? विविधा ?

☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती !! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.

दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस !

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण । अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.

‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे.

या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात.. परंतु खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या जगाचे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.  

कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीमातेसह पारमार्थिक संवादात जगाच्या उद्धाराविषयी बोलताना गुरुंचे महत्व सांगितले आहे.. त्यास गुरुगिता असे म्हणतात..

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात.

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.

जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.

मित्रांनो साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे !

संग्रहिका – सुश्री नीला ताम्हनकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments