सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – ३ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

अबुधाबीची संगमरवरी मॉस्क हे २०१४ चे आकर्षण होते. पांढरा शुभ्र संगमरवर वापरलेली  ती माॅस्क उन्हामध्ये अक्षरशः चमचमत होती. जास्त ऊन असेल तर डोळ्याला त्रास होईल इतकी ! माॅस्कमध्ये प्रवेश करताना पूर्ण पायघोळ ड्रेस लागतो. आत प्रवेश केला की, तेथील अतिप्रचंड गालिचा आपले लक्ष वेधून घेतो ! बाप रे ! केवढा मोठा आणि सुंदर, रंगीत डिझाईनचा गालिचा ! थक्क होऊन गेलो आम्ही ! सगळीकडे संगमरवर आणि त्यावर अतिशय उत्तम रंगीत चित्रकाम ! अप्रतिम ! येथील टॉयलेट सुद्धा बघत रहावी अशी सुंदर संगमरवरी ! अतिशय समृद्ध अशी दुबई, अबुधाबी ही ठिकाणे ! अबुधाबीचे कॉर्निशसुद्धा लोकांना फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे…

पण एक ऑफ साईट ठिकाण आम्ही पाहिले ते म्हणजे फ्लेमिंगो रिझाॅर्ट ! तिथे राहण्यासाठी छोटे छोटे बंगले आहेत. जावयांनी तेथील बुकिंग केले होते. खरंतर समुद्रासारखे खेळणारे पाणी तिथे नाही. पण रेझाॅर्टसमोर मुलांना खेळायला जागा, सगळीकडे वाढवलेली हिरवीगार झाडे आणि रेझाॅर्टच्या व्हरांड्यात बसून समोर शांत दिसणारे पाणी पाहत बसायला खूप आवडले ! विशेष म्हणजे जाई जुईसारख्या वासाच्या फुलांचे वेल प्रत्येक बंगलीजवळ होते. एक दोन दिवस घालवायला खूपच सुंदर ठिकाण होते. 

अशीच ‘ मिरॅकल गार्डनची ट्रिप ! एका वर्षी आम्ही मिरॅकल गार्डनला गेलो होतो. तिथे विविध रंगांची फुले आणि विविध आकारात तयार केलेल्या  फुलांच्या व झाडांच्या आकृत्या यामुळे मिरॅकल गार्डन हे दुबईजवळचं खरोखरच मिरॅकल आहे. तिथेही वासाची फुले नाहीत, पण वेगवेगळ्या बोगन वेली आणि  इतर रंगीत फुले, पाने यांनी ट्रेन, प्राण्यांचे,पक्षांचे आकार बनवून बाग सुशोभित केली आहे. 

पाहता पाहता मुलीला दुबईमध्ये जाऊन पंधरा-सोळा वर्षे झाली. दरवर्षी आम्ही बदलती दुबई पहात होतो हेही विशेषच ! २०१९ मध्ये शेवटची दुबई ट्रिप झाली.. या ट्रिपमध्ये ” दुबई फ्रेम ” हे नवीन ठिकाण पाहिले. दुबई फ्रेम खूपच उंच आहे. दोन्ही बाजूंनी लिफ्ट आहे. एका लिफ्टने चढणे आणि दुसरीकडून उतरणे ! या दोन्हींना जोडणारा मोठा काचेचा मार्ग आहे, त्यावरून लोक फिरत असतात. काचेतून खाली पाहिले की माणसे, वाहने, इमारती, खेळण्यातल्या सारखी छोटी दिसतात ! मनात आलं, हे जग म्हणजेच कॅलिडोस्कोप  आहे ! जितकं फिरू तितक्या विविध आकाराच्या, रंगांच्या, प्रतिमा बघायला मिळतात. दुबई हे चिमुकलं राज्य ! पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडच्या वैशिष्ट्यांनी बनलेले ! भारताला जवळचे आणि हिंदी वातावरण असल्याने आपलेसे वाटणारे ! तिथे टुरिझमची जाणीवपूर्वक वाढ केलेली आहे. येथील कायदेकानू कडक असल्याने गुन्हेगारी तशी कमी आहे. इथे वाळूत फारसे काही पिकत नाही, त्यामुळे बरेचसे खाद्यपदार्थ  परदेशातूनच येतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आधुनिक गोष्टींचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. अशी ही दुबईची रंगीबेरंगी दुनिया आहे ! आमच्या दुबईच्या कमीत कमी पंधरा-वीस ट्रिप्स झाल्या असतील ! जून, जुलैचा ऐन उन्हाळा सुद्धा दुबईत अनुभवला आहे ! लेक – जावयामुळे आमचे दुबई वास्तव्य अगदी सुखाचे असते. २०१९ साली  दुबईहून १२ मार्चला पुण्यात आलो, तेव्हा कोरोनाचा प्रभाव सगळीकडे दिसत होता. गेली दोन वर्षे ” दुबई बहोत दूर है ” म्हणत गेली. पण आठवणींच्या कप्प्यात असलेली दुबई कशी कशी बदलत गेली, याचे हे माझ्या अल्पमतीने केलेले निरीक्षण !

– समाप्त – 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments