सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर
(जन्म : १९ जुलै १९३८ / मृत्यू : २० मे २०२५)
🙏 संपादकीय निवेदन 🙏
॥ भावपूर्ण आदरांजली ॥
अखिल भारत देशाचे भूषण असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, विज्ञानयोगी, जगप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे काल दु:खद निधन झाले. आपल्या ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे डॉ. नारळीकर यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली.
डॉ. नारळीकर यांचा परिचय थोडक्यात करून देता येणे खरंच अशक्य आहे … पण तरीही एक प्रयत्न करत आहोत – –
त्यांचा जन्म कोल्हापूर इथे एका प्रज्ञावंत कुटुंबात झाला होता. तेव्हाचे प्रसिद्ध गणितज्ञ रँग्लर विष्णू वा. नारळीकर हे त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत असल्याने डॉ. जयंत यांचे शालेय शिक्षण वाराणसीलाच झाले होते. त्यांच्या आई सुमती यांची त्या काळातल्या ‘संस्कृत विदुषी‘ अशीच ओळख होती. बुद्धीचा हा समृद्ध वारसा डॉ. जयंत यांनी आणखीच दिमाखदारपणे पुढे चालवला असे निश्चितच म्हणायला हवे.
पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांच्या यशाचा झेंडा दिमाखात फडकताच राहिला. तिथे त्यांनी पी.एच.डी. ही पदवी, तसेच रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्रातील टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पारितोषिके मिळवली. भारतात परतल्यावर त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू केले आणि अखेरपर्यंत त्यांचे हे काम अव्याहत सुरूच होते. सुरुवातीला मुंबईतल्या “Tata Institute of Fundamental Research” या विख्यात संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते रुजू झाले. पुढे काही वर्षांनी पुण्यात स्थापन झालेल्या “आयुका” संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
सर फ्रेड हॉएल यांच्या बरोबर काम करत असतांना त्यांनी ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ हा महत्वपूर्ण सिद्धांत मांडला. अखेरपर्यंत ते स्वतःला याच क्षेत्रात झोकून देऊन काम करत राहिले होते.
या जराशा रुक्ष समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात अगदी अचानकपणे त्यांच्यातला साहित्यिकही जागा झाला होता. त्यासाठी सुरुवातीला ते ‘ नारायण विनायक जगताप ‘ या टोपण नावाने विज्ञान कथा-स्पर्धेत भाग घेत असत हे अनेकांना बहुदा ज्ञात नसावं. पुढे त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला . तर ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या सुंदर आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या व्यतिरिक्त विज्ञानकथा सांगणारी त्यांची २५ हूनही अधिक प्रकाशित पुस्तके प्रसिद्ध आहेत. विविध मराठी नियतकालिकांमध्येही त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखनही सतत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादही झालेले आहेत.
नाशिक येथे आयोजित केल्या गेलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
लेखिका डॉ. विजया वाड यांनी “विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर” या नावाने त्यांचे चरित्र लिहिलेले आहे.
त्यांनी विविध माध्यमांमधून विज्ञान प्रसाराचे मोलाचे काम ‘आपले आद्यकर्तव्य’ समजून शेवटपर्यंत अगदी जोमाने केलेले आहे. खरं तर डॉ. नारळीकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. पण जाताजाता त्यांची समाज हिताची तळमळ अधोरेखित करायलाच हवी. समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला हवे ही त्यांची मनापासूनची तळमळ होती. पण त्याबाबतीतले त्यांचे विचार त्यांनी कधीच लोकांसमोर आक्रस्ताळेपणाने..अवास्तव भडकपणाने मांडले नाहीत. ते विचार नेहेमीच समाजाचा साकल्याने विचार करणारे, संतुलित, आणि ज्ञान-विज्ञान-तत्वज्ञान या तिन्हींचा उत्तम मेळ साधणारेच असत. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतलेल्यांना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी असे म्हणावेसे वाटते.
डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी सुश्री मंगला नारळीकर ही दोन एकमेकांना अगदी पूरक अशी व्यक्तिमत्वे “माणुसकीचा खळाळता झरा” म्हणूनही का ओळखली जायची हे सांगणारा एक लेख आपण आजच्याच अंकात वाचणार आहोत.
🙏💐पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐🙏
– संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏