सुश्री सुलभा तेरणीकर
☆ “माणुसकीचा खळाळता झरा…डॉ. जयंत नारळीकर” – लेखक : श्री भगवान दातार ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. या थोर शास्त्रज्ञाला शतशः प्रणाम.
या महान शास्त्रज्ञाच्या मनातली माणुसकी दाखवून देणारी एक आठवण आज मनात पुन्हा प्रज्वलीत झाली.
(छायाचित्रे – डॉ. नारळीकर, मंगलाताई नारळीकर आणि संगीता खंडागळे)
६ मे २०१३ च्या साप्ताहिक सकाळमध्ये मी एक लेख लिहिला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या एका कामगाराच्या पत्नीने आपल्या हिंमतीवर धावपटू म्हणून कसं नाव कमावलं याची ती यशोगाथा होती. जिचं सगळं लहानपण आईच्यामागे खुरपणी करत धावण्यात गेलं अशा संगीता खंडागळे हिची ही कर्तृत्व गाथा होती.
– – शाळेचं तोंडहि न पाहिलेली व दिवसाला २ रुपये मजुरी मिळवणारी ही मुलगी लग्नानंतर पुण्यात आली. बोपोडीतल्या एका झोपडपट्टीसदृश वस्तीत तिचा संसार सुरु झाला. तिनेच सांगितलेल्या तिच्या कहाणीत नारळीकर दांपत्याच्या मनातला माणुसकीचा झरा मला ऐकायला मिळाला.
आपल्या जिद्दीवर तिनं अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धातली सुवर्णपदकं पटकावली होती.
पुण्यात एकदा तिनं मॅरेथॉन स्पर्धा पाहिली. मला असं पळता येईल का असा भाबडा प्रश्न तिनं तिच्या नव-याला विचारला. तेथून ती पळण्याच्या इर्ष्येने झपाटली गेली. त्यानंतर सुरु झाली तिची अखंड मेहनत.
साडी नेसणा-या व पायात स्लिपर घालणा-या संगीताताईंनी विद्यापीठाच्या ग्राऊंडवर पळण्याचा सराव सुरु केला. भल्या पहाटे ती पळायला जात असे. घरी लवकर परतण्याची घाई होती, कारण दोन छोट्या मुलांना घरी झोपवून ती पळायला यायची. दोन चार दिवस गेले. मुलं घरी उठून रडायला लागली. शेवटी मुलांना बरोबर घेऊन ती जायला लागली. एका झाडाखाली मुलांना बसवून ती त्यांच्या अवती भवती, तिथल्या तिथं धावायची. मुलं घाबरतील या भीतीनं तिला दूरवर जाता येत नव्हतं.
योगायोगाने एक दांपत्य तिथं रोज फिरायला येत असे. साडी वर खोचलेली ही बाई अनवाणी पायांनी तिथल्यातिथं धावत असल्याचं पाहून त्यांचं कुतुहल चाळवलं गेलं. त्यांनी तिची चौकशी केली. आम्ही तुझ्या मुलांकडे पाहतो, तू पाहिजे तेवढं लांब जात जा असं त्यांनी तिला सांगितलं आणि मग तो रोजचाच परिपाठ सुरु झाला. ते दांपत्य म्हणजे डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगलाताई.
थंडी वाढायला लागली. मुलांना इथं त्रास होईल. तेंव्हा तू त्यांना आमच्या घरीच सोडत जा असं त्या मॅडम संगीताला म्हणाल्या. संगीतालाही ते पटलं. मुलांना त्यांच्या घरी सोडून ती पळण्याचा सराव करायला लागली. त्या काळात दोघेहीजण त्या मुलांची काळजी घेत, त्यांचं खाणं पिणं बघत. मॅडमनी त्यातल्या थोरल्याला थोडं शिकवायलाही सुरुवात केली.
काही दिवस गेले. घरी टी. व्ही. वरच्या एका कार्यक्रमात संगीताने नारळीकरांना पाहिलं आणि ती चमकलीच. दुस-या दिवशी, तुम्ही डॉ. नारळीकर का?, असं तिने थेट डॉक्टरांनाच विचारलं. तेंव्हापासून या परिवाराशी तिचा स्नेह जडला. तिच्या मुलींच्या लग्नाला हे दांपत्य आवर्जून उपस्थित होतं.
मोठं मन म्हणजे आणखी वेगळं काय असतं ?
शाळा न शिकलेल्या, पहिली स्पर्धा बूट न घालता पळणा-या संगीताने पुढे देशोदेशीच्या स्पर्धेत भाग घेतला. अनेक पदकं पटकावली. ही सगळी कथा त्या लेखात मी लिहिली होती.
डॉ. नारळीकरांचे निधन झाल्याची बातमी ऐकून मला ती कहाणी आठवली.
माणुसकीचा एवढा खळाळता झरा ज्याच्या मनात वाहतो त्याला देव माणूसच म्हटलं पाहिजे!
लेखक : श्री भगवान दातार
प्रस्तुती : सुलभा तेरणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈