सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ आदिशक्ती चंडिका देवी –  पाटणा ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून “नवरात्र उत्सव” म्हटला जातो..हा नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.. नवरात्रीत  देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते..

पाटणा— आदिशक्ती चंडिका देवी

श्री चंडीकादैव्यै नमो नमः

पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे पूर्वाभिमुख असलेले हेमाडपंथी पुरातन मंदिर…हे आदिशक्तीचे मंदिर बाराव्या शतकात उभारले गेले आहे.  राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. १०ते १२ फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आलेली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याला अठ्ठावीस कोपरे आहेत तर गाभा-यातील सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. पाटणादेवीच्या या  मंदिरात असलेली देवीची मूर्ती खूपच भव्य आहे. प्रसन्नमुख असलेल्या देवीचे एकदा दर्शन घेवून समाधान तर होतच नाही तर पुन्हा पुन्हा देवीचे दर्शन घ्यावेसे वाटते… देवीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहून आपण आपले भानच विसरुन जातो…अत्यंत तेजस्वी असे रूप…. हे तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर नतमस्तक होतो.. 

मातेच्या मंदिरासमोर असलेल्या दोन भव्य दिपमाळा ही पाटणा देवी मंदिराची खास ओळख.. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथर्‍यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे… जवळच असलेल्या पाटणा या  गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.. व ओळखले जाऊ लागले..  

आपण ज्या गावातून पाटणादेवी मंदिराकडे जातो ते गाव म्हणजेच पाटणा.. या गावाला ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व आहे. भारताचे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही जन्मभूमी…

भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दलची माहिती असलेला शिलालेखही येथे आहे. पाटणादेवीच्या मंदिरात बाराव्या शतकामधला एक शिलालेख आजही आपणांस  पाहावयास मिळतो… त्यावर भास्कराचार्यांची वंशावळ कोरलेली आहे. 

मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने  सह्याद्रि पर्वताचे उंच उंच कडॆ, विविध वृक्ष- वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे यामुळे मन अगदी मोहून जाते… 

मंदिराच्या चौथर्‍यावरुन मंदिराच्या भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वतांचे उंच उंच कडे, रंगीबेरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, नागमोडी खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे हे सर्व दृष्य पाहताना आपण स्वतःला पूर्णपणे विसरुन निसर्गाशी कधी  एकरुप होऊन जातो हे समजतचं नाही..! अश्या या रमणीय सौंदर्याने नटलेल्या ठिकाणचा इतिहास ही तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे…

घनदाट जंगलातच पर्यटकांना मोहात टाकणारे केदारकुंड सर्वांनाच आकर्षित करतो… येथूनच जवळ केदारेश्वराचे प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे… नागार्जुन गुंफा व सितान्हाणी या गुंफा तसेच नवव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्याही आहेत… या लेण्यांच्या पुढे सीतेची न्हाणी नावाची लेणी आहे. ही लेणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे… त्याचप्रमाणे दक्षिणेतील  पुरातन लेणी पितळखोरे सुद्धा याच ठिकाणी आहे. 

असे  विविधतेने नटलेले पाटणा देवीचे मंदिर… अनेकांची ही कुलस्वामिनी आहे. आजही कुळधर्म कुळाचारात बरेच भक्त धवलतीर्थातून देवीचे स्मरण करुन पूजेसाठी तांदळा नेतात.

दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.. दर पौर्णिमेस देवी चंडिका हिची (भगवतीची) महापूजा केली जाते..

चला तर मग…चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी या धार्मिकस्थळाला नक्कीच  भेट द्यायला हवी…

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments