मराठी साहित्य – विविधा ☆☆ मनातलं  कागदावर ☆☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

अल्प परिचय 

शिक्षण – B.Sc. (1st class with Hons) पुणे विश्वविद्यालय 

सम्प्रति – 1995 पासून फ्री लान्स ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत.

यातील विशेष कामगिरी:

  1. समकालीन ब्रिटिश कवयित्री ही पाच भागांची मालिका स्त्री मासिकातून प्रकाशित.यामध्ये कवयित्रींचा परिचय व त्यांच्या दोन कवितांचा अनुवाद सादर करण्यात आला.
  2. अॅडव्हरटारझिंग बेसिक्स हे अनुवादीत पुस्तक डायमंड प्रकाशन तर्फे प्रकाशित.
  3. ‘मेडन व्हाॅयेजेस’ धाडसी महिलां नी एकट्याने केलेल्या साहसी प्रवासाची प्रवासवर्णने ‘मस्त भटकंती’ मधून प्रसिद्ध.
  4. ‘प्रतिमा पैलतिरीच्या’ या चरित्रात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित..2016मध्ये.
  5. ‘तुमचे आयुष्य तुमच्या हाती’ अनुवादीत,प्रकाशन 2018.

याशिवाय शेती व्यवस्थापन,जल व्यवस्थापन व पाणलोट विकास,आयुर्वेदिक वनस्पती विषयी माहिती,लहान मुलांसाठी प्रयोग विज्ञान मालिका अशा विविध प्रकारच्या साहित्याचे भाषांतर केले आहे.

या व्यतिरीक्त स्वतंत्रपणे कथालेखन,ललितलेखन चालू आहे.

? विविधा ?

मनातलं  कागदावर ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

इथे नाशिकला आल्यापासून सकाळच्या वेळी बाहेरून पक्ष्यांचा सतत कलकलाट ऐकू येत होता. बाहेर बाल्कनीत येऊन नजर टाकली, तर शेवग्याच्या झाडावर इवल्याशा, मूठभर आकाराच्या सनबर्डस् ची नुसती झुंबड उडालेली दिसत होती. इतके सुरेख रंग त्यांचे, सूर्यप्रकाशात नुसते झळाळत होते. कोणी गडद निळ्या रंगामधे मधूनच झळाळणारी मोरपिशी छटा मिरवत होतं, आणि त्या मोरपिशी रंगाच्या पिसांवर ऊन पडल्यावर त्याच्यावर जी चमक येत होती, त्यावर नजर ठरत नव्हती! तर कोणाचा शेवाळी रंग मेंदीची आठवण करून देत होता. आणि काय ते त्यांचे विभ्रम! ते छोटुसं शरीर पूर्ण उलटं करून चोचीने त्या फुलांमधला मध ओढून घेऊन भुर्रदिशी उडून कुठेसे नाहीसे व्हायचे, बहुतेक त्यांच्या पिल्लांना तो मध भरवायला जात असावेत. काहीजण फक्त हाच उद्योग करत होते, तर काही उडाणटप्पू आपल्या जोडीदारांबरोबर मुक्तपणे विहरत होते. विलक्षण मोहक हालचाली होत्या त्यांच्या! त्या झाडामधून वरच्या दिशेला सूर मारून थोडसं वर आभाळात जाऊन ज्या काही सुरेख गिरक्या ते घेत होते, त्यानं माझी नजरबंदीच करून टाकली. परत वरून खाली सूर मारून त्या झाडाच्या फांद्यांमधूनही सफाईदार गिरक्या घेत थोडं खाली जाऊन उसळी मारून  परत वर आभाळात! आणि या सगळ्या खेळात सूर्यप्रकाशाचीही मोठी भूमिका होती बरं! या सगळ्या गिरक्या आणि परन्यास, हो! पदन्यास नव्हे, परन्यासच! चालू असताना, आकाशातून, झाडाच्या फांद्यांमधून पाझरणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या नृत्याला एक विलक्षण अशी रंगभूषा पुरवलेली होती! एखाद्या गिरकीच्या वेळी फक्त गडद निळा रंग चमकलेला दिसायचा, तर वरच्या दिशेने सूर मारताना मोरपिशी छटा झळाळून उठलेली दिसायची. पटाईत नृत्यांगनांनी लाजून मान खाली घालावी अशा हालचाली होत्या त्या चिटुकल्या पक्ष्यांच्या! आणि दोघांची प्रत्येक हालचाल इतकी विलक्षणपणे सारखी, की हल्लीचं सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा डान्सिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊनच रचत असावेत, याची खात्रीच पटली माझी!  

आणखी एक गम्मत माझ्या लक्षात आली, ती ही, की त्या झाडावर मध गोळा करणारे फक्त हे छोटेसे सनबर्डच दिसत होते. काही काळे भुंगे येत जात होते अधून मधून, पण आम्ही तिथे होतो, त्या पंधरा  दिवसात एकही मोठा पक्षी त्या झाडावर आलेला दिसला नाही मला. म्हणजे, आपण माणसं स्वतःला फार बुद्धिमान आणि सुसंस्कृत समजतो, पण पक्ष्यांमधे असलेली ही सुसंस्कृत जाणीव उरलेली आहे का आपल्यात? दुर्बल गटांसाठी असलेल्या योजनांमधील कितीसा वाटा प्रत्यक्षात मिळतो, त्यांना? त्याच्यावर डल्ला मारणारे गब्बर अधिकारीच जास्त असतात! पण या छोट्या पक्ष्यांना त्रास द्यायला, त्या शेवग्याच्या फुलांमधला मध त्यांना मिळू न देता, स्वतः हडप करायला एकही मोठा पक्षी तिथे आलेला एकदाही मला दिसला नाही! कशी आणि कोण, ही जाणीव त्या एवढ्याशा पाखरांच्या एवढ्याशा मेंदूमधे जागृत ठेवत असेल? इथे देवाचा अदृश्य हात जाणवतो मला तरी! आणि आपल्या मेंदूमधेही असतेच ना, ही जाणीव, ‘त्याने’ दिलेली? पण आपण स्वार्थापोटी ती जाणीव पुसून टाकून आपल्यापेक्षा दुर्बल गटातील माणसांना आणखी दुर्बल बनवत असतो. हा आपल्या अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग, की दुरुपयोग?

नेहमी आपण ऐकत आलोय, की निसर्गाकडून चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत, पण पंधरा दिवसात या पक्ष्यांकडे बघून काय शिकायला हवं, त्याची लख्ख जाणीव मनात जागी झाली! आता या जाणीवेचा प्रसार व्हायला हवा, म्हणून हा लेखनप्रपंच!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-4☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागत आपण पाहिले,- ‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’  ‘नको. गावाकडची  दोघे-तिघे  आहेत.’ आता इथून पुढे )

ती आनंदाला सोडून गेली. तिला यायला दुपारचे तीन वाजले होते. नंतर तिने आंघोळ केली. मी दिलेली साडी नेसली. तिला जेवायला वाढलं. त्याक्षणी जीवनातील तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याप्रमाणे,  ती एकेक घास मनापासून खाऊ लागली.

जेवण झाल्यावर तिला विचारलं,  ‘असं कसं झालं?’

ती म्हणाली, ‘रात्री दारूच्या नशेत गवताच्या गंजीवर जाऊन झोपला. झोपेत कधी तरी साप चावला. ओरडलासुद्धा  नाही. सकाळी  बघितलं तर काळा-निळा पडलेला. झोपण्यासाठी खाट आणायला  दोनदा पैसे साठवले होते. दोन्ही वेळा दारूत उडवले.’

मी  म्हंटलं,  ‘आता कसं  करणार?  डोंगराएवढं आयुष्य पुढे पडलय….’

‘मी  कष्टांना  घाबरत  नाही.’  मग जरा घुटमळली मग म्हणाली,  ‘मला थोडं  बोलायचय. आनंदाचं शाळेत जायचं वय झालय. त्याला तुमच्याकडे  ठेवू का? तुमच्याकडे  राहिला,  की चांगला शिकेल.  फुकट ठेवणार नाही. त्याच्या खर्चाची पै न पै मी देईन. मुलाला पोसायला माझे हात समर्थ आहेत. शे-सव्वाशे तरी दुध्या कोहळ्याचेच होतील. शिवाय भाजीपाला आहे. एखादी गाय पाळीन. म्हणजे दुभतं होईल. थोडं घरात. थोडं विकायला. माझ्या आनंदानं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, असं वाटतय मला. तसंही तो असता, तरी मी आनंदाला इथेच ठेवायचं ठरवलं होतं. त्याच्या सावलीत मला माझ्या मुलाला मुळीच वाढू द्यायचं नव्हतं.’

मग पुढे म्हणाली, ‘गावात तूर मका उगवेन. पेरू,  डाळिंबाची लागवड करेन. गावातील घर-शेत संभाळेन आणि इथे तुमचं अंगण, परसूही बघेन. साफ-सूफ करेन. फुला-फळांची रोपे लावेन.’

मी मुग्ध होऊन ऐकत राहिले. तिच्या बोलण्यातली जादू मला संमोहित करत होती. मला घरातले हंडे-कळशा झळझळलेल्या दिसू लागल्या. मागच्या बाजूच्या मुलूल पडलेल्या लिंबा-डाळिंबाच्या डहाळ्या टवटवित झाल्या. अंगणात चारी बाजूंनी पांढर्या  पिवळ्या फुलांच्या वेलींवर फुलांचे झुबके झुलू लागले.

मी म्हंटलं,  ‘हे घर तू आपलंच घर समज. तुझ्या मुलाला इथे कष्ट होणार नाहीत.’

ती थोडी थांबली. नंतर एखाद्या दु:स्वप्नातून मुक्त होत असल्यासारखी म्हणाली,

‘कुणाला आवडणारी लाजरी,  नखरेल कटाक्ष टाकणारी सुंदर पत्नी होणं, माझ्या आवाक्यात नव्हतं. हा देह,  हे रूप माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाधा होती. पण चांगली आई होऊन दाखवणं, तर माझ्या हातात आहे ना?  आई-मुलामध्ये कुरुप शरीर कधीच बाधा आणत नाही. हा मोठ्ठाच फरक आहे मर्द आणि मुलगा यात!’

तिचा सहा वर्षाचा मुलगा कधीपासून बावचळून आईच्या पदराला चिकटून उभा होता.

‘निघते….’ तिने मुलाचं बोट धरलं. ‘घराचं छप्पर मोडलय. ते दुरुस्त करायचय. दुसर्या् नांगराची व्यवस्था करायला हवी. ‘

ती गेली. दूरवर जात दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोर्याो  आकृतीकडे पहात राहिले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आपण सर्वजण लहानपणापासून “व्यासोच्छिष्टम्  जगत्सर्वंम्” हे वाक्य वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. असा एकही विषय नाही की महर्षी व्यासांनी त्याला स्पर्श केला नाही. असे ते सर्व ज्ञानी होते. अशा भगवान वेदव्यास यांच्याबद्दल मला लहानपणापासून खूप उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळवावी असे वाटत होते.  

मी माहेरची ग्रामोपाध्ये,  माझी आई माहेरची जोशी. त्यामुळे आई-वडील दोघांकडूनही अध्यात्माचा वारसा मिळाला होता . वडिलांचं घर वाळव्याला. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तिथे जात असू. आईचं माहेर चिकुर्ड्याला. आंबे, जांभळे, करवंदे भरपूर. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जात असू. दोन्हीकडे पोथ्या पुराणे भरपूर असत. त्यावेळी मोबाईल ,टीव्ही तर सोडाच पण साधे वाचनालय किंवा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे घरातलीच पुस्तके  वाचण्याचा  छंद लागला. अनेक पोथ्या ,पुराणे वाचून झाली. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ” इति श्री वेदव्यास विरचितं***समाप्तम् ” असेच असायचे, हे लक्षात आले. त्यामुळे इतके छान लिहिणारे हे ऋषी कोण अशी उत्सुकता तेव्हापासूनच होती.

२०१७ साली मी नैमिषारण्यात गेले होते . तिथे व्यास गद्दी पाहिली. तो सारा परिसर अत्यंत पवित्र आणि भारावून टाकणारा होता. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते. भगवान वेदव्यास चिरंजीव आहेत. त्यांचे अस्तित्व त्याठिकाणी जाणवले. तिथे 88000 ऋषीमुनी वायुरूपाने आहेत असे म्हणतात. त्याची देखील अनुभूती आली. भगवान वेदव्यास यांची ती धीरगंभीर मूर्ती डोळ्यात साठवून घेतली. मोबाईल मध्ये भरपूर फोटो काढले. एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

तेथून परत आल्यानंतर “ नैमिषारण्य सुरम्य कथा “ हे पुस्तक लिहायला घेतले. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचायला मिळाले. त्यातूनही वेदव्यास यांची बरीच माहिती कळली.

“नैमिषारण्य सुरम्य कथा “ या माझ्या पुस्तकाची परवा तिसरी आवृत्ती निघाली. त्या संदर्भात मी बरीच व्याख्याने पण दिली.  त्यावेळी लक्षात आले की भगवान वेदव्यास यांच्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही .इतकेच काय, “व्यासपीठ म्हणजे काय? त्यामागील कथा काय ? “ हेही  कुणाला माहिती नाही. व्यासपीठ ,मंच, रंगमंच हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजून सगळे सर्रास वापरतात. पण त्यातील फरक कुणाला माहीत नाही. भगवान वेदव्यास यांच्यावर पुस्तकही उपलब्ध नाही .` तुम्हीच लिहा आणि आम्हाला द्या ` असे वाचनालयातून सांगण्यात आले. योगायोगाने याविषयीचे अनेक ग्रंथ वाचायला मिळाले.आणि मग माझ्या हातून “ ।। भगवान वेदव्यास ।। “  या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक लवकरच बुक गंगा वर उपलब्ध होईल. नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ही विनंती.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग ३ – जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर  ✈️

इथून जेराश इथे गेलो. साधारण सहा हजार वर्षांपूर्वीच्या मनुष्यवस्तीच्या खुणा जेराश इथे सापडल्या आहेत. रोमन साम्राज्यात हे शहर वैभवाच्या शिखरावर होते. या शहराचे बरेचसे अवशेष सुस्थितीत आहेत. शेकडो वर्षे हे शहर वाळूच्या आवरणाखाली गाडलं  गेलं होतं.  सत्तर वर्षांपूर्वीच्या उत्खननात या सुंदर शहराची जगाला पुन्हा ओळख झाली. या शहराचं प्रवेशद्वार लाइम स्टोनचे चार उंच, भव्य खांब व कमानी यांनी बनलेले आहे. त्यावरील चक्रं, पानं, फुलं यांचे डिझाईन बघण्यासारखं आहे. रस्त्यांवर मोठ्या चौकोनी लाद्या तिरक्या बसविलेल्या आहेत. रथाच्या घोड्यांचे पाय घसरू नयेत म्हणून ही व्यवस्था होती. एका बाजूला टेकडीवर चर्च आहे तर एका टेकडीवर डायना या रोमन देवतेचे देऊळ आहे. डायना ही समृद्धीची निसर्गदेवता समजली जाते.थिएटर्स, खूप मोठे चौक, सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, आरोबा म्हणजे फ्लेश मार्केट, तिथली शेळ्या- मेंढ्या मारण्याची जागा, विक्रीची जागा, पाण्याची सोय अशा अनेक सोयी व बांधकामे तिथे  बघायला मिळाली. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सारं अतिशय प्रमाणबद्ध व प्रगत संस्कृतीचं द्योतक आहे. ग्रीक, रोमन आणि अरब यांच्या कला व संस्कृतीचा सुंदर संगम इथे पहायला मिळतो .

(जेराश,मृत समुद्र)

‘मृत समुद्र’ (डेड सी ) म्हणजे जॉर्डनमधील एक मोठं आकर्षण आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या मृत समुद्राला मिळते. याला समुद्र असं म्हटलं तरी हे एक ५० किलोमीटर लांब व १५ किलोमीटर रुंदीचं खाऱ्या पाण्याचं तळं आहे. याच्या चहूबाजूंनी जमीन असल्यामुळे यात लाटा येत नाहीत. याचं वैशिष्ट्य म्हणजे मृत समुद्र व व त्याच्या परिसरातील जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा ४१० मीटर्स ( १३३८ फूट ) खोल आहे. पाण्याचा निचरा फक्त बाष्पीभवनामुळे होतो व त्यातले क्षार तसेच शिल्लक राहतात. त्यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता नेहमीच्या समुद्राच्या पाण्यापेक्षा दसपटीने जास्त आहे. हे क्षार मॅंगनीज, पोटॅशिअम, मीठ, ब्रोमीन, सोडियम या खनिजांनी समृद्ध आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात क्षार असल्यामुळे या पाण्यात जलचर जिवंत राहू शकत नाही म्हणून याचं नाव ‘मृत समुद्र’ असं पडलं.

या समुद्राच्या पाण्यामध्ये व त्यातील खनिजसमृद्ध माती, वाळूमध्ये त्वचारोग बरे करण्याचे, त्वचा सतेज करण्याचे गुणधर्म आहेत. तसेच सांधेदुखी, अस्थमा यावरही त्याचा उपयोग होतो. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून या पाण्याचे औषधी गुणधर्म माहित होते. प्राचीनकाळी इजिप्तमध्ये मृत शरीराची ‘ममी’ तयार करताना  जी रसायने वापरीत त्यातले प्रमुख रसायन मृत समुद्रातली माती हे असे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा व राणी शिबा या त्यांच्या सौंदर्यप्रसाधनासाठी मृत समुद्रातली माती मागवून घेत.नेबेटिअन्सना या मातीचे गुणधर्म माहीत होते.प्रिझर्व्हेटिव्ह व जंतुनाशक म्हणून त्याचा वापर केला जात असे. तसेच त्यांनी या औषधी मातीचा व्यापारासाठीही उपयोग केला. आजही जॉर्डनमध्ये या मातीची पाकीटे, मातीपासून बनवलेली सौंदर्यप्रसाधने, क्रीम, लोशन विक्रीसाठी असतात.

नेहमीच्या समुद्राच्या पाण्याहून मृत समुद्राचं पाणी दसपट क्षारयुक्त व जड असल्यामुळे या पाण्यात कुणालाही तरंगता येतं. बुडण्याची धास्तीच नाही. अनेक प्रवासी मजा म्हणून या पाण्यावर पहूडून मासिकं,पेपर वाचतात. मृत  समुद्रात तरंगण्याचा अनुभव  जॉर्डनहून इस्त्रायलला गेल्यावर घ्यायचा असे आम्ही ठरविले होते. या समुद्राचा एक भाग इस्त्रायलमध्ये येतो.

जॉर्डनमध्ये खनिजतेल मिळत नाही पण इजिप्त वगैरे देशांकडून खनिजतेल घेऊन त्याचं शुद्धीकरण करणाऱ्या रिफायनरीज आहेत. चुनखडीचा दगड असल्याने सिमेंटच्या दोन फॅक्टरीज आहेत. सिमेंट व रेड सी भोवतालच्या डोंगरातील रॉक फॉस्फेट, पोटॅश निर्यात केलं जातं. ऑलिव्हची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ऑलिव्ह प्रॉडक्स व फळे निर्यात केली जातात.

मध्यपूर्वेतील ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू धर्मियांमध्ये सलोखा व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी २०१४ मध्ये जॉर्डनला भेट दिली.आधीचे राजे किंग हुसेन व  सध्याचे राजे किंग अब्दुल्ला (द्वितीय ) यांनी नेहमीच सामंजस्याची भूमिका घेऊन जॉर्डनची प्रगती साधली आहे.

सध्या सर्व जगामध्येच अस्वस्थता व अशांतता आहे. विज्ञानाचा उपयोग विनाशासाठी होतो आहे. गुंतागुंतीच्या राजकारणात सामान्य लोकांचे बळी जात आहेत. ही परिस्थिती सुधारून वेगवेगळ्या देशांमध्ये, धर्मामध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी प्रार्थना करणं एवढेच आपल्या हातात आहे.

जॉर्डन भाग– समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

‘A’ for Appreciation (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न) 🤗

नुकत्याच एका मैत्रिणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच…” एव्हढं केलं मी हिचं , पण दोन शब्दांचं  कौतुक नाही. ” वास्तविक त्या मैत्रिणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली… सासूला देखील ठाऊक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेने करत नाहीत, सून करते… अगदी प्रेमानं … …

गरज आहे ती आवर्जून बोलून दाखवायची.

नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..

कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो…. 

दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनाने, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो… जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते. 

छान तयार होऊन भिशीला स्वागत करणाऱ्या मैत्रिणीकडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते.  तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट- जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रिणीला आपण नटवी म्हणतो, तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरंतर समस्या बरेचदा हीच असते की, आपण काही म्हणतच नाही.

एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले… इतरांची प्रतिक्रिया– “मिळणार नाही तर काय? हिने दुसरं केलंच काय वर्षभर … मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीन.”

दुसरीच्या मुलीला 65% मिळाले.  प्रतिक्रिया– “जरा लक्ष नाही दिलं हिने.  सदा घराबाहेर..”

गम्मत आहे ना ! अहो सोपं आहे. दोघींकडेही जा. मनापासून अभिनंदन करा … आईचे कौतुक करा।  काय लागतं हो याला … हां , मन मात्र जरासं मोठं लागतं. 

.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रिण म्हणाली.. ” मला नाही बाई येत असं लगेच चांगलं म्हणता… जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.” 

“का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?” 😆

क्षणभंगुर आयुष्य साधं सोपं असावं .. कशाला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं… 

स्त्री स्त्रीची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्रीची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला, चैतन्याला, एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तृत्वाला ही नामोहरम करते. 👊🏻

 प्रशंसा म्हणजे लांगुलचालन किंवा चमचेगिरी निश्चित नाही … ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रिणीला ” काय बारीक झालीस ग ! ” असे म्हणायची सवय असते. … ही प्रशंसा नव्हे… 😆

एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची .. संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळं करतो तो राजहंस … आणि सडलेलं कुजलेलं खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?

आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या… एखादीचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले, की आपले कचराडेपो होत नाही. “छान वळण लावलेस ग मुलांना”  असे दुसरीला  म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काही  कांदू होत नाही किंवा एखादी स्मार्ट  म्हणून मी गबाळी असे होणे नाही. 

प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात… आंतरिक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद, चैतन्य देऊन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कशाने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू… त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्याकडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.

आपण स्त्री आहोत ..निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती… जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.

वाणीवाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत. 

A = appreciation– हळूहळू सवय होऊ द्यात… आयुष्य सुरेख होइल…  तुमच्या एकटीचं नाही,  तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीचं. 👍🏻

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares