सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ वेध लागले श्रावणाचे… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

श्रावणातले दिवसच हिरवे हसरे सुखद!! या श्रावण महिन्याला एक सुगंध आहे.. जाई जुई मोगर्‍याचा दरवळ आहे. सभोवताली दाट हिरवळ आहे. शिवारात पीकांचा डौल आहे.फुटणार्‍या कणसांचा परिमळ आहे. सृष्टी कशी तृप्त तजेलदार आहे. पावसांच्या सरींची शीतल, आनंददायी बरसात आहे. सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि एक प्रकारची प्रसन्न व्यस्तता आहे.. नेमाने येणार्‍या या श्रावणाची इंद्रधनु रुपे मनांत कशी साठलेली आहेत.

श्रावण महिना म्हणजे सणांचा सोहळाच. घराघरात हे पारंपारिक साजरेपण सजते.पारंपारिक पदार्थांचांही  सुगंध वातावरणात भरुन असतो..

खरोखरच श्रावणमासी सुगंधाच्या राशी…

नवविवाहीतांसाठी श्रावणी सोमवारची शिवामूठ, मंगळवारची मंगळागौर .. त्यानिमीत्ताने नटणे मुरडणे.. ठेवणीतल्या पैठण्या आणि अलंकारांचा साज…

श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे सौंदर्याचा, पावित्र्य, मांगल्याचाच वर्षाव..

श्रावणातले सणही किती अर्थपूर्ण!! नागपंचमीच्या नागपूजेतून  सृष्टीच्या चराचराला एक आदराचे स्थान देण्याचीच भावना असते. बहिणभावांच्या प्रेमाचे रक्षाबंधन… कोळी आणि समुद्राचे अतूट नाते सांगणारी नारळी पौर्णीमा. उधाणलेल्या दर्यात नारळ टाकून त्याला पूजण्याचा संकेत किती भावपूर्ण आहे…

सण आणि निसर्ग यांचा भावपूर्ण मेळ साधणारा.. गोकुळअष्टमीच्या गोविंदाइतकं गोजीरवाणं

तर अद्वितीयच!! तो डाळींबाचे दाणे घालून नारळ पोह्यांचा प्रसादकाला … त्याची चवच न्यारी.खरं म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणजे मातृदिनच. सुरेख आकाराचे पीठाचे दिवे पेटवून माता मुलांना दीपदान देते. त्यांच्या उजळ भविष्यासाठी प्रार्थना करते…

श्रावणातला अत्यंत कृतज्ञतेचा दिवस म्हणजे बैलपोळा..

घराघरात खीर पुरणाचा बेत घडतो. ढवळे पवळे नटतात. सजतात, रंगतात.

बळीराजाची अर्धांगिनी त्यांच्या मुखी औक्षण करुन प्रेमाचा घास भरवते….

खरोखरच श्रावण महिना म्हणजे प्रेम कृतज्ञता..

श्रावण महिना म्हणजे मांगल्य ‘पावित्र्य…

आनदाचे डोही आनंदाचेच तरंग… सौंदर्याचा अजोड अविष्कार…

आषाढ सरतो आणि श्रावण येतो..

सृष्टी नटते. अवखळ झर्‍यांचा नाद घुमतो.

डोंगर माथे ढगांशी गुजगोष्टी करतात.

भिजल्या घरट्यात पक्षी कुचकुचतात..

रानफुले आनंदे डुलतात…

सप्तरंगांची उधळणच होते….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments