डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी
विविधा
☆ बुद्धाना आवाहन… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆
(जपान मधील “उशिकू बुद्धा”चे चित्र)
हे भगवान गौतम बुद्धा,
जपान सारख्या शांतता प्रिय देशात तुम्ही शांततेचे प्रतिक म्हणून उभे आहात. तुम्हांला सर्वजण “उशिकू बुद्धा”म्हणून ओळखतात. मनाच्या उर्जेसाठी सगळे तुमच्याजवळ येऊन बसतात जिथे जगाचा विसर पडावा असा तुमचा सहवास. भारतभूला जपान मध्ये “Homeland of Lord Goutam Budhdha” म्हणून ओळखले जाते. तुमच्यामुळे भारताबद्दल आदरयुक्त भावना त्यांच्या मनात आहे. ज्या भारतभूमी मध्ये तुम्ही वाढलात, अध्यात्मिक प्रगती केलीत, शांततेचा संदेश जगाला दिलात आणि लोप पावलात तिथं आज परिस्थिती पहा जरा. या भूमीचा गौरव सुजलाम् सुफलाम् सस्य शामलाम् असा होतो. ती भूमी आता रक्तरंजित झाली आहे. तुमची शांतता म्हणजे अन्याय पण सहन करा अशी कशी असेल? हिरोशिमा शहरावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारण्याची कुवत तुम्ही जपानी लोकांना दिलीत. इलेक्ट्राॅनिक्सच्या जगात भरारी मारल्यावर जमिनीवर पाय ठेवून चालण्याची वृत्ती तुम्ही त्यांचेत रूजविलीत. भारतात मात्र अनेक वेळा रक्तरंजित इतिहास निर्माण झाला. बॉम्बस्फोट होण्यापूर्वी तो होऊ नये म्हणून करावयाच्या विचारांची कुवत तुम्ही माणसांना कधी देणार? बॉम्बस्फोटाचा विनाश न ओढवता न्याय मिळविण्यासाठी दुसरे मार्ग अवलंबायची बुद्धी, अशा बुद्धीला साथ देण्याची सामाजिक मानसिकता तुम्ही कधी देणार?सर्वेपि सुखिनः सन्तु…. हा मूलमंत्र फक्त कागदोपत्रीच रहाणार का ?असे असंख्य प्रश्न तुम्हांला पाहून मनात येतात कारण त्यांची उत्तरे तुमच्या जवळ आहेत. सत्व, रज, तमाच्या पलिकडे गेलेले तुम्ही गुणातीत आहात. स्वतःच्या मनाची प्रगती कशी करावी हे तुमचे अध्यात्म सांगते पण अप्रगत मनांशी, बुद्धीशी लढताना अधर्माने वागावे लागते त्याचं काय? भगवद्गीता सांगते”कर्मण्येवाधिकारस्ते…. ” शांत रहा. फळाची अपेक्षा करू नका. असे सर्वांनी ठरविले तर या जगात देशाच्या संसाराचे रहाटगाडगे चालणार कसे?त्याच भगवद्गीतेत सांगितले आहे, “यदा यदाहि धर्मस्य…. “धर्माला ग्लानी आली की तुम्ही येणार. आता तुमच्या नावाला देखील आलीय ग्लानी पण तुम्ही कुठे आहात?तुम्हांला शोधत आहेत सर्व. एकाजागी थांबून फक्त आशिर्वाद देत आहात, तुम्हांला किंकाळ्या ऐकू येत नाहीत का ? तुम्ही घरदार सोडून निघून गेलात. हेच सर्वांच्या वाट्याला आहे का? निदान या प्रश्नांची उत्तरे द्या म्हणजे मार्गदर्शन करायला आला आहात हे तरी कळेल. मग कोणावर बाण मारायचा हे तरी स्पष्ट होईल. सर्वजण तुमची वाट पहात आहेत. तुम्ही शांतता सोडून न्याय वाटायला या….
नको हिरोशिमा, नको नागासाकी, नको शस्त्राने जिवीत संहार
एकच नारा शांततेचा देऊ अन् टाळू मानव संहार.
© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खुप छान.. असेच नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत रहा