालील मुले आहेत. वर्षाला सुमारे दीड लाख नेत्र रोपणांची गरज असते. प्रत्यक्षात फक्त ४०- ४५ हजार नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. म्हणजे किती मुले नेत्र-रोपणाविना राहतात बघा ! आपण ठरवलं तर त्या सगळ्या चिमुरड्याना जग दाखवू शकतो. मग कविवर्य बा. भ. बोरकरांच्या देखण्या डोळ्यात आपलेही डोळे सामावतील…..
गेल्या वर्षी इंग्लंडमुक्कामी असताना,आमच्या मुलीनं चार दिवस स्काॅटलंडला जाण्याचं नियोजन केलं होतं. एडिंबरो ह्या स्कॉटलंडच्या राजधानीत आमचा मुक्काम होता. समृध्द प्राचीन परंपरांचे अवशेष तिथे जपून ठेवले आहेत. ते पाहून झाल्यावर एक दिवस जवळच्या समुद्रकिनारी आम्ही फिरायला जाणार होतो.
सकाळीच तयार होऊन तिथल्याच एका हाॅटेलात नाष्टा करून आम्ही एका बसने समुद्राकडे जायला निघालो.
हवा थंड होती.पण तिकडच्या लोकांना सवय म्हणून बहुतेक लोक टी शर्ट आणि बर्मुडा घातलेले होते.
काही वेळ बसमधून बाहेर पहात होतो. निसर्गसौंदर्याची अनेक रूपं, बसच्या आत आणि बाहेर चकाचक स्वच्छता ,लोकांची सौजन्यपूर्ण वागणूक मी इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये नेहमीचं आहे. त्यामुळे त्यात नवीन वाटत नव्हते. मी बसमध्ये पाहिलं.सगळीकडं स्तब्ध शांतता होती.अनेकजण आपापल्या मोबाईलमध्ये दंग होते तर काही डुलक्या घेत होते.
माझ्या पुढच्या सीटवर एक जोडपं बसलं होतं. ते पाठमोरे होते. तरीही त्यांच्या खांद्यावरचा भाग स्पष्ट दिसत होता. दोघंही उंच होते. तरीही तिची शरीरयष्टी नाजूक होती. तिनं केसांचा बाॅबकट केला होता.
गडद निळ्या रंगाचा झिरझिरीत फ्राॅक तिनं घातला होता. ती राजकन्येसारखी आकर्षक दिसत होती.
कडेच्या खिडकीतून ती बाहेर पहात होती. तिच्या मानाने तो खूप दणकट वाटत होता.दाट मिशा आणि डोक्यावरचे उभे राहिलेले केस यामुळे मला तो हिंदी सिनेमातल्या व्हिलनसारखा वाटत होता. थोड्या वेळात त्या व्हिलननं राजकन्येच्या खांद्यावर आपला हात टाकून तो तिला हसवायचा प्रयत्न करू लागला.ती शांत होती.
मनात विचार करू लागलो; सुंदर मुलींवर जाळं टाकणं हा बलिष्ठांचा जगभर चालू असणारा धंदा दिसतो.
त्याच्या प्रयत्नाला ती फशी पडली वाटतं, कारण तिनंही त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवली. मला तिची कीव आली तर त्याची चीड.
टिपीकल हिंदी सिनेमाची कथा मी मनात रंगवू लागलो. प्रवास कधी संपला ते कळलंच नाही. एका मैदानात बसच्या ड्रायव्हरने बस उभी केली.आमचं डेस्टीनेशन आलं होतं. समोर प्रचंड मोठा जलसागर पसरला होता.त्यावर अजस्र पूल होते.बाहेर आलो. थंडी बोचत होती. मीही पत्नी आणि मुलीसोबत थंडीचे कपडे घालून सगळेजण जात होते तो अथांग समुद्र पहायला गेलो.
सहज लक्ष गेले ते जोडपेही मला दिसले आणि धक्काच बसला.त्या सुंदर राजकन्येला उजवा हातच नव्हता. तिच्या बाॅबकटचे कारण समजून आले. मी पहात होतो. त्याने आपल्या अंगावरचं जर्कीन काढून अलगद तिच्या अंगावर ठेवलं. पाण्याला जोर खूप होता म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करून ठेवले होते.शिवाय अनेक सुरक्षारक्षकही लोकांना सूचना देत होते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून सगळी माहिती देत होता.
काही वेळात एक छोटीशी बोट येऊन उभी राहिली. त्याला फेरी म्हणतात. लोखंडी जिन्यावरून फेरीवर जायचं होतं. मी एका सीटवर बसून पहात होतो. तिला नीट चढता येत नव्हतं. तिला आधार देत त्याने तिला वर चढवलं. फेरीचा वेग वाढत होता. निसर्गाच्या आणि मानवी कर्तृत्वाच्या अनेक यशोगाथा आम्ही त्या स्फटिकशुभ्र जलाशयावर पहात होतो. फेरीवर जमलेली विविध रंगाची माणसं आनंदाने चेकाळली होती. मधूनच पाण्यात ती फेरी हिंदकळत होती. तेव्हा स्वतःला सावरण्याची कसरत करताना गमतीचे अनेक प्रकार घडून येत होते.
ती दोघं आमच्या जवळच्याच लाकडी बाकावर बसले होते.तिनं डाव्या हातानं फेरी पकडली होती,तरीही तिचा तोल जात होता.तो तिला आधार देत उभा होता.
फेरी शांत झाल्यावर त्याने आपली बॅग उघडून कसला तरी बिस्कीटचा पुडा काढून एक बिस्किट तिच्या तोंडात दिलं. फेरी हिंदकळली, तशी तिच्या तोंडातून बिस्किट खाली पडलं. मग त्याने एका हातानं तिला सावरत दुसर्या हातानं नवीन बिस्किट काढून तिच्या तोंडात दिलं……. एखादी पक्षीण आपल्या पिलाच्या चोचीत अन्न भरवते तसा मला तो आता वाटू लागला आणि त्याच्याविषयीचा राग जाऊन ती जागा आदराने घेतली.
☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! — लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆
‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’
… शाळेत असताना दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताबरोबर या प्रतिज्ञेने होत असे. कित्ती भारी वाटायचं. प्रतिज्ञा खणखणीत आवाजात म्हणायला मला खूप आवडायचं. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी शाळेत प्रतिज्ञा झाली नाही. हल्लीच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं तरी पुष्कळ आहे अशी परिस्थिती आहे. ते असो…
… प्रतिज्ञा म्हटल्यावर, म्हणताना आपण जे म्हणतोय तसं वागलं पाहिजे हे आपोआप मनात रुजत गेलंच. पण त्याच पुस्तकात हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं वाचलं की प्रश्न पडायचा, हजारो वर्षांपूर्वी निघणाऱ्या सोन्याच्या धुराचं कवतिक मला आज का सांगितलं जातंय? अर्थात हा प्रश्न मी कधी कुणाला विचारला नाही, कुणी त्याचं आपणहून उत्तर दिलं नाही.
मी शहरात जन्माला आले, शहरात वाढले. आपला देश कृषिप्रधान आहे या वाक्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्ष जावी लागली. शाळेच्या पुस्तकांनी मला काय दिलं माहित नाही पण शाळेने कळत नकळत माझ्यात ‘सेक्लुअर’ जगणं रुजवलं. त्यामुळे इतकी वर्ष मला माझा देश म्हणजे आजूबाजूचा समाज आवडायचा. त्यात त्रुटी होत्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या दिसायच्या, त्यांच्याशी दोन हात करावे लागायचे, पण तरीही राग यायचा नाही. कारण कितीही बुरसटलेला, कर्मठ असला तरी तो रक्त पिपासूं नव्हता. दुसऱ्याचं उघड उघड वाईट चिंतणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं भलं होणार आहे असं मानणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात गैर काहीच नाहीये, उलट ते मर्दुमकीचं लक्षण आहे असं म्हणणारा आणि मानणारा नव्हता. तो दंगेखोर असेलही, क्वचित प्रसंगी असहिष्णू होतही असेल पण त्वरेने सावरणारा आणि आपल्या चुकांचं उघड समर्थन करत त्या चुकांचा पायंडा पडावा यासाठी धडपडणारा नव्हता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता.
सातवी-आठवी पासून मी एकटीने प्रवास करते आहे. एकटीने प्रवास करताना ना मला तेव्हा भीती वाटली ना माझ्या पालकांना. शाळेत असल्यापासून कॉलनीतल्या मित्रांबरोबर भटकत होते, कधी कुणी मुलगी असून मुलांबरोबर खेळते म्हणून टोकलं असेल पण तितकंच..त्याचा न्यूसन्स कधी झाला नाही. की कुणी गॉसिप करण्याच्या भानगडीत पडलं नाही.
आज हे सगळं आठवण्याचं आणि लिहिण्याचं कारण, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आजूबाजूचा समाज मला अवस्थ करतोय. त्याचं वेळोवेळी खालावत चाललेलं रूप मला आतून पिळवटून काढतंय.
त्रास होतोय कारण तो रक्तपिपासू बनला आहे. सतत काहीतरी ओरबाडून घेण्याच्या वृत्तीचा बनला आहे. हपापेलेला वाटायला लागला आहे. सतत काहीतरी हवंय, अशी भूक जी कधीच शमणारी नाहीये.. माणसं शांत नाहीत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. साधं सिग्नलवर कुणी कुणाच्या पुढे गेलं तर माणसं एकमेकांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत असतात. रस्त्यावर माणसे कावलेली आहेत. त्यांना कायम कसला तरी राग आलेला असतो. आणि तो राग आजूबाजूच्या सगळ्या सहप्रवाशांवर सतत काढला जातो. माणसे कधी नाहीत इतकी जाती आणि धर्माच्या नावाने वेडीपिशी झाली आहेत. अचानक अस्मितांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत.
असंख्य जाती आणि विविध धर्म-भाषा यांनी बनलेल्या आपल्या देशाची माती सहिष्णू बनली आहे कारण त्याशिवाय या मातीत गुण्या गोविंदाने कुणालाच जगता येऊ शकणार नाही. सतत माझी जाती-धर्म-भाषा श्रेष्ठ म्हणत दुसऱ्याच्या जीवावर उठायचं ठरवलं तर उद्या इथे रक्ताच्या पाटापलीकडे काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून पिढयानुपिढ्यांच्या मशागतीनंतर सहिष्णू जगणं तयार झालंय. जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण भिन्न असलो तरीही आनंदाने एकत्र राहू शकतो यात असणारी विलक्षण ताकद, सामर्थ विसरून माणसं कप्पाबंद आयुष्य जगू बघतायेत. माणसाला एखाद्या छोट्या चौकोनी खोलीत बंद करून टाकलं आणि तिथं ऊन, वारा, नवा चेहरा यातलं काहीही येणार नाही, दिसणार नाही याची काळजी घेतली, त्या खोलीत कोंडलेल्या माणसाला कुणाशीही बोलता येणार नाही याची काळजी घेतली तर त्या माणसाचं काय होईल, तसं काहीसं आता आपल्या समाजाचं झालं आहे असं अनेकदा वाटतं. सगळं कोंडलेलं. कोंदट. कुबट.
मी शाळेत होते तेव्हा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या जाती धर्माचे आहेत याकडे माझ्या पालकांचं लक्ष नसायचं. रादर कुणाच्याच पालकांचं नसायचं. तो महत्वाचा मुद्दा नव्हता. पण आज आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांनी कुणाशी मैत्री करायची, याचे निर्णयही पालक घेऊ लागले आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीचा भारत मोठा ग्राहक आहे यातच आपली विकृत सामाजिक मनोवृत्ती दिसते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून स्वतःच्या गर्भार मुलीला जाळणारे वडील हा आपल्या समाजाचा कर्तृत्ववान चेहरा आहे. आणि अशा बापाचं समर्थन करणारे हे समाजाचं भीषण वास्तव. माणासांना मारणे गैर आहे, चूक आहे ही जाणीव नसलेला आणि आदीम भावनांना खतपाणी घालून त्याच कशा योग्य आहे हे ठसवायला निघालेला आपला समाज बनला आहे.
हे अचानक बनलेलं नाही..हळूहळू रुजत आता प्रस्थापित होऊ बघतंय.
रोजच्या जगण्याच्या धबडग्यात माणसांच्या मनातला कोलाहल आता उघड उघड अंगावर येतो आहे. शहरं बकाल झाली आहेत. माणसं नुसतीच धावत आहेत. गावांच्या समस्या आहेत तशा आहेत. शेतकरी अस्वस्थ आहेत. बेकारी वाढली आहे. कर्मठपणा वाढतो आहे. माणूस असुरक्षित झाला की तो त्याचं जगणं जाती-धर्मात शोधायला सुरुवात करतो. आपण असुरक्षित मनाच्या माणसांचा देश बनलोय का? अशा रक्तासाठी चटावलेल्या देशात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाढवणार का? त्यांना आपण कसा आणि कसला समाज देऊ करतोय याचा थोडा तरी विचार आपण करणार की नाही?
सरकारं येतात जातात. राजकारणाच्या गणितात आपण सामान्य माणसांनी, जो हे देश खऱ्या अर्थाने चालवतात त्यांनी किती वाहवत जायचं, किती अडकून पडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कुठलं सरकार येतं याहीपेक्षा आपल्या समाजाची रक्तपिपासू वृत्ती बदलणं जास्त गरजेचं आहे. सतत रक्ताची तहान लागल्यासारखा दिसतो आपला देश !
… खरंच इतकं रक्तपिपासू बनण्याची गरज आहे का आपल्याला?ज्या देशाने जगाला अहिंसा शिकवली त्या देशाला कधीही न शमणारी रक्ताची तहान लागावी?
मातीतल्या सहिष्णुतेची बाधा सगळ्यांना पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे.
आपण एकमेकांच्या रक्ताला चटावलेला समाज नाहीयोत. हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगण्याची गरज आहे.
हा देश ग्रेट होता की नाही माहित नाही, पण तो ग्रेट व्हावा यासाठी जात-धर्म-पंथ-भाषा-लिंग भेदाच्या पलीकडे भारतीय म्हणून विचार करायला हवाय. नाहीतर पुढल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.
समोर पराजित झालेला सुलतान खाली मान घालून उभा होता. पृथ्वीराज महाराजांनी मोठा लढा देऊन विजयश्री मिळवली होती तरीही, पृथ्वीराज चौहानाचे पाय जमिनीवरच होते. अभयदान देणारा दाता नेहमी श्रेष्ठच असतो नाही कां? आणि त्या श्रेष्ठत्वाला स्मरून त्यांनी सुलतानाला अभय देऊन बंधमुक्त केलं होतं.
पुढे अशा घनघोर लढाईची पुनरावृत्ती दोन वेळा झाली. विशाल अंतःकरणाच्या चौहानांनी सुलतानाला तीन वेळा अभय दिलं. पण सूडाच्या भावनेने, अहंकाराने पेटलेल्या सुलतानाने, त्या सैतानाने, आपल्या उपकार कर्त्यावरच चाल करून त्याचा पराभव केला. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो ना ! तसंच झालं. सुलतानाने,घनघोर प्रबळ सैन्याच्या बळावर चौहानांचा पराभव केला. आणि तो महापराक्रमी नरसिंह पृथ्वीराज चौहान शत्रूच्या जाळ्यात अडकून जायबंदी झाला.
पिसाळलेला सुलतान शब्दांचे आसूड फटकारून विचारत होता, “बोल चौहान क्या सजा चाहिये तुझे ? अब तो तुम हमारे कब्जेमे हो l और हमारे कैदी बन गये हो l अब तुम्हारे लिये एकही सजा काफी है l हमारा इस्लाम धर्म स्वीकार करो …l बस यही एकही रास्ता है तुम्हारे लिये l “
संतापाने लालबुंद झालेला तो नरकेसरी त्वेषाने म्हणाला, ” हमे सजा देनेवाले तुम कौन हो सुलतान? हमारी जान जायेगी लेकिन जबान नहीं जायेगी l हम जानकी कुर्बानी करेंगे लेकिन अपना धर्म कभी नही छोडेंगे ! “ डोळ्यातून अंगार ओकत दुभाषाला चौहान म्हणाले ” सांग तुझ्या पाखंडी सुलतानाला, शरणागताला अभय देणाऱ्या धर्माची आमची जात आहे. तर कपट नीतीने उपकारकर्त्यावरच उलटणारी तुझी सापाची जात आहे. अभय देऊन विषारी सापाला दूध पाजण्याची चूक झालीय आमच्याकडून. प्राण गेला तरी चालेल. पण इस्लाम धर्म आम्ही कधीही स्विकारणार नाही. आमच्या धर्माशी शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठच राहू.”
चौहानांच्या डोळ्यातील अंगार बघून सुलतान आणखीनच चवताळला. त्या क्रूरकर्माने त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा फर्मावली आणि तो पराक्रमी निरपराधी धर्मनिष्ठ पुरुष पृथ्वीराज चौहान पुरता जायबंदी झाला. अनेक प्रकारे त्याचा छळ झाला, पण निश्चयापासून तो शूरवीर जराही ढळला नाही . त्यांनी आपला धर्म सोडला नाही . त्यांच्या एकनिष्ठतेची आणि त्यांच्यावर चाललेल्या अन्वनित अत्याचाराची बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या राज्यात सगळीकडे पसरली. चौहानांची प्रजा कासाविस झाली. स्वामीनिष्ठ सेवक बैचेन झाले .आणि मग त्यांच्यातलाच एक सेवक मनाशी मनसुबा रचून सुलतानासमोर हाजिर झाला. आणि म्हणाला …” आपको सादर प्रणाम सुलतानजी l एक शेवटची संधी आम्हाला द्या. आमचे महाराज आवाजाच्या दिशेने निशाणा साधण्यात तरबेज आहेत . तुम्ही एकदा परीक्षा तर पहा .. त्यांचा नेम चुकला तर मग खुशाल त्त्यांच्यावर तलवार चालवा .”
सुलतान छद्मीपणे हसून म्हणाला, ” पागल हो गये क्या? वो अंधा क्या तिरंदाजी करेगा ? उसकी आखोंकी रोशनी तो गायब हो गयी है l मनावर कमालीचा ताबा ठेवत, सेवक शांतपणे म्हणाला, ” एक.. सिर्फ एक बार पहचान कर लो सुलतानजी” l अशी विनंती केल्यावर अखेर उत्सुकतेपोटी सुलतान तयार झाला .
मैदानात मोठे लोखंडी गोळे ठेवले गेले.आपल्या प्रजेसह, सैन्यासह,सुलतान तिथे विराजमान झाला. एक अंधा आदमी निशानेबाजी क्या करेगा ? हा कुचकट भाव मनात होताच. लोखंडी गोळे एकमेकांवर आदळले. ध्वनी झाला आणि बरोब्बर त्याच दिशेने पृथ्वीराजानी निशाणा साधला.. हे कसं शक्य आहे? सुलतान ठहाका मारून हसून म्हणाला ” इसमे कुछ गोलमाल है” ..
सेवकाने अदबीने उत्तर दिले ” सुलतानजी आणखी एकदा परीक्षा पहायची असेल तर अवश्य बघा. पण त्याआधी तुम्ही स्वतः नेमबाजी करण्याची महाराजांना आज्ञा द्या, कारण आमचे महाराज तुमचे कैदी आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय ते बाण सोडूच शकत नाहीत.” या स्तुतीने सुलतान खुलला . त्याने विचार केला, चौहान महापराक्रमी, युद्धकलानिपूण होगा तो क्या ! ये शेरका बच्चा पृथ्वीराज चौहान अभी अपनेही कब्जे मे हैं ” … आणि याचाच सुलतानाला गर्व झाला होता . मिशीवरून हात फिरवत सेवकाची विनंती त्यांनी मान्य केली. सेवक धावतच आपल्या स्वामींजवळ गेला. सुलतानाने विनंती मान्य केल्याची, सूचना, त्याला स्वामींपर्यंत पोहोचवायची घाई झाली होती .तो स्वामींजवळ पोहोचला. आपल्या स्वकीय भाषेतील कवितेच्या रूपाने, सुलतानाच्या आणि महाराजांच्या मधल्या अंतराचे मोजमाप, त्यानी आपल्या स्वामींना कवितेद्वारे सूचित केलं . जड साखळदंडांनी वेढलेला , दृष्टिहीन असा तो ‘ नरकेसऱी ‘ आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सज्ज झाला.
गडगडाटी हसून टाळ्या पिटत सुलतान छद्मीपणे म्हणाला .. ” चौहान.. अबे अंधे,कर ले नेमबाजी और दिखा दे अपनी होशियारी !”
आणि काय सांगावं मंडळी.. अहो ! आवाजाच्या दिशेने बाण सूं सूं करीत सुसाट सुटला .आणि–आणि –सुलतानाच्या छातीत घुसला .कपट कारस्थानी सुलतान क्षणार्धात, खाली कोसळला. त्याच्या पापाचा घडा भरला होता. मैदान माणसांनी गच्च भरलं होतं. सुरक्षा दलाला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. हजारो लोकांच्या साक्षीने, सुसज्ज सैन्याच्या देखत, संरक्षक नजरेचं पात लवण्याच्या आतच पृथ्वीराजांच्या बाणाने शत्रूला यमसदनास पोहोचवलं होत. “दगा-दगा “असं ओरडतच सैन्य चौहानांच्या दिशेने धावले. आता खरी परीक्षा होती ती राजांच्या स्वामीनिष्ठ सेवकाची,
विजेच्या चपळाईने त्यानें राजांच्या छातीत पहिल्यांदा खंजिर खुपसला . लगेच तोच खंजिर स्वतःच्या छातीत घुसवला . आणि- त्या दोघांना त्याक्षणीच शौर्य मरण आलं. शत्रूच्या हाती पडून स्वामींची विटंबना होण्यापेक्षा त्या स्वामीनिष्ठ सेवकाने स्वामींबरोबरच स्वतःलाही खंजिर खूपसून ,मरणाला आपणहून कवटाळून संपवलं .आणि ते दोघे स्वामी, सेवक ‘ ‘ ‘नरवीरकेसरी ‘ अजरामर झाले.
धन्य तो धर्मासाठी ,स्वामींसाठी प्राणांची आहुती देणारा कर्तव्यतत्पर सेवक आणि धन्य धन्य! ते पृथ्वीराज चौहान .. .अशा शौर्य मरण पत्करणार्या त्या पराक्रमी ‘ नरकेसरींना ‘ माझा. मानाचा मुजरा,– मानाचा मुजरा .
गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करताक्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या.त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला.
घरी येताना मन सहज विचार करू लागले की 50 एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला !
पर्यावरण म्हणजे काय? ही सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, मातीआणि जमीन या सर्वांचे संतुलन! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार!
आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे!
हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली !
माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर
जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले ,ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे..
5 जून 1973 साली अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची आपण काळजी करतो हे दिसून येईल!
तुझ्या वासाने, आणि तुझ्या रंगकांतीने मी इकडे आलो, ओढावलो गेलो, तुझ्या त्या मनमोहक रूपानी माझ्या मनास भुरळ घातली . काय तुझा तो सुवास, तुझा तो रंग आणि परिमळ …. विधात्याने नक्कीच खुबीने तुला निर्माण केले असेल बरं ! तुझ्या ह्या मुलायम अंगकांतीने म्हण की , विलोभनीय रंगाने म्हण, मी पुरता तुझ्या प्रांगणात शिरलो .. . मी आत कसा घुसलो ते कळलंच नाही .. केवढी ही जादू .. जी तुझ्या फक्त दिसण्यात आहे, रूपात आहे.. . तर मग मी अंतरंगात शिरलो तर काय होईल हे कळणारच नाही !
सुगंधाने एवढं मोहित होता येतं का रे ? ते भ्रमरांना विचारावे लागेल , त्यांची पण माझ्यासारखीच गत होणार.
मनुष्य काय किंवा भृंग काय, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, आकृष्ट होण्याची ओढ ही जन्मजातच ! बहुतेक आपण आकर्षित व्हावे म्हणूनच विधात्याचा हा खटाटोप नाही का ? भ्रमराने तरी कोणत्या फुलावर यावे, बसावे ! चुंबन घ्यावे ! हे त्याच्या प्राक्तनातच लिहिले असेल का ? कोणत्या फुलावर बसावे, त्याचा कोणता रंग असावा, ते कोणत्या जातीचे असावे, सुगन्ध कोणता असावा ह्याला बन्धन तर नाही ना ! कोणतेही फूल भ्रमरास प्रिय आहे, त्याला कश्याचेच बंधन नाही , जातिपात तो मानत नाही… क्षुद्र, श्रेष्ठ , उच्च कनिष्ठ, असा भेदभाव तरी त्याच्या मनात येत असेल का ? मग मी तर साधा मानव प्राणी , सुगंधाने मला भुरळ पडणारच. मन हे असंच रसायन आहे, असं नाही का वाटतं ? जिथे निसर्ग आहे तिथे ते ओढ घेतच. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला वय आड येतं का ? नाही ना ? मग मी तर साधा जीव ….
कठीण लाकूड पोखरणारा भृंग मृदु, नाजूक अश्या कमलदलात .. त्याच्या पाशात अडकून पडतो. कमलदलं केव्हा मिटतात व तो केव्हा मृत होतो, ते त्याला ही कळत नाही …. असा का बरं हा निसर्ग
नियम ! असे म्हणतात की फुलपाखरांचं मिलन झाल्यावर नर मरून जातो ! मादी तेवढीच जिवंत राहते. .. का ? तर पुढील पिढी वाढविण्यासाठी. मग नर फुलपाखरांच्या नशिबी मरणच का? कोणता निसर्ग नियम विधात्याने लावला? त्यासाठीच का नराचा जन्म आहे , नेहमीच शमा-परवानाचे नियम का बरं असावे, हे माहीत असून देखील नर हे कसं काय धाडस करतो? तर केवळ आंतरिक ओढ, माया जिव्हाळा, प्रेम !
प्रेम हे असंच असतं का हो ? का मग दरीत उडी टाकायची …. षड्रिपु हे निसर्गतःच सगळीकडे वास करतात का ? अगदी फुलांच्या-पानांच्या -वेलीच्या -सौंदर्याच्या -सुगंधाच्या ठाई ! पण त्यांचे अस्तित्व आहे का ? की विधात्याने विश्वमोहिनीचे रूप चराचर निसर्गात भरून ठेवलं आहे ? काळ्या कपारीतून थंडगार गोड पाण्याचा स्रोत, कुंडातून सतत ओसंडून वाहणारे थंड गार जलप्रवाह ! काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड. भूगर्भात असणारा तप्त लाव्हारस …. काय काय बघायचे हे ! आकाश व सागर निळेच का ! सागराचे पाणी खारट का ? सागराला जर तहान लागली तर त्यानी कुठं जायचं ? सरितेला सागराची ओढ का ? अश्या अनेक गूढ प्रश्नांनी मन सैरभैर होते.
देवा तू आमच्यासाठी काय काय निर्माण केलेस व हे मोहिनी-तंत्र कशासाठी वापरलेस? वर धर्म अर्थ काम करून मोक्ष मिळवण्यासाठी का भाग पाडलेस ? मोक्ष आहे की नाही मला माहित नाही पण ….
पुनरपि जननं पुनरपी मरणं
पुनरपि जननी जठरे शयनं ।।
… हाच सिद्धांत मला भावतो कारण तुझं निसर्गरूप मला सतत पहावे वाटते. म्हणूनच ययातीही पण स्वतःच्या मुलाकडून तरुणपण मिळवण्यासाठी मोहाच्या आहारी गेलाच ना !
हे सखी .. दे दे मला .. आज सर्व काही हवं आहे, जे जे असेल ते ते दे ! उधळण कर तुझ्या मृदु मुलायम हाताने तुझ्या नक्षत्रांची, तुझ्या सुगंधाने मी बेधुंद झालो. तुझ्या दरबारात कसलीच कमतरता नाही , तुझी पखरण अशीच चालू ठेव. मला आज मनमुराद अमृत लुटवायचं आहे, कोठेही कमतरता नको. आस्वाद घेवू दे मला …तुझ्या पवित्र नक्षत्रांचा , मुलायम पाकळ्यांचा वेडापिसा होवून मला भ्रमर होवू दे, मग मी जन्मभर तुझ्या सानिध्यात मृत झालो तरी चालेल ! कर खुली तुझी कवाडे ! सुगंधाची किंमत एवढी तरी किमान द्यावीच लागेल ना ! जन्मभर तुझ्या महिरपी मेघडंबरित विसावा घेण्याची तयारी आहे माझी .
मला तुझे एकतर्फी प्रेम नको, बलात्कार पण नको, मला तुझे सौंदर्य विद्रूप पण करावयाचे नाही.
तुझ्यातील प्रेमभावनेचं शिंपण कर. तू जशी असशील तशी तू मला प्रिय आहेस, तुझ्या सुगंधानी
माती पण भिजेल. ओला होईल गंधित वारा. हाच तर खरा निसर्ग नियम आहे .
विचार .. खुशाल विचार त्या सर्व लतावेलींना , फुलांना, पानांना, त्याच्या सुगंधाना, त्या पारिजातकाला विचार , आम्रकुसुमांना विचार, गुलाबाला विचार, गुलबकावलीला विचार ! निसर्गत: जे अव्याहत चालत आले आहे, त्या कालपुरुषाला विचार, त्या चंद्र सूर्य तारे ग्रह यांना विचार .. निसर्ग नियम ते कधी विसरले आहेत का ? मग मी तरी का विसरु !
असेच विचार त्या ययातीच्या मनात आले असतील का ? क्षणभंगुर वासनेचा विरक्त सोहळा, हाच मनुष्याला प्रिय आहे का ? हे निसर्गदेवते हेच तुला पण अपेक्षित आहे का ? ह्यालाच जीवन म्हणतात का ?
ययाती व्हायचं की संन्यासी, की ऋषी मुनी, की मानव धर्माचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं.
होय फुला हेच इंगित आहे का जीवनाचं ? तुझ्या परिमळ एवढी प्रचंड उलथापालथ करतो, तुझ्या मनमोहक रूपाने तो भ्रमर असो वा फुलपाखरू .. त्या दोघांचंही रुपडं तुला भावतं का रे ?
… हे ज्या त्या विविधरंगी फुलांनीच ठरवावं . मानवाला ह्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ?
☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे आम्ही सर्वजण एका वृद्धाश्रमाला भेट द्यायला निघालो होतो. संचालकांनी “एकदा येऊन बघून जा” असे सांगितले होते . आमचे अध्यक्ष श्री जोशी यांची बायको आणि मी जाताना जवळ बसलो होतो. त्या जरा वेळाने मला म्हणाल्या ,
“अग माझी नणंद यांची सख्खी बहिण तेथे आहे. आज आठ महिन्यांनी आमची भेट होईल.”
” ती तिथे असते” ?
मला आश्चर्यच वाटले .
” हो..अग तिचा मुलगा अमेरिकेत.. तो एकुलता एक.. आईची इथं सोय करून गेला आहे. गेली आठ वर्ष ती तिथेच आहे. पहिल्यांदा आम्ही सारखे जात होतो तिला भेटायला. पण आता आमची आमची ही वयं झाली ….प्रेम आहे ग… पण ….”
यावर काय बोलणार? सत्यच होते ते…
“तुमच्या घरी त्या येत होत्या का?”
” त्या लोकांनी सांगितलं ..घरी जास्ती नेऊ नका .कारण नंतर मग त्यांना इथे करमत नाही. “
“त्यांना ईतरांच्या अनुभवाने ते जाणवले असणार…”
“हो ग… पहिले काही दिवस भाचे, पुतणे, नातेवाईक त्यांना भेटायला गेले. नंतर हळूहळू त्यांचेही जाणे कमी होत गेले …. हल्ली इतका वेळही नसतो ग कोणाला..”
हे सांगताना वहिनींचा गळा दाटून आला होता….
आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतून उतरलो .एक नीटस, गोरीपान, वयस्कर अशी बाई धावतच आली…..
तिने जोशी वहिनींना मिठी मारली. शेजारी काका उभे होते. त्यांना वाकून नमस्कार केला .तिघांचे डोळे भरून आले होते .
मी ओळखले या नणंदबाई असणार… त्यांना झालेला आनंद आम्हालाही जाणवत होता. तिथे आम्ही चार तास होतो .तेव्हढा वेळ त्या दोघांच्या आसपासच होत्या .
सेक्रेटरींनी संस्थेची माहिती दिली. आणि संस्था बघा म्हणाले.सगळेजण गेले.
मी जोशी वहिनींबरोबर त्यांच्या नणंदेच्या रूममध्ये गेले .वहिनी दमल्या होत्या. नणंदेनी त्यांना कॉटवर झोपायला लावले. चादर घातली आणि पायाशी बसून राहिल्या.
विश्रांती घेऊन वहिनी उठल्यानंतर ते तिघ गप्पा मारत बसले. लहानपणीच्या ,आईच्या, नातेवाईकांच्या आठवणी काढत होते. हसणं पण चालू होतं.
इतक्यात “जेवण तयार आहे” असा निरोप आला.
जेवण वाढायला तिथे लोक होते. तरीसुद्धा नणंदबाई स्वतः दोघांना वाढत होत्या. काय हवं नको बघत विचारत होत्या .
त्यांचं जेवण संपत आल्यावर त्यांनी पटकन जेवून घेतलं.
थोड्यावेळाने आम्ही निघालो.
तेव्हा नणंदबाईंना रडू आवरेना… तिघही नि:शब्द रडत होते.. बोलण्यासारखं काय होतं?
सगळं समोर दिसतच होत….
सर्वात शेवटी दोघे गाडीत चढले.
बाहेर पदर डोळ्याशी लावून उभ्या असलेल्या नणंदबाई….
आम्हाला सर्वांनाच पोटात कालवत होत.
परत येताना वहिनी तर हुंदके देऊन रडत होत्या.
गप्प गप्प होत्या….
नंतर काही वेळानंतर म्हणाल्या
” वाईट वाटतं ग.. पण माझ्याकडे तरी कस आणणार? आमची एक मुलगी. आमचचं आजारपण करताना तिची किती तारांबळ होते …नणंदेची जबाबदारी तिच्यावर कशी टाकणार?तीलाही तिचा संसार नोकरी आहे. आणि हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही ग….पण नणंदेला एक सांगितलं आहे …आमच्या दोघांपैकी एक जण गेलं की मी किंवा हे तिकडेच राहायला येणार…”
हे ऐकल आणि माझेही डोळे भरून आले..
जे वास्तव आहे ते वहिनी सांगत होत्या तरीपण…….
वहिनी पुढे म्हणाल्या
” ती नेहमी म्हणते तुम्ही दोघ एकत्रच रहा…..तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य देवो देवांनी… “
पण ते झालंच नाही…. जोशी काका गेले आणि पंधरा दिवसांनी वहिनी पण गेल्या……
अशाच कधीतरी मला नणंदबाई आठवतात …आणि डोळे भरून येतात….
सोलापूरपासून जवळच असलेल्या एका खेड्यामध्ये आमचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर आम्ही एका ब्राह्मण कुटुंबाकडे जेवायला गेलो ते वडिलांचे मित्र होते …सोबत आणखीन गावातली दोन ब्राह्मण माणसे होती घरातल्या बाईंनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता अगदी छोट घर.. परिस्थिती अत्यंत सामान्य… चार माणसांना जेवायला बसता येईल इतकीच जागा आणि थोड्याशा उंचावर बाईंचं स्वयंपाकघर.. त्या मला म्हणाल्या “तु सगळ्या लोकांना वाढशील का म्हणजे मी गरम गरम पोळ्या करेन…” मी तेव्हा सातवीत होते म्हणजे बारा वर्षाचे वय असेल आणि मी म्हंटले हो… मी पानं घेतली. मीठ चटणी लोणचं एक भाजी आमटी भात भातावर वरण हे सगळं मी वाढलं त्या बाई पोळ्या करायला बसल्या! हे सगळं चुलीवर चाललं होतं. तेव्हा लाईट वगैरे काही नव्हते जेवणाऱ्या मंडळीसमवेत एक कंदील होता आणि बाई स्वयंपाक करत होत्या तिथे एक चिमणी होती .मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता …मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाहीये , संपले आहे. दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील. त्याप्रमाणे मी दुधाचा एक एक चमचा भातावर वाढला …
मंडळी जेवण करून उठले. माझ्या तोंडावरच प्रश्नचिन्ह त्यांना दिसत असाव बहुधा !मग मी आणि त्या जेवायला बसलो तेव्हा त्या म्हणाल्या.. “ खेडेगावात परिस्थिती खूप बिकट असते. त्यात आमच्या वाटण्या झाल्या. तूप दररोज जेवणात आता जमत नाही, पण आपला ब्राह्मण धर्म आहे ना .. भातावर तूप वाढल्याशिवाय कोणी जेवत नाही.. असे जेव्हा असते ना तेव्हा थोडेसे दूध वाढावे ..!” मला त्या फारसं न शिकलेल्या बाईचं मोठं कौतुक वाटलं …
तेव्हा काही कळत नव्हतं पण तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता आणि आता त्याचा विचार करताना वाटतं की खरंच आपल्या स्त्रियांनी धर्मसंस्कार संस्कृती आणि आपली असणारी परिस्थिती याच्याशी किती उत्तम सांगड घातली होती आपल्या घरचे न्यून कधीही कोणाला दिसू दिले नाही ती प्रत्येक वेळ साजरी करत होत्या म्हटलं तर चुकीचं होणार नाही.. म्हणूनच स्त्री ही शक्ती आहे तिची भक्ती केल्याशिवाय संसार चालत नाही अडचणीतून मार्ग कसा काढावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री… प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन कसे मिळवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री ..किती प्रश्नांची ती सहज सोडवणूक करते आणि ते कुणाला कळतही नाही. आजही मी त्या बाईला मनापासून नमन करते आणि खूपदा गंमत म्हणून वरणभातावरती दूध घेऊन पाहते त्या प्रसंगाची आठवण म्हणून—–!
मला वाटतं संसारात पदार्पण केल्यानंतर आईची जरा जास्तच आठवण येते काहो ? कारण एकेक चटके बसायला लागले की आई गं ! असं म्हणून आईच आठवते नाही कां आपल्याला ? बघा नं ! टोपली भरून वांगी बघून तुमचही असच झाल असत . पुराणातली नाही कांही खऱ्या वांग्याची गोष्ट सांगतीय मी. सोबतीला माझी फजिती पण ऐका. पहिल्यापासूनच सगळं सांगते तुम्हाला,
‘कंटाळा,’आणि ‘ हे मला येत नाही ‘! हे दोन शब्द माझ्या आईच्या कोशातच नव्हते. ही कडक शिस्त तिने आम्हा भावंडांना मारून मुटकून लावली होती .
संसाराचे धडे आईने आमच्याकडून गिरवून घेतले.ते धडे लग्न झाल्यावर ,संसारात पडल्यावर फार फार उपयुक्त आणि मौल्यवान ठरले.
एकदा गंमतच झाली कशी कोण जाणे ह्यांनी वांगी जरा जास्तचं आणली होती . कदाचित भाजीवालीने गोड बोलून साहेबांच्या गळ्यातच मारली असावीत, आता या एवढ्या वांग्याचे काय करू ? त्यांना प्रेमाने गोजांरू म्हटलं तर काटे हातात टोचणार . चरफडत पिशवी रिकामी केली. अहो टोपल भरलं की हो वांग्यानी ! माझ्यापुढे मोठा यक्षप्रश्न,! संसारात पडून सुगरणपणाच्या मोरावळा झाला नव्हता . त्यामुळे मला सुगरणीला ते आव्हानच होत. आईच डाळवांग अप्रतिम व्हायच. बुद्धीला ताण देऊन पहिल्या दिवशी आई कसं करायची ? काय काय घालायची ? हे आठवून आठवून केल एकदाच डाळ वांग. दुसऱ्या दिवशी केली भरली वांगी. तिसऱ्या दिवशी कांदा बटाटा वांग्याचा रस्सा. हाय रे देवा! तरीपण द्रौपदीच्या थाळीसारखी टोपलीत काही वांगी उड्या मारतच होती.आता काय करायच बाई ह्या वांग्याच ? पुन्हा भल मोठ्ठ प्रश्नचिन्ह ??? आणि मग एकदम ट्यूब पेटली. आईने केलेली मिश्र डाळींची, दाणे आणि अगदी दोनच चमचे, तांदुळाची सगळं काही थोडं थोडं घेऊन भाजून, वाटून मसाला घालून केलेली चविष्ट रस्सा भाजी आठवली. मग काय बांधला की हो पदर.! सगळ्या डाळी, दाणे भाजून, वाटून रस्सा केला. अय्या ! पण भाजलेले तांदूळ वाटायचे राहयलेच की जाउं दे ! घालू तसेच सबंध तांदूळ,एवढ्याशा तांदुळानी काय होणार आहे ? असं म्हणून मी तांदुळाची वाटी रिकामी केली.काय तरी बाई ह्या वांग्या वांग्यांनी डोकच फिरवलय. रसरशित फुललेल्या दगडी कोळशाच्या शेगडीवर भाजीचा हंडा चढवलाएकदाचा . “आज काय मग बेत” ?असं म्हणतच सगळेजण स्वयंपाक घरात डोकावले. मी थंडपणे उत्तर दिल, ” आज पण शेवटच्या वांग्याची, वेगळ्या प्रकारची,रस्सा भाजी केली आहे चला जेवायला “. सगळे नाक मुरडत मागच्या मागे पसार झाले. ह्यांना तर बोलायला जागाच नव्हती. कारण किलो दोन किलो वांगी हयांनीच तर आणली होती. माझ्या चेहऱ्याकडे बघून नवरोबांनी पण चक्क पळ काढला. पण काही म्हणा हं, भाजीचा सुगंध लपत नव्हता. बारा वाजले. पंगत बसली.आणि —
बापरे ! वाढताना लक्षात आल,भाजीत न वाटलेल्या तांदुळाचे प्रमाण जरा जास्तच झालय. एकजीव न झालेले अखंड तांदूळ माझ्याकडे डोळे वटारून बघताहेत आणि पाणबुडी सारख्या उड्या मारताहेत. चार घास खाऊन कसंबसं जेवण उरकून, ” ए आई आम्ही ग्राउंड वर जातो गं ” म्हणून मुल पसार पण झाली. हे मात्र भाजी चिवडत बसले होते. शेवटी न राहून इकडून विचारणा झाली “आजचा वांग्याचा प्रकार जरा वेगळा वाटला नाही कां?म्हणजे कुठे मासिकांत वाचलात कीं कुणी सखीनी शिकवला? नाही म्हणजे सहज विचारतोय, नक्की काय आहे हे ? वांग्याची भाजी का वांगी भात,? काय म्हणायच ह्याला ?”
मसाल्याबरोबर न वाटता सबंध तांदूळ घालून आधीच माझ्या चारी मुंड्या चीत झाल्या होत्या. तरी पण हार मानेल ती बायको कसली ? मी ठसक्यात उत्तर दिल, “आमच्याकडे ह्याला ‘ मसाला वांगी रस्सा भाजी ‘ , म्हणतात आणि माझ्या आईनेच तर मला ही शिकवलीय. आई पण अशीच करते ही मसाला वांगी. ह्यांचा घास हातातच राहयला. आ वासून ते माझ्याकडे बघतच राह्यले. ‘आता हीच्या आईने, म्हणजे आपल्या सासूबाईंनीच शिकवलं म्हणजे….
जाऊदे झाल ! पुढे काही न बोलणंच चांगल अशा धूर्त विचाराने, अगदी शेवटचं एकच राह्यलेलं वांग आ वासलेल्या तोंडात महाशयांनी कोंबल.आणि मी हुश्यss केल. संपली ग बाई एकदाची भाजी.
पुढे आईकडे गेल्यावर अगदी जस्सच्या तस्स आई पुढे मी ते वांगी पुराण मांडल. आणि लाडात येऊन म्हणाले, “ए आई अशीच करतेस नां गं तू ही भाजी ? मी तस ह्यांना सांगूनही टाकलंय की माझ्या आईने शिकवलीय ही भाजी मला.” आई काम करता करता एकदम थबकली . कपाळावर हात मारून पुटपुटली, “कार्टीनी तिच्याबरोबर जावयांसमोर माझीही अब्रू घालवली.जावई म्हणाले असतील, “अरे वा रे वा! आपली इतकी सुगरण बायको,आणि तिची आई म्हणजे आपली सासू खरंच किती सुगरण असेल.आईला नुसत्या कल्पनेनेच लाजल्यासारख झाल. आणि काय योगायोग बघा हं! हे नेमके त्याच दिवशी आईकडे यायचे होते. आई मधली सासू जागी झाली. पटकन माझ्या हातात पिशवी कोंबत ती म्हणाली, ” लवकर जा आणि मंडईतून वांगी घेऊन ये. आणि हो वाटेत मैत्रिण भेटली तर चकाट्या पिटत बसू नकोस.जावई यायच्या आत भाजी तयार झाली पाहिजे.” आहे का आता ! आई म्हणजे ना! मी कुरकुरले, ” आई अगं पुन्हा वांगी ? हे वैतागतील माझ्यावर” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आई म्हणाली, “जा लवकर आणि ताजी, छोटी, काटेरी वांगी आण पटकन.” हाय रे दैवा ! कुठून आईला हा किस्सा सांगितला असं झाल मला .कंटाळा तर खूssप आला होता पण आई पुढे डाळ शिजणार नव्हती. एकदाची चरफडत वांगी आणली. आणि जरा हाश हुश करीत दमले ग आई !असं म्हणून टेकले, लोडावर रेलून लोळण फुगडी घेऊन , माहेरपणाचा विसावा,घेण्याचा सुखद विचार करत होते . इतक्यात आईसाहेबांचे फर्मान आले.,” लोळू नकोस इकडे ये ,मी भाजी कशी करतेय ते नीट बघ. आणि तांदुळाचं वगैरे प्रमाण किती घेते तेही बघून ठेव.” मंडळी बघताय ना तुम्ही? माहेरी आले पण सासुरवासच कीं हो हा.! कुठून आईला ही वांग्याची गाथा सांगितली असं झालं मला. आणि हे तरी आजच का यावेत ? लगेच बायकोच्या मागे सासुरवाडीचा पाहुणचार झोडायला ? सगळे ग्रहच फिरलेत गं बाई माझे, पण करणार काय ? झक्कत उठले. आणि आईसमोर बसले. बघता बघता सगळी धान्य थोडी थोडी घेऊन भाजून,वाटून मसाला घालून चमचमीत भाजी तयार पण झाली. संपूर्ण घरभर भाजीचा घमघमाट सुटला होता. काय तरी बाई ! याच भाजीचा भुसावळला आपण केवढा मोssठ्ठा घोळ घातला होता. आणि ती तर मसाला भाजी नाही, तर मसाले भातच झाला होता. पाणबुडी सारखे अखंड तांदूळ त्यात उड्या मारत होते. पणअहाहा!ही आईने आत्ता केलेली भाजी रस्सेदार अशी,कित्ती छान दिसतीये . हे आले बारा वाजले. म्हणजे घड्याळयाचे हं . 😃 पानं मांडली . हात धुवायला जावई मोरीपाशी गेले. तेव्हा टॉवेल द्यायचं निमित्त करून मी पण हळूच पिल्लू सोडल, “अहो ऐकलंत का?आज जेवणात वांग्याची भाजी आहे बरं का! मी जेवढं हळू सांगितलं नां तेवढे हे जोरात किंचाळले “काsssय वांगी? आमच्या घरात आईकडे बाथरूम नव्हतं तर चौकोनी मोरी होती. तिथेच भला मोठा तांब्याचा वहिनीने लखलखीत घासलेला बंब आईने कोपऱ्यात त्रिकोणी तिवईवर व्यवस्थित बसवला होता.
हं तर काय सांगत होते, हे का s s sय ? करून ओरडल्यामुळे माझ्या भावाला शरद आप्पाला वाटल ह्यांना बंबाचा चटका बसला की काय ? तो एकदम पुढे येत म्हणाला, ” काय झालं बाळासाहेब ? बंबाचा चटका बसला का ? नाही म्हणजे ! एकदम ओरडलात म्हणून म्हटलं.” हे गडबडले ओशाळून म्हणाले, “नाही ! नाही! तसं नाही.,! “असं म्हणत मी दिलेल्या टॉवेलमध्ये त्यांनी तोंड खूपसलं. तेवढ्यात, शरद आप्पासाहेब गरजले” अरे त्या बंबाची जागा बदला रे कुणीतरी. ” एवढ्या सगळ्या गोंधळात मी कशाला थांबतीय तिथे? वांग्याच्या भाजीचे पिल्लू सोडून मी पळ काढला. आईजवळ येऊन उभी राहयले तर आई गालातल्या गालांत हंसत होती.’ त ‘ वरून ताकभात ओळखण्या इतकी ती नक्कीच हुशार होती .या सगळ्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने वहिनी मात्र विचार करीत होती,बंब कुठे ठेवायचा? असा हा सावळा गोंधळ कुठून कुठे चालला होता.
पानावर बसल्यावर जावई सासुबाईंना म्हणाले, “सासूबाई भाजी जरा कमी करता का? नाही म्हणजे वांग्याची भाजी मला सोसत नाही अलर्जी आहे .” हा इशारा मला होता. मुकाट्याने वाटी उचलून त्यात फक्त दोनच चमचे भाजी वाढून मी वाटी ह्यांच्या पुढे ठेवली.पहिला वरण भात संपला.आता पाळी आली भाजीची. ह्यांनी भाकरीचा तुकडा मोडून घास तोंडात घातला.आणि डोळेच विस्फारले. एका सेकंदात वाटी रिकामी झाली.अगदी चाटून-पुसून वाटी घासल्यासारखी लख्ख झाली. उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” सासूबाई काय कमाल आहे!मस्त झालीय हो भाजी. खूपच छान ! नाहीतर आमच्याकडची बाई साहेबांनी केलेली भाजी, नव्हे.. नव्हे वांगी भातच म्हणावं लागेल त्याला .नको नको ती आठवणच नको!. असं म्हणून चेहरा वेडा वाकडा करत जावयांनी विनवल, ” सासुबाई एक विनंती आहे, तुमची लेक माहेर पणाला आली आहे ना, तर रोज शाळा घ्या तिची. “आई झटकन पुढे झाली. आणि म्हणाली,”असं नका हं म्हणू, ही भाजी तुमच्या बायकोनीच केली आहे ” आईने पांघरूण घातल्यावर मीही नाक फुगवून म्हणाले, ” बर का आई ! आत्ता तुझ्या देखरेखी खाली मी भाजी केलीय . अशीच भाजी पुन्हां मी करूनच दाखवीन.” खाली मान घालून घे पुटपुटले नको नको!काही दिवस तरी नको. ” लगेच वहिनी म्हणाली,” आता सासुबाईंच्या देखरेखी खाली मी पण तयार होणार आहे.आणि म्हणणार आहे ,” हम भी कुछ कम नहीं ”
मैत्रिणींनो –वांगी पुराण– संपलं. एक गोष्ट मात्र लक्षात आली, माझी आई,सुगरण, संसार दक्ष, संसाराचा समन्वय साधणारी आणि सगळ्यांना शिस्तीत मार्गदर्शन करणारी होती. तसंच मला व्हायचं आहे. पण या कथेवरून तुम्हीही एक धडा घ्या बरं का ! वांगी खूप नका हं आणू? नाहीतर रोज वांगी..वांगी.वांगीपुराणच होईल तुमच्या घरी. .