मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘अरे यार, या सुमेशला काय म्हणावं तरी काय? इकडे डायबेटीस आहे, पण आपल्या हिश्श्याची मिठाई काही सोडत नाही. बघ .. बघ… तिकडे बघ… रसगुल्ला आणि बर्फीचे दोन पीस उचलून गुपचुप आपल्या पिशवीत ठेवलेत.’ विनोदाची नजर सुमेशकडे लागली होती.

‘मुलांसाठी घेतली असेल. आपल्याला काय करायचय.’ मी म्हंटलं, ’तू आपला खा. पी. आणि पार्टीची मजा घे.’

‘याला कुठे लहान मुले आहेत? म्हणजे एक-दोन पीसमध्ये खूश होऊन जातील.’ विनोद म्हणाला. ‘बघ .. बघ… आता समोसा पिशवीत ठेवतोय. मोठा कंजूष माणूस आहे. जे खाल्लं जात नाही, ते लोक प्लेटमधे तसंच ठेवतात. पण हा कधी टाकत नाही. कुणास ठाऊक, घरी जाऊन काय करतो त्याचं?’

‘काय वाटेल ते करेल. त्याची मर्जी. त्याच्या वाटणीचं आहे ते सगळं. तुझंसुद्धा लक्ष ना, या असल्याच गोष्टींकडे असतं.’

‘ते बघ! तो सगळं सामान घेऊन चाललाय. बघूयात काय करतोय!’ विनोद हेरगिरी करण्याच्या मागे लागला.

‘जाऊ दे ना रे बाबा,’ मी टाळाटाळा करत म्हंटलं.

‘चल रे बाबा,’ म्हणत त्याने मला जवळ जवळ ओढतच बाहेर नेलं।

बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं, रसगुल्ला, बर्फी, सामोसे वगैरे घातलेली पिशवी, गेटपाशी उभ्या असेलया दोन मुलांकडे देत होता. ती मुले जवळच्याच झोपडीत रहात होती आणि आस-पास खेळत होती.

मी म्हंटलं, ‘ बघ! आपल्या हिश्श्याचा उपयोग याही तर्‍हेने करता येतो. ‘ विनोद काही न बोलता नुसता उभा होता.

 

मूळ कथा – ‘अपना हिस्सा’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 ☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

यंदा दिपक दहावीला होता. एकुलता एक लाडका हुशार मुलगा. त्यामुळे घरात तसेच शाळेतही त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा खूप होत्या. तो शाळेच्या निवडक मुलांच्या बँचमध्येही होता. ह्या बँचचा खुपसा पोर्शन शाळेत व क्लासमध्येही शिकवून झाला होता. जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि दोन महीने झाल्यावर शाळेत दिपकची पहिली चाचणी परिक्षा झाली. ह्या परिक्षेचे पेपर निवडक मुलांसाठी वेगळे होते. त्यांना आतापर्यंत शिकवून झालेल्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित होती. त्या परिक्षेत दिपकला नेहमीपेक्षा खूप कमी मार्क पडले. हल्ली त्याची सारखं डोकं दुखत असल्याची तक्रार सुरू होती. पण ते सर्दीमुळे किंवा अभ्यासाच्या ताणामुळे असेल असे वाटून थोडे दुर्लक्ष केले गेले. मार्क कमी पडल्याने त्याला आईबाबांचा व शाळेत शिक्षकांचाही फार ओरडा खावा लागला. पण दिपकच्या आजीआजोबांच्या मनाला मात्र ही गोष्ट फार खटकली. कारण दिपक हा फार सिन्सिअर मुलगा, उगीचच नाटकं करणारा नव्हता. आणि ते दोघेही जास्त वेळ घरात असल्याने त्यांनी त्याच्या डोकेदुखीचे निरिक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही डोकेदुखी थोडी वेगळी आहे. दिपकचं जेव्हा डोक दुखत असे तेव्हा तो फार बेचैन व अस्वस्थ होत असे. डोकं तो जोराने दाबुन धरत असे, आणि चेहराही फार विचित्र करत असे. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असे. थोड्या वेळानं वेदना कमी झाल्यावर मग तो ठिक असे. त्याला केव्हातरी किरकोळ तापही येई. तापावरच औषध घेतले की तो उतरे. पण नंतर तो शांत असे. शाळेचा व क्लासचा अभ्यास तो कसातरी पुर्ण करत असे. जास्त खेळतही नसे.ही लक्षणं काही बरोबर नव्हती. काहीतरी योग्य पावलं उचलायला हवी होती. नाहीतर काही खर नाही, असे त्यांना वाटत होते. म्हणून ही गोष्ट त्यांनी विश्वासच्या म्हणजे दिपकच्या वडीलांच्या लक्षात आणून देण्याचे ठरवले. मग त्याच दिवशी दुपारी विश्वास जेवायला घरी आल्यावर विश्वासला जवळ बोलावून ते म्हणाले, “विश्वास मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे दिपकच्या बाबतीत. माझी एक गोष्ट ऐकशील का?”

“हो बाबा बोला. “विश्वास म्हणाला.

“अरे, दिपकचं हल्ली वरचेवर दुखतं. किरकोळ तापही असतो. त्याला, काही वेळा त्या वेदना सहन होत नाहीत. बाकी इतरवेळी तो ठिक असतो. पण मला काही ही लक्षण बरोबर दिसत नाहीत. त्याची लवकरच नीट तपासणी करायला हवी.” आजोबा म्हणाले.

“होय. ते माझ्याही लक्षात आलंय बाबा. पण या कामांमुळे वेळच मिळत नाही.” विश्वास म्हणाला.

“अरे, मग वेळ काढ. जरा बाजूला ठेव तुझी कामं. त्यांना विलंब झाला तरी चालेल. पण हे काम महत्त्वाचे आहे ते आधी कर.दिपकला एखाद्या चांगल्या डॉक्टराला दाखवून नीट इलाज लवकर व्हायला हवेत.” आजोबा म्हणाले.

“हो मी वे काढतो लवकरच.” असं म्हणून विश्वास परत कामावर गेला.

              क्रमशः

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

 

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?

धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

 

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी

जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

 

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?

आठवणींना, श्वास म्हणालो, चुकले का हो?

 

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे

मी त्याना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?

 

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

 

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली

सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

 

चौदा वर्षे, पतीविना, राहिली उर्मिला

हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

 

घात आप्त, आघात सगे, अपघात सोयरे

ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

 

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!

याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

 

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?

कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

 

 – इलाही जमादार

एक ऊत्तुंग मराठी गझलकार आज आपल्यांत नाही हे स्वीकारणं खूप कठीण आहे!

एक मार्च १९४६ साली दूधगाव सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर गझलकार म्हणून इलाही जमादार यांचेच नांव घेतले जाते.

पुण्यात एका लहानशा आऊट हाऊसमधे रहात.. पुस्तके आणि मांजरांच्या पसार्‍यात हा अवलिया गढलेला असायचा. खोली लहान असली तरी कवी मन फार मोठे.. प्रत्येक मित्रासाठी हे मनाचे दार ऊघडे असायचे..

गझल क्लिनीकच्या माध्यमातून ते नवोदित कवींसाठी कार्यशाळा घेत…

काठावरी ऊतरली। स्वप्ने तहानलेली।

डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा।

किंवा,

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला।

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा।

अशा त्यांच्या काळीज भेदणार्‍या रचना मनात साठलेल्या आहेत….

आज ते नसले तरी हा शब्दगंध वातावरणात दरवळतच राहणार….!!

एक कलाकार, एक गझलकार म्हणून इलाही जमादार सदैव स्मरणात राहणार…

त्यांच्या स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली….????

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

खरच किती प्रश्न डोकावतात नाही का मनात?

नक्की आयुष्य आहे तरी काय?अनेक प्रश्नांनी भरलेल, अनेक सुखाने, दुःखाने भरलेले नाना छटांनी नटलेले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक माणसाचे प्रश्न वेगळे आणि उत्तर पण वेगळी.  प्रत्येक  माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा.

कोणासाठी ते सप्तरंगी आहे तर कोणासाठी रंगहीन, नीरस. कोणासाठी ते समुद्राच्या लाटा आहेत खळखळणाऱ्या,सळसळणाऱ्या, तर कोणासाठी एखादी शांत वाहणारी नदी किंवा सुरेख संगम दोन नद्यांचा. कोणाला ते शीतल शांत चंद्राप्रमाणे भासतं , तर कोणाला सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्या प्रमाणे.

मला विचाराल तर, आयुष्य हे एक प्रश्न चिन्ह आहे ज्याचे उत्तर कधीच मिळत नाही, एक कोड आहे जणू, जर सुटल तर मोकळी वाट नाहीतर आपल्या वाट्याला घाटच घाट.

कधी वाटते की आयुष्य एक सोंगट्यांचा खेळ आहे. आपण फक्त आपली खेळी खेळायची, त्याच फळ काय द्यायचे ते मात्र देवानी त्याच्या हातात ठेवले आहे,थोडक्यात आपण प्यादी आहोत पटावरची, फासे तर तो टाकतो, तो सूत्रधार आहे ह्या आयुष्य रुपी नाटकाचा. आपण फक्त आपला अभिनय नीट पार पडायचा.

मला काही वेळा मात्र आयुष्य सप्तरंगी वाटतं छान सुंदर, इंद्रधनुष्याला जसे सात रंग असतात अगदी तस. मग त्यात प्रेमाचा रंग आला, आपुलकीचा आला, स्पर्धेचा, द्वेषाचा, मद, मत्सर अगदी सगळे रंग आले. हां आता ह्यातला आयुष्यरुपी कॅनव्हास वर कोणता रंग जास्त भरायचा हे मात्र आपल्या हातात आहे.

अचानक मला असे वाटले की जितकं आपलं वय,आपला अनुभव तसे भासत असेल काहो हे आयुष्य सगळ्यांना?

छोट्या मुलांना आयुष्य फुग्याप्रमाणे, किंवा फुलपाखरा प्रमाणे भासत असेल का छान हलकं हलकं आकाशात स्वच्छंद बागडणार आपल्याला हवे तसे  रंग स्वतः भरणार  ना कोणते नियम ना बंधन. स्वच्छंद बागडायचे फक्त. कोणतेच प्रश्न नाहीत , त्यामुळे तक्रार पण नाही.

थोडं मोठं झाल्यावर त्यांना ते स्वप्नं रुपी वाटत असेल का? जिथे अनेक स्वप्नं पहायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झगडायचे. अनेक चॅलेंज घ्यायचे आणि ते पूर्ण ही करायची.

थोडक्यात नियम आणि कायदे आपलेच.

आंब्यांच्या झाडाला मोहर यावा, किंवा छान हिरवी गार पालवी यावी तस किंवा एखाद्या पाण्याचा धबधब्या सारखे स्वच्छंद सतत वाहणारं.

अजून मोठ झाल्यावर म्हणजे कदाचित तिशी ओलांडल्यावर, जेव्हा अनेक जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात  तेव्हा आयुष्य पझल गेम सारखं वाटत असेल का, किंवा डोके चालवा, सुडोकू सारखा जिथे प्रत्येक कोड सुटतच अस नाही पण तरीही आपण प्रयत्न करतोच ना. आणि बरेचदा मार्ग ही मिळतो.

आयुष्यभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसल्यानंतर म्हणजेच सगळया जबाबदार्‍या संपल्या की हेच आयुष्य आपल्याला रात्रीच्या चांदण्यांसारखं शीतल शांत वाटत असेल का. ह्या  टप्प्यावर आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असं नाही,पण आता ती मिळावीत म्हणून धडपड ही नसेल. ना काही मिळवण्याची धडपड असेल ना काही गमावण्याच दुःख.

थोडक्यात काय तर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.

सहज मनाच्या कोपर्‍यातुन ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

ते दिवस मार्गशीर्षातील होते. नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. माझे यजमान आणि त्यांचे व्यावसायिक मित्र, महत्वाच्या कामानिमित्य पुण्याला निघाले होते. सकाळीच लवकर ते गाडीने निघाले. जाताना रात्रीपर्यंत परत येईन, असे सांगून गेले.

घरात, मी, मुले, व सासूबाई होतो. त्या दिवसभराची दैनंदिनी हळूहळू पुढे सरकत होती. संध्याकाळ झाली. पुरुषमाणसे जेवायला नसली की स्वयंपाक आवरता करता येतो. त्याप्रमाणे आमची जेवणे चट्कन आवरली. हळूहळू रात्रीने आपले पाय गडदपणाकडे पसरायला सुरवात केली. आणि डोळे त्यांच्या वाटेकडे वळू लागले. १९८९-९० साली भ्रमणध्वनीचा संचार झाला नव्हता. घरोघरी फक्त दूरध्वनी असत. त्यामुळे निरोप मिळणे दुरापास्तच होते.

वाट पाहतापाहता आम्ही निद्राधीन झालो.

सकाळी चहापाणी आवरून, मी परदेशस्थ नणंदेला पत्र लिहायला बसले होते. घड्याळात सकाळचे सात वाजायला आले होते. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. मला वाटले यजमानच आले असतील, मुलाने दर उघडले, तर आमचे कार्यालयातील दोन माणसे, कसनुसे चेहरे घेऊन उभी होती. मी विचारले, ”सकाळी,  सकाळी,  काय काम आहे?”ते जरा घाबरलेलेच वाटत होते. त्यामुळे काहीतरी विपरीत तर घडले नाहीना, अशी शंका मनाला चाटून गेली. मग मी त्यांचेशी खोलात जाऊन बोलू लागल्यावर, त्यांनी माझे यजमान रात्री अपघातात सापडल्याचे सांगितले. पुन्हा पुन्हा, यजमान सुरक्षित असल्याची व किरकोळच  लागल्याची ते ग्वाही देत होते. कऱ्हाडला कृष्णा हॉस्पिटलला त्यांना एडमिटकेल्याचे सांगितले. मला न्यायला गाडी येईल, व कार्यालयाच्या शेजारी राहत असलेल्या मावशी माझ्याबरोबर सोबत येणार असल्याचे सांगितले. मी जायची जुजबी तयारी केली. मनात काळजी, आणि असंख्य प्रश्न उभे राहत होते. नुकताच कऱ्हाडला त्याच रस्त्यावर, अशाच खाजगी गाडीच्या अपघातात शहरातला एक व्यावसायिक दगावला होता.

ते सर्व मनात आले. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. सर्व आवरून जायला निघालो.

ती रात्रीची वेळ होती.  त्या काळात चौपदरी मार्ग झालेला न्हवता.  कऱ्हाड-पेठ रस्ता दोह्नी बाजूंनी गर्द वृक्षांनी वेढलेला होता.  दुपदरी रस्त्यावर,  एखाद्या पुढच्या वाहनाला,  मागे टाकून जाताना प्रचंड त्रास होत असे.  चालवणार्याचे कसबच पणाला लागत असे.  त्यात साखर कारखान्याला उस पुरवणार्या ट्रॅक्टर ट्राॅलीची वाहतूक ही चालू असण्याचा तो हंगाम होता काही वेळेस बंद पडलेला ट्रॅक्टर,  ट्राॅली मागे सोडून निघूनही जाई.  त्या ट्राॅलीला मागे कोणतीही लाल खुण,  किंवा दिवा नसे.  येणार्या वाहनाला अचानक जवळ गेल्यावरच हि ट्राॅली दिसू शके.

त्या दिवशी माझे यजमान व त्यांचे मित्र पुण्याहून उशिरा निघाल्यावर,  साताऱ्यात ते जेवायला थांबले जेवण झाल्यावर ते मार्गस्थ होण्यासाठी निघाले.  पुण्यातून येताना मागच्या आसनावर बसलेल्या माझ्या यजमानांना,  त्यांचे मित्र म्हणाले ‘भोगले साहेब,  तुम्ही पुढच्या आसनावर बसा.  मी मागे एकटाच बसतो,  म्हणजे आरामात झोपून जाईन.  त्या प्रमाणे दोघांनी,  आसनांची आदलाबदल केली.  गाडीचे सारथ्य तिसरे मित्र होते ते करू लागले.  कऱ्हाड सोडल्यावरही प्रवास सुरक्षित चालला होता.  थोडेसे अंतर कापल्यावर,  एका पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे गेल्यावर,  एकदम वर वर्णन केले आहे तशी उसाची ट्राॅली दृष्टीपथात आली.

त्या बरोबर सारथ्य करणाऱ्या राय सोहनींनी त्यांच्या गाडीचा वेग कमी करत गाडी शून्य वेगावर आणत ट्राॅली मागे उभी करण्याचा विचार केला.  पण हाय !! विपरीत घडणारं टळणारं न्हवतं.  मागून एक ट्रक वेगाने येत असलेला त्यांच्या गाडीवर मागच्या बाजूने जोरात आदळला.  क्षणात गाडीचा मागचा भाग चेपाटला जाऊन पुढच्या आसनांना टेकला.  सारथ्य करणारे राय सोहनी व माझ्या यजमानांना जोरात दणका बसून ते पुढच्या गाडीच्या भागावर आदळले.

थोडा वेळ गेल्यावर माझ्या यजमानांना गुदरलेल्या प्रसंगाची जाणीव होऊ लागली.  येणारया जाणार्या गाड्यांना त्या गाडीची अवस्था बघून,  त्यात कोणी जिवंत असेल असे वाटतच न्हवते माझ्या यजमानांनी धक्यातून थोडसं सावरल्यावर आपले पाय शाबूत असल्याची खात्री केली.  इकडे तिकडे पाहत त्यांच्या हाताला एक तुटलेला लोखंडी लांब तुकडा लागला.  तो घेऊन त्यांनी वरच्या तुटलेल्या टपावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली आणि मग तो आवाज ऐकून येणारया जाणार्या वाहनांना आत कोणीतरी जिवंत असल्याची जाणीव झाली मग वाहने थांबवून लोक मदतीला धावले वाहतूक पोलिसांना पाचारण केल्यावर ते हजर झाले.  जिवंत असलेल्या त्या दोघांना बाहेर काढून कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माझ्या यजमान ज्या कामासाठी गेले होते,  त्या साठी त्यांचे मित्र बाफना यांच्या बॅगेत बरीच रक्कम असल्याचे ठाऊक होते.  त्यांनी मोठ्या समय सूचकतेने ती पिशवी आपल्या पोटाजवळ ठेऊन दिली.  न जाणो ती रक्कम सरकार जमा झाली असती तर परत मिळवणे दुरापास्त होऊ नये.  नंतर रुग्णालयात बाफनांचे भाऊबंद पोहोचल्यावर त्यांना ती पिशवी सुपूर्द केली.

आम्ही घरातून निघाल्यावर दोन तासांत रुग्णालयात पोहोचलो बाहेर काही व्यक्ती माझ्या येण्याची वाट पहात उभ्या होत्या.  त्यात कर्हाडच्या किर्लोस्कर कंपनीतील,  श्री. महाबळ साहेब व श्री. चिपळूणकर साहेब तेथे आलेले होते.  मी उतरल्यावर त्यांनी माझ्या यजमानांची तब्येत चांगली असल्याचे सांगून मला धीर दिला.  पण त्या पुढे म्हणाले,  ‘एक सीट गेली. ’ ती एक सीट म्हणजे यांचे व्यावसायिक मित्र बाफना यांची होती.  ज्यांनी साताऱ्याला माझ्या यजमानांना पुढे बसण्यास सांगितले होते (केवढा हा दैवदुर्विलास) पण पुढची माझ्या यजमानांची सीट शाबूत राहिली.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

इतक्या वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर आणि अथक प्रयत्ना नंतर मी ज्या सोनेरी क्षणांची वाट पहात होते, तो क्षण समोर येऊन ठेपला. मी भरत नाट्य म् या अवघड नृत्य प्रकारामध्ये एम ए. ही पदवी मिळवून मास्टरी केली. तो क्षण मी, आई-बाबा, घरातील सर्व, ताई, गोखले काकू, श्रद्धा, माझ्या मैत्रिणी सगळ्या साठीच अविस्मरणीय होता.

एम ए. पदवी प्राप्त केल्यामुळे माझी आणि माझ्या व्यक्तिमत्वाची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. कदाचित या परिस्थिती मध्ये मी घरातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले असते. आई-बाबां साठी कायमची चिंता बनून राहिली असते. पण त्यावर मात करून मी हे मोठे यश प्राप्त केले होते.

अनेक शाळांमधून, महिला मंडळांमधून, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब मधून मला नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली समाजामध्ये माझी ओळख अंध शिल्पा अशी न रहाता, नृत्यांगना शिल्पा म्हणून झाली. एक चांगला कलाकार म्हणून मला ओळखले जाऊ लागले. मीही माझे भाग्य समजते की माझ्या वाट्याला कलाकाराचे आयुष्य आले.

सतत कार्यक्रम, त्यासाठी ड्रेसअप होणे, मेकअप करणे, हेअर स्टाईल करणे, दागदागिने घालणे, पायात घुंगरू, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे यामध्ये माझा वेळ आनंदात जात होता. घुंगरां च्या छुन छुन गोड गोड नादाने माझ्या जीवनात अनोखे संगीत निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यांचे अभिप्राय, रंगमंचावरून खाली उतरताना पासून त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, त्यांनी हसत मुखाने केलेले हस्तांदोलन या मुळे मी हर्षून जात होते. माझ्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. माझे हे कौतुक बघून आई बाबांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान मला जाणवत होते.

भरत नाट्यम् मध्ये एम.ए होणं हे ताई आणि माझ्यासाठी तपश्चर्येचा प्रदीर्घ काल होता. प्रवास होता. त्याचा परिपाक म्हणून त्याला पदवीच्या रुपात एक छान, गोंडस फळ आलं होतं. त्या आनंदा प्रित्यर्थ्य आईबाबांनी एक कौटुंबिक समारंभ करायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा होता. या कार्यक्रमामध्ये आपटे कुटुंबीय, आमचे सर्व कुटुंबीय, सुपरिचित या सर्वांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समोर मी माझी कलाही सादर केली. सगळे जणं नृत्यामध्ये रमून गेले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares