मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा वक्तृत्वाची… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “कथा वक्तृत्वाची” ☆ श्री सुनील शिरवाडकर

श्री. विश्वास नांगरे पाटील आणि प्रा. शिवाजीराव भोसले 

आपलं पहिलं वहीलं भाषण अनेकांना आठवत असतं. ते बहुतेक वेळा फसलेलं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं असंच एक पहिलं भाषण. प्राथमिक शाळेत होते ते.आणि प्रसंग होता टिळक जयंतीचा. व्यवस्थित पाठ केलेलं भाषण ऐनवेळी ते विसरून गेले. सुरुवात तर केली होती..पण पुढे आठवेना.

‘एवढं बोलुन मी माझे भाषण संपवतो’ असं म्हणुन त्यांनी जयहिंद केलं.नंतर त्यांना असं स्टेजवर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली ती थेट कॉलेज मध्ये.

‘मला पडलेलं स्वप्न ‘ असा विषय दिला होता.सोमवारी ती स्पर्धा होती.आदल्या दिवशी त्यांनी एक चित्रपट बघितला होता..लालपरी नावाचा.एका गरीब मुलाला एक लालपरी भेटते.. त्याच्या आयुष्यातील अडचणी ती दुर करते..त्याची स्वप्न ती पुर्ण करते असं काही तरी ते कथानक होतं.

विश्वास नांगरे पाटलांनी कोणतीही तयारी न करता ते कथानकच अगदी समरसून सांगितलं. भाषणाला टाळ्या मिळवल्या.. पहिला नंबरही मिळाला.

अँकरींग करणे, किंवा आरजे यासाठी पण वक्तृत्व आवश्यक असतेच.कोणाला त्यात करीअर करायचे असते कोणी केवळ हौस म्हणून याकडे बघतात.पण एक उत्तम वक्ताच उत्तम ॲंकर होऊ शकतो.मग उत्तम वक्ता होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

” युवकांनी वक्ता होण्याची इच्छा जरूर बाळगावी.. पण त्यात अनिवार अधिरता नसावी.वक्तृत्व हे जोपासलेल्या व्यक्तीमत्वाला आलेले फळ असते.साधनेची सुदिर्घ वाट..आणि त्यानंतर शेवटी शेवटी येणारी प्रसिध्दीची पहाट ” —- हे विचार आहेत प्रा.शिवाजीराव भोसले यांचे. वक्तृत्व म्हणजे काय.. त्यासाठी नेमके काय करावे लागते.. मनाची,विचारांची मशागत कशी करावी,यांचं मार्गदर्शन शिवाजीराव भोसले करत असत.

वक्तृत्व आणि शिवाजीराव यांना आपण वेगळे करुच शकत नाही. ही कला त्यांनी कशी प्राप्त केली? त्यांनी विद्यार्थी दशेत असताना खूप भाषणे ऐकली.. त्यात श्री. म.माटे..बाळशास्त्री हरदास.. ना.सी.फडके..साने गुरुजी.. नंतरच्या काळात बाबासाहेब पुरंदरे.. इंदिरा गांधी.. वाजपेयी असे अनेक वक्ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. 

शिवाजीराव म्हणतात…. 

“एखादा वक्ता बोलण्यामुळे प्रसिध्दिस येतो.. पण तो ऐकण्यामुळे घडतो.. वाढतो हे आपण विसरून जातो. गायनात आणि वक्तृत्वात श्रवणाचे महत्त्व मानावेच लागेल. संगीत श्रवणाने कान तयार होतो, तर व्याख्यान ऐकून मन तयार होते. इतरांना काहीही ऐकवू पाहणाऱ्यांनी आरंभी खूप ऐकले पाहिजे. श्रवणाशिवाय आकलनाचे क्षितिज विस्तारत नाही.. बहुश्रुतपणा प्राप्त होत नाही.”

उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे हे जसे शिवाजीराव सांगतात.. तसे काय करु नये याचेही ते मार्गदर्शन करतात.दाद किंवा प्रतिसाद वक्त्याला हवाच असतो.. पण सुरुवातीला तो मिळण्याची शक्यता कमीच. शिवाजीराव सांगतात.. श्रोत्यांचे लक्ष विचारांकडे कमी आणि शब्दांकडे अधिक असते .त्यामुळे नवखा वक्ता चमकदार शब्दांचाच आश्रय घेतो.पण नंतर त्याला ती चटकच लागते. सुमार शब्दयोजना करून टाळ्या मिळवण्यात तो धन्यता मानतो आणि नंतर या पाशातून बाहेर पडणे त्याला अशक्य होते.

ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शिवाजीराव सांगतात..

“ वक्तृत्व ही मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते.. रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत रहातात.. त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होते.” 

आपल्या पहिल्या..खरंतर दुसऱ्या भाषणात यश मिळाल्यावर  विश्वास नांगरे पाटलांचा आत्मविश्वास वाढला.त्यांनी ठरवलं..आता झाकली मूठ ठेवायची नाही. कोणत्याही स्पर्धेत उतरायचं .. .. भिडायचं  …लढायचं.. जिंकलो तर उत्तम, हरलो तर विचार मांडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.

आणि हा आत्मविश्वास त्यांना मिळाला तो आपल्या बोलण्यातून….  आपल्या वक्तृत्वातून.

(१ जून – विश्वास नांगरे पाटील यांचा जन्मदिवस… .. त्या निमित्ताने…)

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘गेला असेल कुठेतरी… येईल परत’ 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?’ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

– ‘तुला राग नाही आला माझा?’

– का यावा? 

– मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

– छे छे ! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का?

. ..  आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का?

.. ..  म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

– मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

– चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट ..  आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

— चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

…’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

.. .. आपण फार एकटे झालेले असतो…. !!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगू नका 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते।।.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अमृतघट” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अमृतघट” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : “अमृतघट” – काव्यसंग्रह

कवयित्री : अरुणा मुल्हेरकर

प्रकाशक : शॉपीजन

प्रकाशन :१६ मे २०२४

किंमत:®२९१/—

सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा नुकताच प्रकाशित झालेला अमृतघट हा काव्यसंग्रह हाती पडताच प्रथम दर्शनी मी दोन गोष्टींमुळे अत्यंत प्रभावित झाले. पहिले म्हणजे काव्यसंग्रहाचे शीर्षक. अमृतघट  या शब्दातलं माधुर्य आणि शब्दात असलेला उपजतचा काव्यभाव, रसमयता आणि शुद्धता मनाला आकर्षित करून गेली. अमृतघट म्हणजे अमृताचा घट,  अमृताचा कलश.  अमृत म्हणजे संजीवन देणारं सत्त्व. तेव्हाच मनात आलं,” नक्की या काव्यसंग्रहातून मनाला संजीवन, चैतन्य, ऊर्जा लाभणार.” नावात काय असतं? असं म्हणतात पण माझ्या मते नावातही खूप काही असतं.

दुसरं म्हणजे या पुस्तकाचं अत्यंत आकर्षक असं मुखपृष्ठ जे सुप्रसिद्ध चित्रकार आणि ग्राफिक्सकार सौ. सोनाली सुहास जगताप यांनी केलेलं आहे. अतिशय मनोवेधक असं हे मुखपृष्ठ आहे. घटातून अमृतधारा ओसंडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बासरीच्या सुरात तल्लीन झालेल्या सावळ्या, मोरपीसधारी, घनश्यामाची भावपूर्ण मुद्रा! संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर हे मुखपृष्ठ किती योग्य,अर्थपूर्ण आणि चपखल आहे याचीच जाणीव होते.

अमृतघट  उघडला आणि त्यातून बरसणाऱ्या अमृतधारांनी माझे मन अक्षरश: पावन झाले.

भक्तीरसमय  ५८ भक्तीगीतांनी हा कलश भरलेला आहे. यात अभंग आहेत, ओव्या आहेत, आरत्या आहेत,अंगाई,लावणी, वृत्तबद्ध भक्तीरचनाही आहेत.

जसजशा तुम्ही या भक्तीरचना वाचत जाता तसतसा तुम्हाला तादात्मतेचा, एकरूपतेचा, अद्वैताचा अनुभव येतो. अवघा रंग एक होऊन जातो.

या संग्रहात गणेशाची आराधना आहे, विठ्ठल भक्तीचा आनंद आहे आणि कृष्ण भक्तीची तल्लीनता आहे. या साऱ्याच भक्तीरचना रूप रस गंध नादमय आहेत यात शंकाच नाही.

जगामध्ये असा कोणी नसेल ज्याच्या मनात परमेश्वराविषयी भाव नाही.” मी परवेश्वराला मानत नाही” असे म्हणणाऱ्या माणसाच्या मनातही कुठेतरी ईश्वरी शक्ती विषयीची, त्याच्या अस्तित्वाची मान्यता असतेच आणि त्या शक्तीशी शरण जाण्याची कधी ना कधी त्याच्यावरही वेळ येतेच तेव्हा तो हतबल जरूर होत असेल पण  त्यावेळी तो फक्त शरणागत असतो. अरुणाताईंच्या या भक्तीरचना वाचताना वाचक खरोखरच शरणागत होऊन जातो.

तुज नमो या अभंगात त्या म्हणतात,

तूच एक आम्हा।  दावी मार्ग काही। तुजविण नाही। जगी कोणी।।

तुजविण शंभो मज कोण तारी” हा करुणाष्टकातला बापुडा भाव याही शब्दांतून जाणवतो.  कर्ताकरविता तूच आहे याची पुन्हा एकदा या शब्दांतून मात्रा मिळते.

सामान्य माणसाची भक्ती ही सगुण असते. त्याच्या श्रद्धास्थानाला एक काल्पनिक रूप असतं आणि ते मनातलं रूपदर्शन त्याला चैतन्य देत असतं.

सगुण भक्ती या काव्यरचनेत अरुणाताई किती सहजपणे म्हणतात,

लागलीसे आता। एक आस बाबा।

दावी तुझ्या रूपा ।जगन्नाथा।।

खरोखर भक्ताची व्याकुळता, आर्तता या संपूर्ण अभंगात  दृश्यमान  होते.

कृष्ण सखा, कान्हा, मुरलीधर, देवकीनंदन, गोवर्धनधारी अशी कितीतरी मधुर नावे प्राप्त झालेले भगवंताचे रूप आणि मानवी जीवन याचं अतूट नातं आहे.  कान्हाच्या भक्तीतला जिव्हाळा ज्याने अनुभवला नाही असा जिवात्माच नसेल.

सावळा हरी या रचनेत अरुणाताई याच लडिवाळ भावनेने लिहितात,

नंदाचा तो नंदन 

यशोदेचा कान्हा

करी नवनीताची चोरी 

फुटतो गोमातेला पान्हा.. 

फुटतो गोमातेला पान्हा या तीन शब्दांनी अंगावरचा  रोमरोम फुलतो. 

ही रचना वाचताना वाचक गोकुळात जातो. कृष्णाच्या बालक्रीडेत सहजपणे रमून जातो. 

धून मुरलीची ऐकूनी 

अवघ्या गोपी मुग्ध झाल्या

देहभान त्या विसरून

सुरावटीवर डोलू लागल्या…

वाचकही अशाच मुग्धावस्थेत काही काळ राहतो.

माऊली, गुण गाईन आवडी, विठ्ठल विठ्ठल गजरी, वारी निघाली, या भक्तीरचना वाचताना आपण वारकरीच बनून जातो आणि टाळ,मृदुंगाच्या  गजरात चाललेल्या वारीचा सहजपणे भाग बनून जातो.

रूप सावळे साजिरे।हरपले माझे मन।

डोळा भरुनिया।पाहू चित्ता वाटे। समाधान ।।

इतके भक्तीरसात आकंठ बुडालेले शब्द पंढरपुरी स्थित असलेल्या माऊलीच्या चरणांचे जणू दर्शन घडवितात.

जीव गुंतला, मृगजळ एक आशा,नावाडी,काय भरवसा उद्याचा,या रचना चिंतनात्मक आहेत.  जगण्याविषयी सांगणाऱ्या आहेत. प्रपंचाच्या रगाड्यात रुतलेल्या सामान्य माणसाच्या मनस्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत.

लोभ मोह क्रोध मत्सर

षड्रिपू  घेरती मला

ना सुटे माझेपण 

*प्रपंची जीव गुंतला …*यामध्ये एक प्रांजळपणा जाणवतो.  स्वतःच जगणं आणि अवतीभवती वावरणाऱ्या प्रियजनांचे अथवा इतरांच्या जीवनाचे निरीक्षण करताना जे जे टिपलं गेलं त्याची प्रतिबिंबं त्यांच्या या भक्तीरचनेत आढळतात आणि ते सारं वाचत असताना आपल्या जीवनाचे ही संदर्भ आपल्याला सापडतात.  हे अगदी सहजपणे घडतं. 

जरी या रचना अध्यात्मिक असल्या तरी त्यात अवघडपणा नाही.  यात संत संतवाङमयाचा अभ्यास आणि आभास दोन्ही आहे आणि माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठी त्या जगण्यासाठी आधारही देतात आणि म्हणूनच त्या वाचनीय ठरतात.

या भक्तिरचना वाचताना श्रीरामाचे दर्शन होतं, बलशाली हनुमान दिसतो, दत्तगुरूंचे दर्शन होते, संत ज्ञानेश्वरांची महती कळते, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा ही दर्शन देतात, शेगावला घेऊन जातात. या भक्तीरचनांमध्ये जशा आरत्या आहेत, ओव्या आहेत, अभंग आहेत तशाच वृत्तबद्ध भक्तीरसात्मक  कविताही आहेत.  शोभाक्षरी नावाचा एक नवीन गोड काव्यप्रकार या संग्रहात वाचायला मिळतो.

भावसुमने ही रचना शोभाक्षरी आहे.

या रचनेत चरणाच्या प्रत्येक ओळीत नऊ अक्षरे आहेत.त्यामुळे या रचनेला एक सुरेख लय,गेयता प्राप्त होते.

वाहू तुळस विठोबाला

भजू भक्तीने ईश्वराला

 

नको मजला व्यवहार

एका विठ्ठला नमस्कार…

हे अनंता..हे भुजंगप्रयात वृत्तातले  श्लोक अतिशय तात्विक आहेत.मनाला समजावत आधार देतात.

अनंता तुला रे किती मी स्मरावे

तुझे रूप चित्ती सदा साठवावे

 

दिवा स्वप्न हे पाहते मी मुकुंदा

पृथा स्वर्ग करण्यास तात्काळ यावे

 

 शिवरायावर केलेली ही ओवी पहा…

 

 खानापाशी सैन्य किती

 मावळे घाबरले 

गनिमी काव्याने त्याने

गडकिल्ले जिंकले …

काही पौराणिक विषयावरच्या ओव्याही यात वाचायला मिळतात.

आणखी एक.. ही लावणी पहा —कशी मजेदार आहे!

 

प्रतिष्ठापना राम मूर्तीची 

डोळा भरूनशान पाहूया 

राया चला अयोध्येला जाऊया…

ही आध्यात्मिक लावणी  मनाला आनंद देणारी आणि प्रसन्न करणारी आहे.

यात भारतीय सण,रितीपरंपरांवर आधारितही काव्यरचना आहेत.गुरुवंदना आहे.अनमोल विचारधनाचा एक खजिनाच या अमृतघटात साठवलेला आहे

विविध  प्रकारच्या तल्लीन करणाऱ्या, देहभान हरपवणाऱ्या, मुग्ध करणाऱ्या, मनावर मायेची पाखर घालणाऱ्या, दुःखावर फुंकर मारणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या दिशादर्शक, संदेशात्मक, तत्वचिंतनात्मक भक्तीरचनांनी भरलेला हा अमृतघट प्रत्येकानी देव्हार्‍यात जसे गंगाजल पात्र ठेवतो, तद्वतच संग्रहात ठेवावा इतका मौल्यवान आहे.  यातलं सगळं लेखन संस्कारक्षम आहे.

कवयित्रीने मनोगतात  म्हटल्याप्रमाणे वडिलांचा लेखन वारसा  त्यांनी जपलेला आहे हे नक्कीच. या रचनांमध्ये संस्कार आहेत, शास्त्रशुद्ध काव्यनियमांचे पालन आहे मात्र हे लेखन स्वयंसिद्ध आहे. यात प्रभाव आहे पण अनुकरण नाही, यात अनुभव आहे पण वाङमय चौर्य नाही. हे स्वरचित आणि स्वतः केलेल्या चिंतनातून, मंथनातून, घुसळणीतून वर आलेलं नवनीत आहे.

या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या नाशिकस्थित सौ. सुमतीताई पवार यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

पुन्हा एकदा सांगते या भावभक्तीच्या अमृतघटातलं अमृत चाखूनच  पहा….

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares