सौ. मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ माझा जयंतदादा… – लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
नुकतेच ५ एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतताना वासुदेव (माझे पती) सहज बोलून गेले की ‘जयंतदादां सारखी माणसं ह्यापूढे दुर्मिळ असतील’… मी देखील मानेनं दुजोरा दिला होता…
त्यादिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो. खूप गप्पागोष्टी झाल्या. अर्थातच मंगला वहिनीची अनुपस्थिती जाणवत होती पण तसं न दाखवता आम्ही अगदी क्रिकेटसकट विविध विषयांवर बोलत होतो.
जयंतदादानं नवीन लेखनाचे तो तपासत असलेले प्रिंटाऊट वाचायला दिले. माझ्या बाबांबद्दल ‘मोरू परतून आला… ‘ ह्या शीर्षकाखाली प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं.
एका भाच्यानं आपल्या लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती होती. वाचून मन भरून आलं होतं.
माझे वडिल हे जयंतहून ८वर्षांनी मोठे होते त्यामुळे मामापेक्षा एका मोठ्या भावासारखं त्यांचं सख्यं होतं…
नंतर चहापाणी झाल्यावर आरामात निघालो. पण मन जयंतदादाच्या ‘साधी रहाणी उच्च विचारसरणी ‘ अश्या स्वभावात गुंतलं होतं. वासुदेवांनी योग्य शब्दात विचार मांडले आणि मग परतीच्या प्रवासातल्या आमच्या गप्पा दिवसभराच्या घडामोडींची उजळणी करतं झाल्या…
नंतर आम्ही गेला महिना आमच्या व्यावसायिक कामात व्यस्त होतो.
नवीन प्रकाशित इंग्रजी पुस्तकं पुण्यात प्रत्यक्ष भेटून जयंतदादाला द्यायचं चाललं होतं तोच आज सकाळी माझ्या भाचीचा सईचा फोन आला आणि जयंतदादा आता कधीच भेटणार नाही ह्या कल्पनेनं मन सुन्न झालं…
बातमी पसरली होती. परिचितांचे मेसेजेस, फोन येत होते पण आम्ही उभयतां जयंतदादाच्या सुखद आठवणीत स्वतःला सावरुन घेण्याचा फोल प्रयत्न करत होतो.
डॉ. जयंत नारळीकर हा जगप्रसिद्ध वैज्ञानिक -खगोलशास्त्रज्ञ… माझा जयंतदादा म्हणजे सख्खा आते भाऊ…
महाराष्ट्राचं तसचं भारताचं भूषण असला तरी माझ्या बाबांना ‘माझे मोरूमामा’ असं प्रेमानं संबोधणारा, नंदिनीमामी म्हणून कौतुकानं माझ्या आईच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्कानं बोलणारा, कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी मंगलावहिनीबरोबर कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा, वासुदेवांबरोबर आवडीनं क्रिकेटच्या गप्पा मारणारा आणि प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या चिन्मयचं मनापासून कौतुक करणारा प्रेमळ, मनमिळाऊ असा माझा जयंतदादा!!
लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार आणि त्यात आई-वडिल-मामा असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत, गणित, विज्ञानचं नव्हे तर काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते.
माझ्या वडिलांनी (सुप्रसिद्ध गणिती प्रा. मो. शं हुजूरबाजार) रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता. परीणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली ती कायमची! ! ही गोष्ट सर्वश्रृत आहे…
मोरू मामांनी त्यांच्या डॉ. जयंत नारळीकरसारख्या तोपर्यंत जगप्रसिद्ध झालेल्या खगोलशास्त्रज्ञ भाच्यासाठी सुयोग्य पत्नी म्हणून आपली आवडती सुशिल, अतिशय हुशार पण साधी रहाणी असलेली गणिती विद्यार्थीनी मंगला राजवाडे निवडली होती. मामांची निवड सुयोग्य होती.
जयंतदादा आणि मंगलावहिनी एक परीपूर्ण जोडी होती.
आयुष्यातल्या सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत, एकमेकांचा आदर करत पुढं केंब्रिजहून भारतात परत येऊन दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले होते. गीता, गिरीजा आणि लिलावती ह्या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत.
माझी आत्या, म्हणजे माझ्या वडिलांची मोठी बहिण, संस्कृत विदुषि सौ. सुमती नारळीकर आणि आतोबा रॅंग्लर विष्णू नारळीकर ह्यांचे सुसंस्कार आज नारळीकरांच्या पुढंच्या चार पिढ्यांत नकळत जाणवताहेत.
१९ जुलै, १९३८ ह्या दिवशी कोल्हापूरात जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर… वाराणशीत शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवतं इंग्लंडमधल्या केंब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेले आणि रॅंग्लर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाले.
पुढं खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले. अगदी लहान वयात त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण म्हणून सन्मानित केलं होतं.
नंतरही अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळत गेले. विविध विषयावर लेखन करत गेले. त्यांच्या साध्यासोप्या मराठी भाषेतल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली.
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ असले तरी मराठी भाषेत केलेलं लेखन आजही सगळे आवर्जून वाचतात. सर्वसामान्यांना कळेल अश्या मराठी भाषेतून विज्ञान कथा लिहून त्या महाराष्ट्रातल्या गावांगावांत पोहोचवल्या. इंग्रजी भाषेच्या कुबड्या न घेता शुद्ध मराठीत विज्ञानाच्या विविध विषयांवरील त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नारळीकर दांपत्यानं घेतलेले विशेष परीश्रम हे आजही चर्चेचा विषय आहेत…
दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली. आपली सहचारिणी बरोबर नाही हे दु:ख त्यांना मनात जाणवतं असलं तरी त्यावर मात करून कालपरत्वे आता ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. आम्हाला त्यांच्या मनोरंजक खुसखुशीत नेमक्या शब्दात असलेल्या केंब्रिजच्या आठवणी, भारतात येऊन आधी टी. आय. एफ. आर. मधिल आणि नंतर आयुकाची म्हणजेच पुणे येथील सुप्रसिध्द इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सची
उभारणी, त्या काळात आलेले विविध अनुभव वगैरे वाचताना पुढंच्या ब्लॉगची आतुरतेनं वाट पहात असूं…
गेल्या महिन्यात भेटून ह्या सगळ्या गप्पा मारत वेळ छान गेला होता. माझ्या वडिलांनी रचलेली संस्कृत काव्य आणि विडंबनांची पुन्हा एकदा उजळणी झाली होती. आता पुढच्या महिन्यात आमचं नवीन इंग्रजी पुस्तक घेऊन येऊ तेव्हा ही संस्कृत काव्य आणि विडंबनं मी उतरवून घेईन असं म्हणून निरोप घेतला होता. तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल…
जयंतदादा हा आमच्या पिढीसमोर असलेला आदर्श होता. कितीही यश मिळालं तरी जमिनीत पाय घट्ट रूतवून ‘आकाशाशी जडले नाते’ ही शिकवण देणारा माझा जयंतदादा… तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके डॉ. जयंत नारळीकर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या खगोलशास्त्र प्रेमाचा वारसा आपल्याजवळ कायम राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली जयंतदादा.
☆
लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे
मुंबई
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈