सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments