श्री मकरंद पिंपुटकर
☆ नलावडे बाईंची शाळा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती ‘बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा’. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई (8655846810) यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.
बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.
तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.
मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.
सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी कामं देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला ‘धपाटे देईन हं’ असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.
कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.
कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. ‘श्वास’ चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.
खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.
बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.
“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते.
मी तिला सांगितलं ‘तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल’, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. ‘क्लार्कला पैसे द्या’ म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. “
बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.
आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर, पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.
देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.
निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार ‘धपाटे देईन हं’ म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.
बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.
समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :
महंते महंत करावे,
युक्तीबुद्धीने भरावे,
जाणते करून विखरावे,
नाना देशी.
समर्थच असेही म्हणतात की
आपणासी जे ठावे,
ते ते दुसऱ्यासी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकळ जन.
हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.
जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!
आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈