सौ. ज्योती विलास जोशी
अल्प परिचय
शिक्षण – बी.एस.सी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हाॅस्पिटल मॅनेजमेंट.
छंद:—
ऑइल पेंटिंग, गायन, वादन.
आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललितबंधिंचे सादरीकरण व अभिवाचन.
विविधा
☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆
जगात शुभंकराकडं जसं मन आकृष्ट होतं, तसंच भयंकराचं देखील वेगळं आकर्षण आहे. लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा ठेवत प्रथम बाऊची आणि नंतर बागुलबुवाची भीती दाखवली जाते. या भीतीनं मनाचा एक कप्पा व्यापला जातो. लहान मुलं रडता रडता आपण कशासाठी रडत होतो हे विसरतात. त्यांच्या डोळ्याचे रांजण कोरडे पडतात. आवाजाची तान शिथिल होते, पण मायेची माणसं जवळ असल्याने अपेक्षा मात्र पूर्ण होते हे नक्की…. वय वाढेल तसं भीती एक मानसिकता होते. मनाला जाणवणारी संवेदना असते ती. अनाठाई भीतीनं विचारांचे पंख कापले जातात. भीतीनं कापरं भरलेलं मन, ‘सिदन्ती मम गात्राणी मुखम् च परिशुष्यते’ अशी तक्रार करायला सुरुवात करतं. मन पुट पुटायला लागतं ‘भय इथले संपत नाही. ‘ भयानक हा स्थायीभाव असणारा हा रस नवरसातला एक… जणू लाव्हाच!
आयुष्याला एक शिस्त असावी म्हणून माणसाने देव, धर्म, नियमावली, जाती, समाजमान्यता या भयांना जन्माला घातलं. मुकपणे पाहणाऱ्या या निसर्गाला देखील माणूस खाऊ की गिळू असं करू लागला. म्हणूनही ही बंधने असावीत. हास्य रस हा केवळ मनुष्य प्राण्यात स्त्रवतो परंतु भयरस मात्र समस्त प्राणिमात्रात दिसून येतो. साहित्यसृष्टीही या रसाने व्यापून गेली आहे. केवळ भयकथा लिहिणारे लेखक प्रसिद्ध आहेत. चित्रपट सृष्टीतील भयपटांचा एक चाहतावर्ग आहे. मृत्यू, सूड, खून, मारामारी, रक्तरंजित कथा यांचे सिनेमे पाहणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. ‘भुताचा पिक्चर सुपरहिट’ हे समीकरण बनलंय. आताशा माणसं भुतांना घाबरत नाहीत. ती स्वतःच चालती-बोलती भूतं झालीत. माणूसच माणसाला घाबरायला लागलाय. पूर्वी भुतं तरंगायची पण आता माणसंच हवेत असतात. त्यांचेच पाय जमिनीला लागत नाहीत. ती स्वतः भूतं झालीत. मारामाऱ्या, युद्ध, मृत्यु, खून, सूड यांची शस्त्र घेऊन ही भूतं पृथ्वीवर नंगा नाच करू लागलीत. त्यांच्यावर इलाज करणारा यांत्रिक बोलवायला हवा. ही भूतं निसर्गालाही डिवचतात. त्यानं निसर्गाचाही कोप होतो. निसर्गाची प्रतिक्रिया म्हणून पाझरलेला भयरस तर अति दाहक! आताशा नवरसातून निर्माण झालेले राग, द्वेष, त्वेष, मत्सर, लालसा, अहंकार यांची भूतं मनाच्या रंगमंचावर नंगानाच करू लागली. आयुर्वेदात भयज्वर भयअतिसार अशा रोगांवर भयचिकित्सा सुरू झाली आहे आहे हे आपल्या संस्कृतीचं दुर्दैव आहे..
मोठे होऊ तसं बाऊ गेला… बागुलबुवा गेला. नंतर आला करोना नावाचा गब्बर सिंग! ! जो डर गया वो मर गया असं म्हणून थैमान घालू लागला. भितीची अनेक रूपं दाखवू लागला. भीतीतून अस्वस्थता वाढू लागली आणि अनामिक विचारांना मोकाट वाव मिळाला. आणि मग उत्तराऐवजी नवीन प्रश्नच निर्माण झाले. समाजाच्या अवहेलनेची भीती, जिथे जिथे आपण जोडले गेलोय तो जोड तुटण्याची भीती. आर्थिक विपन्नतेची भिती अपयशाची, अज्ञानाची, अज्ञाताची, निर्णय चुकल्याची अशा अनेक भीतीने जीव ग्रासून गेलाय.
जीवन आव्हानांचा सागर आहे त्याकडे कसं पाहायचं लढून म्हणजेच फाईट करून की पळून जाऊन म्हणजे फ्लाईट घेऊन की फ्राईट होऊन म्हणजे थिजून हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा भयरस आटेल.. आणि तो मनकंपनास कारणीभूत होणार नाही…
© सौ ज्योती विलास जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈