श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐  आपापली खिडकी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आपापली खिडकी !

समजा आपण बसने कोठे प्रवासाला निघालो आहोत आणि बस स्टॉपवर जरा गर्दी दिसली, तर आपण असा विचार करतो की येणाऱ्या बस मध्ये आपल्याला नुसते जरी चढायला मिळाले तरी भरून पावलो ! कारण इच्छित स्थळी जायला आधीच उशीर झालेला असतो ! कधी कधी अशा गर्दीत, त्या बस मध्ये चढायला मिळाल्यावर त्यात comfortably उभे राहायला मिळाले तरी मग आपल्याला बरे वाटते ! हो की नाही ?

त्याच बस मध्ये इतर वेळी जर थोडी कमी गर्दी असेल आणि आपल्याला कुठेही नुसते बुड टेकायला मिळाले तर आपण लगेच खुश ! 

पण, एखाद्या प्रवासात जर तीच बस आपल्याला खूपच रिकामी मिळते,  तेंव्हा आपण  “खिडकी” ची जागा कुठे आहे का ते बघतो आणि तेथे  बसतो, खरं की नाही ? त्याशिवाय जर तुम्ही बसलेल्या खिडकीच्या बाजूला “ऊन” नसेल तर काय, सोन्याहून पिवळेच की !

आता अस बघा, वरील चारही प्रसंगात “आपण” तेच असतो, पण या चारही वेळेला आपण बस पकडतांना, वेगवेगळा विचार करतो ! तसेच त्या चारही प्रसंगी आपली “सुखाची” व्याख्या  परिस्थितीनुरूप बदलती असते !

प्रत्येकालाच आयुष्यात अशी एक सुखदायक “खिडकीची” जागा आवडत असते आणि ती तशी मिळवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करीत असतो. त्यात काहीच चूक नाही.

आपले आयुष्य म्हणजे सुध्दा एक बस आहे, असं मला वाटतं ! त्या बस मध्ये प्रत्येकाला एक एक, पण निरनिराळी खिडकी तुमच्या नशिबात असेल तेंव्हा मिळावी, अशी सोय त्या विधात्याने केलेली आहे आणि त्यातून प्रत्येकाला दिसणारा जो वेगवेगळा नजारा आहे, तेच आपले आयुष्य आहे असे माझं प्रामाणिक मत आहे !

थोडक्यात काय, तर आपण सुद्धा आपल्या नशिबात जी “खिडकी” आली आहे किंवा येणार आहे त्यातच आनंद मानून, त्यातून दिसणारा जो नजारा आहे त्यातच सुख मानले, त्याचा आनंद घेत घेत जगण्याचा प्रयत्न केला, तर या जगात कोणीच दुःखी राहणार नाही, या बद्दल माझ्या मनांत तिळमात्र शंका नाही !

आपापल्या मनाची काळजी घ्या !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments