सुश्री ज्योति हसबनीस

हळवा क्षण

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  हळवा क्षण)

काळ भराभर पुढं जात असतो. आणि स्वत:बरोबर आपल्यालाही नेत असतो. कधी स्वखुषीने तर कधी नाईलाजाने, त्याचं बोट धरून पुढे पुढे आपली पावलं पडत राहतात. मागचं सारं काही धुसर धुसर होत जातं आणि त्याच वेळी समोरच्या दृष्यातले रंग अधिकच गहिरे आणि वेधक वाटायला लागतात. बदलत्या आयुष्याशी जवळीक वाढू लागते, गोडी निर्माण होते. जीवनातली लज्जत आणि रंगत अनुभवता अनुभवता एखादा क्षण असा येतो की परत मन झर्रकन काळाचं बोट सोडून पार भूतकाळात मुसंडी मारतं ..आणि शोधू लागतं काही हरवलेलं, निसटलेलं, काळाच्या ओघात दुरावलेलं..!! पाऊस पडल्यानंतरची तरारलेली जुईची वेल आणि वेड लावणारा तिचा सुगंध फार फार बेचैन करतो जिवाला! कर्दळीच्या पानातल्या जुईच्या कळ्यांची पुडीच माझ्या नजरेसमोर येते आणि पार माझ्या शाळा कालेजच्या दिवसात घेऊन जाते ती मला ! आई-बाबांचं सहजीवनच साकारतं माझ्या डोळ्यासमोर! छोटंसं घर आमचं चाळीतलं, बाग कुठे असणार तिथे ! पण बाबा अतिशय रसिक, आईची फुलांची आवड  ओळखून न विसरता पावर हाउस वरून येतांना जुईच्या कळ्या तोडून कर्दळीच्या पानांत बांधून आणायचे , आणि शाळेतून आलेली थकलेली आई प्रसन्न्  चेहऱ्याने गजरा करायची! गजरा लावतांनाचा तिचा आनंदी चेहरा अजूनही डोळ्यांसमोर तस्साच आहे, आणि आफिसमधून आल्यावर लगबगीने आईच्या हातात ती हिरवी पुडी देतांनाची बाबांची कृतकृत्य भाव असलेली छबी तश्शीच मनावर कोरली गेलीय ..!

काळाबरोबर भरपूर पुढे आलेय ..भरपूर काही मागे राहिलंय पण आई-बाबांच्या सुखी समाधानी सहजीवनाच्या स्मृती तर कालातीत आहेत …नेहमीच पाऊस पडणार …जुई तरारणार ..आणि त्या हिरव्या गार पुडीतल्या जुईच्या कळ्या मला परत लहान करणार ..आई-बाबांकडे घेऊन जाणार ..

येतो असा एखादा क्षण खुप हळवं करून जाणारा …!!

© ज्योति हसबनीस

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments