सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ पासवर्ड… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” आई, तू रडू नकोस हं” इवल्याश्या गो-या गो-या हातांनी आईला मिठी मारत श्रीहान बोलला..

श्रीहान.. माझ्या बहिणीचा नातू.. भाचा सौरभ नि भाचेसून यशश्रीचा लेक.. पाच वर्षांचा.. गोड नि लाघवी मुलगा..

सौरभ, यशश्री, सानवी म्हणजे श्रीहानची थोरली बहीण आणि श्रीहान.. सोलापूरला आमच्याकडे आलेले..

रात्रीची जेवणं झाल्यावर 

आम्हा मोठ्यांच्या गप्पा रंगल्या..

नि सानवी नि श्रीहान खेळात गढून गेले..

खेळाचं रूपांतर कधी भांडणात झालं ते कळलच नाही..

पाठीवर पडलेल्या धपाट्याचा जोरदार आवाज ऐकू आला.. नि आम्ही तिकडे धावलो..

श्रीहानचे निळेशार डोळे पाण्याने गच्च भरले होते..

पण त्याला आपण शूर आहोत, हे दाखवायचं होतं.. त्यामुळे डोळ्यातून पाणी बाहेर पडू न द्यायची त्याची धडपड चालली होती..

लेकराच्या भरलेल्या डोळ्यांनी आईचं हृदयही गदगदलं…

तिने त्याला छातीशी धरलं..

“श्रीहान, तू शूर आहेस नं..? रडायचं नाही.. ” तिने त्याच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला..

त्यानं का कुणास पण तिच्या डोळ्यात पाहिलं…

“आई, तू… रडू नकोस हं…” त्याच्या चिमुकल्या हातांनी तिला कवेत घेतलं..

त्याच्या या आईला ” तू रडू नकोस” म्हणण्यानं सगळ्यांनाच हसू फुटलं.. त्याच्या माऊलीला सुद्धा…

आईच्या चेह-यावरच्या त्या हास्यानं काय जादु केली.. माहीत नाही..

त्याच्या अंगात काहीतरी संचारलं..

त्याने पटकन डोळे पुसले.. नि बहिणीच्या पाठीत जोराचा गुद्दा घालून तो विजयी भावनेने आईकडे पाहू लागला.

आईच्या चेह-यावरच्या एका हास्यानं त्या पिल्लात केवढा आत्मविश्वास निर्माण झाला..! !

नवजात अर्भक.. भुकेच्या नि वेदनेच्या पलीकडील काहीही न कळणारं..

आईच्या, जिवलगांच्या चेह-याकडे… त्यांच्या चेह-यावरच्या हास्याकडे.. त्यात स्वत:बद्दल असलेल्या कौतुकाकडे पहात मोठं होतं.. नि अगदी महिन्या-दोन महिन्याच्या वयात “हसणं” ही भावना त्याच्यात अलगद जन्माला येते..

ते आपल्या मातेकडे पाहून पहिल्यांदा हसतं तेंव्हा त्या माऊलीला आकाश ठेंगणं होऊन जातं..

आणि ती जेंव्हा पुन्हा त्याच्याकडे पाहून प्रतिसादात्मक हसते, तेंव्हा त्याला आयुष्याचा ” पासवर्ड” मिळतो..! !

त्याचं कुशीवर वळायला लागणं, पालथं होणं, बसायला लागणं, उभं राहणं, चालणं, धावणं.. प्रत्येक पहिल्या कृतीच्या वेळचा माऊलीच्या चेह-यावरचा आनंद.. दहा हत्तींचं बळ देणारं हसू.. त्या बाळाला.. प्रगतीच्या मार्गावर अलगद पोहोचवतं..

आपल्या आजारपणात पाण्यानं भरलेले नि आपल्या यशानं चमकलेले माऊलीचे डोळे यांतला फरक कळण्याइतकं ते बाळ मोठं होतं नि आईच्या चेह-यावर हसू आणण्यासाठीची त्याची धडपड सुरू होते..

शाळेत मिळालेले चांगले गुण, परीक्षेत मिळवलेला पहिला नंबर, निरनिराळ्या स्पर्धांमधून, खेळांमधून मिळालेल्या यशाने जन्मदात्रीबरोबरच, वडील, आजी-आजोबा, भावंडं, गुरुजन यांच्या चेह-यावरचं कौतुकाचं हास्य आता त्याचा प्रेरणास्त्रोत झालेला असतो..! !

वाढत्या वयाबरोबरच निसर्ग पासवर्डची साईट बदलतो..

“तो ” असेल तर त्याला ” तिच्या ” चेह-यावरचा 

 आणि

” ती ” असेल तर तिला ” त्याच्या ” चेह-यावरच्या आनंदाचं व्यसन लागतं..

त्या खास चेह-यावरचं कौतुक पाहण्यासाठी तो कायकाय करतो…

कुणी आभाळाएवढं शिक्षण घेतं..

कुणी सातासमुद्रापार जातं..

कुणी जीवावरचा धोका पत्करून काम करतं..

कुणी जीवापलिकडचे काबाडकष्ट करतं..

कुणी स्वत:ला सजवतं..

कुणी पोटातून हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी अन्नपूर्णेची उपासना करतं…

तर कोणी घरच्या लक्ष्मीच्या चेह-यावरच्या समाधानासाठी लक्ष्मीची आराधना करतं! !

कुणाची गज-याची, कुणाची हि-याच्या दागिन्याची….

कुणाची नाजुक बोटांनी बनवलेल्या अलवार चिरोट्याची..

तर कुणाची घट्टे पडलेल्या हुळहुळत्या हातांनी थापलेल्या भाकरीची…

प्रत्येकाची वेगवेगळी धडपड…

पण सगळ्यांचा पासवर्ड मात्रं तोच..

जिवलगाच्या चेह-यावरचं ” हसू “…! !

आणि एकेदिवशी त्यांच्या वेलीवर एक नाजुकशी कळी उमलते..

नि ती त्यांच्याकडे पाहून जेंव्हा पहिल्यांदा खुदकन् हसते…

तेंव्हा वर्तुळ पूर्ण झालेलं असतं..

अख्खी अलिबाबाची गुहा त्या ” इवलुशा तिळाच्या पासवर्डनं ” सताड उघडलेली असते..

डोळ्यात न मावणा-या त्या खजिन्याच्या तेजानं डोळे वाहू लागतात..

आता त्या दोघांचं सारं काही सुरू होतं ते त्या “कळीच्या” चेह-यावरचं ते “पहिलं हसू” त्या दोघांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसच ठेवण्यासाठी..

भोवतालची तमा न बाळगता, लाज सोडून अगदी गर्दीतही अंगावर पाजलेलं दूध, तान्ह्याचं रडणं थांबून त्याचा हसरा चेहरा पाहण्यासाठी जागलेल्या अनंत रात्री, चिमुकल्यानं बोळकं पसरून केलेल्या हास्यामुळे होणा-या विश्वदर्शनासाठी पाठ दुखत असतानाही त्याचं घोडा होणं नि पिल्लाला घरभर फिरवून आणणं..

बक्षीस घेताना त्या बालजीवाच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासाठी तिने घेतलेली दिवसरात्र मेहनत…

सारं काही फक्त त्या काळजाच्या तुकड्याचं हसू चिरंतन रहावं म्हणून…

“बदल”… हाच आत्मा असणारा निसर्ग…

आईवडिलांचा चेहरा पहात…

त्यांच्या दु:खाने दु:खी होत् नि त्यांच्या आनंदाने मूठभर मांस अंगावर चढणारं ते लेकरू मोठं होतं..

त्याची मरूस्थळं बदलतात..

त्याचं वेगळं विश्व निर्माण होतं..

जिथं या मावळत्या सूर्यांच्या उर्जेची गरज नसते.. ना त्यांच्या चेह-यावरच्या आनंदाची..

आता फक्त असतं…..

त्याच्यासाठी तिच्या आणि तिच्यासाठी त्याच्या सुरकुतलेल्या चेह-यावरचं थकलेलं हसू…! !

तिने चेपून दिलेली त्याची दुखरी पावलं, त्यानं आणून दिलेला किराणामाल, त्याचे दात काढलेले म्हणून तिनं निगुतीने केलेली मऊसर खिचडी…

तिने न सांगताही त्याने आणलेली तिची औषधं…

सुनेसमोर त्याने खंबारपणे घेतलेली तिची बाजू…

अशा जगाच्या दृष्टीने किरकोळ गोष्टीही

जोडीदाराचा चेहरा हसरा करण्यासाठी पुरेशा असतात…

अशातच एक दिवस तो देव नावाचा कोणीतरी त्यातल्या कुणातरी एकाला घेऊन जातो… राहिलेल्याची करूण मजा पाहण्यासाठी…

आता त्या एकट्याला कुणाच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी जगावं, हे कळेनासं होतं..

जगण्यासाठीचा पासवर्डच हरवलेला असतो!!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments