सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ सो द ट्रुथ कम्स आऊट… ☆ सुश्री शीला पतकी ☆
सोलापूर मध्ये अनेक शाळांची मिळून एक विज्ञान दिंडी निघालेली होती. त्यावेळेला एक विज्ञान प्रदर्शन ‘नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल’ मध्ये भरले होते. त्याचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर जयंतराव नारळीकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शालेय मुलांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे नारळीकरांचे व्याख्यान होणार होते. विज्ञान दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी, शाळा सहभागी झालेल्या होत्या. सरस्वती मंदिर पासून हि विज्ञान दिंडी निघून, ती नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौकातून हुतात्मा स्मृती मंदिर जवळ विसर्जित झाली. एका मोठ्या उघड्या टेम्पोमध्ये मी एक रोबोट बनवला होता. त्या रोबोटच्या आत श्रद्धा कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी होती. ती आता अमेरिकेत सी. ए. आहे. उंचीने लहान असल्यामुळे तिला रोबोटचा पूर्ण पोशाख घातला होता. अर्थातच् संपूर्ण रोबोट थर्माकॉलचा बनवलेला होता. हात ताठ होते. मुंडके मात्र हालत होते.
लोक रस्त्यावरून त्या रोबोटला फुलं देत होते, खाऊचे पुडे देत होते. रोबोट सर्वांना हात हालवून अभिवादन करीत होता. अशा पद्धतीने ती विज्ञान दिंडी हुतात्मा स्मृती मंदिर पाशी विसर्जित झाली. त्याचे स्वागत डॉक्टर नारळीकरांसह अनेकांनी केले. रोबोटने नारळीकरांना एक पुष्पगुच्छ दिला. नारळीकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि डोक्यावर हात ठेवला. पण मानवी संस्कारी सवयीप्रमाणे ती खाली वाकली आणि तिचे रोबोटचे तात्पुरते घातलेले मुंडके नकळत खाली पडले. नारळीकर सर पटकन म्हणाले, ‘‘सो द ट्रुथ कम्स आऊट”…
मी त्यांच्या शेजारीच उभी होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘सत्य शोधणे हेच तर विज्ञानाचे काम आहे ना! ! ” त्या माझ्या अपेक्षित आणि पटकन् आलेल्या उत्तरावर ते खूप खुश झाले. त्या दिवशी त्यांचे व्याख्यान खूप सुंदर झाले. त्यांच्या स्वागतासाठी एक खास ‘स्वागत गीत’ मी लिहिले होते आणि आमच्या विश्वकर्मा बाईंनी ते सादर केले होते. झपतालामध्ये ते गीत होते. मला संगीतातला तो ताल-बिल काही कळत नव्हता. मग त्यांनी मला त्या तालातले एक गाणं दिलं… ‘‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा… ” आणि मी त्याच चालीवरती एक स्वागत गीत तयार केले होते. स्वागत गीताला खूप टाळ्या पडल्या. संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर प्रेक्षकांनी भरले होते. त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर झाले. आमच्या विज्ञान दालनाचेही त्यांनी भरपूर कौतुक केले.
अतिशय विद्वान असा हा माणूस होता. भारतीय संस्काराने परिपूर्ण आणि विज्ञानावर विलक्षण निष्ठा होती. खगोलशास्त्रावरती अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. अशा व्यक्तीच्या सहवासात पाच तरी मिनिटे घालवता आली… हे आमचे भाग्यच!
आजच्या खगोलशास्त्रीय विज्ञान संशोधनात त्यांचा खूप मोठा असा ‘सिंहाचा वाटा’ आहे. अशा या महान खगोलशास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. खूप मोठा ऐवज आज आम्ही हरवला आहे. त्यांच्या जाण्याने एक विज्ञान तपस्वी नाहीसा झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈