श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र– ताईच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्वपूर्ण साक्षीदार होतीच. अर्थात पुढे तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहेत याची शक्यता मात्र त्याक्षणी मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!)
अतिशय प्रेमाने, कर्तव्य भावनेने आम्ही दिलेले पैसे आमच्या भावनांचा विचार करून, आम्हाला बरं वाटावं म्हणून तरी ताईनं घ्यायला हवे होते, असेच मला वाटत असे. पण हे वाटणं किती चुकीचं, एकांगी विचार करणारं, ताईवर अन्याय करणारं होतं हे आईच्याच बोलण्यातून एकदा मला स्वच्छ जाणवलं.
असंच एक दिवस आई सांगत होती, “अरे तुम्ही सद्भावनेने दिलेले पैसे घेणंही ती नाकारते म्हणून किती वाईट वाटायचं तुला. पण तुम्हा सर्वांच्या पैशाचं कांहीच नाही. त्याही पुढचं सांगते.
‘माझ्या नवऱ्याच्या निवृत्तीनंतर आलेल्या पैशावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ असं म्हणायची ती. या विचारानेही ती सतत खंतावत असायची. मला खूप वाईट वाटायचं. मी परोपरीने तिला समजवायची. पण तिची समजूतच पटायची नाही. ‘अगं तुझे भाऊ आपण होऊन, मदत म्हणून देतायत तुला तर घेत कां नाहीस? प्रत्येकवेळी नको कां म्हणतेस?’ असं मी तिला एकदा म्हंटलं तर म्हणाली, ‘ आई, एकदा घेतले ना तर ती सुरुवात ठरेल. मग त्याला शेवट नाही. आमच्या मुलांना आम्ही कांही फार मोठी इस्टेट ठेवणार नाही आहोत, मग त्यांना कर्जंतरी का म्हणून ठेवायची?’
‘अगं, कर्ज म्हणून ते कुठं देतायत ? ते कुणीच दिलेले पैसे परत मागणार नाहीयेत ‘
‘ त्यांनी नाही मागितले तरी परत द्यायला नकोत? माझ्या भावांनी तरी ते पैसे कष्ट करूनच मिळवलेत ना? मग? मी त्यांची मोठी बहीण असून त्यांना कधीच काहीच देऊ शकले नाही, मग त्यांच्याकडून घेऊ कशी? नको आई. ते मला नाही आवडणार. परमेश्वर देईल तेच फक्त माझं. “
ताई गेल्यानंतर पुढे कितीतरी दिवस तिच्याच संदर्भातलं हे असंच सगळं आईच्या मनात रूतून बसलेलं होतं. त्या आठवणींमधलं ‘परमेश्वर देईल तेच फक्त माझं’ हे ताईचं एक वाक्य पुढे घडून गेलेल्या आक्रितामागचा कार्यकारणभाव सामावून घेणारं आणि म्हणूनच अतिशय महत्वाचं होतं हे आईच्या बोलण्यातूनच मला जाणवलं, ते ताईला लाॅटरीचं बक्षिस लागल्याचं समजल्यानंतर! कारण त्यासंदर्भात माझ्या मनात निर्माण झालेल्या सगळ्याच प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं देणारंच ते वाक्य होतं! ! त्यातला शब्द न् शब्द पुढे माझ्या ताईच्या सात्विक कणखरपणाचं प्रतीक जसा तसाच तिने अतूट श्रध्देने प्राप्त केलेला तिचा परमेश्वरावरील अधिकार सिध्द करणाराही ठरला! !
” तू भाऊबीजेला आला होतास तो प्रसंग आठवतोय ना तुला?” एकदा बोलता बोलता आईनं विचारलं.
” हो. त्याचं काय?”
“तो प्रसंगच निमित्त झालाय पुढच्या सगळ्याला.. “
” म्हणजे?”
“भाऊबीजेदिवशी तुला रिक्षापर्यंत पोचवून केशवराव घरी परत आले ना तेव्हा त्यांना तू काय म्हणालास हे तुझी ताई खोदून खोदून विचारत राहिली. बराच वेळ त्यांनी सांगायचं टाळलं तेव्हा खनपटीलाच बसली. शेवटी त्यांना ते सांगावंच लागलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्ही सगळी भावंडं एकमेकांना धरून असल्याचं पाहून मला तुम्हा सर्वांचं खरंच खूप कौतुक वाटलं. पण तुझी ताई? ते सगळं ऐकून ती मात्र खूप अस्वस्थ झाली. केशवरावांचं बोलणं संपलं, तसं आतल्या आत घुसमटत रडत राहिली. आम्ही तिला ‘काय झालं’, असं विचारलं, समजावलं तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. डोळे पुसले. भिंतीचा आधार घेत उठायचा प्रयत्न करू लागली. मी तिला सावरायला पुढे येईपर्यंत ती भिंतीच्या आधाराने स्वतःला सावरत आत देवघरापर्यंत आली. देवापुढे निरांजन लावलंन् आणि तशीच अलगद डोळे मिटून देवापुढं बसून राहिली. मी तोवर आत येऊन तिचं अंथरूण, पांघरूण झटकून नीट केलं आणि सहज डोकावून पाहिलं तर अजूनही तल्लीन अवस्थेत ती देवापुढे बसून होती! पुढचं दृश्य पाहून मी चरकलेच. तिच्या मिटल्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली,.. चेहरा गदगदत होता, चेहऱ्यावरची नस न् नस थरथरत होती..! .. मी लगबगीने पुढे धावले. तिला उठवायला हात लावणार, तेवढ्यात आत आलेल्या केशवरावांनी मला थांबवलं. ‘तिला थोडावेळ बसू दे… बरं वाटेल.. ‘ हलक्या आवाजात ते म्हणाले.
थोड्या वेळाने ती शांत झाली. एकाग्रतेने नमस्कार करून शांतपणे डोळे उघडले. पदराने चेहरा खसखसून पुसला. आधारासाठी हात पुढे केला आणि उठली. आत जाऊन पडून राहिली. मग तिने केशवरावांना हाक मारून बोलावून घेतलं.
‘तुम्ही मला नेहमी तुला काय हवं, असं विचारता ना? मोकळेपणाने सांग, मी आणून देईन असं म्हणता. हो ना? आज मी सांगणाराय. जे सांगेन ते ऐकायचं. मागेन ते मला आणून द्यायचं.. ‘ ती म्हणाली.
केशवरावांनी तत्परतेने ‘सांग, काय हवंय.. ?’ असं विचारलं.
‘आज बुधवार आहे. उद्या गुरुवार. उद्यापासून दर गुरुवारी मला पाच रुपयांचं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट आणून द्यायचं’
‘लॉटरीचं तिकिट? भलतंच काय?’
‘यात भलतंसलतं काय आहे? मला हवंय. ‘
‘अगं पण कां? कशासाठी?’
‘ते योग्य वेळ आली कीं सांगेन. मी आजपर्यंत इतक्या वर्षात हट्टानं कांही मागितलंय कां तुमच्याकडं? नाही ना? आज मी सांगतेय म्हणून ऐकायचं. बाकी दुसरं मला काहीही नकोय.. ‘
ती म्हणाली होती.
तिला पाच लाखांचं बक्षीस लागलं तो तिसरा गुरुवार होता.. “
आई सांगत होती. तिचा प्रत्येक शब्द मला अधिकच बुचकळ्यांत टाकणारा होता.
“बक्षीस लागल्यानंतर ताईची प्रतिक्रिया काय होती?”
“खूप आनंद झाला होता तिला. हे सगळं कां.. कसं घडलं याचा उलगडा भारावलेल्या अवस्थेत ती स्वतःच जेव्हा बोलली तेव्हा झाला. तुझं आणि केशवरावांचं बोलणं तिला समजलं तेव्हा जणू कांही आपला केविलवाणा भविष्यकाळ तिला अस्वस्थ करू लागला होता. आपल्या या आजारपणात नवऱ्याचे फंड/ग्रॅच्युइटीचे सगळे पैसे संपून जाणार हे तिला स्पष्टपणे दिसत होतंच. ते संपले की कुणाकडून तरी पैसे मागावे लागणारच हे तिला तीव्रतेने जाणवलंही, पण तेच तिला मान्य नव्हतं. त्या अस्वस्थतेत तिने त्यादिवशी देवासमोर बसून गजानन महाराजांना साकडं घातलं होतं..!
‘माझ्या नवऱ्याने रात्रंदिवस जागून आणि कष्ट करून ४० वर्ष राबल्यानंतर त्याला जे पैसे मिळालेत त्यावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ हा तिचा प्रश्न होता! ‘ते सगळे पैसे माझ्या औषधपाण्यांत संपल्यानंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या म्हातारपणात आपल्या मुलांच्या संसारात एखाद्या आश्रितासारखं कां म्हणून पडून रहायचं? मला माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडं काहीही मागायचं नाहीय. नशिबाने माझ्या पदरात टाकलेले हे भोग मला मान्य आहेत. पण कृपा करून तुम्ही माझ्या या घरातली ही आर्थिक लूट थांबवा. त्या बदल्यात माझं हे यातनामय आयुष्य चार सहा महिने वाढवा हवं तर. माझे सगळे भोग, यातना, दु:ख.. तोंडातून ब्र ही न काढता मी निमूट सहन करेन. पण मी अखेरचा श्वास घेईन, तेव्हा माझ्या नवऱ्याने घाम गाळून मिळवलेले साडेतीन लाख रुपये जसेच्या तसे त्याच्याजवळ शिल्लक रहायला हवेत… ‘
ही गजानन महाराजांसमोर तिने मांडलेली तिची कैफियत होती! आणि.. आणि.. महाराजांनी तिचं गा-हाणं ऐकलं होतं…! “
आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर! आणि त्याच क्षणी हे ‘गजानन महाराज’ कोण हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती! !
‘तू स्वतःच एकदा वेळ काढून ही पोथी वाच म्हणजे तुला नीट समजेल गजानन महाराज कोण ते.. ‘ असं माझी ताईच एकदा मला म्हणाली होती आणि आता ते जाणून घ्यायची प्रेरणा द्यायलाही माझी ताईच अशी निमित्त झाली होती!
पुढच्या सगळ्या शोधाचा त्या दिशेने सुरू झालेला माझा प्रवास आणि त्या प्रवासवाटेवर आलेले अनुभव माझ्या ताईच्या जाण्याच्या दुःखाचं सांत्वन करणारे होतेच आणि अलौकिक आनंदाच्या स्पर्शाने मला कृतार्थ करणारेही! ! त्या अनुभवांचा माझ्या अंतर्मनाला झालेला स्पर्श हा माझ्या आठवणींमधला अतिशय महत्त्वाचा तितकाच मोलाचा ठेवा आहे!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈