श्री मोहन निमोणकर
विविधा
☆ “माळ्यावरचे ओझे…” – लेखक : श्री विजय लिमये ☆ श्री मोहन निमोणकर ☆
युरोपात, अमेरिका मध्ये ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाही त्या वस्तू आपापल्या गेटसमोर टॅग लाऊन ठेऊन देतात, ज्यांना गरज आहे त्यांनी त्या घेऊन जाणे. आता भारतातही काही ठिकाणी माणूसकीची भिंत कल्पना उभारली गेली आहे. जिथे तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवता येतात आणि ज्यांना गरज आहे ते लोक घेऊन जातात. आता काही एनजीओ सुध्दा ही सेवा कार्य करीत आहेत.
मी पैज लावून सांगतो, आपल्या देशातील असे एकही घर नाही जिथे माळे विविध वस्तूंनी खचाखच भरलेले नाहीत. माळे खाली केले तर त्यातून नाना तर्हेच्या वस्तू मिळतात. एकंदरीत हे माळे अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठीच वापरले जातात.
थोडा विचार करूया, सर्वांच्या लक्षात येईल, जी वस्तू आपण मागील तीन वर्षात एकदाही वापरलेली नाही ती आपण आपल्या उर्वरित आयुष्यात एकदा सुद्धा वापरणार नाही. मग अश्या वस्तू माळ्यावर साठवून ठेवण्याचा काय उद्देश असणार आहे? घरातील एकूण सामानापैकी पन्नास टक्के सामान आपण विविध कारणांनी वापरणार असतो, ज्याचा मी वर सांगितल्याप्रमाणे तीन वर्षातून एकदा तरी उपयोग होतो, बाकीचे सामान आपण केवळ असुदे, लागेल कधीतरी या आशेने उगीच साठवून ठेवतो.
तमाम भारतीयांना विनाकारण अनेक वस्तू साठवण्याची सवय आहे. एका नातेवाईकाचा पुण्यातील वाडा पाडून अपार्टमेंट करण्याचे ठरले, तेव्हा वाड्यातून मोठा ट्रक भरून जुने सामान निघाले, जे आताच्या जमान्यात भंगार या सदरात मोडले. पितळ व तांब्याची भांडी, स्टीलचे अनेक तांबे, गंज, व विविध आकाराची भांडी, चमचे, वाट्या, पेले, भाजी, आमटी वाढण्यासाठीचे डाव आणि मोठे चमचे. या शिवाय पूर्वीचे पत्र्याचे चौकोनी डबे, तेलाचे मोकळे डबे, तांब्याचा बंब, विविध आकाराची घमेली, जुन्या सुटकेस, ट्रँक, अश्या नानाविध वस्तू निघाल्या. या वस्तू मागील दोन पिढ्यांनी विनाकारण साठवून ठेवलेल्या होत्या, ज्या येणाऱ्या काळानुसार कालबाह्य झालेल्या होत्या. आजोबांनी व वडिलांनी जे सामान पोटाला चिमटा देऊन जमवले, नातवाने ते सर्व किलोच्या भावात विकले, त्यांनी ते त्यांच्या जमान्यात विकले असते तर आताच्या कैकपट जास्त किंमत मिळाली असती.
मध्यम, उच्चमध्यम, व श्रीमंत वर्गातील महिलांची घरातील कपाटे साड्या व ड्रेसेसनी इतकी खचाखच भरलेली असतात, तरीही त्या कपड्यांच्या बाबतीत असमाधानीच असतात आणि कपड्यांची कपाटे नेहेमी अपुरीच पडतात. दुसरीकडे, अश्याही महिला आहेत ज्यांना अंग झाकण्यापुरताही कपडा मिळत नाही.
आजही लग्न व इतर समारंभात मोठयाप्रमाणात आहेराच्या वस्तू दिल्या व घेतल्या जातात, या सामानातील बऱ्याच वस्तूंची रवानगी थोड्याच दिवसात माळ्यावर होते. या सामानातील थोड्या फार वस्तू पुन्हा भेट म्हणून सरकवल्या जातात. वित्तीय लाभाचा विचार करता, हा खूप मोठा तोटाच आहे कारण आपला खूप पैसा अश्या तर्हेने अडकलेला राहतो. ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांना ते अडगळीत टाकावे लागते, आणि जे गरीब आहेत त्यांना चार भांडी जमवताना, रक्ताचे पाणी करावे लागते.
सेकंड होम घेणारे असेच असतात, त्यांच्या त्या सेकंड होम चा उपभोग रखवालदार घेतो. घरमालक वर्षातून जास्तीत जास्त दोन तीन वेळा त्या घरात येतो, मोजून तीन ते पाच दिवस राहून जातो. रखवालदार अथवा मुनीम, घर सांभाळणारा उरलेले तीनशे पन्नास दिवस त्या घराचा फुकट उपभोग घेतो.
जर तमाम भारतीयांनी हि माळ्यावरची कधीही न लागणारी अडगळ गरजवंतांना दिली तर मी सांगतो उत्पादन उद्योगात वीज वापर घटेल, वाहतुकीवरचा खर्च कमी होईल ज्यामुळे प्रदूषण किमान पाच टक्क्यांनी कमी होईल. जश्या चलनी नोटा तिजोरीत पडून राहिल्या कि चलन टंचाई होते, तीच गोष्ट अश्या वस्तू माळ्यावर पडून राहिल्याने होतो.
अनेक लोकांच्याकडे जुन्या गाड्या, सायकली विनाऊपयोग पडून असतात, केवळ वेळत न विकल्यामुळे, त्यांची किंमत वर्षसरताना कमी कमी होत जाऊन भंगार रूपात परिवर्तन होते. विविध सरकारी गाड्या, वस्तु, फर्निचर सुद्धा केवळ वेळेत लिलाव करून न विकल्यामुळे प्रचंड नुकसान होते, हे नुकसान आपल्यासारख्या करदात्यांच्या टॅक्स रूपात दिलेल्या पैशाचे असते, याची जाणीव सरकारदरबारी कुणालाही नसते.
आज, समाज परिवर्तनाची नितांत गरज आहे, निदान माळ्यावरच्या वस्तू तरी उदारतेने द्यायला शिका, कदाचित त्या चार सहा वस्तूनी कित्तेक लोकांचे संसार उभे राहतील. त्याचा पर्यावरणावर होणार भार हलका होण्यास मदत होईल.
मोह सोडा, इथून परलोकी काहीच घेऊन जायचे नाही, मग इतके ओझे जोपासायची काही गरज आहे का?
म्हणतात ना,
देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….
देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….
घेणाऱ्याने… घेता घेता… देणाऱ्याचे… हातचं घ्यावे।
चला तर एक माणूसकीची भिंत ऊभी करूयात.
धन्यवाद 🙏
लेखक : श्री विजय लिमये
मो. 9326040204
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈