श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
वाचताना वेचलेले
☆ प्रिय कामवाल्या बाईस… लेखिका : अनामिका ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
प्रिय कामवाल्या बाईस,
साष्टांग दंडवत!
तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.
आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?
तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/ पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?
तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…
तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.
त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.
दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.
का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!
पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. ‘माझ्याशिवाय’ काही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला ‘नाखुष ‘कोणी करत नव्हते.
अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.
माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.
पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.
आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…
पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…
सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.
माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.
ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्या गोष्टींशी बोलू लागलो.
साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.
आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.
तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.
तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?
अजुन बर्याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.
चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.
वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.
तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,
आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!
कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.
ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.
भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.
अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.
आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाही की ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.
खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.
तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!
एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!
तुझी
दीदी
☆
लेखिका : अनामिका.
प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈