श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग -1… अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, ” कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, ” तुला साडेसाती सुरू झालीय का? ” असे विचारले. 

त्यावर ती म्हणाली, ” नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे.”

मी म्हंटले ,” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल.”

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, ” झाला तुझा वाह्यातपणा सुरू? “

विनोदाचा भाग सोडला, तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली, 

कोणाची संपली? कोणाची सुरू झाली? काय म्हणून काय विचारता महाराजा, ” साडेसाती ” !     

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला

“साडेसाती “असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असले तरी ती कोणालाही टाळता येत नाही.

`ज्योतिष मानत नाही,` असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडा तरी घाबरतो. 

एक गोष्ट आहे—-

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले, ” लक्ष्मी येताना छान दिसते, आणि शनी महाराज जातांना चांगले दिसतात.”

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही. 

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते. 

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की… ” मी सरांशी गप्पा मारून आलोच ,” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का? “

देशपांडे म्हणाला, “ओरडतात.”

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का? “

देशपांडे: ” वाटतं…, मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते. 

पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे.”

मी : ” काय? “

देशपांडे : ” एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, ” देशपांडे चला, चहा पिऊ.”

चहा पितांना ते म्हणाले, ” देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, आणि साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही .”

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही. 

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो. 

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो, कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. 

कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही , तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला.

अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. 

क्रमशः…

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments