सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ हाबुराचे दही – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

जेवणात दही कोणाला आवडत नाही? मधुर आणि ताजं दही म्हणजे जेवणातलं अमृत. आमच्या घरी दुधात दोन-चार चमचे ताक किंवा एक दोन चमचे दही टाकून विरजण लावायची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने विरजण लावून बरं चाललं होतं…

अशात एकदा युट्यूब बघता-बघता मला दही विरजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसू लागल्या. उत्सुकता म्हणून मी त्या बघितल्या आणि मग माझे सत्याचे प्रयोग सुरू झाले.

रात्री दुधात देठासकट हिरवी मिरची टाकून झाकून ठेवलं. आता व्हिडिओतल्यासारखं मस्त घट्ट दही तयार होणार असं स्वप्न बघत झोपी गेले. सकाळी उठून पाहिलं तर त्या विरजणाच्या दुधाला घाणेरडा वास येत होता. मग ते कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.

त्यानंतर दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून विरजण लावून पाहिलं तर ते दही बेचव आणि कडवट लागलं. मग कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. तुरटी फिरवून दही लावून पाहिलं. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.

त्यानंतर हस्त नक्षत्राच्या पावसाचं पाणी दुधात मिसळल्यावर फार सुंदर दही होतं असं वाचलं. मग एके दिवशी जोराचा पाऊस सुरू झाल्यानंतर मी स्टीलचं पातेलं घेऊन गच्चीत गेले. संपूर्ण भिजले पण पातेल्याच्या बुडाशी जमेल इतकं पाणी गोळा करूनच आणलं. मग हे बड्या मुश्किलीने पकडलेलं हस्तजल दुधात घातलं.

पण दूध खराब होण्यापलीकडे काहीच झालं नाही. कदाचित ते वेगळंच नक्षत्र असावं. एक तर हस्त नक्षत्र ओळखण्यात मी चुकले असेन किंवा हस्त नक्षत्राने मला हस्त हस्त फसवलं असेल. पण दही काही लागलं नाही. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातले.

त्यानंतर कवडी दही बनविण्याची रेसिपी बघितली. संक्रांतीचं सुगड स्वच्छ धुवून दोन दिवस ते पाण्यात बुडवून ठेवलं. मग त्यात तापवून थंड केलेलं निर्जंतुक दूध आणि थोडं ताकाचं विरजण घातलं. सुगडाला “यशस्वी भव” असा आशीर्वाद देऊन झाकण लावून ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी दुधातलं पाणी झिरपून गेलं आणि उर्वरित घन पदार्थ गाडग्याला आतून चिकटून बसला. तो चमच्याने खरडून काढावा लागला.

दह्याचं आणि माझं काय वाकडं आहे कोण जाणे.. चिनी मातीच्या सटात दही चांगलं सटसटीत होतं म्हणून ते करून पाहिलं. पण सटानंसुद्धा माझी सटकवली. एकदा एक मैत्रीण म्हणाली की काचेच्या बाटलीत दही खूप चांगलं विरजतं.

मग एक लांब मानेची स्मार्ट बाटली हुडकून काढली आणि तिच्या पोटात दही लावून बाटली डायनिंग टेबलवर ठेवली. बाटलीचं प्रतिबिंब टेबलाच्या काचेत अतिशय सुंदर दिसत होतं. वेगवेगळ्या प्रकारे लाईट टाकून त्याचे दहा-बारा फोटो काढले. बाटली तर खूपच सुंदर दिसत होती. पण दही मात्र सामान्य दह्यासारखंच झालं. काचेच्या स्पर्शामुळे त्यात काहीही फरक पडला नाही.

पण बाटली धुताना मात्र फार त्रास झाला. बाटलीच्या अप्सरेसारख्या निमुळत्या मानेला आतून चिकटलेलं दही निघता निघत नव्हतं. अखेर अंगणातलं गवत उपटून काटकीला बांधलं आणि बाटलीच्या तोंडातून गवताचा बोळा आत घालून बाटलीची मान धुतली. नेहमीप्रमाणे ती दह्याची पचकवणी कढीपत्त्याला नेऊन घातली.

एकदा मी डी मार्टमधून योगर्ट आणून खाल्लं. ते कॅरमलाईज्ड योगर्ट होतं. मग तो सत्याचा प्रयोग करून झाला. यावेळी दह्याला तो विशिष्ट दुर्गंध येऊ नये म्हणून त्यात विलायचीचे दाणे पण टाकून पाहिले. पण घरचं योगर्ट काही केल्या डी-मार्टसारखं लागत नव्हतं. मग अमुल दह्याचे बुडगे आणून पाहिले.

अशी दहीशोधाची यात्रा सुरू असताना मागच्या आठवड्यात ॲमेझॉनवर नवीनच दहीपात्र सापडले. त्याला हाबूरपात्र असे म्हणतात. तर हाबूर हा दहा लाख वर्षांपूर्वी तयार झालेला ऐतिहासिक दगड आहे. त्या दगडाच्या भांड्यात लावलेलं दही उत्तम होते असे ॲमेझॉनचं म्हणणं आहे.

हा दगड म्हणे लाव्हा खडकापासून तयार झालेला असतो. त्यात भरपूर मिनरल्स वगैरे असतात. या भांड्यात दूध ठेवलं तर बिना विरजणाचे दही तयार होते असा त्यांचा ऑनलाइन दावा आहे. हे सगळं ठीक आहे…. परंतु छोट्यात छोटे हाबूरपात्र कमीत कमी दीड हजाराचं आहे.

तर हा हाबूर दगड फॉसिलचा एक प्रकार आहे. तो राजस्थानात सापडतो. मार्केटिंगवाल्या लोकांनी माझ्यासारखी दहीपात्रे शोधणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा दांडगा अभ्यास केलेला असतो. आमचा बावळटपणा म्हणजे त्यांची कमाई.

तर भरपूर हाबूर संशोधन केल्यानंतर हाबूरपात्र आपल्या खिशाला परवडणार नाही हे माझ्या लक्षात आले. मग मी गुगलवरून त्याचे भरपूर फोटो शोधून काढले आणि जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन साधारणपणे हाबुराच्या रंगाशी मिळते जुळते दगड शोधायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या काळ्या दख्खनी मातीत तांबुस सोनेरी दगड कधी सापडावेत‌…

पण आजकाल यवतमाळात राजस्थानची वाळू मागवतात. तिचा रंग गुगलवर दाखवलेल्या हाबूरपात्रासारखाच दिसतो. तर कपभर दुधात थोडीशी राजस्थानी वाळू टाकून का प्रयोग करू नये असे माझ्या मनाने घेतले. मनाने घेतले की हातानेही घेतले. माझे हात मनाची आज्ञा पाळण्यासाठी सदैव तत्पर असतात. मग मूठभर वाळू आणून दहा वेळा स्वच्छ पाण्याने धुतली. त्यातली चमचाभर वाळू कपभर दुधात घातली. आणि सकाळी कप उघडून पाहिला. तर दूध जसेच्या तसेच. थोडेसे बुडबुडे येण्यापलीकडे काहीच बदल झाला नव्हता.

मग हे दूध कढीपत्त्याला नेऊन घातलं. मग मी जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन हाबुर दगडाचा एखादा मोठा तुकडा सापडतोय का हे पाहू लागले. दिसला गोल्डन ब्राऊन दगड की उचल… गोल्डन ब्राऊन दगड दिसला की उचल… असे करता करता पिशवीवर गोल्डन ब्राऊन दगड जमा झाले. अखेर त्या दगडी खजिन्यात मला दोन हाबूरला समानार्थी तांबडे तुकडे सापडले. पुन्हा एकदा कपभर दुधाचा प्रयोग केला. हाबुराच्या नादात पुन्हा एकदा चमत्कारिक हाबुर दही तयार झालं. पुन्हा एकदा ते कढीपत्त्याला नेऊन घातलं.

लपलप हलणारे तारुण्याने मुसमुसलेले दही तयार करायच्या नादात कढीपत्ता मात्र चांगला पोसला गेला आहे आणि तेलाने माखलेल्या बाळाच्या जावळाप्रमाणे तुकतुकीत पानांनी डवरून लसलसत आहे. आता कढीपत्त्याचा दहीपत्ता झाला आहे‌. त्याचे पान चावून खाल्ले तरी आंबटसर लागत आहे. आता फक्त ही पाने दुधात टाकून दही विरजते काय ते पहायचे बाकी आहे….

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments