श्री जगदीश काबरे
☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे की, जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्याच्या धडपडीचा अविष्कार पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण माणूस म्हणून एकसंध नसून आपले शरीर हे विविध अवयवांनी बनलेल्या पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्या गुणसूत्रांच्या एकेक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. शरीराचे अवयव म्हणजे मी नाही. पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच की, बाहेरून वस्तू आणून माणूस घर बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. या शरीरातील हृदयाची धडधड थांबणे म्हणजेच मृत्यू होय. जीवनाची असोशी आणि मृत्यूचे भय माणसाच्या मनात सतत असल्यामुळे माणसाने मृत्यूनंतरचे जीवन कल्पीले आणि वेदनारहित अमर आत्म्याचा जन्म झाला.
असा आत्मा अस्तित्वात नसल्यामुळे वास्तवात शरीर जर्जर झाले असेल तर त्याचा त्रास माणसाला होतो. अशा वेळेस घरातील जवळच्या सुहृद नातेवाईकांनाही त्याचा त्रास होत असतोच. पण बरेचदा आपलेपणाने तर कधी कर्तव्य बुद्धीने ते सगळे सहन करत असतात. जीवनभर स्वावलंबी जगल्यानंतर शेवटच्या काळात परावलंबी होणे हे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला दुःखदायकच वाटत असते. अशावेळेला त्याने जर इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली तर ते चूक कसे ठरेल? पण अजूनही आपल्याकडे इच्छामरण म्हणजे आत्महत्या असे समजण्यात येते. म्हणून व्याधीग्रस्त माणसाला मरणाची वाट बघत व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. हा सहानुभूतीच्या नावाखाली रुग्णाला जिवंतपणे मरणयातना देणारा अनुभव क्रूरपणाचा नाही का?
हे लक्षात घेऊन न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आता जबाबदारी वाढते ती इच्छामरणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची. जर एखाद्याने इच्छापत्रात ‘विशिष्ट उपचारानंतर मला शांतपणे मरू द्यावे’, असे म्हटले असेल तर त्याचा सन्मानाने मारण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. माणसाला सन्मानाने जगायला हवे असते तसेच सन्मानाने मरायलाही. पण या कायद्यामुळे आत्महत्याही कायदेशीर होईल आणि या कायद्याचा गैरवापर पैसाअडक्यासाठी केला जाईल, अशी भीती बाळगणे म्हणजे नदीला केव्हातरी मोठा पूर येईल आणि आपण त्यात बुडून वाहून जाऊ; म्हणून नदीकाठी घर बांधणे चुकीचे असे समजण्यासारखे आहे. कारण प्रत्येक कायदा हा दुधारी शास्त्रासारखा असतो. त्याचा वापर विधायक करावा की विघातक हे शेवटी आपल्यावर अवलंबून असते.
एवंच आजच्या धकाधकीच्या जीवनात जर एखाद्याने आयुष्य पूर्णपणे उपभोगले असेल आणि शेवटच्या काळात व्याधीग्रस्त होऊन खितपत मरण येण्यापेक्षा जर त्याने इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. असेही मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणे हे धर्मसंमत आहेच. तेव्हा आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर न्यायालयाच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तुम्हाला?🤔
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर