सुश्री प्रभा हर्षे

??

म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा – लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

ओरिसा हे राज्य सुंदर घनदाट जंगलासाठी आणि चिलका सरोवरासाठी प्रसिद्ध आहे.  त्याचप्रमाणे तेथील मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. प्राचीन भारतीय वास्तुशिल्पांचा अप्रतिम नमुना म्हणजे पूरीचे जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचे सूर्यमंदिर. 

माझा एका तत्त्वावर दृढ विश्वास आहे. ते तत्त्व म्हणजे आमची कंपनी कोणत्याही प्रदेशात एक डेव्हलपमेंट सेंटर उघडते, तेव्हा त्याचबरोबर आमच्या इन्फोसिस फौंडेशनचे कार्य सुद्धा त्या भागात तात्काळ सुरू झाले पाहिजे.  याच कारणाने आमच्या फौंडेशनचे कार्य ओरिसामध्ये सुरू झाले. ओरिसा राज्यात प्रचंड गरिबी आहे व त्या भागात सुमारे  १३,५०० बिनसरकारी (एनजीओ) संस्था गरिबातील गरिबांची मदत करण्यासाठी कार्यरत आहेत.

ओरिसा राज्यात बरेच आदिवासी आहेत. सर्व आदिवासी वस्त्या घनदाट जंगलातील दुर्गम भागात आहेत. त्यांच्या स्त्रिया गडद रंगाच्या साड्या परिधान करतात. पोपटी,  गडद पिवळ्या, गडद लाल आणि काळ्याभोर केसाचा अंबाडा घालून त्यात फुले माळतात. ओरिसाच्या जंगलातून प्रवास करत असताना या स्त्रिया दृष्टीस पडणं हा एक सुखद अनुभव असतो.

एकदा मी कलाहंडीला निघाले होते. ते गावही म्हणता येणार नाही, शहरही म्हणता येणार नाही. तिथली खास प्रसिद्ध म्हणता येईल अशी एकही गोष्ट सांगता येणार नाही.  माजुर भुंज किंवा कोरापुट प्रमाणेच ही पण एक आदिवासी वस्ती आहे. 

असं म्हणतात की स्वातंत्र्यपूर्ण काळात या कलाहंडीवर एक राजा राज्य करत होता.  हा राजाच आपला प्रतिपाळ करणारा, तारणहार आहे असा तेथील आदिवासींचा विश्वास होता व त्या राजाला दैवी शक्ती प्राप्त आहे,  अशीही त्यांची समजूत होती. हे आदिवासी इतके निष्पाप आहेत की राजेशाही संपुष्टात आली असल्याची त्यांना कल्पनाही नाही. अजूनही एखादं मुलं अनाथ झालं तर ते त्याला नेऊन कलेक्टरच्या दारात ठेवून येतात. त्यांच्या दृष्टीकोनातून राजा हा त्यांचा सर्वश्रेष्ठ त्राता असतो.

कलाहंडीचे जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे भवानी पट्टनम.  ते इतर जिल्ह्याच्या ठिकाणांपेक्षा निराळ आहे.  ते एक छोटसं गाव आहे.  मी आज पर्यंत जी काही जिल्ह्याचे ठिकाण पाहिली, त्यापेक्षा ते अगदीच वेगळे आहे, उदाहरणार्थ माझं जन्मगाव म्हणजे धारवाड.  खरंतर हे भवानी पट्टनम इतकं झोपाळलेलं गाव आहे हे पाहून मला फार आश्चर्य वाटलं. 

त्या गावातील अनाथ मुलांसाठी, अविरतपणे काम करत असलेल्या एका एनजीओला भेटायला मी गेले होते. त्याच्या डोक्या वरील प्रत्येक पांढरा केस त्याच्या आयुष्यभराच्या निस्वार्थ त्यागाची कहाणी सांगत होता.  या अनाथ मुलांची सेवा करताना स्वतःच्या मनात कोणतीही प्रतारणा येऊ नये यामुळे त्यांनी स्वतः विवाहसुद्धा केला नव्हता.

भुवनेश्वर पासून केसीना या भवानीपट्टनमच्या जवळच्या रेल्वे स्टेशन पर्यंतच्या प्रवासात मी या आदिवासीचं निरीक्षण करत होते.  ते आपली ट्रेन येण्याची वाट पाहात अत्यंत शांतपणे प्लॅटफॉर्मवर थांबत. ते अननस, रानटी केळी, बटाटे अशा विविध वस्तू बांधून घेऊन निघालेले असत.

माझ्याबरोबर एक दुभाष्या होता. कोणत्याही भागातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन काम करायचं तर त्या भागातील लोकांची भाषा येणे अत्यंत महत्त्वाचा असतं.  या आदिवासी विषयी माझ्या मनात हजारो प्रश्न उमटले होते.  संस्कृती विषयी त्यांच्या काय कल्पना होत्या, त्यांची जीवन पद्धती कशी होती इत्यादी. हे आदिवासी नेहमी घोळक्यानेच राहतात असं मला सांगण्यात आलं होतं. आपण सुसंस्कृत लोक रूढी परंपरांचा आणि रितीरिवाजांचा जसा बाऊ करतो तसा हे लोक करत नाहीत.

त्यांचं वागणं सरळ, साधं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी मालमत्तेची संकल्पना त्यांच्यात जवळ जवळ आढळतच नाही.  या लोकांची जवळून ओळख करून घेण्याची मला तीव्र इच्छा होती.  त्या लोकांना कोणत्यातरी मार्गाने काहीतरी मदत करावी व त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये,  त्यांची स्वतःची ओळख हरवली जाऊ नये हा माझा उद्देश होता.

या लोकांची गाठ घेण्यासाठी मला किमान दोन मैल पायी चालावं लागेल असं मला माझ्या दुभाष्याने सांगितलं. त्यांच्या छोट्या घरापर्यंत पोहोचायला गाडीचा रस्ताच नव्हता. मी तयार झाले. 

बराच वेळ चालल्यावर अखेर एक गाव लागलं. मला एक स्त्री भेटली. मला तिच्या वयाचा काही अंदाज करता येईना. तिच्या तोंडची बोली भाषा जरा वेगळीच होती. त्यामुळे आमच्या दुभाष्याला तिचं बोलणं मला समजावून सांगण्यास जरा कष्ट पडत होते. ती स्त्री काळीसावळी, काळ्याभोर केसांची होती.  ती सहज सत्तर वर्षाची असेल,  पण तिच्या डोक्याचा एकही केस पांढरा नव्हता. तिने केसांना रंग वगैरे लावलेला असण्याचा प्रश्नच नव्हता. मग तिचं गुपित तरी काय असावं ? त्या दुभाष्यालाही काही सांगता येईना.  पण हे गुपित तिचं एकटीचंच नव्हे तर त्या वस्तीतील प्रत्येकच माणसाचं होतं,  कारण त्यांच्यापैकी कुणाचाही एक सुद्धा केस पांढरा नव्हता.

त्यानंतर मला एक म्हातारा माणूस भेटला. मी म्हातारा म्हणते आहे खरी.. पण त्याचं सुद्धा वय नक्की किती असावं हे सांगणं फार कठीण होतं. आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले,  त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशेचार वर्षाचं असावं. 

या म्हाताऱ्याशी माझं संभाषण चांगलं रंगतदार झालं. मी त्याला विचारलं,  आपल्या देशावर कुणाचे राज्य आहे ?

त्याच्या दृष्टीने देश याचा अर्थ कलाहंडी एवढाच होता, हे उघडच होतं. त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला. तुम्हाला माहित नाही ? आपल्या देशावर कंपनी सरकारचं राज्य आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ईस्ट इंडिया कंपनी.  भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, याची त्या म्हाताऱ्याला कल्पना नव्हती. 

मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोक चक्र दाखवलं.  

पण त्यांचा त्याच्यावर काही प्रभाव पडला नाही.  हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे.  त्याच्याकडे पाहून थोडेच कळणार आहे,  आपल्यावर कुणाचे राज्य आहे ते ? आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे.

इंग्लंडची ती गोरीवाली राणी आता परत गेली आहे व तिचा आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला,  पण त्याला काही ते पटेना. 

आदिवासी जमातीमध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्त्वाची असते, याची मला पूर्ण कल्पना होती.  त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला.  हे पहा,  या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण, खूप खूप साड्या, मिठाची गोणी, आगपेटया….अगदी जमिनीचा तुकडा सुद्धा विकत घेता येऊ शकतो,  याची तुम्हाला कल्पना आहे का ?

त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही लोक आपापसांत भांडता,  वाडवडिलांनी ठेवलेल्या जमिनी सोडून दुसरीकडे जाता,  आपलं हे जंगल सोडून शहरात जाता.  त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्ष जगलोच ना ? आमचे वाडवडील सुद्धा जगले.  आम्ही देवाची लेकरे.  या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहात आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्याच मालकीची नाही. इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही.  कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही. वारा आमची आज्ञा पाळत नाही.  पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी विक्री आम्ही कोण करणार ? मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं काहीच तुमच्या मालकीचं नाही, तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाच्या जोरावर करता ? तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडेल.  

त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं,  ते काही मला समजेना.  त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशीच समजूत होती की,  माझं ज्ञान त्याच्याहून जास्त आहे.

चलनवाढ आणि घट,  राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहिती आहे.  इथे या माणसाला या सगळ्या कशाचीही माहिती नव्हती.  पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता.  भूमी, पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकीण नसते हे त्याला माहित होतं. 

मग जास्त सुसंस्कृत कोण ? कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हातारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments