सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण… ☆ सुश्री शीला पतकी ☆
वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते. साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या, ‘‘बाई, माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो दोन महिन्यांपूर्वी वारला. ” मला जरा धक्काच बसला. कारण मुलगा अगदी तरुण होता… २३-२४ वर्षांचा. त्या बाई पुढे म्हणाल्या, ‘‘त्याची बायको वीस वर्षाची आहे. तिचे काय करावे मला समजत नाही. ”
मी म्हटलं, ‘‘किती शिकली आहे? ”…
त्या म्हणाल्या, ‘‘आठवी नापास झालीय. कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती. मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली. पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले. पोरगी देखणी आहे. वयाने लहान आहे. मी कामाला जाते. घरात माझा दुसरा तरूण मुलगा आहे. म्हणजे तिचा दीर आहे. मला काही सुचत नाही. मी काय करू? ”… मी म्हणाले, ‘‘बाई, शिकवा मुलीला. शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. धुणेभांडे करण्यासाठी ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात”…
मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग. बोलके डोळे… लांब केस… छान उंची, बांधा. हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते. मी म्हणाले, ‘‘हिला शिकवा. ” त्या म्हणाल्या, ‘‘आता कुठे शाळेत पाठवणार? ”… मी म्हणाले, ‘‘माझ्या शाळेत पाठवा. नापास मुलांच्या… तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकूया”… त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती. मी त्यांना सांगितले की ८,०००/- रुपये फी भरावी लागेल. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ”
मी म्हणाले, ‘‘फुकट शिक्षणाची किंमत नसते. मी तुम्हाला एक मार्ग सुचवते”… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती. मी त्यांना एक मार्ग सांगितला की, ‘‘सकाळी ८ ते ११ पर्यंत बालवाडीला सेविका म्हणून तिने काम करावे. साडेअकराला शाळेत बसावे. साडेपाचला शाळा सुटते. जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे. मी तिला महिना पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून कट केले जातील. याप्रमाणे तिची जी काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची शाळेची फी भरेन. फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावीच लागेल. ”
त्यांना ते पटलं. पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या. मी त्यांना दिलासा दिला, ‘‘ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही काळजी करू नका. ” त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे. तुम्ही सांभाळा. ” मी म्हणाले, ‘‘हरकत नाही. आता ती माझी जबाबदारी आहे. ” याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली.
मुलगी हुशार होती. कामाला चपळ होती. एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं. त्यामुळे शाळेला सुट्टी नाही. काम उत्तम व नेटके करत होती. अभ्यासाची गोडी वाढली. आमच्या अनेक शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली. थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची. परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती. या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले. तिचा उत्साह वाढला. मुलगी खरंच हुशार होती, पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती.
हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दरमहा मासिक घातलं जाते. त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी. आणि ते कार्य दुपारी बाराला असते. याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे. तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची… तिला काहीच कळत नव्हते. संसार म्हणजे काय हे कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता. त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती. ती म्हणाली, ‘‘बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय”… मी म्हणाले, ‘‘बोला. ” त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती. ती हिच्या नावावर केलेली आहे. पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही. तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला. पण अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरी येईल. काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो, म्हणून”… ‘‘अगदी खरे आहे. ” मी म्हणाले, ‘‘मग काय विचार केलात? ”
त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते”… खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते. पण तरीही आईच्या सावधपणाने मी त्यांना म्हंटलं, ‘‘का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमच्या थोड्याशा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का? ” त्या म्हणाल्या, ‘‘नाही हो बाई. पोरीला सावत्र आई आहे. बाप कुठवर बघणार. माझ्या घरात तरी काय वेगळं आहे. माझा नवरा आजारी. पोरगा अपंग. ”
लहानपणी झाडावरून पडून एक हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडंसं अपंगत्व आलं होतं त्या मुलाला. बाकी मुलगा चांगला होता. निर्व्यसनी होता. एका दुकानात काम करत होता. बाईचं स्वतःचं घर अगदी भर पेठेत होतं. जुन्या चाळीत रहात असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते. त्यामुळे दोन खोल्यांचं छप्पर डोक्यावर होतं. बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता. आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता. या सर्व दृष्टीने विचार करता ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता’ या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच. मी म्हंटलं, ‘‘मुलीच्या वडिलांना बोलावून घ्या. ”
आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले. बरोबर त्यांच्या नात्यातली चार माणसंही आली. बोला-चाली झाल्या. लग्न ठरले. पण मी त्यांना एकच अट घातली की, ‘लग्न रविवारी करायचं. मुलगी शाळा बुडवणार नाही. ’ एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले. त्यांच्या गावाकच्या त्यांच्या देवाच्या दारात जाऊन लग्न करायचे ठरले. मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या. अर्थात् हे सगळं तिला एकटीला बाजूला घेऊन समजून सांगितले. तिला विचारले, ‘‘हे तुला चालणार आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस. तुझी आणि तुझ्या नवऱ्याची बेडरूम जी होती, तीच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे. त्याच घरात तुला वावरावयाचे आहे. हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? ”
तिची मानसिक तयारी चांगली झाली होती. ती म्हणाली, ‘‘हो. मी हे करेन. तो दिर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याच आहे आणि ती माझी आई पण आहे. ” तरीही ‘आई आणि बाई’ या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याच. मी तिला सांगितले, ‘‘तुझा पहिला नवरा हा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी, त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस. पुरुषांना हे आवडत नसते. त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे. पण त्याचा अहंभाव दुखावेल असे, पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस. आठवणी सांगू नकोस. हे पथ्यं पाळ. म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. ”
हे खरंतर खूप अवघड होते. पण तिला निभावणे भाग होते… झाले… मग काय? लग्न झाले… सोमवारी नवी नवरी आणि जावई पाया पडायला आले. शाळा सुरू झाली. जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला… त्यानंतर आमची अभ्यासिका, परीक्षा, सराव परीक्षा… हे सगळं पार पडलं. आणि मुलगी ७५% गुणांनी पास झाली…
मग पुढचा विचार सुरू झाला. तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलावून घेतले. आणि सांगितलं की, आता स्वत:च्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षण तिला दिले पाहिजे. ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते. लगेचच मी आमच्या इथे असलेल्या ‘मुळे हॉस्पिटल’ मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला. गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षांच्या नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळाला.
‘आता या तीन वर्षाच्या कोर्समध्ये मूल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या’… इतके मी त्यांना सांगितले. खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या, पण काय करणार… इलाज नव्हता. त्यांनीही हे सगळं वेळोवेळी ऐकलं… अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली. लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, त्याच महिला डॉक्टरने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले. नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला.
नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती. आज ती तिथे उत्तम काम करीत आहे. दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे. दोन गोंडस मुले झाली आहेत. संसार सुखाचा चालला आहे. स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…!
मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले, तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे. आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख-समाधान हे मला तिच्या चेहऱ्यावर वाचता येते व लक्षात येतं की, हे केवळ शिक्षणाने घडले आहे.
दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात. ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल, अशा गोष्टी तुम्हाला सापडतात. लक्षात ठेवा शिक्षणाला पर्याय नसतो… न शिकता मोठी झालेली माणसंही आहेतच… पण ते वेगळे. शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही, तर सुखी होतो. म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे की शिका. आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या. जमलं तर एखाद्याला लिहायला, वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…!
मग काय? … करा सुरुवात… ‘जून’मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा. शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षणाची गोडी लावा. त्याला प्रवाहात आणा. खरंच, इतके तरी आपण करू शकतो ना…!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈