सौ. वृषाली सहस्रबुद्धे
विविधा
☆ रोज बदलतं स्टेटस… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆
19.04. 2024 पासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला. सुजाण नागरिक मतदान करायला तर गेलेच आणि नंतर त्यांनी आपल्या मतदानाचा पुरावा त्यांनी व्हॉट्स ॲप किंवा इतर सोशल मीडियाच्या स्टेटसवर सादर केला. कुणी मतदान केंद्रावर तयार केलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर, कुणी मतदान केंद्राच्या आवारात वा प्रवेश द्वारात, कुणी घरी परत येण्यापूर्वी गाडीवर बसून तर काहींनी घरासमोर फोटो काढून ते स्टेटसवर टाकले. हा सगळा प्रकार पाहून मला प्रश्न पडला की खरंच असे आपल्या वैयक्तिक गोष्टींचे फोटो स्टेटसवर टाकणं इतकं आवश्यक आहे? समजा ‘मी मतदान केलं’ हे कुणालाही कळलं नाही तर मी ते केलं नाही असं होतं का? नाही ना! !
आजकाल अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही स्टेटसवर ठेवल्या जातात. कुठे जेवायला गेले तर आधी तिथे फोटो काढणार आणि स्टेटसला टाकणार. तीच कथा जेवण आल्यावरची. समोर आलेलं गरमागरम सुग्रास जेवण जेवायचं सोडून ते वाढलेल्या ताटाचे फोटो आधी स्टेटसला जावे लागतात. त्यामुळे बहुतेक त्या पदार्थांची चव वाढत असणार. काही लोक तर जेवत असतानाचेही फोटो टाकतात. काय उपयोग याचा? कारण हे स्टेटस बघणारे जे लोक असतात ना तेही हे सगळं करत असतातच ना! मग त्यांना या फोटोंचं काय कौतुक?
यात आणखीही एक मजेदार प्रकार असतो. ग्रुपमधल्या एखाद्याचा वाढदिवस असतो. मग तो स्वतःचा वाढदिवस कसा साजरा केला याचे फोटो स्वतःच्या स्टेटसवर ठेवतो. इथपर्यंत सगळं ठीकच आहे. पण मग ग्रुपमधील कुणीतरी त्या स्टेटसचा स्क्रीन शॉट काढून तो आपल्या स्टेटसवर ठेवतं. काय सुचवायचं असतं नक्की त्याला? की बाबा रे बघ, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की माझ्याही स्टेटसला तुझेच फोटो आहेत असं? अर्थात जे तो वाढदिवस विसरले आहेत त्यांना त्याची आठवण यावी हाही एक छुपा उद्देश त्यामागे असावा. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा वैयक्तिक संदेश पाठवूनही देता येतात. सरळ कॉल करून बोलणे तर फारच छान. पण नाही, जोपर्यंत मी काय केलं हे लोकांना कळत नाही तोपर्यंत जगण्याचा काय उपयोग?
तरी एक वेळ अशा आनंदाचं ठीक आहे, पण आपण जे सामाजिक कार्य करतो त्याची जाहिरात का स्टेटसवर केली जाते? आपण झाडं लावणार असू तर लगेच त्या रोपाबरोबरचा एक फोटो स्टेटसला. रक्तदान केलं तर लगेच हाताला सुई पोचलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या पलंगावर पडून असतानाचा फोटो स्टेटसला. कुठल्या तरी संस्थेला अगदी छोटीशी देणगी दिली तरी तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबरचा फोटो स्टेटसला येणं हे जास्त महत्वाचं असतं. तीच कथा अन्नदानाची. भुकेलेल्या लोकांना खायला घालण्यापेक्षा जास्त महत्त्व त्यांच्या घोळक्यासमोर उभं राहून घेतलेल्या सेल्फीला आणि ती स्टेटसवर येण्याला ही सध्याची अवस्था आहे. खरं तर आपल्या संस्कृतीत गुप्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. मग आता याचाही गाजावाजा करणं का आवश्यक झालं आहे? ‘मी दान करतो, अगदी याचक मागेल ते त्याला देतो’ अशी दवंडी न पिटताही कर्ण अजूनही दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेच ना! !
आजकाल बहुतेक सर्वच लोक स्वतःच्या आयुष्यातील अगदी खाजगी बाबीही ह्या स्टेटसवरच्या फोटोंमुळे चव्हाट्यावर आणत असतात. मग ते मित्र-मैत्रिणींबरोबरचं भांडण असो वा घरातल्या लोकांशी झालेले मतभेद. मुलाचा वाढदिवस असेल तर त्याच्या खरेदीसाठी गेल्यावर तिथला फोटो, त्याची तयारी झाल्यावर त्याच्यासकट सजलेल्या घराचे आतून, बाहेरून फोटो, नवीन घेतलेल्या सगळ्या वस्तू – अगदी कपडे, दागिने, फर्निचर, कार इत्यादी – हे सगळं स्टेटसला जावंच लागतं. घरातले सगळे चित्रपट बघायला, जेवायला किंवा प्रवासाला गेले तर वारंवार ‘स्टेटस अपडेट’ करून त्याचा सतत गाजावाजा केला जातो. पण यातून आपण आपलं घरदार, जीवाभावाची माणसं, वैयक्तिक आयुष्य असुरक्षित करत असतो हे या सगळ्यांना कसं समजत नाही? प्रत्यक्ष भेटायला जायला तर सोडाच, पण आजकाल फोनवरही थोड्या वेळ बोलायलाही ज्यांना वेळ नसतो ते स्टेटसवर मात्र तासचे तास घालवताना दिसतात.
यावर आधारित एक गोष्ट मी काही वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिली होती. साधारणतः ५५ ते ६० च्या दरम्यान वय असलेलं एक जोडपं घरी बसून अशा तरुण जोडप्यांचं स्टेटस रोज बघतात ज्यांना तान्ही ते ९-१० वर्षांपर्यंतची मुलं आहेत. मग त्या मुलांच्या वाढदिवसाच्या म्हणा किंवा इतर काही निमित्ताने म्हणा ते कुटुंब ज्या दिवशी गर्दीच्या ठिकाणी जाणार असेल जसं की खरेदीसाठी बाजारात, मॉलमध्ये किड्स् झोनला खेळायला, किंवा एखाद्या यात्रेत वा प्रदर्शनात इत्यादी, तिथे आपल्या तरुण साथिदारांना पाठवून त्या लहान मुलांना पळवून आणतात आणि त्यांची विक्री करतात. त्या जोडप्याच्या वयामुळे ते बरेच दिवस पोलिसांच्या नजरेत येत नाहीत, कारण ते सोशल मीडियावरच्या स्टेटसचा असा काही वापर करत असतील आणि तेही त्यांच्या वयात हा संशय कुणालाही येत नाही. पण ती गोष्ट असल्याने यथावकाश पोलिस त्या दोघांसह त्यांच्या पूर्ण टोळीलाही पकडतात आणि तो मुलांचा व्यापार थांबवतात. पण हे वास्तव आहे का? आणि असेल तरीही तोपर्यंत विकल्या गेलेल्या त्या छोट्या मुलांचं नक्की काय झालं, त्यातली किती सापडली, किती घरी परतली, किती जणांना घरच्यांनी परत स्वीकारलं (मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न फारच विदारक स्वरूपाचा असतो), ज्यांना काहीच आठवलं नसेल त्यांचं काय झालं असे अनेक प्रश्न मला अजूनही सतावतात.
म्हणून असं वाटतं की आपल्याला होणारा आनंद किंवा दुःख अथवा आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या सोशल मीडियावरच्या स्टेटसला सतत टाकून जगासमोर आणू नयेत. कारण ते स्टेटस पाहणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल, आपलं भलं चिंतीत असेल असं नाही. जे लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत ते तुमचा गैरफायदाही उठवू शकतात. तेव्हा स्टेटसवर काहीही टाकण्यापूर्वी आपलं घर, संसार, आपली माणसं यांचा विचार नक्कीच करा.
© सौ. वृषाली सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈