सुश्री वैशाली पंडित
परिचय
शैक्षणिक अर्हता – बी. ए. बी. एड्. मराठी/ समाजशास्त्र
माझं लेखन – तरूण भारत, पुढारी, लोकमत, मिळून सा-याजणी यांत सदरलेखनसकाळ स्मार्ट सोबती या पुरवणीत सलग सहाव्या वर्षी सदर सुरू आहे. अंतर्नाद, आरती मासिकातून कथालेखन. कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम सांभाळले. अनेक साहित्यिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालवले. झपूर्झा या मासिकातून कथा लेखन.
पुस्तके –
- दीपमाळेची फुले (ललित लेख संग्रह) – आरती प्रकाशन, डोंबिवली. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार.
- आगीनझाड (कथासंग्रह) पंडित पब्लीकेशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
- असा घडला सेनानी (चरित्र कादंबरी,) पंडित पब्लिकेशन कणकवली
- आधण आणि विसावण (ललितबंध) अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर, कोमसाप पुरस्कार.
- पाच दशक नऊ सुटे (ललितबंध)- अभिनंदन प्रकाशन. कोल्हापूर
- कल्याणकटोरा (संतचरित्रात्मक कादंबरी) विघ्नेश प्रकाशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
- श्री गजानन विजयग्रंथ साहित्यिक पारायण – संतकवी दासगणू यांच्या अध्यायांवर रसग्रहणात्मक लेख. — अल्टीमेट प्रकाशन, नाशिक
- मंत्रभूल, -(ललित लेखबंध-)- सकाळ प्रकाशन पुणे
- अन्य –
- ‘कानगोष्टी’ ही शिशुवर्गासाठींची गोष्टींची श्रवणफीत. मात्र आता सीडीप्लेअर कालबाह्य झाल्याने त्या गोष्टी माझ्या यु ट्युब चॕनेलवर ऐकता येतील. मुलांचा श्रवण विकास व्हावा यासाठीच या गोष्टी आहेत.
- पाच दशक नऊ सुटे या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख हिच्या हस्ते केला. दिशामुळे तो आणि ती या बरोबर ते या समाजाशीही मैत्रबंध निर्माण झाला.
- ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाची स्थापना २०१४ मध्ये झाली.
- अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रम त्यात सुरू असतात. पुढच्या वर्षी दशकपूर्ती आहे. सिंधुदुर्गातल्या ३० नव्या जुन्या लेखिका एकत्र येतात. दृढ साहित्यबंध निर्माण झालेला आहे.
- मी फेसबुकवर सक्रिय असते. स्पर्शतृष्णा हा माझा सर्वाधिक व्हायरल झालेला लेख होता.
- गोमंतकातील चौदाव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- मिळून सा-याजणीची गेली २० वर्षे प्रतिनिधी.
- मॕन इन थ्री पीस ही कथा गोव्यातील एका दिग्दर्शकाने सिनेमासाठी निवडली.
- आकाशवाणीवरून अनेक कथा कविता प्रसिद्ध
विविधा
☆ मी आधुनिक श्रद्धाळू… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
हो बाई ! मी अगदी आधुनिक आहे. जुन्याजीर्ण श्रद्धा कालबाह्य झाल्यात. आपण काळाबरोबर बदलायला हवं नाहीतर रद्दीतसुधा घ्यायचं नाही कोणी. हे मला पक्कंच कळलेलं आहे. तर सांगत काय होते, हं मी आधुनिक…
म्हणून तर मी स्मार्टफोन वापरायला शिकले. अगदी ह्याच्यात्याच्या हातापाया पडून, मिनत्या करून मोबायलातलं एकेक तंत्र माहीत करून घेतलं. फेसबुक म्हणू नका, व्हाटसप म्हणू नका सगळीकडे मुसंडी मारली. माहेर, सासर, शाळेतले, कॉलेजातले, इथले-तिथले पन्नासग्रुप फोनवर आले. प्रत्यक्षात कधी बोलायला मिळत नव्हतं ते इथे अगदी धो धो बोलून घ्यायला लागले. जळ्ळं प्रत्येकवेळी बोलायलाच हवं असं तरी कुठे ? इकडून आलेला मेसेज तिकडे ढकलला तरी चालतोच की ! ओटीतला ब्लाऊजपीस कसा हिचा तिला, तिचा हिला परत आपल्याच ओटीत येतो, तस्से मेले हेही मेसेज परत आपल्याच व्हाटसप्यात येतात ते सोडा.
आणखी एक बरं झालं बाई ! रोजच्या जेवणाचं ताटही फेसबुकाला, वॉटसपाला नैवेद्य दाखवायचं व्रत नेमाने करता आलं. एरव्हीच्या शिळ्याफोडणी भातालाही सव्वाशे लाईक्स आले की ऊर कसा भरून येतो नै ? नाहीतर त्याला घरात माझ्याशिवाय विचारत कोण होतं ?
भरलं वांगं, दहीबुंदी, काजुकुर्मा, असल्या पदार्थांचे फोटो मी टाकले तेव्हा उभ्या गुगलने मला सुगरण, यम्मी, माऊथवाॕटरींग असाल्या कमेंटी टाकल्या. ही बाई बघावं तेव्हा आॕनलाईनवर असते, करते तरी कधी ? सगळ्यांनाच आश्चर्य. पण म्हटलं ना, मी आधुनिक… करायला कशाला हवंय काही ? नेट लावलं की हव्वा तो पदार्थ पुढ्यात. तेच ब्लाऊजपीस पुढच्या ओटीत टाकत रहायचे. माझा आजचा मेन्यू म्हणून. फक्त ज्या ग्रूपवर घरातली मुलं सुना, नातवंडं नाहीत तिथेच ते टाकायचं. नाहीतर ” कधी गं हा मेन्यू होता आपल्याकडे ? मुगाची खिचडीच तर केलीस उशीर झाला म्हणून. ” असं बिनदिक्कत विचारायला कमी नाही करायचे हे लोक.
आता खर्च म्हणाल तर… वाढला थोडासा. खोटं कशाला बोला ? नेटपॕकचा तर राजरोसच वाढला पण दुधाचा खर्च वाढला. गॕसचे सिलिंडर महिन्याला एकाच्या जागी दोन लागायला लागले. काय ? नाही कळलं काही ? अहो, आख्खं गुगल बोटाखाली रगडताना होते दुधाची अंमळशी सांडलवंड. जातं महिन्यातून फक्त वीसपंचवीसदा दूध उतू. पण एवढी बिझी असल्यावर घसा-याचा खर्च नाही का गृहित धरत ? मग ?
तर… असं सगळं सुरळीत चाललेलं. तर या मोबाईलबाळालाच दृष्ट लागावी ? कसंतरीच करायला लागलं की. डोळाच उघडीना. नेहमीचा त्याचा चार्जरचा अंगठा तोंडात दिला, तास झाला तरी हाल नाही की चाल नाही. शेवटी चांगला दुसरा लांबशेपटीवाला चार्जर लावला तरी तेच. जीव धास्तावला अगदी. म्हटलं दृष्ट तरी काढावी. सिमकार्ड मुठीत धरून तीनदा उतरवलं, पुटपुटलेही. ” डीपीची, सेल्फीची, जॉईनची, क्वीटची, अपलोडाची, डाऊनलोडाची, नोकीयाची, सॕमसंगची, आयबाॕलची कोणाची नजर लागली असेल तर फुटो त्याचा कॕमेरा !” पण… छे ः !
मग काय न्या डाॕक्टरकडे. घसघशीत बिल घेऊन त्याने केले उपचार. आणला घरी. तर त्यात वॉटसप काही केल्या उगवेना. आता करू तरी काय ? माझे कित्ती कॉंन्टॕक्टस ताटकळले असतील माझ्याशिवाय, कोणी नवी साडी घेतली, कोणी जुनी गाडी विकली, कोणाच्या सासूने कोणाला कसे टोमणे मारले, कोणाच्या सुनेने आगाऊपणा केला काही समजणार नाही मला ?
तेवढ्यात यांच्या मित्राचा मुलगा बायको मुलासह आमच्या घरी आला. तिघांच्याही हातात त्यांचे मोबाईल. आमच्याशी बोलताना दोन शब्द आम्हाला आणि बाकीचं मोबाईलमधे तोंड घातलेलं. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी कारण विचारलं मी सांगितलं. म्हणे हात्तेरेकी. आमचा बबलू इइइझ्झीली देईल दुरूस्त करून. बबलू. इयत्ता सातवी क ने इकडे तिकडे खाटखुट केलं आणि उगवलं की व्हाॕटसप. सगळी ओळखीची तोंडं दिसली डीप्यांमधली आणि हायसं झालं. आनंदाच्या भरात बबलूचे कित्ती फोटो काढू न् किती नको झालं मला. खुषीत एक आख्खं पार्लेजी बिस्कीट जास्तच घातलं त्याच्या प्लेटमध्ये.
ते गेले आणि कौतुकाने मोबुल्याला मांडीवर घेतलं. काय सांगू ? त्याचं एक दुखणं बरं झालं आणि अनेक बारीकसारीक कुरबुरी सुरू झालेल्या दिसल्या. एकतर व्हाॕटसपवरची काहींची नावं गुल. नुसतेच नंबर. लोकही असले खत्रूड ना, डीपी दर तासाला बदलतात. कोणाचा नंबर ते कळतच नव्हतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे…. आई आई ग्ग्ग ! फेसबुक गायब… काय ढवळलं त्या कार्ट्याने तो गुगल जाणे. कासावीस झाला जीव. शेवटी सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः म्हणतातच ना ! मी म्हटलं मेलं वाॕटसप तर वाॕटसप.
पण नावं नव्हती त्यांचे मेसेज आले तर कोणाला काय रिप्लाय द्यावा कळतच नव्हतं. अंदाज पंचे काहीही ठोकत होते. एकाला मी तो बायकोला फिरायला नेत नाही म्हणून झापलं तर ते सासरच्या ग्रूपवरचे मामेसासरे निघाले. त्यांचं लग्नच नाहीये झालेलं. माझी जीवाची मैत्रीण समजून आमच्या नवराबायकोतल्या उखाळ्या पाखाळ्या लिहिल्या तर तो मेसेज नेमका दादाला पोचला. त्याने दात दाखवत तो माझ्या नव-याला फाॕरवर्ड केल्याचा रिप्लाय टाकला. काय बघा स्वभाव ! याचं त्याला त्याचं याला करावं का असं ?
शेवटी विनंती केली पर्सनली, बाबांनो, कृपया नावं कळवा. तर काहीनी निरागसपणे कळवलं काहींनी ओळखा बघू असं मलाच कोड्यात टाकलं. नतद्रष्ट मेले.
आपली मेसेज फाॕरवड करायची लिस्टही बिनसलेली. एकाला दाबावं तर सुळ्ळकन भलतीकडेच तो मेसेज पसार. आमचा अगदी चौघींचाच एक भन्नाट ग्रुप आहे. तिथे कसलाही विधिनिषेध नाही. जिभेची हाडं तिथे चुकून मिळायची नाहीत. असाच एक ठ्यां हसायला लावणारा मेसेज मी तिथे पाठवायला म्हणून दाबला तर तो थेट एका सोवळ्या ग्रुपवर जाऊन आदळला. एकच हाहाकार उडाला तिथे. अगदी ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात चिंचगुळाच्या आमटीत मांजराने तळलेला बांगडा टाकल्यावर जे होईल ते झालं. पुढची दहा मिन्टं मी तिथे साॕरी… चुकले. परत नाही असं होणार अशा नाकदु-या टाईप करीत होते.
घरात कोणी आजारी असेल तर प्राण कसे कंठाशी येतात ते मी सांगायला नको. मी किती मोबाईल तज्ज्ञ गाठले, किती पैसे त्यांच्या खिशात घातले त्याचा हिशेबच नाही. एखादा तज्ज्ञ मोबाईल चिमटीत धरतो, उगाच इथे तिथे बोटं आपटतो आणि जाहीर करतो, “प्च काय नाय उपयोग याचा. शाप डबा झालाय. ” काहींनी माझा इमेल आयडी स्वःच्या आवडीने बदलला. माझी जन्मतारीख तर इतकी वेगवेगळी पडली की शिवरायांनाही खंत वाटावी. बरं तारीख वेगळी टाकली एकवेळ मान्य. पण साल ? माझ्या पोरांचा टवाळ्या करणारा मेसेज. एकविसाव्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! एक शुभेच्छा अठराव्या वाढदिवसाची आली. असं करता करता बहुतेक माझ्या आईलाच कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या शुभेच्छा माझ्या नातवांकडून गेल्या तर नवल नको वाटायला. थोरल्या नि धाकट्याने तर फेसबुकचे किती अकाउंट उघडलेस गं म्हणत मला काही कळत नसल्याची ग्वाही दिली. सुनेने एकदा बघू काय झालंय म्हणत मोबाईल हातात घेतला आणि इस्स्स.. म्हणत ओढणी तोंडावर घेतली. “अहो ममी, असले फोटो कशाला डाऊनलोड केलेत ?” म्हणत घाईघाईने तो डिलीट केला. मी काहीही न करता मला हे भोगावं लागत होतं.
इथे नाही काही होणार. हा प्राॕब्लेम मुंबईलाच बघावा लागेल. असा घरातून मला सल्ला मिळाला. पण…. आशा चिवट. परत कोणी मोबाईलतज्ज्ञ वाटला की त्याच्या पायावर मोबाईलला घालते. तो सांगेल ते गंडेदोरे करायची तयारी असते माझी. मग ? शेवटी मी आधुनिक ना ? माझ्या श्रद्धाही आधुनिक. ना ?
© सुश्री वैशाली पंडित
मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈