? विविधा ?

☆ तारा…भाग – 7 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली सुग्रीवचे युध्दाचं आव्हान स्विकारण्यास बाहेर येऊ लागला, त्यावेळी मात्र तारा निश्चयाने वालीला अडवण्याच्य दृष्टीने त्याच्या समोर आडवी येऊन, अत्यंत केविलवाणेपणाने, दिनवाणीपणाने यावेळी न जाण्याबद्दल त्याला विनवून अडवू  लागली. म्हणाली, “ही वेळ युध्दासाठी योग्य नाही. उद्या प्रातःकाळी युध्दास जावे, आता धोका आहे.” वाली हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, ” सुग्रीवापासुन मला धोका….? अगदी हास्यास्पदच गोष्ट आहे. सुग्रीवासारख्या यतःकिंचित भेकडाचे जर मी आव्हान स्विकारले नाही तर संपुर्ण त्रिखंडांत भेकड वाली म्हणुन नामुष्की, दुष्किर्ती होईल. हे तुला चालेल का?”

तारा कळवळून वालीला म्हणाली, “स्वामी! आज सुग्रीव एकटा नाही. त्याच्या बरोबर अयोध्येचे वीर, पराक्रमी, सत्शील राजपुत्र राम-लक्ष्मण आहेत, ज्यांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा वध करुन नायनाट केला. त्यांनी सुग्रीवाला त्याच्या कार्यात मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तुम्ही सुग्रीवाला कमी लेखू नका. तो सबल आहे. म्हणूनच विनवते, ही वेळ टाळावी. ह्या अशुभ वेळी जाऊं नये.”

वाली म्हणाला, “शुभ-अशुभ मी काही मानत नाही. सुग्रीवाने युध्दाचे अव्हान दिले, ते स्विकारणे माझे कर्तव्य आहे. त्याच्यामागे प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी त्याचा मागच्यासारखा पराभव करुन, त्याला लोळवून नक्की परत येईन.”

तारा म्हणाली, “सुग्रीव तुमचा लहान बंधु आहे. विनाकारण कशाला त्याच्याशी शत्रृत्व ठेवायचे? त्याचे तुमच्यावर किती प्रेम होते जाणत नाही का? त्याने राज्य परत केल्यावरही त्याचेवर आकसाने गैरसमजाने उगीचच संघर्ष कां वाढवायचा? निदान आतां तरी प्रेमाने, समझोत्याने त्याची रुमा त्याला परत करुन गुणागोविंदाने राहावे.”

वाली म्हणाला, “आता ते शक्य  नाही. त्याचा पराभव करुन रुमाला दाखवुन देतो की, तिचा पती किती नालायक आहे.”

त्यावर तारा म्हणाली, “असे नका हो वागू..! असे वावगे वागल्याने अनर्थ मात्र अटळ आहे. इतिहास साक्ष आहे, अहंकार व अत्याचाराची  अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. असे घडले आहे की, जय तर दूरच राहिला पण शेवटी मानहानी व पराभव पत्करुन धुळीस मिळावे लागले आहे.’

परंतु दुराग्रही, हटवादी वाली बधला नाही. उलट जास्तच चेकाळल्यासारखा होऊन पुढे जायला निघाला. ताराचे प्रयत्न विफल झाले, नाइलाज झाला तिचा. शेवटी म्हणाली, “जाताच आहात तर माझी एक इच्छा पुर्ण करुन तरी जा.”

ताराने आसन मांडले. त्यावर वालीला बसवुन पंचारतीने त्याचे औक्षण करतेवेळी तीने अपाद्विनाशक मंत्र म्हटला, पण तिच्या मंत्रातुन आज शक्ती निर्माण झाली नाही. पुढील घडणारे भविष्य तिला कळून चुकले. हे औक्षण अखेरचेच ठरेल याची तिला कल्पना आली. मोठ्या कष्टाने, विकल मनःस्थितीने वालीला निरोप दिला. वाली त्वेषाने निघून गेला.

ताराने अत्यंत शोक करीत मंचकावर धाडकन अंग टाकले. या पतिव्रतेला भविष्यांतील घडणार्यात घटनांची काळाने सूचना तीला दिली असावी.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments