श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “आंबामेव जयते…” – लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
अलीकडे ‘पहिला आंबा खाणं’ हा एक इव्हेण्ट झालाय. सुरुवातीला आंब्याचा भाव (अर्थात हापूस) हा डझनाला बाराशे रुपये असतो. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा बाराशे रुपये पगार हा ‘वलयांकित’ पगार होता. ‘‘मला फोर फिगर पगार आहे, ’’ हे ‘मेरे पास माँ है’ थाटात सांगितलं जायचं. आता त्या भावात बारा आंबे मिळतात.
आपण आंबे विकणाऱ्याला ‘चल एक आंबा वर घाल’, असं टिपिकल मध्यमवर्गीय थाटात सांगितलं की तो वर सुनावतो, ‘‘एक आंबा म्हणजे किती रुपये झाले कळतं ना?’’ नशीब तो विचारीत नाही, ‘कोथिंबीर, लिंबू किंवा दोन बोंबील आणि आंबा यांतला फरक कळतो ना? सरळ वर घाल म्हणून काय सांगताय?’
दर मोसमात आंब्याचा भाव वाढतो आणि दर मोसमात त्याचं कारण दिलं जातं की, ‘यंदा फळ जास्त आलं नाही’. ‘चांगला आंबा परदेशात पाठविला जातो म्हणून यंदा बाजारात आंबा नाही, ’ हेही अलीकडे या प्रश्नाचं दुसरं उत्तर असतं. पुढेपुढे ‘किती आंबे खाल्ले’ ही इन्कम टॅक्सकडे जाहीर करण्याची गोष्ट ठरू शकते आणि आयकर विभागाच्या धाडीत दहा पेट्या आंबा सापडला ही बातमी ठरू शकते. पण तरीही आंबा हा मराठी माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक कायम राहणार. सोन्याचे भाव वाढतात म्हणून लग्नात मुलीच्या अंगावर दागिने घालणं थोडंच कमी होतं? लहानपणी आईने आंब्याचा पहिला घास भरवला, तिथपासून आजपर्यंत आंबा मी प्रेमाने खात आलोय.
मी जिभेने सारस्वत असल्यामुळे सांगतो, मला बांगड्याएवढाच आंबा आवडतो. तुम्ही मला पेचात टाकणारा प्रश्न विचाराल की, ‘बांगडा की आंबा?’ तर हा प्रश्न, तुला डेटवर कुणाबरोबर जायला आवडेल? माधुरी दीक्षित (अर्थात तरुण) की श्रीदेवी (तरुणच). (आणि हो, मीपण तरुण.) तर उत्तर, दोन्ही, असं असेल. तसंच आंबा आणि बांगड्याबद्दल असेल. तळलेला बांगडा आणि आमरस हे एकाच वेळी जेवणात असणं यालाच मी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणतो.
माझ्या लहानपणीसुद्धा हापूस आंबा महाग असावा. कारण तो खास पाहुणे आले की खाल्ला जायचा. आमरस करण्यासाठी पायरी आंबा वापरला जायचा आणि ऊठसूट खायला चोखायचे आंबे असत. बरं, पाहुण्याला हापूस देताना आंब्याचा बाठा खायला देणं अप्रशस्त मानलं जाई. त्यामुळे बाठा माझ्या वाट्याला येत असे. मला बाठा खायला किंवा चोखायला अजिबात लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. दोन मध्यमवर्गीय संस्कार माझ्यात आजही अस्तित्वात आहेत. एक, आंब्याचा बाठा खाणे आणि दुसरा, दुधाचं भांडं रिकामं झाल्यावर जी मलई किंवा तत्सम गोष्ट भांड्याला चिकटते, ती खाणे. कसले भिकारडे संस्कार, असा घरचा अहेर (माहेरहून आलेला) मला मिळायचा! पण ज्यांनी तो आनंद घेतलाय त्यांनाच माझा आनंद कळू शकेल. एवढंच काय की, घरचं दूध नासलं की मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यात साखर घालून आई ते आटवायची आणि त्यातून जे निर्माण व्हायचं त्यालाच ‘अमृत’ म्हणत असावेत, अशी लहानपणी माझी समजूत होती. आता हा आनंद दुष्ट वैद्यकीय विज्ञानामुळे धुळीला मिळालाय. देवाने माणसाला कोलेस्टेरॉल का द्यावं? आणि त्यात पुन्हा वाईट आणि चांगलं असे दोन प्रकार असताना वाईट कोलेस्टेरॉल का द्यावं? बरं ते कोलेस्टेरॉल जर निर्माण करायचं, तर ते मलईत वगैरे टाकण्यापेक्षा कारलं, गवार किंवा सुरणात टाकलं असतं तर बिघडलं असतं का? आंबाही फार नको, असं सुचविताना डॉक्टर त्यात पोटॅशियम असतं ते चांगलं, असा उःशाप देतो ते बरं असतं.
मला जवळपास सर्व फळं आवडतात. कलिंगड, द्राक्ष (द्राक्षाच्या सर्व पेयांसह), संत्र्यापासून जांभूळ-करवंदापर्यंत. करवंदाच्या आतल्या रंगावरून कोंबडा की कोंबडी खेळ खेळत मी अनेकदा करवंदं खाल्ली आहेत. आता फक्त आठवते ती ग. दि. माडगूळकरांची लावणी, ‘जाळीमंदी पिकली करवंदं’. अजूनही कोकणाच्या दिशेने गेलं की करवंदांची जाळी दिसते. वाटतं कधीकधी लहानपणात शिरावं. मनाला वाटलं तरी शरीराला ते समजावणं कठीण जातं. करवंदाच्या जाळीत आणि लाल एस. टी. त शिरण्याची माझ्या शरीराची सवय गेली ती गेलीच!
असो, तर मी सांगत काय होतो? हं, फळं सर्व आवडली तरी आंबा हा फळांचा खऱ्या अर्थाने राजा! तो मला जेवणाच्या ताटात किंवा बशीत कुठल्याही रूपात आवडतो. आमच्या घरी आंबा खास पाहुण्यांना (बायकोची आवडती माणसं) हा सालंबिलं कापून, छोटे तुकडे करून एका ‘बोल’मध्ये छोट्या फोर्कसह पेश केला जातो. असं साहेबी आंबा खाणं मला बिलकूल आवडत नाही. आंबा खाताना हात बरबटले पाहिजेत, सालंसुद्धा चोखलीच पाहिजेत आणि जमलं तर शर्टावर तो सांडला पाहिजे. तरच तो आंबा खाल्ल्यासारखा वाटतो. आंबा ताटात असताना मासे सोडून इतर पदार्थ मला नगण्य वाटतात. विव्ह रिचर्डस् बॅटिंग करताना मैदानावरच्या इतर सर्व गोष्टी नगण्य वाटायच्या तशा! आंबा खाण्यासाठी चपाती, परोठ्यापासून सुकी भाकरही मला चालते.
फक्त एकच गोष्ट मला जमलेली नाही. आमरस भातात कालवून भात ओरपणे! माझ्या एका मित्राला ते करताना पाहिलं आणि मला त्या मित्रापेक्षा आंब्याची कीव आली. आंब्याची गाठ भाताशी मारणं हे मला एखाद्या गायिकेने औरंगजेबाशी विवाह लावण्यासारखं वाटलं. भात ओरपायला आंबट वरणापासून चिकन करीपर्यंत अनेक गोष्टी असताना आमरसाचा वापर का करावा?
आंब्याच्या मोसमात पूर्वी मला लग्नाला जायला आवडे. म्हणजे मी अशा काळाबद्दल म्हणतोय जेव्हा जेवणाच्या पंगती असत, बुफे नसे आणि जेवण हे मुंबईएवढं कॉस्मॉपॉलिटन नव्हतं. आता मराठी लग्नातही ताबा पंजाबी, गुजराती, चिनी, थाई, दाक्षिणात्य, इटालियन, अमेरिकन पदार्थांनी घेतलाय. त्या वेळी सारस्वत लग्नातली कोरडी वडी (जी ओली असून तिला कोरडी का म्हणत ते सारस्वत जाणे), पंचामृत आणि अनसा-फणसाची भाजी! ही भाजी त्या वेळी फक्त श्रीमंत सारस्वत लग्नात असे. कारण त्या भाजीत आंबा, अननस आणि फणस असे त्रिदेव असत. त्यामुळे तिला ग्रेट चव येई. त्या काळी सारस्वत लग्नात अनसा-फणसाची भाजी ठेवणं हा स्टेटस सिम्बॉल होता.
आंब्याचा आणि लग्नाचा संबंध हा जुनाच आहे. किंबहुना आंब्याचा उल्लेख रामायण, महाभारतातही आहे. तसंच पतंजलीचं महाभाष्य आणि पाणिनीची अष्टाध्यायी या ग्रंथांतसुद्धा आहे. हिंदूंच्या सर्व सणांत आणि उत्सवांत आंब्याला महत्त्व दिलं गेलंय. जवळपास सर्वच धार्मिक विधी आंब्याच्या पानाशिवाय होत नाहीत. मंगलकार्यात, मंडपात आणि दारावर आंब्याच्या पानांची तोरणं बांधायची पद्धत आहे. कोणत्याही कलशावर आम्रपल्लव ठेवून मग त्यावर नारळ किंवा पूर्णपात्र ठेवतात. वटपौर्णिमेला स्त्रिया आंब्याची वाणं देतात. आम्रफल हे वांझपण नष्ट करणारं आणि गर्भप्रद मानलं जातं.
आंब्याच्या सुमारे दोनशे जाती आहेत, पण माणसाप्रमाणे आंब्यांतला जातिभेदही मी मानत नाही. हापूसपासून राजापुरी, तोतापुरी, बाटली आंबा वगैरे कुठलाही आंबा मला आवडतो आणि मी तो खातो. लहानपणी तर मी कैरीपासूनच सुरुवात करायचो. किंबहुना शाळा-कॉलेजात असताना एप्रिल-मे महिन्यात आंबा आणि सुट्टी या एवढ्याच दोन गुड न्यूज असायच्या. बाकी सर्वच बॅड न्यूज! आधी परीक्षा, मग तिचा निकाल! गीतकार-कवी शैलेंद्रने एका गाण्यात म्हटलंय, ‘जब गम का अंधेरा घिर आए, समझो के सवेरा दूर नहीं’. परीक्षा-निकालाच्या ‘अंधेऱ्या’नंतर (खरंतर त्यामुळे डोळ्यांपुढे अंधारी आल्यानंतर) ताटातल्या आंब्याचं महत्त्व जास्त वाटायचं. तो त्या ‘सवेरा’सारखा वाटायचा. मुंबईत कैरी-आंबा हीच वसंताची चाहूल. एरवी कोकीळ इथे मुंबईत कुठे ऐकायला येणार! आणि ‘परीक्षा आलीए तरी झोपतोय कसला, ऊठ लवकर, ’ हे वडिलांच्या तोंडचे शब्द कोकिळेच्या तोंडातून ऐकायला आले असते तरी ते कर्कशच वाटले असते.
‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’, ही कविता शाळेत न शिकवताही आम्हांला पाठ होती. भारतीय वाङ्मयात आंब्याला, आम्रवृक्षाला मोठं स्थान आहे. कालिदासाच्या निसर्गवर्णनात वसंतागमनसूचक तांबूस, हिरव्या आणि पांढुरक्या आम्रमंजिरीचं वर्णन नेहमी असतं. कामदेवाच्या पंचगटात आम्रमंजिरीचाही अंतर्भाव आहे.
आंबा नुसता जसा मला नुसता खायला आवडतो तसा कुठल्याही रूपातला आंबा मला आवडतो. उदा. कैरी, कैरीचं पन्हं, लोणचं, मोरांबा, आंबटगोड लोणचे, आंबापोळी वगैरे वगैरे! फक्त आंब्याच्या कोल्ड ड्रिंक्सच्या वाटेला मी जात नाही. अवाजवी आणि फालतू साखरेला शरीरात यायचं आमंत्रण का द्या? आणखीन एक प्रश्र्न मला पडतो. नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, पण मग आम्रवृक्ष काय कमी उपयोगी नाही. कैरी-आंबा सोडा, बाठा किंवा कोयीचं पीठ पौष्टिक असतं. झाडाचं लाकूड उपयुक्त असतं. आंब्याच्या झाडाच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात. तिच्यापासून रंगही तयार करता येतात. आंब्याचं झाड औषधी असतं, असं म्हणतात.
चला, आता दीड-दोन महिने आमच्या घरी मासळी, आयपीएलपेक्षा आंब्याची चर्चा जास्त असणार. पलीकडच्या कर्वेबाईंनी हापूस स्वस्तात मिळविल्याचा टेंभा मिरविल्यावर माझ्या बायकोचा चेहरा ख्रिस गेलचा कॅच सुटल्यासारखा होणार. पण पुढे आजचा मेनू काय, हा प्रश्न नवरा विचारणार नाही, याचं समाधान असणार. कारण बाजारातला हापूसच काय, बाजारातला शेवटचा बाटली आंबा संपेपर्यंत नवरा शांत असणार.
‘आंबामेव जयते!’
🥭🍑
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
(मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या रिव्हर्स स्वीप ह्या त्यांच्या पुस्तकातून साभार)
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈