श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘हद्द…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

रानातून आलेल्या तात्यांनी घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या गोठयात वैरणीचा भारा टाकला आणि तिथंच डाव्या बाजूला अळू, कर्दळ आणि केळी जवळ असणाऱ्या दगडावर उभा राहून  हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारले आणि पायात वहाणा सरकवून खांद्यावरच्या टॉवेलने तोंड पुसत  मागच्या दाराने घरात न येता बाजूच्या बोळकांडीतून पुढे आले. तीन पायऱ्या चढून वर सोप्यात आल्यावर उजव्या बाजूला भिंतीकडे पायातल्या वहाणा काढल्या आणि सोप्यातल्या खांबाला टेकून बसत बायकोला, लक्ष्मीला हाक मारली.

गोठ्यात वैरणीचा भारा टाकला तेंव्हाच लक्ष्मीला तात्यांच्या येण्याची चाहूल लागली होती. त्यांनी वैलावरचा चहा उतरवला. दोन कपात गाळला आणि चुलीतील लाकडे बाहेर ओढून त्या चहा आणि पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आल्या. तात्यांच्या हातात तांब्या देताच त्यांनी वरूनच चार घोट पाणी प्यायले आणि तांब्या बाजूला ठेवला. त्यांनी तात्यांच्या हातात चहाचा भरलेला कप दिला आणि स्वतः तिथंच शेजारी पायरीवर पाय सोडून जोत्यावर बसल्या.

तात्या चहा पीत असतानाच त्यांना तो ही वैरणीचा भारा घेऊन येताना दिसला. तो तात्यांच्या हद्दीत पायही पडणार नाही याची काळजी घेत त्याच्या हद्दीवरून वळला. वैरणीचा भारा गोठयाच्या बाहेरच्या बाजूला उभ्या उभ्याच फेकला. तात्यांकडे रागाचा कटाक्ष टाकून तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याच्या घरात गेला.

तात्यांना पाहिले किंवा काही मनाविरुद्ध झाले तर त्याचे सळसळते रक्त उसळून यायचे, तो चिडायचाच अन एकदा चिडला की मग मात्र त्याचा स्वतःवर ताबा राहत नसे. त्यात वडील गेल्यापासून तर त्याच्यावर वचक असा कुणाचाच राहिला नव्हता. आई बिचारी त्याच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे मनाने खचलेली, थकलेली. ती त्याला सारखे सांगत राहायची, समजावत राहायची.

” तुमच्या अशा मुळुमुळू बोलण्या- वागण्यानेच प्रत्येकजण शिरजोर झालाय, डोक्यावर बसायला लागलाय..”

आईच्या समजवण्यावरही तो उसळून तावातावाने ,रागाने, चिडून आणि शेजारी तात्यांच्या घरात ऐकू जाईल असे म्हणायचा.

त्याच्या मनात आपल्या शेजाऱ्यांच्याबद्दल, तात्यांच्याबद्दल खूप राग होता. शेजारच्या तात्यांचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा हद्दीवरून वाद होता, ही गोष्ट खरी होती पण हा वाद काही आत्ताचा नव्हता. मागील तीन चार पिढ्यांपासूनचा वाद होता. त्याची ही चौथी पिढी.  वाद होता तरीही त्यांची कुटुंबे शेजारी-शेजारी नांदली होती.

गुण्यागोविंदाने नांदली होती असे म्हणता येणार नाही पण कारणपरत्वे होणारे, घडणारे  भांडण वगळले, एकमेकांशी असणारा अबोला वगळता, खरंच ती शेजारी नांदली होती. सुख-दुःखाच्या क्षणी,काही दिवसांकरिता का होईना, हा अबोला विरघळून जायचा. पण त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यावर मात्र शेजारच्या काकू, तात्यांची बायको, आईचा आधार झाली होती. दुपारच्या निवांत वेळी परड्यात काहीतरी काम करता करता  त्या तिच्याशी बोलत असत. कधीतरी घरात काही केलेला पदार्थ त्याच वेळी इकडून तिकडे जात येत असे. 

आधीही भांडणे नियमित अशी नव्हतीच कधीतरी कारण परत्वे होत.. ती मात्र कडाक्याची, हमरीतुमरीवर येऊन होत.  पण त्याच्या वडिलांच्या मृत्युनंतर तात्यांकडून कधीच भांडण झाले नव्हते.. त्यांच्या कडून भांडणाची धार बोथट झाली होती. त्याचे वडील गेल्यावर पुन्हा पुन्हा काही दिवसांनी तात्या त्यांच्या घरी आलेूपच वाईट झाले. आपल्या दोन्ही कुटुंबात वाद-विषय आहेच पण ते सारे विसरून काहच पण ते सारे विसरून काहीही अडले-नडले तर सांगा. “

तात्या त्याच्या आईला म्हणाले होते. त्यांच्या मनालाही त्याच्या वडिलांचा मृत्यु चटका लावून गेला होता.

                                  क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments