श्री मंगेश मधुकर
☆ स्वतःबरोबर… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
आयुष्य मोठं गमतीशीर आहे, सतत काहीना काही पाहिजे असतं. एक झालं की दूसरं मग तिसरं..
हे चक्र चालूच.
लहानपणी स्वतःपुरता विचार करणारे आपण, जबाबदारी, कर्तव्य पार पाडताना बदलतो. ‘जगणं’ स्वतःपेक्षा इतरांसाठीच होतं. चिंता, टेंशन्स, काळजी, धावपळ, तडजोडी हेचं रुटीन. सगळं चांगलं आहे पण मन शांत नाही. अस्वस्थता सोबत असतेच तेच ते अन तेच ते… काहीतरी हरवलंय.
विचार करताना लक्षात आलं की, इतरांचं करण्याच्या नादात स्वतःलाच विसरलो. आवडी-निवडी, छंद बाजूला टाकून जगतोय… मग ठरवलं की स्वतःला रिचार्ज करायचं, वय्, स्टेटस. आई-वडील, घर, संसार, बायको, मुलं, ऑफिस. जबाबदाऱ्या, चिंता आणि मोबाइल…. सर्वांना दूर ठेवून एक दिवस स्वतःबरोबर घालवायचा.
बायकोला सांगितलं तर कपाळाला हात लावत म्हणाली “ताप नाहीये”
मी तडकलो तेव्हा तिनं हसत हसत विचारलं….
“नक्की काय करणारेस”
“माहिती नाही. काहीतरी डिफरंट”
“ऑल द बेस्ट, ” म्हणत तिनं हातात टिफिन दिला.
“हे कशाला? ”
“अहो कोलंबस, स्वतःच्या शोधात निघालात तेव्हा बाहेरपेक्षा घरचं खाणं केव्हाही चांगलं”
मोबाईल स्वीच ऑफ करून बाहेर पडलो.
बसस्टॉप पाहून रिक्षानं जाण्याचा विचार बदलला. तसंही खूप वर्षात बसनं प्रवास केला नव्हता. रविवार असूनही बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. शेवटच्या स्टॉपचं तिकीट काढलं. खिडकीतून रस्त्यावरचं ट्राफिक पाहत बसलो. अचानक ओळखीचा परिसर दिसायला लागल्यावर कुठं आलोय ते लक्षात आलं. पुढच्याच स्टॉपला उतरलो. दहावीपर्यंत याच भागात राहिलेलो. नंतर शिक्षण, नोकरीमुळे वेगवेगळ्या शहरात गेलो आणि आता इथंच सेटल झालो…. या सगळ्यात, कधी बालपणीच्या ठिकाणी यायला जमलंच नाही.
आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना योग आला.
…. प्रचंड आनंद झाला. एक भन्नाट फिलिंग. चालत निघालो. एक्साइटमेंट वाढलेली. खूप वर्षानी जुना परिसर पाहताना अंगावर शहारा आला. भिरभिरत्या नजरेनं सगळं मनात साठवताना आठवणींचे एकेक धागे जोडले जात होते…..
…. खूप काही बदललेलं.. एकदोन जुने वाडे सोडले तर सगळ्या नवीन बिल्डिंग आणि नवीन माणसं.
काही जुने थकलेले चेहरे दिसले. आवर्जून भेटलो. ओळख पटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुखावणारा होता.
गप्पांच्या ओघात जुन्या काळात गेलो…..
…. त्या काळातली मजा, मस्ती, खेळ, सण, गणपती मंडळ सगळं डोळ्यासमोर आलं. आमच्या वाड्याच्या जागी झालेल्या बिल्डिंगकडे पाहताना वाड्यातल्या असंख्य कडू-गोड आठवणी नजरेसमोर आल्या. खूप भरून आलं… ‘आठवणी’ आपल्याला मिळालेलं फार मोठं वरदान. त्या नसत्या तर माणसं दगड झाली असती. आठवणींचा घोळका सोबत घेऊन बराच वेळ गल्लीबोळातून भटकलो. अजूनही जुन्या काळाची जाणीव करून देणारे अवशेष काही ठिकाणी शिल्लक होते.
…. फिरताना आपसूकच पाय जवळच्या प्राचीन मंदिराकडं वळले. लहानपणी दररोज यायचो आणि आता तब्बल 22 वर्षांनी पाऊल ठेवत होतो. बरीच पडझड झालेली तरी काही ठिकाणी नवीन बांधकाम आणि दुरुस्ती केलेली. दर्शन घेऊन सभामंडपात डोळे बंद करून ध्यान लावलं… एकेक क्रिया यंत्रवत घडत होत्या. रोजच्या धावपळीत एक क्षणही फुरसत नसते पण आज….
…. सारखी चिडचिड करणारा मी आज खूप शांत होतो. खूप छान वाटलं. बराच वेळ बसलो. आपण एकजागी इतका वेळ शांत बसू शकतो याचं आश्चर्य वाटलं. मन तृप्त झालं पण पोटानं भुकेची जाणीव करून दिली. मंदिरातल्या बाकावर बसून उदरभरण केलं. डबा खाताना ‘तिची’ खूप आठवण आली. तडक निघालो आणि पंधरा मिनिटांत तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो…..
…. अजूनही ती तशीच होती… ‘ माझी शाळा ’.. मनातला अजून एक हळवा कोपरा. जुन्या आठवणी पुन्हा फेर धरून नाचायला लागल्या. आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस पण त्यावेळी कळलंच नाही.
आयुष्यात अनेक गोष्टी या नंतरच कळतात बऱ्याचदा वेळ गेल्यानंतर.. असो..
शाळेचा निरोप घेऊन भरपूर सिनेमे पाहिले तिथं पोचलो. बंद पडलेले, रंग उडालेलं, कचरा आणि झाडा-झुडपांनी वेढलेलं थिएटर पाहून मनात कालवाकालव झाली. लवकर ही वास्तू देखील इतिहासजमा होणार याविषयी खात्री पटली. मल्टिप्लेक्स कितीही उत्तम असली तरी सिंगल स्क्रीनची मजा काही औरच.
शेजारच्या थिएटर इतक्याच जुन्या असलेल्या टपरीवर चहा घेतला. अजूनही तीच चव. अहाहा! ! फार भारी वाटलं.
स्वतः बरोबर फिरताना चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. मस्त, फ्रेश वाटत होतं. खूप आनंदी होतो.
मन शांत होतं. जे शोधत होतो ते सापडलं. महिन्यातून एकदा स्वतःबरोबर फिरायला जायचच असा निश्चय करून घरी जाण्यासाठी बस पकडली…..
…. खिडकीतून पाहताना नकळत गाणं गुणगुणायला लागलो
“सुख म्हणजे नक्की काय असतं.”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈